शिरपूर, जि. धुळे येथील लेखिका सौ. शिल्पा प्रसन्न जैन यांचा ‘आभास’ हा कथासंग्रह ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केला. या पुस्तकाला ज्येष्ठ पत्रकार सुभाषदादा कुलकर्णी यांनी लिहिलेली ही प्रस्तावना. हा कथासंग्रह घरपोच मागविण्यासाठी ‘चपराक’च्या वेबसाईटला जरूर भेट द्या.
सौ. शिल्पा जैन यांचा प्रकाशित होणारा हा पहिला कथासंग्रह. समाजातील स्त्री मनाशी, त्यांच्या भावविश्वाशी जवळिक साधणारा हा कथासंग्रह आहे. समाजात रोज जे घडते, स्त्रियांना ज्या समस्यांना रोज सामोरे जावे लागते त्यांचे बारकाईने निरीक्षण करुन त्या समस्या, वेदना आपल्या कथेतून मांडण्याचा प्रयत्न लेखिकेने हृदयापासून केलेला बघावयास मिळतो. त्यामुळे या कथेतील नायिका लेखिकेच्या आजूबाजूला वावरणार्या, त्यांच्याशी मैत्री असलेल्या असाव्यात असा ठाम विश्वास निर्माण होतो. या कथांचे कथानक काल्पनिक नसून वास्तव वेदनांचे समुच्चीकरण आहे हाच विचार दृढ होतो.
ह्या कथासंग्रहात अनाथाश्रमातून जीवनप्रवासाला सुरूवात करून शेवटी वृद्धाश्रमात दाखल झालेली सायली, निसर्गाच्या क्रूर चेष्टेने मातृत्व हरवून बसलेली अस्वस्थ दीपाली, पोटाची खळगी भरण्यासाठी, कुटुंबाचे पालन करण्यासाठी नटी होण्याच्या नादात स्त्रीजीवनाचे सर्वस्व गमावून बसलेली देखणी माखी, प्रेमाच्या आभासाला बळी पडलेली चारूलता, नवर्याचा अधमपणा डोळ्यांनी पाहूनही नातिचरामि म्हणणारी स्मिता, मुलीचा जन्म नाकारणार्या विचाराचा बळी ठरलेली व तिची सासू असे का वागली? असा प्रश्न जिला भेडसावत आहे ती गीता, स्वत:च्या संसारातील अंधारासोबत समाजातील अंधार नष्ट करावयास सिद्ध झालेली स्वयंप्रभा उषा, समर्पण हा स्त्रियांचा निसर्गदत्त गुणधर्म आहे हे सांगणारी सीमा या कथानायिका सार्या स्त्रीजातीचे प्रतिनिधित्व करणार्या आहेत.
लेखिकेच्या मनातील चिंतनशीलता कथांमधील पुढील वाक्यातून व्यक्त झाली आहे. त्या म्हणतात रोज सरणावर चढणे, आगीतून होरपळून निघणे, रोज नवे युद्ध पेलण्यास तयार होणे हा स्त्रीचा जीवनक्रम झाला आहे. एका कथेत त्या म्हणतात ‘जगाच्या बाजारात आंतरिक सौंदर्याला महत्त्व नाही. स्त्रीचे सत्त्व चौकटीच्या आतच शाबूत राहते. जरा सुखाची झुळूक आली की एकदम दु:खाचे वादळ येते, अशी खंतही व्यक्त करतात. दुसर्यासाठी जगण्यालाच स्त्रीजीवन म्हणतात, असा आश्वासक विचारही सांगतात तर समाजाला आपण एवढे शिकलो पण सुशिक्षित झालो का? असा खडा सवालही विचारतात. समोरच्या माणसाच्या मनात प्रवेश करण्यासाठी त्या सुचवतात. ‘हृदयापर्यंत जाण्याचा मार्ग पोटातून जातो.’ मनाला झालेल्या जखमांसंबंधी त्या म्हणतात, ‘पायात जर काटे रुतले तर ते हातांनी काढता येतात परंतु मनाला बोचलेले काटेरी शब्द जन्मभर रुतून बसतात.’
त्यांच्या कथांमधून, पुरुषप्रधान संस्कृतीमधला उद्दामपणा आणि त्या उद्दामपणाला दिलेले समर्पक उत्तर आहे. या प्रवृत्तीविरुद्ध जिद्दीने दिलेला लढा आहे. त्यांच्या सार्या कथा स्त्रीजीवनाच्या वेदनांचा नि:श्वास आहेत. त्यांची कथा आसवांची खंडणी वसूल करुनच संपते. एका अनाथाश्रमातल्या मुलीला श्रीमंत कुटुंबात नेतात. ती समृद्ध-सुखी संसार करते पण कालचक्र तिला पुन्हा वृद्धाश्रमात नेते व शेवटी ती एकटीच राहते.
मतीमंद मूल होणे म्हणजे वंध्यत्वाच्या दु:खापेक्षाही कठीण, अस्वस्थ करणारा हा प्रश्न या कथेत आहे. स्त्रीचे सौंदर्य कधी-कधी शाप ही ठरते हे सांगणारी ‘देखणी’ ही कथा आहे. आपला प्रियकर दुसर्या धर्माचा असूनही त्याच्यावर हृदयापासून प्रेम करणार्या मुलीची झालेली फसगत ‘आभास’ या कथेत आहे. नवर्याला आव्हान देणारी आपली संस्कृती नाही. नवर्याने काही केले तरी निमूटपणे सहन करण्याची आपली संस्कृती हे बिंबवणारी ‘नातिचरामि’ ही कथा आहे. स्त्रीचे माता होणे म्हणजे तिच्या जीवनाचे सार्थक होणे पण मुलगा-मुलगी भेद मानणार्या पाशवी मनोवृत्तीने तिचे मातृत्वच ओरबाडले गेले. त्या शापित मातृत्वाची ‘ती अशी का वागली?’ ही कथा आहे.
व्यसनाने किडनी गमावून बसलेल्या अहंकारी नवर्याला स्वत:ची किडनी बहाल करुनही तो सुधारण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट तो संशयी झाला आहे, हे पाहून स्वत:ला सावरण्यासाठी घराबाहेर पडून समाजसेवेला वाहून घेणार्या जिद्दीची ‘स्वयंप्रभा’ ही कथा आहे. आपल्या बहिणीच्या अकाली निधनानंतर आपल्या नियोजित वराकडे पाठ फिरवून बहिणीच्या मुलाला मातृत्व बहाल करताना प्रसंगी आपल्या पोटच्या मुलाकडेही दुर्लक्ष करणार्या मातृत्वाची समर्पणाची ही कथा आहे.
सौ. शिल्पा जैन यांचे हे पहिलेच साहित्यशिल्प असले तरी त्यांची प्रतिपादनक्षमता वाखाणण्याजोगी आहे. त्यांची वाचनाची आवड त्यांना लेखनाकडे घेऊन आली आहे. एखादी घटना पाहून कालांतराने आपण विसरुनही जातो. मात्र अशा घटना मनात जतन करुन ठेवून त्या घटना घडल्यापासून समाजाला काही देण्यासारखे आहे का याचा विचार करुन त्या कथेत रुपांतरित करुन समाजाप्रती अर्पण करण्याची लेखिकेची ही जिद्द नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या कथासंग्रहाचे सहृदय वाचकांनी कौतुक केल्यास त्यांच्यासाठी ते स्फूर्तिदायक ठरेल. लहान मुलगा उभे राहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण जसे त्याच्या पहिल्या पाऊलाचं कौतुक करतो तसेच आपणा वाचकांची कौतुकाची थाप मिळाली तर निश्चितच भावी काळात लेखिकेकडून अधिकाधिक सरस, साहित्यनिर्मिती होईल अशी खात्री वाटते.
हा कथासंग्रह वाचनीय, संग्रही ठरावा ही सदिच्छा!
– सुभाषदादा कुलकर्णी
ज्येष्ठ पत्रकार, शिरपूर, जि. धुळे