वात, वारा आणि हवा

वात, वारा आणि हवा

Share this post on:

वरवर पहाता या तिन्ही शब्दांचा अर्थ सारखाच आहे. हवा वाहू लागली की त्याला वारा म्हणतात हे आपण शाळेतच शिकलो आहोत. हे तिन्ही शब्द जरी समानार्थी असले तरी प्रत्येक शब्द विशिष्ठ ठिकाणीच शोभून दिसतो/चपखल बसतो.

अमुक एक जागा हवेशीर आहे असे म्हणताना हवा या शब्दाच्या जागी वारा शब्द चपखल बसत नाही. हवेतील प्राणवायू हा सजीवांना जीवित ठेवणारा मोठा घटक आहे. आपण शाळेत असेही शिकलो आहे की वनस्पती हवेतील कार्बन डॉय ऑस्काईड हा घटक शोषून घेतात व त्यामुळे सजीवांना शुद्ध प्राणवायूचा पुरवठा निसर्गाकडून केला जातो. तसे पाहावयास गेले तर प्राणवायू व कार्बन डॉय ऑस्काईड या दोन घटकांशिवाय अनेक वेगवेगळे घटक हवेत असतात. आपण जसजसे जमिनीवरून उंचावर जाऊ तेव्हा काही विशिष्ठ उंचीपलीकडे गेल्यावर हवेतील प्राणवायूचे प्रमाण कमी होत जाते व त्यामुळे श्वसनाच्या क्रियेमध्ये अडथळा येऊ लागतो. विशिष्ठ उंचीपेक्षा जास्त उंच असणाऱ्या पर्वतावर चढाई करणाऱ्या गिर्यारोहकांना प्राणवायूचा साठा बरोबर घेऊन जावाच लागतो. तसेच वात व वारा हे समानार्थी शब्द आहेत. वाऱ्याची दिशा कळण्यासाठी वातकुक्कुट यंत्राचा वापर केला जातो. देवापुढे ठेवणाऱ्या तेलाच्या निरांजनाची सुद्धा वातच असते असाही वात या शब्दाचा अर्थ आहे. भर उन्हाळ्यात घरात थंडावा निर्माण करण्यासाठी वातानुकूलित यंत्र बसवून घेतले जाते.

तथागत म्हणजे भारताला पडलेलं सुंदर स्वप्न । प्रशांत आर्वे

आता वात, वारा व हवा या शब्दांचे इतर उपयोगही आहेत व त्याचाच आता उहापोह पाहणे नक्कीच रंजक ठरेल. मे महिन्याच्या सुट्टीत परीक्षा संपल्यामुळे व निकाल लागलेला असल्यामुळे मुले घरात धुडघूस घालतात तेव्हा ‘या मुलांनी नुसता वात आणला आहे’ हे वाक्य जवळ जवळ सर्व पालकांच्या तोंडी असते. तसेच जर कोणी दंडेली अथवा दादागिरी करत असेल तर ‘नुसता अंगात वात भरला आहे’ असा शेरा मारला जातो. त्याचबरोबर एखादा माणूस नुसताच जाड असेल व अंगात काही करण्याची धमक नसेल तरीही ‘फक्त वात भरला आहे’ किंवा ‘वाताचे शरीर आहे’ असा शब्दप्रयोग केला जातो. म्हणजेच थोडक्यात ‘निव्वळ फोकशा आहे’ अशी त्या माणसाची संभावना केली जाते.

वात या शब्दासारखाच वारा हाही शब्द अनेक ठिकाणी अनेक अर्थांनी वापरला जातो. भरधाव वेगाने धावणाऱ्या मुलाला अथवा तरुणाला धावताना पाहून साहजिकच तोंडातून शब्द बाहेर पडतात की ‘कानात वारं गेल्यासारखे पळतो आहे.’ कधी कधी पळणे या क्रियेला ‘अंगात वारं गेल्यासारखा पळतो आहे’ किंवा ‘वारं प्यालासारखा पळतो आहे’ असेही म्हणतात. याबाबतीत अजूनही एक शब्दप्रयोग केला जातो की तो / ती ‘वाऱ्यावर स्वार होऊन पळत आहेत.’ कधीतर अतिशयोक्तिपूर्वक असेही म्हणतात की तो / ‘ती वाऱ्यालाही मागे सारेल’ किंवा ‘वाऱ्याशी स्पर्धा असल्याप्रमाणे धावतो / धावते आहे’ त्याचप्रमाणे असेही म्हणतात की ‘वाऱ्यावर आरूढ होऊन पळतो / पळते.’ असो.

‘जसा वारा वाहील तसे तोंड फिरविणे’ असाही वाक्प्रचार अधूनमधून वापरला जातो. राजकारणात या वाक्प्रचाराला जास्तच महत्त्व आहे. निवडणुकीच्या काळात जनतेच्या दृष्टिकोनातून या वाक्प्रचाराला वेगळेच महत्त्व आहे. ‘जसा वारा वाहील तसे तोंड फिरविणे’ याचा राजकारणातील अर्थ म्हणजे ज्या राजकीय पक्षाची सरशी होण्याचा संभव आहे त्या राजकीय पक्षाची हातमिळवणी करणे. अशा मंडळींना आयाराम गयाराम असेही संबोधले जाते. कधी कधी जरा वेगळे वागणाऱ्या मुलाला किंवा माणसाला असेही म्हणतात की ‘अंगात वारा संचारल्याप्रमाणे वागतो आहे.’ कधी कधी लहान मुलांचा हट्ट पुरविला गेला नाही तर आकांडतांडव करतात किंवा शांतपणे धुसपूसत बसतात. आकांडतांडव करणारा मुलगा नेहमी अंगात वारा संचारल्यासारखा वागत असतो. काही वेळा असेही म्हटले जाते की ‘मी सांगितले ते ऐकले का नुसतेच इकडून तिकडे गेले वारे’ म्हणजेच या कानाने ऐकायचे व त्या कानाने सोडून द्यायचे. सामान्यतः लहान मुलांना शिकवताना किंवा काही समजून सांगतांना या वाक्प्रचाराचा उपयोग केला जातो. क्वचित प्रसंगी पत्नीच्या तोंडीही पतीच्या संदर्भात हा शब्दप्रयोग केला जातो. असो. काही पुरूष मनाला येईल तसे बेलगाम वागत असतात. त्यांना त्यांच्या करणीचे कसलेच सोयरसुतक नसते तसेच नीती-अनीतीची चाड नसते. तेव्हा असे म्हटले जाते की ‘त्याने आयुष्य वाऱ्यावर सोडून दिले आहे.’ ‘वाऱ्याशीही उभे न राहणे’ हा वाक्प्रचारही वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी वापरला जातो पण या दोन्ही प्रकारात थोडासा नकारात्मक सूर उमटतो. क्वचित असा सूर निघतो की ‘माझ्या वाऱ्यालाही उभे राहायची तुझी लायकी नाही आणि तोंड वर करून मलाच विचारतो.’

एक सुरेल मैफिल

कधी कधी अशी बेमुर्वतखोर भाषा बोलली जाते की ‘कोणी माझ्या वाऱ्यालाही उभे राहू शकत नाही.’ एखाद्या भांडकुदळ व्यक्तीची ओळख अशी करून दिली जाते की ‘ती व्यक्ती इतकी भांडकुदळ आहे की वेळ पडली तर वाऱ्याशीही भांडायला कमी करणार नाही’ म्हणूनच कोणी त्या व्यक्तीच्या वाऱ्यालाही उभे रहात नाही. ‘अंगावरून वारं जाणे’ यामध्ये दुःखद सूर आहे. एखाद्या व्यक्तीच्या डाव्या अंगावरून वारं गेले आहे याचा अर्थ त्या व्यक्तीला अर्धांगवायूचा झटका आला व त्यात त्याचे डावे अंग संवेदनाहीन तसेच चेतनाहीन झाले आहे. काहीवेळेस अशी परिस्थिती येते की भरपेट जेवण झालेले असते अथवा पोट बिघडलेले असेल तेव्हा पोटातील गॅसेस मागून बाहेर पडतात तेव्हा चार-चौघात त्या क्रियेस ‘वारा सरणे’ असे म्हटले जाते. वारा सरणे हा शब्दही तसा शिष्ठसंमत असल्यामुळे या वाक्प्रचाराबद्दल कोणालाही काहीही खटकत नाही.

हवा हा शब्द ही असाच अनेक अर्थांनी वेगवेगळ्या ठिकाणी वापरला जातो.
हवा काय छान सुटली आहे याव्यतिरिक्त अनेक ठिकाणी या शब्दाचा वापर केला जातो. काय मस्त हवेशीर जागा आहे अथवा या गॅलरीत उभे राहिले की हवा छान येते असाही वापर हवा या शब्दाचा केला जातो. शाळेतील मुलाला / मुलीला एखादा प्रश्न विचारला तर उत्तर माहीत नसल्यामुळे इकडची तिकडची उत्तरे दिली जातात तेव्हा शिक्षक ‘उगाच हवेत तीर मारू नकोस’ म्हणजे बरोबर उत्तर येत नसेल तर उगाच भलती सलती उत्तरे देऊ नकोस. ‘हवेत तीर मारू नकोस’ हे शाळेत ठीक आहे पण शालेय शिक्षण संपल्यावर त्याची जागा ‘हवेत बाता मारू नकोस’ हा वाक्प्रचार घेतो. निवडणुकीच्या काळातसुद्धा अमुक एक राजकीय पक्षाची अथवा राजकीय नेत्याची हवा असते. कधी कधी एखादी बातमी खूप वेगाने पसरते पण त्या बातमीच्या सत्यतेबद्दल कोणालाच माहीत नसते. तेव्हा मलाही या बातमीची सत्यता माहीत नाही पण अशी हवा आहे किंवा अशी हवा पसरली आहे अशी मखलाशी केली जाते.

हा तर वाङमयीन यज्ञ l प्रा. मानसी रांझेकर

काही जणांच्या बाबतीत असे घडते की त्यांना यश मिळाले की ते उन्मत्तपणे वागू लागतात. कोणाचाही अपमान करायला ते मागेपुढे पाहत नाहीत. त्यांना त्यांच्या यशाचा गर्व चढलेला असतो. अशा परिस्थितीत ‘हवा डोक्यात गेली आहे’ असा वाक्प्रचार केला जातो. या यशप्राप्तीच्या परिस्थितीत अजून एक शब्दप्रयोग तंतोतंत लागू होतो व तो म्हणजे हवेतून चालणे. यशाची हवा डोक्यात गेल्यामुळे आपण श्रेष्ठ आहोत व बाकीचे सगळे आपल्यापेक्षा खुजे आहेत ही भावना मनात घर करू लागते व त्याचे पर्यावसान ‘मी’ पणात होते. वास्तविक हे दोन्ही शब्दप्रयोग समानार्थीच आहेत. यशाची हवा डोक्यात गेल्यावर त्याचे पर्यावसान हवेतून चालण्यात होते. काही वेळेस असा प्रसंग येतो की दोन तीन मित्र / मैत्रिणी अचानक एकसारखा विचार करू लागतात अथवा एकसारखे बोलू लागतात. हे पाहिल्यावर आपसूकच म्हटले जाते की अमक्या तमक्याची हवा लागली वाटते. वर उल्ल्लेख केल्याप्रमाणे मित्रांच्या गप्पा चालू असताना कोणाचा तरी वारा सरल्यावर अशी हाकाटी होते की हवा कोणी दूषित केली. काहीवेळेस असेही होते की गप्पा मारता मारता एखादा मित्र बोअर करायला लागतो अथवा काही अशक्यप्राय गोष्टी सांगू लागतो तेव्हा आपोआप बाकी मित्रांच्या तोंडून बाहेर पडते की ‘ए चल, हवा आने दे.’ हिंदी / मराठी गीतकारांनी देखील या शब्दांचा छान उपयोग करून घेतला आहे. ‘आला आला वारा, संगे पावसाच्या धारा’, ‘वारा गाई गाणे’, वाऱ्यावरती घेत लकेरी’, ‘वाऱ्यावरती गंध पसरला’, ‘ये हवा ये हवा ये हवा’, ‘हवा के साथ साथ’, ‘ये हवा ये रात ये चांदनी’, ‘हवाओ पे लिख दे’ इत्यादी गीतांमध्ये गीतकारांनी या शब्दांचा चपखल वापर केला आहे

शेवटी एवढेच सांगता येईल की वात, वारा व हवा यांचा अर्थ जरी सारखा असला तरी विविध प्रसंगात त्या शब्दांचे विविध अर्थ निघू शकतात. मला कल्पना आहे की हे वाचताना तुम्हाला वात आला असेल. मी समोर असतो तर वारा सरेपर्यंत तुम्ही माझ्यावर शाब्दिक मारा केला असता व वारा सरल्यावर हवा का दूषित केली म्हणून शब्दांचा भडीमार केला असता.

मिलिंद कल्याणकर

नेरुळ, नवी मुंबई
९८१९१५५३१८

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!