संवाद व स्वगत

संवाद व स्वगत

मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे विचार करण्याची शक्ती. या विचार करण्याच्या शक्तीवरच मानवाच्या आयुष्याचा डोलारा उभा असतो. मानवाच्या प्रत्येक कृतीत काही ना काही तरी विचार असतोच. अगदी तान्हे बाळसुद्धा आपल्याला तहान, भूक लागली आहे हा विचार आपल्या रडण्यावाटे आईपर्यंत पोहोचवतच असते. या वयापासून मानव विचार करण्यास तयार होत असतो. आई, बाबा, इतर मंडळी या विचार प्रक्रियेला वळण देत असतात. तहान लागल्यावर स्वतःच्या हाताने पाणी घेण्याचा विचार आईच त्याच्या मनात रुजविते.

लहान असताना चुकून एखाद्या गरम गोष्टीला हात लागून हात पोळला की दुसर्‍या वेळेस त्या गोष्टीला हात लावायच्या वेळेस ‘याला हात लावला की हात पोळतो’ हा विचार मनात येऊन तो लहानगा हात लावण्याचा विचार सोडून देतो. अशा कितीतरी गोष्टींमुळे विचारप्रक्रियेला चालना मिळते. जसजसे वय वाढते तसतसे ही विचार प्रक्रिया परिपक्व होऊ लागते. विचारांना चालना मिळते. मनातील त्या विचारांना संवादाचे कोंदण लाभते. एक तर आलेल्या वेगवेगळ्या अनुभवातून किंवा वाचनातून मानवाला चांगले विचार कोणते आणि वाईट विचार कोणते याची ओळख होऊ लागते व त्यातूनच परिपक्वता जन्म घेते. कधी कधी मित्रांच्या, आप्तस्वकीयांच्या बरोबर संवाद साधून चांगले व वाईट विचार यांची ओळख होते.

संवाद व स्वगत हे दोन्ही अर्थवाही शब्द जरी वेगळे असले तरी ते मानवी विचारांशी निगडित आहेत. संवाद ही माणसाला मिळालेली अमूल्य देणगी आहे. संवाद हे जिवंतपणाचे लक्षण आहे. आपल्या मनातील विचारांना शब्दरूप देणे म्हणजेच संवाद. आपल्या मनातील विचार, भावना जेव्हा शब्दांतून समोरील व्यक्तिला जाणवून दिले जातात व त्यावर त्या व्यक्तिच्या प्रतिसादाची अपेक्षा केली जाते हा प्रकार संवाद या शब्दात मोडतो. ज्याप्रमाणे आपले विचार, भावना, सुख-दुःख समोरील व्यक्तिकडे व्यक्त करण्याची गरज असते तसेच समोरील व्यक्तिचे विचार समजून घ्यायची गरज आपल्याही मनाला असते. विचारांची देवाण-घेवाण होणे फार महत्त्वाचे आहे. संवादाच्या माध्यमातून या विचारांच्या देवाण-घेवाणीमुळे साहजिकच आपल्या विचारांना एक वेगळी सकारात्मक दिशा मिळू शकते. त्यामुळे आपले विचार जास्त प्रगल्भ होऊ शकतात. मनातील भावनांना शब्दांवाटे मोकळीक मिळाली नाही तर ते विचार तसेच त्या भावना मनात दाबल्या जातात आणि त्यातून काही वेगळेच पेचप्रसंग, प्रश्न निर्माण होऊ शकतात. विचारांची अथवा भावनांची कोंडी झाली तर त्याचे रूपांतर विकृत स्वभावातही होऊ शकते.

अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत पण त्या शारीरिक आहेत. संवाद ही मानवाच्या मनाची मुलभूत गरज आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मनमोकळा असेल तर त्याची खुमारी काही औरच असते.
मनातील विचारांचे चित्र असे संवादाचे वर्णन केले तर ते नक्कीच बरोबर ठरेल. मनातील विचारांचे चित्र चपखल शब्दांत मांडणे ही एक हातोटीच आहे. मनातील विचार नुसते चांगले असून चालत नाहीत तर त्या विचारांना सुयोग्य शब्दांचे कोंदण लाभले तर ते विचार अधिक प्रभावशाली वाटतात. संवाद हा जगण्याकरीता प्राणवायू आहे हे नक्की. एक वेळ माणूस अन्नाशिवाय राहू शकेल पण संवादाशिवाय जगणे खूप कठीण आहे. संवादाचा अभाव हे माणसा-माणसात दुरावा होण्याचे तसेच वाढण्याचे महत्त्वाचे कारण आहे. संवादात कसलाही अहंगंड आला की संवाद कमी होण्यास सुरुवात होते. अशी काही उदाहरणे आहेत की परदेशात राहणारा आपला मुलगा आपल्या जवळ रहावा असे वयस्कर झालेल्या मातापित्यांना वाटत असते. त्याचवेळेस मुलगाही मातापित्यांबरोबर राहण्यास तयार असतो पण येथे संवाद आड येतो. मुलाला वाटते की मातापित्याने बोलावले की लगेच मी येईन त्याचबरोबर मातापित्यांना वाटत असते की त्याने स्वतःने तिकडचे सगळे सोडून इकडे यावे.

तसेच लहान भाऊ व मोठा भाऊ यांच्यात काही कारणाने बेबनाव झालेला असतो तेव्हा मोठ्याला वाटते की मी मोठा आहे त्याने माझ्याकडे आले पाहिजे, त्याचवेळेस लहान भावाचे विचार असतात की मी लहान असलो म्हणून काय झाले मीच का नेहमी नमते घ्यायचे? या परिस्थितीत संवाद किती महत्त्वाचा ठरतो याची कल्पनाच केलेली बरी. बोलायला किंवा संवाद साधायला कोणी नसेल तर व्यक्तिमत्वावर परिणाम होतो. प्रगल्भ व्यक्तिमत्वाची मन मोकळे असण्याची गरज आहे. नवीन नवीन ज्ञान आत्मसात करण्याची तसेच ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याची गरज असते. आपल्या विचारांची आपणच पडताळणी करण्याची गरज असते. या सगळ्याकरिता संवादाची नितांत आवश्यकता असते. संवाद हे इतके प्रभावशाली माध्यम आहे की मोठे मोठे प्रश्न सोडविण्याची ताकत या संवादात असते.

स्वगत या शब्दाचे मूळ सोलोलॉकी या लॅटिन शब्दात आहे. सोलोलॉकी या शब्दाचा स्वगत हा प्रतिशब्द आहे असे म्हटले तर जास्त बरोबर आहे. स्वगतचा अर्थ स्वतःशी बोलणे. सामान्यतः हा शब्द नाट्यक्षेत्राशी संबंधित वापरला जातो. नाटकाची गती राखण्यासाठी या स्वगतांची योजना केलेली असते. नाटकातील पात्रांच्या मनात काय चालले याची कल्पना प्रेक्षकांना यावी म्हणून या स्वगतांची योजना केलेली असते. या स्वगतांमुळे इतर पात्रांचे भावविश्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. स्वगत हे फक्त प्रेक्षकांकरिता असते. नाटकातील इतर पात्रे ते स्वगत ऐकत नाहीत. बहुतेक वेळा स्वगत म्हणणारेच पात्र रंगमंचावर असते आणि आपले मनोगत स्वगताच्या रूपात प्रेक्षकांसमोर सादर करीत असतात. काही नाटकांची स्वगते खूपच गाजली. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकातील लीला बेणारे यांचे तर ‘नटसम्राट’मधील गणपतराव बेलवळकर इत्यादी स्वगते खूपच गाजली. काही नाटकात खलनायकाच्या मनात असलेले कुटील कारस्थान स्वगतामुळेच प्रेक्षकांना कळते. स्वगत हे नाटकातच असते असे नाही तर आपल्या दैनंदिन दिनचर्येत सुद्धा या स्वगताचा आपण अनुभव घेत असतो.
व्याख्यान देणारा वक्ताही व्याख्यान देण्याआधी त्याची तयारी म्हणून स्वगताचाच आधार घेतो व मगच श्रोत्यांसमोर येतो. घरात जर पती-पत्नीत भांडण, मतभेद झाले तर पती किंवा पत्नी या स्वगताची मदत घेतात. जोडीदारासमोर जास्तीचे काम काढून ते करताना जोडीदाराला ऐकू जाईल असे स्वगत म्हटले जाते. ‘मी एकटाच, एकटीच काम करतो, करते पण कोणालाही काही वाटत नाही. कामात मदत करणे तर दूरच पण काम केल्याबद्दल कौतुकाचे दोन शब्द तोंडातून बाहेर पडतील तर शपथ. माझे नशीबच खोटे, दुसरे काय!’ हे नुसते स्वगतच नाही तर हे सगळे जोडीदाराच्या कानावर पडावे म्हणून त्याला स्वगताचे रूप दिलेले असते. हे जोडीदाराने ओळखलेले असते.

