‘‘अणीबाणी लोकांसाठी त्रासदायक असली तरी माझ्यासाठी ती चांगली होती. कारण ना. ग. गोरे, एस. एम. जोशी, मोहन धारिया त्याकाळी आमच्या बडोद्याच्या घरात रहायला होते. मी पक्का संघवादी. अणीबाणीच्या काळात आमच्या घरातील या समाजवाद्यांचं वास्तव्य तिथं काम करणारा पोर्या बघत होता. तो या सगळ्यांना चहा देत होता, त्यांची सेवा करत होता.
हे सगळे माझे स्नेही म्हणून ते त्याला त्याचं कर्तव्य वाटत होतं. ती मंडळीही त्याला शाबासकी द्यायची. मला ते आवडायचं नाही. मी त्याला रागावून विचारलं, ‘‘अरे तू स्वयंसेवक आहेस ना? मग ही कामं का करतोयस?’’
त्यावर तो म्हणाला, ‘‘संघ आणि समाजवादी यांच्यातील अंतर मी कमी करत असेल तर तुम्हाला काही अडचण आहे का?’’
हे असं उत्तर देणारा मुलगा म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. ज्यांच्या घरी ते काम करायचे आणि आजही त्यांचे जे मार्गदर्शक आहेत ते व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. दामोदर विष्णु नेने. डॉ. नेने लेखनाच्या क्षेत्रात ‘दादूमियाँ’ नावानं सुपरिचित आहेत. इंदिरा गांधी यांचं मराठीतलं पहिलं चरित्र त्यांनी लिहिलं. ते अटलजींचे सल्लागार होते. आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर त्यांच्याकडं कामच केलंय. मोदींचा ‘स्वयंसेवक ते पंतप्रधान’ हा प्रवास दादूमियाँनी जवळून बघितलाय. आजही मोदींना कठोरपणे सल्ला देणारे अपवादात्मक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडं बघितलं जातं.
दोन वर्षांपूर्वी दादूमियाँना पुण्यात एमआयटीनं ऋषिपूजनाच्या कार्यक्रमासाठी बोलावलं होतं. नव्वदीकडं झुकलेला हा डॉक्टर अजूनही नियमित प्रॅक्टिस करतो, रोज स्वतः गाडी चालवत हॉस्पिटलला जातो हे ऐकून आश्चर्य वाटलं. आम्ही त्यांना ‘चपराक’च्या कार्यालयात सदिच्छा भेटीला बोलावलं. ज्येष्ठ स्वयंसेवक दिलीपराव कस्तुरे यांच्यामुळं कसलेही आढेवेडे न घेता ते आले. त्यावेळी त्यांची जी मुलाखत आम्ही रेकॉर्ड केली त्यातला एक किस्सा आज मुद्दाम वाचकांना सांगावासा वाटतो.
दादूमियाँ त्यावेळी पुण्यातल्या एका साप्ताहिकासाठी ‘दिल्लीतला महाराष्ट्र’ हे सदर लिहायचे. त्याला अफाट वाचकप्रियता मिळाली होती. यशवंतराव चव्हाण त्याकाळी संरक्षण मंत्री होते. त्यांनी दादूमियाँचा संपर्क क्रमांक मिळवला आणि त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. दादूमियाँ म्हणाले, ‘‘मी दिल्लीत इंदिरा गांधी यांच्याकडं येत असतो. त्यावेळी भेटू.’’
यशवंतराव म्हणाले, ‘‘मला तुमच्या घरी यायला बंदी आहे का? तुमचा थोडा वेळ द्या, मी तुमच्या घरी येतो…’’
दोघांची भेट ठरली. यशवंतराव बडोद्याला आले. तासाभराची चर्चा हाईल असा कयास होता. यशवंतराव तीन दिवस राहिले. दादूमियाँचा अभ्यास आणि त्यांचं चिंतन बघून भारावून गेले. शेवटी ते म्हणाले, ‘‘आता मला निघावं लागेल. या वास्तव्यात मला खूप काही शिकायला मिळालं. मला तुम्हाला काहीतरी द्यायची इच्छा आहे. काय देऊ सांगा?’’
दादूमियाँचे वडील आणि आजोबा महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे सचिव. त्यामुळं त्यांच्याकडं नाही अशी कोणतीही गोष्ट नव्हती. त्यावेळी लेखन करणार्यांना जमीनजुमला, वेटिंगला असलेल्या गाड्या, टेलिफोनचं कनेक्शन अशा अपेक्षा असायच्या. हे सगळं तर दादूमियाँकडं आधीच होतं. म्हणून त्यांनी विनम्रपणे काहीही घ्यायला नकार दिला. यशवंतरावांचा मात्र हट्ट होता की ‘‘माझ्या समाधानासाठी काहीतरी मागा.’’
शेवटी दादूमियाँ म्हणाले, ‘‘मला तुमच्या गुप्तहेर संस्था कसे काम करतात हे बघायचंय. त्यांनी एखादं वेगळं प्रकरण कसं शोधून काढलंय हे समजू शकेल का?’’
यशवंतराव थोडे शांत झाले. अशी काही मागणी होईल असं त्यांना वाटलं नव्हतं. त्यांना शब्द तर पूर्ण करायचा होता. मग ते निर्धारपूर्वक म्हणाले, ‘‘मी इथली एक लोकलचीच फाईल मागवतो. ती समोर बसून वाचा आणि लगेच मला परत करा.’’
ती फाईल आली. ज्यांच्याविषयी ती होती ते दादूमियाँचे खास मित्र. त्यांची लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू होती. त्यांच्या विरूद्ध काँग्रेसच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती होती. दादूमियाँनी ती फाईल वाचली आणि खिन्नपणे त्यांना परत केली.
दुसर्या दिवशी ते त्या मित्राच्या भेटीला गेले. दादूमियाँनी सांगितलं, ‘‘काल मला यशवंराव चव्हाण भेटले होते.’’
मित्र तोर्यात म्हणाला, ‘‘भेटले असतील. त्यात काय विशेष? तू पत्रकार आहेस…’’
‘‘त्यांनी तुझ्याविषयी एक फाईल तयार केलीय…’’
‘‘केली असेल… मी काँग्रेसच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करणार… त्यांचं कामच आहे ते…’’
‘‘तू तुझ्या वयाच्या सोळाव्या वर्षी एका मुलीवर अत्याचार केले होतेस…’’
हे ऐकताच मित्र जाम भडकला. तो म्हणाला, ‘‘माझ्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी चूक होती. त्यानंतर मी एकही रात्र स्वस्थ झोपू शकलो नाही. ही गोष्ट ती मुलगी सोडली तर कुणालाच माहीत नव्हती. तुला कसे कळले?’’
दादूमियाँनी सांगितले, ‘‘अशा अनेक गोष्टी त्यात आहेत…’’
त्यानंतर आठ-दहा दिवसातच एके सकाळी ‘गुजरात समाचार’चा अंक आला. त्यात मुख्य बातमी होती की या मित्राचा बिनशर्त काँग्रेसमध्ये प्रवेश. इतकंच नाही तर काँग्रेसने तिथे दुसराच उमेदवार दिला आणि या मित्रानेच त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले…’’
हे सगळं ऐकल्यावर मला वाटलं की देशात गेल्या सात वर्षात फक्त ‘झेरॉक्स इंडस्ट्री’च चालू आहे का? आश्चर्यकारक वाटावेत असे सगळेजण भाजपमध्ये का जात आहेत? ‘गुरूची शिकवण गुरूला’ याप्रमाणे काँग्रेसच्या धुरिणांचे हे शस्त्र मोदी-शहा वापरत आहेत का?
सगळ्या पक्षातून उमेदवार आयात करायचे. त्यांच्याकडून मजबूत पक्षनिधी घ्यायचा. इतर उमेदवारांच्या प्रचाराचीही जबाबदारी त्यांच्यावरच सोपवायची, असं काही सुरू आहे का? निवडणुकीच्या आधी आठ-दहा दिवस अचानकपणे भाजपमध्ये प्रवेश करणार्यांची अशी संख्या कमी नाही. बरं, जे इतर पक्षातून भाजपमध्ये येत आहेत त्यांना कोणती महत्त्वाची पदेही दिली जात नाहीत. नारायण राणे यांचे एकच उदाहरण त्यासाठी पुरेसे बोलके ठरावे. थोडे स्पष्टच नोंदवायचे झाले तर अशा आयात उमेदवारांच्या खांद्यावर बैलगाडीचा जू ठेवायचा. त्यांना वाटते की तेच ही गाडी ओढत आहेत. प्रत्यक्षात कासरा मात्र दुसर्याच्याच हातात आहे…
प्रताप सरनाईक यांच्यासारखा मालदार आमदार भाजपशी जुळवून घ्यायची भाषा करतो. आपले नेते आणि पक्ष अडचणीत येईल, असे पत्र लिहून आपल्या नेतृत्वाला कळवतो. यापेक्षा मोठा पुरावा अशा गोष्टीसाठी आणखी कोणता हवा?
‘प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं’ असं म्हटलं जातं. राजकीय युद्धातही अशा अनेक गोष्टी पुरातन काळापासून चालत आल्यात. कुणालाही त्या गैर वाटल्या नाहीत. मात्र लोकशाही राष्ट्रात इर्षा, स्पर्धा, द्वेष यातून हा संघर्ष इतक्या टोकाला गेलाय की कोणत्याही पक्षात औषधाच्या मात्रेइतकीही नैतिकता शिल्लक राहिली नाही. याला कोणी म्हणजे कोणीही अपवाद नाही. येनकेनप्रमारे सत्ता मिळवणे आणि त्यातून संपत्ती निर्माण करणे हाच बहुतेकांचा दृष्टीकोन दिसतो. त्यासाठी ते कोणत्याही पातळीवर जायला तयार होतात. सामान्य माणूस हे सर्व पाहून चर्चा करतो, त्रागा करतो, अपेक्षा व्यक्त करतो. उद्वेगाने अद्वातद्वा बोलतो. त्याच्या भावना, त्याच्या निष्ठा प्रामाणिक असतात. त्यामुळं त्याला हे सगळं राजकारण अभद्र वाटतं. मात्र त्यापुढे जाऊन या अशा अनेक गोष्टी राजकारणात घडतात. या सगळ्यात आपल्या राष्ट्राचं जे काही व्हायचं ते हाईल. इच्छा असूनही आपण ते टाळू शकत नाही, मात्र हे ‘आर्ट ऑफ पॉलिट्रिक्स’ समजून घेऊन स्वतःचा त्रास कमी करून घेतला तरी ती मोठी उपलब्धी असेल इतकंच.
– घनश्याम पाटील
7057292092
दै. ‘पुण्य नगरी’, मंगळवार, 29 जून 21.
अतिशय माहिती पूर्ण माहितीचा खजिनाच म्हणूया असा लेख. ‘दादूमिया’ यांच्याबद्दल खूप चांगली माहिती मिळाली. त्यांचा काळ डोळ्यासमोर उभा राहिला, ही तुमच्या लिखाणाची जादू! राजकारण गेलं ….. आपण सामान्य माणूस म्हणून वाचनाचा आनंद घेऊ इतकंच!! लेख आवडला.
माझे वडील ‘राजकारणा’त होते व आमच्या ‘एकांतातील वाड्या’त घडवण्यात(!) आलेल्या अशा घडामोडी(?) मी चोरून ऐकल्या आहेत. असो.
@ॲड.लखनसिंह कटरे.
खूपच आतल्या गोटातल्या गोष्टींचं दर्शन घडवलं. किती उलाढाली होतात पडद्याआड हे वाचणं, ऐकणं रंजक आहे. आपलं दादुमियांना भेटण, त्यांना बोलतं करणं यात काही संकेत असावेत.
अभिनंदन.!
बरीचशी नवीन माहिती मिळाली. सुंदर लेख!
अप्रतिम लेख, खूपच माहितीपूर्ण
दादूमिया हे नाव पूर्वीपासून जाणतो. आज सविस्तर कळले. खूपच माहितीपूर्ण लेख.👍
आमच्या सारख्या सामान्य माणसांना अशा दुर्मिळ बातम्या म्हणजे मेजवानीच…
लेख खूप छान आणि वास्तव …! 👍🏼🙏🏼