सोच बदलो...तुम बदलोगे।

सोच बदलो…तुम बदलोगे

Share this post on:

‘‘विचार सतत वाहतात पण त्यांचे सामर्थ्य कमी होत नाही. ते नदीप्रमाणे असतात. एक एक विचार येत गेला, नाहीसा होत गेला पण सत्ता चालली ती विचारांचीच! मनुष्याला या विचारांपासूनच प्रेरणा मिळत आली आहे. विचारांच्या सामर्थ्याची तुलना करावी अशी अन्य शक्ती या जगात नाही,’’ हे अनमोल चिंतन आहे… आचार्य विनोबा भावे यांचं!

चांगल्या विचारांनीच माणूस घडत असतो. मात्र सकारात्मक विचार करणार्‍या लोकांची प्रगती लवकर होताना आपल्याला दिसून येईल. याउलट नकारात्मक विचार करणार्‍या व्यक्तिंना अनेक संकटांना, दुर्धर प्रसंगाना सामोरं जावं लागतं! साधारणतः बर्‍याच लोकांचं आपल्या विचारांकडे लक्ष नसतंच. दिवसभरात अनेक विचार प्रत्येकाच्या मनात येत असतात. सतत निरनिराळे विचार मनात आले तर सर्वसामान्य माणसाच्या मनाचा कोंडमारा होतो. अशा विचारांना नकारात्मकतेची झालर लागली तर मग विचारूच नका. त्यावेळी मनाची अवस्था सैरभैर झाल्याशिवाय राहत नाही!

एखादी चांगली कृती करताना मनात येणारा सकारात्मक विचार आपल्याला पकडून ठेवता यायला हवा. सतत त्याचंच चिंतन मनात असायला हवं. त्यामुळे आपल्या हातून होणार्‍या कामाची अंमलबजावणी अगदी व्यवस्थितपणे पार पडणार यात शंकाच नाही. मात्र अशावेळी मनात येणारा पहिला विचारच जर नकारात्मक असला तर पुढे संकटांची मालिका येण्यास वेळ लागणार नाही! म्हणून सकाळी उठल्याबरोबर आपल्या मनात येणार्‍या पहिल्या सकारात्मक विचारावरची पकड घट्ट करण्याची सवय जर आपण लावली तर मग अख्खा दिवस आपलाच समजा. सगळं कसं आपल्या मनासारखं घडणार… कुठलंही महत्त्वाचं काम तेव्हा चुटकीसरशी होणार हे निश्चित!

बर्‍याच वेळा आपण जसं नाही तसं दुसर्‍यांंना दाखवण्याचा प्रयत्न करतो. मात्र अशा प्रकारच्या वागण्यातून फारसं काही साध्य होत नाही. उलट निराशाच आपल्या पदरी पडल्याचं लक्षात येतं. त्यामुळे नकारात्मक विचार आपसूकच आपल्या मनात रूंजी घालू लागतात. मग कितीही प्रयत्न केला तरी कुठल्याही कामात मन लागत नाही! याउलट आपण जसे आहोत तसेच जर चारचौघात वावरलो तर कुठलंही दडपण आपल्या मनावर राहणार नाही. पर्यायानं आपला आत्मविश्वास वाढून सकारात्मक विचार आपल्या मनात येणार हे नक्की! एकदा का आपल्या मनात सकारात्मक विचार यायला लागले की मग आपल्या विचारसरणीमध्येही चांगले बदल घडू शकतात. या चांगल्या बदलांमुळेच समाजात आपल्याबद्दल आदराची भावना निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.

आजकाल केवळ स्वतःसाठीच जगण्याची जणू स्पर्धा लागली आहे की काय, अशी एकूण परिस्थिती आहे! स्वतःसाठी जगताना इतरांचा विचारही कुणाच्या मनात येत नाही. मग त्यांना मदत करणं तर दूरच. जो इतरांसाठी काहीतरी चांगलं करताना दिसतो त्यालाच सकारात्मक विचारांची ऊर्जा लवकर प्राप्त होते अन् हीच वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपले दैनंदिन जीवन जगताना प्रत्येकानं आपला आवाका बघून गरजवंतांंना मदत करण्याचा विचार तरी मनात आणून बघावा असं वाटतं! अशाप्रकारचे विचार मनात आले तरी सकारात्मक ‘सोच’च्या दिशेने आपण जात आहोत हे आपल्या लक्षात येईल.

काही आडमुठ्या स्वभावाचे पालक आपल्या मुलांना अगदी नकळत्या वयापासूनच ‘हे करु नको, ते करू नको, ‘तिकडे जाऊ नकोस, इथं हात लाऊ नकोस’, ‘ते बघू नको, हे खाऊ नको’ असा सारखा नन्नाचा पाढा सुरू करतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या त्यांच्यामध्ये एकप्रकारची नकारात्मक भावना वाढीस लागते. नंतर शाळेत शिकत असताना अशा मुलांच्या सुदैवाने जर शिक्षक उत्तम मिळाले तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे कालांतराने सकारात्मक विचार त्यांच्या अंगी बाणले जातात. मग अभ्यास करताना किंवा परीक्षेच्या वेळी त्यांना सकारात्मकतेचा फायदा होताना दिसतो. घरचे वातावरण भिन्न असले तरी अशाप्रकारचे विद्यार्थी निर्भेळ यश संपादन करताना दिसतात. म्हणजेच सकारात्मक विचारांना आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे यावरून लक्षात येते.

आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात प्रसंगानुरूप छोटे मोठे विनोद करणे, चांगल्या विचारांच्या पुस्तकांचे वाचन करणे, तणाव न वाढवणारे हलकेफुलके चित्रपट किंवा नाटकं बघणे, आपल्या परिसरातील झाडांना, पक्ष्यांना पाणी देणे इत्यादी गोष्टीसुद्धा आपल्यामधील सकारात्मकता वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. तसेच चांगल्या विचारांच्या निर्व्यसनी लोकांशी मैत्री असणे हे सुद्धा आपल्या तणाव मुक्तीसाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आपल्यामध्ये निर्माण होऊ शकतो!

संपूर्ण जगाला शांती आणि अहिंसेचा बहुमोल संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध म्हणतात… ‘‘खूप जास्त विचार करणे हे दुःखाचे मोठे कारण आहे. त्यामुळे विचार नकारात्मक बनतात!’’

हे बुद्धांचं वचन निर्विवाद सत्य असल्याचं आपल्याला पदोपदी जाणवतं… कारण अति विचार करणारे लोक कालांतरानं डिप्रेशनमध्ये गेल्याची अनेक उदाहरणं आपल्या बघण्यात येतात. मग दुर्दैवानं त्यात काही आपले जवळचे मित्रही असतात. त्यांना कितीही समजावण्याचा प्रयत्न करा, त्यांचं उत्तर ठरलेलंच असतं… ‘‘कुछ समज मे नहीं आता यार, मानो दिमाग का दही हो गया है..!’’ अशा प्रकारच्या व्यक्तिंना मग निष्णात समुपदेशकच योग्य ते मार्गदर्शन करून सकारात्मकतेची दिशा दाखवू शकतात!

अब्राहम लिंकन यांचं उदाहरण याठिकाणी खूप महत्त्वाचं ठरतं. त्यांनी आपल्या जीवनातील बहुतेक निवडणुकांंमध्ये पराभव स्वीकारला. मात्र सरतेशेवटी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सगळ्यांंना आश्चर्याचा धक्का दिला तो त्यांच्यातील सकारात्मक विचारसरणीमुळेच! भीषण अपघातात पाय गमावलेल्या आणि नंतर कृत्रिम पाय बसवून एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न मनाशी बाळगणारी अरूणिमा सिन्हा! प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आणि एव्हरेस्ट ‘‘मी माझ्या मनात सर केला आहे!’’ अशी प्रचंड सकारात्मक ऊर्जा तनामनात घेऊन तिने शेवटी जगातील सर्वात उंच अशक्यप्राय एव्हरेस्ट सर केलाच. त्याचप्रमाणे नेहमीच सळसळत्या उत्साहाने आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर यशाची एकानंतर एक शिखरे पादाक्रांत करणारे आपले ‘मिसाईल मँन’ डॉ. अब्दुल कलाम हे तर सकारात्मक ऊर्जेचे मूर्तीमंत उदाहरण!

अशाप्रकारच्या असंख्य प्रेरणादायी व्यक्तिंचे दाखले आपल्याला मार्गदर्शक ठरु शकतात. गरज आहे फक्त आपण आत्मविश्वासानं अन् सकारात्मक विचारांनी मार्गक्रमणा करण्याची… आपल्यासोबत इतरांना सुद्धा प्रेरित करण्याची..!

विनोद श्रा. पंचभाई

पुणे
9923797725

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

4 Comments

  1. भाई नेहमीप्रमाणेच छान लेख.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!