कधी कधी मधून मधून भांडी, दारे, खिडक्या इत्यादींचे आवाज येत असतात. कधी हे स्वगत विषयाला धरून असते तर कधी अनेक विषयांना स्पर्श करणारे असते. स्वगत अजून एका प्रकारात प्रभावीपणे, परखडपणे मांडले जाते. दूरदर्शनवर एखादी क्रीडा स्पर्धा पाहताना हमखास याचा प्रत्यय येतो. ती क्रीडा स्पर्धा पाहताना स्वतःला त्या खेळाचा / खेळाची विश्लेषक समजून तसेच त्या खेळातील नैपुण्य प्राप्त असल्याचाही आव आणला जातो. क्रिकेटचा सामना पाहताना ‘फलंदाजाने हा चेंडू असा खेळावयास पाहिजे होता’ अथवा ‘या गोलंदाजाने फलंदाजाला लेगब्रेक टाकला तर फलंदाज बाद होईल’ इत्यादी वाक्ये स्वतःशीच बोलताना त्या खेळाडूंची अक्कल तर काढली जातेच पण ‘त्याला काहीच येत नाही, उगाच जागा अडविली आहे’ अशी वाक्ये स्वगतच बोलली जातात. खेळणार्‍याला मुर्खात काढून ही स्वगत म्हणणारी मंडळी मोकळी होतात. शाळा, महाविद्यालयात ‘लास्ट बेंचर’ असा एक संवर्ग असतो. या वर्गवारीतील मुले, मुली या स्वगताचा
शेवटी असे सांगता येईल की संवाद हा प्रत्यक्षपणे समोरासमोर होतो. स्वगत हा संवादाचा भाग असूनही स्वतःच्या मनाशी बोलला जातो. नाटकाची गती वाढविण्यासाठी स्वगत या प्रकारची योजना केलेली असते तर संवाद तोच दुवा पकडून नाटकातील पात्रांचे विचार प्रेक्षकांसमोर मांडीत असतो. कधी कधी संवाद ही गोडीची परिसीमा गाठावी इतके तेल-तुपात-साखरेत घोळवलेले असतात पण स्वगत मनातील खरे विचार, खर्‍या भावना याचे प्रतिबिंब असते. संवाद व स्वगत यात एकरूपता आली की तो दुग्धशर्करायोगच होतो. हेही तेवढेच खरे आहे की स्वगतामुळे संवादाला सहजता येते.

मिलिंद कल्याणकर
नवी मुंबई 9819155318

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

2 Thoughts to “संवाद व स्वगत”

  1. रविंद्र कामठे

    फारच छान लेख

  2. Joshi dinkar

    खूप छान

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा