समाज अध:पतनाला जातोय…

समाज अध:पतनाला जातोय...

अडीच हजार वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी जातक कथा लिहिल्या कारण समाज अध:पतनाला जात होता. सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी माणसाच्या खलप्रवृत्तीचं वाकडेपण नष्ट करण्यासाठी विश्वनियंत्याकडे पसायदान मागितलं कारण समाज अध:पतनाला जात होता. तीनशे वर्षापूर्वी समर्थ रामदासांनी दासबोध लिहिला त्यात मुर्खांची लक्षणं सांगितली. तेव्हाही समाज अध:पतनाला जात होता. दीडशे वर्षांपूर्वी लोकहितवादींनी लोकपत्र लिहिली, निबंध लिहिली गेली तेव्हाही समाज अध:पतनाला जात होता आणि आज एकविसाव्या शतकात समाजातील प्रत्येक घटक सांगू पाहतोय की समाज अध:पतनाला जातोय!

मग अडीच हजार वर्षांपूर्वीपासून ते एकविसाव्या शतकापर्यंत समाजात झालेल्या अध:पतनात नक्की फरक तो काय?

जेव्हा विचार विकार होऊ पाहतात, अनैतिकताच नैतिकता भासू लागते आणि सत्याला असत्याची रंगरंगोटी आणि दांभिकतेची झालर चढू पाहते तेव्हा समाज खरंच अधःपतनाला जात असतो!

निर्भयासारखी एखादी वयात आलेली, एखादी वयात येऊ पाहणारी, कलियुगातील पुरुषरुपी कलीकडून कुस्करली जाते, उद्ध्वस्त केली जाते तेव्हा झोपलेला नव्हे झोपेचं सोंग घेतलेला हा समाज खडबडून जागा होत तिच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतो. मूक मोर्चे निघतात, मेणबत्या लावल्या जातात, वृत्तपत्राचे रकाने भरतात, मथळे सजतात, क्वचित एखादा अधिकारी एन्काऊंटरसारखं पाऊल उचलतो, विधेयकं मांडली जातात आणि वृत्तवाहिन्या हे विदारक चित्र घशाला कोरड पडेस्तोवर समाजाला ओरडुन सांगत राहतात.

परंतु हृदयी अमृताचं स्तन्य असलेली अनंतकाळची माता म्हणवणारी एखादी ती कलीचं रूप धारण करत, स्वतःच्या वासनांचं हिडीस आणि ओंगळवाणं रूप नाटकी प्रेमाचा मखमली मुलामा चढवत स्वतःच्या एकटेपणाची जाहिरात अंतरजालाच्या माध्यमातून करते तेव्हा त्या क्षणिक सुखासाठी अधीर झालेले किंवा सहानुभुतीतून आधार देऊ पाहणारे तरुण त्या वासनेच्या दलदलीत सहज सापडतात आणि तिच्या न संपणार्‍या वासनेची आणि विकृत मानसिकतेची शिकार होतात. परिणीती, काही भीतीनं गर्भगळीत होत शरण जातात, काही व्यसनाधीन होतात, नैराश्येच्या गर्तेत ढकलले जातात, आत्मविश्वास गमावतात, उद्ध्वस्त होतात.

गुन्हेगारी क्षेत्रातील बाईंच्या भाईगिरीचे कारनामे वाचण्यासाठी हे पुस्तक घरपोच मागवा

काही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलताना दिसतात. किमान पक्षी निर्भयांचे आक्रोश समाजापर्यंत पोचतात परंतु अशा पीडित तरुणांचे आक्रोश या निद्रिस्त समाजाच्या कर्णाला स्पर्शही करू शकत नाहीत तर समाजमनाला चटका लागणं दूरच!

पुण्यासारख्या पुण्यनगरीत, मुंबईसारख्या मायानगरीत, एक ना अनेक महानगरात, उपनगरात, उच्चभ्रू म्हणवणार्‍या वसाहतीतून अशी विकृत असंस्कृत संस्कृती रुजू होऊ पाहतेय की अनैतिकता नैतिकतेचे कपडे घालून समाजापुढे वावरतेय आणि समाजाला वाटतंय हीच नैतिकता… हीच नैतिकता… हीच नैतिकता…!

व्यक्तिमत्त्वाला जसे असंख्य पैलू असतात तसेच व्यक्तिपासूनच बनलेल्या समाजाच्या विकृतपणालही अनेक पैलू असू शकतात!

वासनांध विकृतीत अनेक तरुणी होरपळतात. अनेक तरुण उद्ध्वस्त होतात आणि हे होत असतानाच दुसरीकडे समवयीन तरुणीकडं आकर्षित न होता ‘आंटीज रॉक्स’ म्हणत चेहर्‍यावर चाळीशीची लाली आणि केसातून एखादी चंदेरी बट उठून दिसणार्‍या स्त्री वर्गाकडे आकर्षित होणारी तरुण पिढी उदयास येऊ पाहतेय आणि या कृतीची अनेक कारणं बिनधास्तपणे हे तरुण देतात!

एखादी वीस वर्षीय तरुणी आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या व्यक्तिच्या प्रेमात (…?) नव्हे पैशाच्या प्रेमात पडून त्याचं सुखी कुटुंब उद्ध्वस्त करते आणि वाहिन्यावरच्या अशा मालिका आणि असले पात्र समाजाच्या मनोरंजनाचा विषय ठरत असतील तर वाहिन्यांची टीआरपी आणि लोकांची मनोरंजनाची भूक नीतिमत्ता आणि नैतिकतेचा उंबरठा ओलांडून केव्हाच बाहेर गेलीय हे वेगळं सांगायला नकोय आणि असले आदर्श आपणच नव्या पिढीपुढं ठेवू पाहत असू तर वैचारिक अध:पतन अपेक्षितच आहे.

स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही लोकसंख्येचा फुगवटा घेऊन भारत विकसनशीलतेच्या उंबरठ्यावर उभा असताना उद्याचा एकेक स्तंभ देशाची धुरा समर्थपणे खांद्यावर पेलण्यापूर्वीच निखळलेला उद्ध्वस्त झालेला भारताला परवडणार आहे का?

मग आता नक्की काय करायला हवंय…?

स्त्रियांच्या ‘अंतरीचे रंग’ जाणून घेण्यासाठी हे पुस्तक घरपोच मागवा

‘परस्त्री मातेसमान’ या विचारधारेचा निश्चयाचा महामेरू पुन्हा जन्म घेईल की कोण ज्ञानोबा आता समाजाच्या नैतिकतेचं पसायदान मागतील? माता, समाज-वैरीण न होता माउली व्हावी या तत्त्वज्ञानाची भगवदगीता सांगायला आणि समाजाला खडबडून जागं करायला श्रीकृष्ण स्वतःच्या वचनात बांधील राहून पुन्हा कल्कीच्या रुपात जन्म घेईल आणि समाजाला आलेली अनैतिकतेची ग्लानी दूर करेल याची वाट पहायला हवं का?

माणूस घडत असतो तो परिस्थितीच्या उबेतून, शिक्षणातून निर्माण झालेल्या सारासार विवेकबुद्धितुन!

त्यामुळे शिक्षण हे केवळ साक्षर करण्यासाठी नव्हे तर माणूस सरस करण्यासाठी असायला हवं कारण सरस हा शब्द उलटा फिरवला तरी तो सरसच ठरतो पण साक्षरतेचं चाक उलट फिरू लागलं तर मनुष्याचा राक्षस होतो!

इ साक्षरता अनेक विकृत राक्षस जन्माला घालू पाहतेय. तेव्हा शिक्षणमूल्यांचं अधिष्ठान प्रदान करणारं स्तन्य असायला हवं. तेव्हाच व्यक्ती साक्षर न होता सरस होईल आणि नैतिकतेचं सकस पोषण समाजाला मिळेल कारण खरोखर समाज अध:पतनाला जातोय..!
– सायली कस्तुरे-बोर्डे
9405075222

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

3 Thoughts to “समाज अध:पतनाला जातोय…”

  1. जयंत कुलकर्णी

    सायली कस्तुरे बोर्डे यांनी समाजाच्या नैतिकतेवर व अनैतिकतेवर केलेलं भाष्य मनाला सुन्न करणारे आहे.

  2. Vinod s. Panchbhai

    समाजाचं विदारक वास्तव मांडलय !

  3. Shirish

    अतिशय परखड…अधःपतन होते आहे हेच खरं .. पुन्हा ज्ञानेश्वर जन्मण्याची वाट पाहू ,…

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा