मलमपट्टी नको; माणूस उभा करा!

मलमपट्टी नको; माणूस उभा करा!

कोरोनासारख्या जागतिक महामारीमुळं भयप्रद परिस्थिती निर्माण झालेली असतानाच विविध प्रांतात निसर्गाचं तांडवही अनुभवायला येत आहे. मागच्या वर्षी कोकण भागात निसर्ग चक्रीवादळानं हाहाकार उडवला. यंदाही तौैक्ते वादळानं होत्याचं नव्हतं झालं आहे. गेल्या वर्षी निसर्गाच्या तडाख्यानं कोकणवासीयांचं अतोनात नुकसान झालं. नारळ, पोफळी, फणस, कोकम, जायफळाच्या बागा क्षणार्धात उद्ध्वस्त झाल्या. शेकडो वर्षांची झाडं उन्मळून पडली. डोळ्यादेखत सगळं भुईसपाट होऊनही कोकणी माणसानं धीर सोडला नाही. न खचता, न डगमगता तो पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करत होता.

निसर्ग चक्रीवादळाच्या वेळीही अनेक नेत्यांनी कोकणचे दौरे केले. आपदग्रस्तांना मदत करायची म्हणून हे दौरे होते की या संकटाच्या काळातही त्यांना पर्यटन दौरे करायचे होते हे कळलं नाही. सरकारकडून तुटपुंजी मदत मिळूनही कोकणी माणूस डगमगला नाही. यंदा पुन्हा त्याला तौक्ते वादळास सामोरं जावं लागल्यानं मात्र तो हवालदील झाला आहे. कोरोनाची परिस्थिती उद्भवल्यानंतर महाराष्ट्रात एकाच माणसानं कटाक्षानं घरकोंडीचे नियम पाळले. काहीही झालं तरी घर सोडायचं नाही असा प्रण केल्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून राहिले. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कोमट पाणी पिण्याचा सल्ला त्यांनी सातत्यानं जनतेला दिला. यंदा तौैक्ते वादळात मात्र ते चक्क घराबाहेर पडले आणि अवघ्या चार तासात कोकण दौरा उरकून परत त्यांच्या निवासस्थानी आले. मनसेच्या संदीप देशपांडे यांनी याबाबत उपहासानं त्यांना सुनावलं की, तौैैक्ते वादळापेक्षा मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अधिक वादळी होता.

खरंतर अशा दौर्‍यांचा फार्स हा फक्त देखावा ठरतो हे यापूर्वीही अनेकदा दिसून आलं आहे. सांगली-सातारा-कोल्हापूर भागात आलेल्या महापूराच्या वेळी तेव्हाचे मुख्यमंत्री असाच देखावा करत इकडं फिरत होते. गिरीश महाजन यांच्यासारख्या नेत्यानं तर तिकडं जाऊन सेल्फी काढल्या म्हणून वाद ओढवून घेतला होता. सत्ता नसतानाही शरद पवार यांनी त्या भागातला दौरा काढून लोकांना धीर दिला होता. आता ते आणि त्यांचा पक्ष सत्तेत असूनही आपदग्रस्तांसाठी भरीव असं काहीच करताना दिसत नाहीत.

शरद पवारांच्या आपत्ती निवारणाच्या कार्याचं नेहमी कौतुक केलं जातं. त्यासाठी 1993 च्या किल्लारी भूकंपाच्या वेळचं उदाहरण आवर्जून दिलं जातं. तेव्हा संपर्काची साधनं उपलब्ध नव्हती. प्रसारमाध्यमांची इतकी स्पर्धा नव्हती. तरीही शरद पवार किल्लारीला पोहोचले. किल्लारी, लामजना, कवठा, नारंगवाडी, रेबे चिंचोली, सास्तूर, लोहारा, माकणी, उमरगा, बलसूर, बाबळसूर, नाईचाकूर अशा लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 52 गावांचा त्यांनी आढावा घेतला. स्वतः त्यांनी किल्लारीत तळ ठोकला. लगोलग निर्णय घेत भरीव मदत जाहीर केली. जगभरातून मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री स्वतः भूकंपग्रस्तांची दुभंगलेली मनं सांधण्याचा, त्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत म्हटल्यावर प्रशासनही खडबडून जागं झालं. मदत कार्यात कसलीच उणीव भासू दिली गेली नाही.

त्यानंतर या भागातील 52 गावांचं पुनर्वसन झालं. त्यासाठी जमिनीचं संकलन करताना अनेक अनास्था प्रसंग उद्भवले. दोन घरातील अंतर, कामाचा दर्जा यावरून चर्चा झडल्या. भूकंपग्रस्तांसाठी आलेल्या मदतीत मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. ज्या कुटुंबातील सदस्य मृत्युमुखी पडले होते त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्यात आली. त्यातही लक्षवेधी घोटाळे झाले. तरूणांना सरकारी नोकर्‍यांचं आश्वासन देण्यात आलं होतं. ते आजतागायत पूर्ण झालेलं नाही. भूकंपग्रस्तांच्या मदतीच्या बहाण्यानं जी लूट करण्यात आली, फसवणूक करण्यात आली त्याची दखल कोणीही आणि कधीही घेतली नाही. स्वभावानं कणखर असलेला मराठवाडी माणूस तशा परिस्थितीतही स्वतःच्या पायावर उभा राहिला. त्याचं आक्रंदणं कुणाच्या लक्षातच आलं नाही. अनेकांनी त्यानंतर गाव सोडलं. मिळेल तिथं आणि मिळेल ते काम करून कुटुंबाची उपजिविका केली. आजही त्यांच्या मनावर जे ओरखडे उमटलेत ते दूर झाले नाहीत. दुसरीकडं शरद पवार यांच्यासारख्या नेत्यानं मात्र किल्लारी भूकंपात किती मोठं योगदान दिलं याचा डांगोरा कायम पिटला जातो. इतकंच काय अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना गुजरातच्या कच्छ येथे झालेल्या भूकंपाच्या वेळी त्यांनी आपत्ती आणि व्यवस्थापनाच्या कामासाठी शरद पवार यांची मदत घेतली. किल्लारी भूकंपग्रस्तांच्या व्यथा-वेदना मात्र आजतागायत कुणाच्याही लक्षात आल्याचं दिसत नाही.

कोकणच्या आपत्तीत जे नुकसान झालंय ते अशा दौर्‍यांनी भरून निघणार नाही. त्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करायला हव्यात. नरेंद्र मोदी यांनी कोरोनापूर्व काळात जगभराचे दौरे केले. त्यावेळी त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. हे सरकारी पैशानं जग फिरत आहेत, मौजमजा करत आहेत असे आरोप झाले. आज मात्र करोनाच्या काळात जगभरातून जी मदत येत आहे, ती पाहता मोदींनी सर्व देशांशी जे संबंध निर्माण केले त्याचं महत्त्व लक्षात येतं. मोदींच्या अनेक धोरणांवर टीका होऊ शकते मात्र त्यांचं हे योगदान कुणालाही नाकारता येणार नाही.
मोदी-शहांनीही वादळाच्या वेळी, महापूराच्या वेळी किमान हेलिकॉप्टरनं गुजरात-महाराष्ट्रात असे धावते दौरे केले. सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणच्या दौर्‍यावरून राजकारण करत आहेत. आम्ही तीन दिवस या भागाच्या दौर्‍यावर होतो, तुम्ही चार तासात दौरा आटोपता घेतला, असा आरोपही भाजपकडून केला जातोय. सगळं जग बेचिराख होत असतानाही हे महाभाग आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात मश्गुल आहेत. मेलेल्यांच्या टाळेवरचं लोणी खाणं हा काय प्रकार असतो हे यातून दिसून येतं. महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही या बिकट परिस्थितीचं भान आहे की नाही असा प्रश्न सामान्य माणसाला पडतोय. त्याच्यापुढं जगण्या-मरण्याचं आव्हान असताना कोणी कसे दौरे केले यावरच चर्चा झडताहेत. मदतीच्या नावावर मात्र तोंडाला पानं पुसली जात आहेत. आपदग्रस्तांना तात्पुरती मदत करणं, त्याच्या बातम्या प्रसारमाध्यमापर्यंत पोहोचवणं आणि आम्हीच कसे या संकटाच्या वेळी तुमच्या सोबत आहोत हे दाखवून देणं असले घाणेरडे राजकारण सुरू आहे.

जोपर्यंत मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करत नाही, दीर्घकालिन योजना आखत नाही, मोडून पडणार्‍या सामान्य माणसाला पुन्हा उभं राहण्यासाठी मदत करत नाही तोपर्यंत अशा वरवरच्या मदतीला काहीच अर्थ उरत नाही. कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग असताना इथला भोळा-भाबडा आणि प्रामाणिक कोकणी माणूस आर्थिकदृष्या सक्षम कसा होईल याचे दीर्घकालिन नियोजन व्हायला हवे. त्याला तात्पुरत्या कुबड्या न देता, वरवरच्या मदतीचं ढोंग करून सहानुभूती न मिळवता त्याला भरीव मदत करण्याचा प्रामाणिकपणा दाखवायला हवा.

एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणे यांच्यासारखं रांगडं नेतृत्व कोकणी माणसाला मिळालं होतं. त्यांचा कोकणवर एकहाती पगडा होता. आता राज्याच्या राजकारणातही कोकणसाठी संघर्ष करणारा नेता दिसत नाही. जे आहेत ते नेत्यांच्या आशीर्वादाखाली दबले गेलेत. स्वाभिमानी कोकणी माणसाची ही परवड पाहूनही कुणाच्याही हृदयाला पाझर फुटू नये ही शोकांतिका आहे. पश्चिमी किनारपट्टीवरील गेल्या काही काळात सातत्यानं येणारी ही अरिष्टं पाहता काहीतरी ठोस काम करणं गरजेचं आहे. वेगळा विदर्भ, वेगळा मराठवाडा अशा प्रांतिक मागण्यांना अधूनमधून जोर येत असतानाच ज्या सामान्य कोकणी माणसाच्या जिवावर मुंबई उभी आहे त्याचा आत्मसन्मान कोणीही दुखावू नये. मुख्यमंत्र्यांनी चार तासांचा दौरा केला, की विरोधी पक्षनेत्यांनी तीन दिवस कोकणात तळ ठोकला यापेक्षा त्यांना या अडचणीच्या काळात कोणी काय मदत केली हे महत्त्वाचं आहे. सामान्य माणूसही तितकंच लक्षात ठेवतो आणि योग्य वेळी ज्याला त्याला ज्याची त्याची पायरी दाखवून देतो हे ध्यानात घ्यायला हवं.

– घनश्याम पाटील
7057292092

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “मलमपट्टी नको; माणूस उभा करा!”

  1. रविंद्र कामठे

    सर तुम्ही अतिशय योग्य विषयाला हात घातलाय.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा