छत्रपती शिवाजीराजांचे व्यापारविषयक धोरण

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी रायगडावर झाला. रायगड ही मराठ्यांची नवी राजधानी म्हणून ओळखली जावू लागली. रायगडावर महाराजांनी राजदरबारापासून विविध इमारती बांधल्या. रायगड हा सुसज्ज गड तयार केला. रायगडावरील भव्य, देखणी व सुसज्ज बाजारपेठ हे शिवाजी राजांच्या व्यापारविषयक धोरणांवर प्रकाश टाकते.

‘‘राजधानीच्या गडावर बाजारपेठ असली पाहिजे व व्यापार झाला पाहिजे’’ ही शिवाजीराजांची भावना त्यातून स्पष्ट होते. बाजारपेठेतील दुकानांचे अवशेष आजही बाजारपेठेच्या भव्यतेची जाणीव करून देतात. रायगडावरील बाजारपेठ हे केवळ सौंदर्यस्थळ नसून, मराठ्यांच्या व्यापारविषयक धोरणांचे स्मारकच म्हणावे लागेल.

घोड्यावरुन खरेदी करता यावी अशी उंच जोपी, दर्शनी दुकानाच्या मागे माल साठविण्यासाठी वेगळी खोली या सर्व गोष्टी पाहताना आजही अचंबा वाटतो. मराठी माणसांना व्यापार येत नाही, असे म्हटले जाते; मात्र शिवछत्रपतींनी त्यांच्या अत्यंत धामधुमीच्या कामातही व्यापाराबद्दल सुस्पष्ट धोरण आखलेले दिसते.

शिवछत्रपतींचा स्वतःचा व्यवहारही अत्यंत काटेकोर होता. शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाला भेटायला गेले त्यावेळेस औरंगजेबाने महाराजांचा केलेला अपमान, महाराजांनी मराठ्यांच्या स्वाभिमानाचे प्रदर्शन करीत दाखवलेले धैर्य व त्यांची आग्र्याहून सुटका हा इतिहास आपल्याला माहिती आहे. आग्र्याला कैदेत टाकल्यानंतर महाराजांनी औरंगजेबाच्या अनेक मोठ्या सरदारांना रोख रकमा व देणग्या देण्याचा धडाका चालवला. त्या लोकांनी महाराजांना दक्षिणेत परत जाऊ द्यावे यासाठी औरंगजेबाकडे आपला शब्द खर्ची करावा, अशी महाराजांची अपेक्षा होती. यासाठी कराव्या लागलेल्या अवाढव्य खर्चाने महाराजांकडील द्रव्य संपले.

मिर्झाराजे जयसिंह यांचा मुलगा राजा रामसिंह यांच्याकडून महाराजांनी खर्चासाठी मोठी रक्कम घेतली व त्याला हुंडी लिहून दिली. हुंडी हा एक प्रकारचा धनादेशच होय. महाराज कैदेत असताना रामसिंहाचे लोक ती हुंडी घेऊन राजगडावर गेले व त्यांना हुंडीत लिहून दिलेली रक्कम मिळाली. ‘हा राजा शत्रूच्या कैदेत असतानाही त्याच्या धनादेशाचा अनादर झाला नाही’ ही गोष्ट पुरेशी बोलकी आहे. आज धनादेशाच्या अनादराचे प्रचंड खटले सर्वच न्यायालयात प्रलंबित असलेले दिसतात. या पार्श्वभूमीवर शिवाजीराजांचा  काटेकोर आर्थिक व्यवहार निश्चितच नजरेत भरतो.

राज्य शासनाने प्रकल्पग्रस्तांना अनेकदा नुकसान भरपाईच्या दिलेल्या धनादेशाचा अनादर झाला आहे, अशा बातम्या आपल्याला दिसतात. या पार्श्वभूमीवर शिवाजीराजांचे वेगळेपण उठून दिसते.

‘आज्ञापत्र’ या ग्रंथात महाराजांचे व्यापारी धोरण अधिक विस्ताराने स्पष्ट होते. आज्ञापत्रातील ‘साहुकार’ हे प्रकरण शिवाजीराजे हे व्यापार वाढावा यासाठी किती दक्ष होते ही गोष्ट स्पष्ट करतात. आज्ञापत्रातील ‘साहुकार’ हा शब्द आजच्या ‘सावकार’ या शब्दाशी संबंध नसलेला शब्द आहे. ‘साहुकार’ याचा अर्थ व्यापार करणारा, भांडवलदार, व्यापारी या अर्थाने आज्ञापत्रात वापरला आहे. व्यापार वाढवण्यासाठी राजांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे आज्ञापत्रात लिहिले आहे. व्यापार्‍यांना जास्तीत जास्त सोयी व सवलती देणे आवश्यक असल्याचेही नमूद केले आहे.

‘‘राज्याचा व्यापार म्हणजे राज्याची शोभा आहे’’ हे आज्ञापत्र वाचल्यावरच समजते. परराज्यातील चांगले व्यापारी स्वराज्यात आणून त्यांना व्यापारासाठी उद्युक्त करणे हे महाराजांचे ध्येय असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

व्यापार्‍यांना प्रतिष्ठा मिळावी एवढेच आज्ञापत्र सांगत नाही. व्यापार्‍यांना आपल्या लग्नसमारंभाना बोलावून त्यांचा सन्मान करावा हे छत्रपतींचे धोरण वाचताना आश्चर्य वाटते. ‘राज्य संपन्न व्हायचे असेल तर राज्यात व्यापार चांगल्याप्रकारे झाला पाहिजे’ ही भावना आज्ञापत्राच्या पानापानातून प्रगट होते.

युद्धात शत्रूचे सेवक अगर अनुयायी सापडले तर त्यांची कत्तल करण्याचा मोघली व आदिलशाही रिवाज होता. शत्रूच्या सेवकांना व अनुयायांना शासन करावे, असे शिवाजी राजांचेही मत होते. मात्र शत्रूकडील व्यापारी सापडल्यास त्याला असे शासन न करता त्याला प्रतिष्ठेने वागवावे हे छत्रपतींचे धोरण होते. व्यापाराबद्दल हा राजा किती दक्ष होता हेच यावरुन दिसून येत नाही काय?

व्यापाराबद्दल आज्ञापत्रातील एकाच वाक्यात सांगायचे तर ‘साहुकार म्हणजे राज्याची व राजर्षीची शोभा.’ यावरुन व्यापाराबद्दल आस्था बाळगणारा एक राजा 350 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात काम करत होता हे स्पष्टपणे दिसून येते. ‘व्यापारामुळे राज्य श्रीमान होते म्हणून राज्यात नवे व्यापार आणले पाहिजेत’ असे हा राजा आवर्जून सांगतो. महाराष्ट्र शासनाने छत्रपतींच्या व्यापारविषयक धोरणाकडे डोळे उघडून पाहण्याची आवश्यकता आहे. गुजरात, पश्चिम बंगाल, ओडिसा इतकेच काय पण बिहारमध्ये विविध उद्योग चालले असताना आम्ही आज हात चोळीत बसलो आहोत. मात्र शिवछत्रपती आज्ञापत्रात म्हणतात की, ‘‘परमुलुखी जे जे साहुकार असतील त्यांची समाधानी करून ते आणावे. त्यांसि अनुकूलन पडे तरी असतील तेथेच त्यांचे समाधान रक्षून, आपली माया त्यास लावावी…’’

स्वतःच्या मुलखात व्यापार आणण्यासाठी काय करायला हवे याचे धोरण शिवाजीराजांनी फार पूर्वीच निश्चित करून ठेवले आहे हे एकदा समजावून घेण्याची आवश्यकता आहे. ‘आपले लग्नात व्यापारी बोलवून, वस्त्रे देऊन त्यांचा सन्मान करावा’ इतका बारकावा सांगणारा हा राजा स्वराज्यात व्यापार वाढावा यासाठी किती प्रयत्नशील होता हे यावरुन दिसून येते. आज महाराष्ट्रात येणारे कित्येक उद्योग दुसरी राज्ये पळवत आहेत याचे सर्वात महत्त्वाचे कारण आमचे आज्ञापत्रांकडे दुर्लक्ष झाले आहे हेच होय! पण व्यापार म्हणजे अयोग्य किंवा अनैतिक गोष्टी करणे हे महाराजांना मान्य नव्हते. कोकण किनारपट्टीवर पोर्तुगीजांनी लोकांना पकडून गुलामांचा व्यापार सुरू केला. महाराजांनी पोर्तुगीजांशी वैर पकडले पण गुलामीचा हा व्यापार बंद केला. मराठी व पोर्तुगीज यांच्यातील संघर्षाचे प्रमुख कारण ‘पोर्तुगीजांचा किनारपट्टीवरील रयतेला पळवून चाललेला गुलामांचा व्यापार’ हेच होते. बाळाजी आवजी चिटणीसांसारखा सचिव केवळ योगायोगानेच महाराजांना मिळाला. गुलामांच्या बाजारात महाराजांनी बाळाजी आवजी व त्याच्या कुटुंबाची केलेली सुटका इतिहासाने ठळकपणे नोंदवली आहे.

शत्रूच्या प्रदेशावर आक्रमण करतानाही महाराजांनी कधी सरसकट लूट केली नाही. शत्रू प्रदेशातील व्यापार्‍यांकडून खंडणीची मागणी करणे व मागणी करूनही खंडणी मिळाली नाही तर मगच लुटीचा मार्ग वापरणे हे शिवाजीराजांचे धोरण सुरत प्रकरणात दिसून येते. परराज्यातील व्यापार्‍यांची प्रतिमा जपण्याचा हा प्रकार होय.

मात्र या देशात व्यापारी म्हणून आलेल्या ब्रिटीश, फ्रेंच अशा सर्व परकीयांची पाऊले महाराजांनी फार पूर्वीच ओळखले होते. परकीय विशेषतः ‘टोपीकर’ म्हणजे ‘इंग्रज’ हे या देशात फक्त व्यापारासाठी आलेले नाहीत तर त्यांना राज्यकारभार करायचा आहे हे शिवाजीराजांनी केव्हाच ओळखले होते. त्याबद्दल आज्ञापत्रात अत्यंत स्पष्ट शब्दात लिहिले आहे. ‘टोपीकरांचा या प्रांते प्रवेश करावा, राज्य वाढवावे, स्वमत प्रतिष्ठावे हा पूर्ण अभिमान… त्याहिवरील हट्टी जात, हातात मालो तर मेलियावरी सोडावयाचे नव्हेत.’’

ब्रिटिश या देशात कशासाठी आले आहेत हे शिवाजी महाराजांना माहिती होते. ‘व्यापारासाठी स्वराज्यात जागा देताना त्यांना खाडीजवळील जागा देऊ नये’ असे शिवाजीराजांनी स्पष्टच नमूद केले आहे. ‘टोपीकरांना जागा देताना नीच, गावापासूनची दूरची जागा द्यावी’ असे निर्देशच राजांनी दिले आहेत. म्हणजे खरा व्यापारी व खोटा व्यापारी यातील फरकही छत्रपती जाणून होते हे स्पष्ट होते.

व्यापारी म्हणून आलेल्या टोपीकरांनी हातात केवळ तागडे न धरता राज्यकारभार करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली आहे हे छत्रपतींनी पूर्वीच ओळखले होते. छत्रपतींच्या आज्ञापत्राकडे झालेल्या दुर्लक्षामुळे या देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीत खितपत पडावे लागले.

ब्रिटिशांशी कसे वागावे हे सांगताना शिवाजीराजे म्हणतात, ‘‘यांची आमदप्तरी आले गेले एवढीच असो द्यावी’’.

याचा  विचार करता व्यापारी म्हणून आलेल्या ब्रिटिशांना ओळखणारा कुणीतरी राज्यकर्ता हिंदुस्थानात होता ही बाब स्पष्ट होते.

बंदरावरचा व्यापार कसा असावा याबद्दलही महाराजांनी सांगितले आहे. परकीय व्यापार्‍यांशी प्रेमाने वागून त्यांना आपले करावे असे सांगणार्‍या शिवाजीराजांकडे आमचे दुर्लक्ष झाले आहे, असेच म्हणावे लागेल. शिवाजीराजांनी स्वतः स्वराज्यात व्यापार वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले असल्याचे दिसून येते. ‘साहुकारीमुळे राज्य श्रीमान होते’ या आज्ञापत्रातील कथनातच सर्वकाही आले.

पन्नास वर्षांच्या आयुष्यात एका बाजूला चाललेल्या लढाया, स्वकीयांशी व परकीयांशी चाललेला संघर्ष, स्वराज्य विस्तारासाठी सुरू असलेली अखंड धडपड या सार्‍या जंजाळात महाराजांनी स्वराज्यात व्यापाराला उत्तेजन दिले. विविध प्रांतातील व्यापारी स्वराज्यात आणले. रायगडावरील बाजारपेठेचा प्रमुख नागाप्पा शेट्टी हा होता. छत्रपतींना आणखी काही काळ आयुष्य लाभले असते तर व्यापाराबद्दल आजही कायम असलेली मराठी माणसांची मानसिकता त्यांनी त्याचवेळी बदलली असती. राज्यात व्यापारी असतील तर त्यांची अडी-अडचणीला मदत होते, संकटकाळी त्यांच्याकडून कर्जही मिळते, व्यापार्‍यांच्या संरक्षणात राज्याचा फार फायदा आहे हे आज्ञापत्रातील बारकावे राजांच्या व्यापार धोरणावर प्रकाश टाकतात.

उद्योगाशिवाय प्रगती नाही, व्यापाराशिवाय समृद्धी नाही याचे भान सतराव्या शतकातील या मराठा राज्यकर्त्यास होते. व्यापाराविषयी मराठी माणसाच्या मनात केव्हा न्यूनगंड निर्माण झाला हे निश्चित सांगता येत नाही पण शिवकालात हा न्यूनगंड निश्चितच निर्माण झालेला नाही. व्यापार करणे म्हणजे नफा मिळवणे, कोणाची तरी फसवणूक करणे व पाप करणे असल्या चुकीच्या समजुतीही मराठी माणसाच्या मनात कधी आल्या ते लक्षात येत नाही मात्र शिवछत्रपतींचे व्यापारविषयक धोरण पाहिल्यावर आता तरी आपण बदलले पाहिजे हा विचार मनात आल्यावाचून राहत नाही.

शिवाजीराजांनी अत्यंत प्रतिकूल काळात स्वतंत्र राज्य निर्माण केले. आपण निर्माण केलेल्या राज्यांची व्यवस्था कशी असावी याबद्दल शिवाजीराजांच्या अनेक कल्पना होत्या. शेतकर्‍यांच्या व शेतीच्या विकासासाठी शिवाजीराजे काय करत हे ‘सभासद बखर’ वाचताना जाणवते तर ‘आज्ञापत्रे’ राजांचे व्यापार आणि उद्योगाबद्दलचे प्रेम स्पष्ट करते.

व्यापाराला उत्तेजन, प्रोत्साहन दिल्याने राज्य ‘श्रीमान’ होते असे मानणारा शिवाजीराजांसारखा राज्यकर्ता हाच भारतीय उद्योजकांसमोर आजही एक नवा आदर्श निर्माण करतो.

– उमेश सणस, वाई

९८२२६३९११०

(लेखक छत्रपती शिवाजीमहाराजांच्या साहित्याचे अभ्यासक आणि कादंबरीकार आहेत.)

पूर्वप्रसिद्धी – ‘चपराक, व्यापार आणि उद्योग विशेषांक २०११’

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

4 Thoughts to “छत्रपती शिवाजीराजांचे व्यापारविषयक धोरण”

 1. डाॅ.अशोक शिंदे

  अतीशय वाचनीय लेख.शिवरायांचे व्यापारविषयक धोरण पहिल्यांदाच वाचायला मिळाले.

 2. शिवव्याख्याते प्रा.जावेद शेख

  छत्रपती शिवरायांचे व्यापार विषयक दृष्टिकोन अत्यंत अभ्यासपूर्वक सणस सरांनी मांडला व एक वेगळा दृष्टिकोन दिला आहे.सुंदर लेख🚩👍धन्यवाद सणस सर व चपराक टीमचे🚩🙏

 3. सुवर्णा जाधव

  अतिशय ज्ञानवर्धक व वेगळी माहिती… अभिनंदन 💐
  सुवर्णा जाधव

 4. शिवव्याख्याते प्रा.जावेद शेख

  शिवरायांच्या व्यापारविषयक धोरणावरील सुंदर अभ्यासपूर्ण असा लेख 🚩खूपच सुंदर,अभ्यासपूर्ण व वेगळी माहिती देणारा लेख आहे.
  ग्रेट🙏🏼🚩धन्यवाद सणस सर व चपराक टीम

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा