बौद्धिक मागासपणाचे काय करणार?

बौद्धिक मागासपणाचे काय करणार?

मानवी जीवन हे विलक्षण आहे. आपापल्या सापेक्ष जीवनचौकटीत तो आपले आयुष्य जगत असतो, धारणा बनवत असतो. आपले व्यक्तिमत्व आपापल्या कुवतीप्रमाणे समृद्ध वा अवरुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. या समृद्धीच्या वा अवरुद्धीची उंची-खोली मोजत बसण्याचे खरे तर कारण नाही. प्रत्येकाचे जीवन हा एक स्वतंत्र अनुभव असतो. कोणताही बाह्य विचार मनुष्य पूर्णपणे स्वीकारत नाही.

मग तो धर्मविचार असो की राजकीय विचार. अर्थविचार असो की सामाजिक विचार. अनेकदा प्रत्येकजण विविध विचारांच्या सापेक्ष उपस्थितीत आपल्या स्वयंविचारांची जोड देत एक स्वत:चे विचारविश्व बनवत असतो. अशा अगणित विचारांच्या संदर्भव्युहात विचारकलह निर्माण होणे स्वाभाविक आहे. तसे घडतेही. किंबहुना तसेच घडणे अभिप्रेत असते. फक्त विचारकलह हा सृजनात्मक असावा, विध्वंसक नसावा, एवढीच काय ती अपेक्षा बाळगता येते.

वैचारिकतेशी प्रत्येकाचे एक इमान असावे असेही अभिप्रेत असते. विचार बदलु शकतात. जसे नवे जीवन दृष्टीक्षेपात येते, नवे अनुभव येतात तसे विचार बदलणे… मग ते व्यक्तिगत जीवनाबाबत असोत वा सामाजिक जीवनाबाबत, धर्मतत्त्वांबाबत असोत की जीवनमूल्ल्यांबाबत. परिवर्तनशीलता हाच निसर्गाचा नियम आहे. उलट जे गतकाळालाच चिकटुन बसतात व गतकाळातील आमचे सारे काही श्रेष्ठच होते व तसेच जीवन-नियम आजही कायम असावेत असे जे मानतात त्यांना आपण सनातनी, प्रतिगामी असे म्हणतो. काळ हा नेहमीच पुरोगामी-अग्रगामी असा असतो. नवीन कालसापेक्षतेत जे नवविचार देतात, समाज विचारांना एकंदरीत समृद्ध करत नेण्याच्या कार्यात हातभार लावतात त्यांचे विचार पटले वा नाही पटले तरी एकुणातच विचारकलहातुन नवविचार निर्माण होण्याचे अनवरत प्रक्रिया सुरु होते. जेव्हा अशी प्रक्रिया थंबते तेव्हा अंधारयुग निर्माण झाले असे मानले जाते. भारतात काय किंवा युरोपात काय, अशी अंधारयुगे येऊन गेली आहेत. समाजजीवन कोणत्याही नव-विचारचैतन्याला मुकलाय असे घडुन गेले आहे.

सॉक्रेटिसने तरुणांनाच प्रश्न विचारत वैचारिक क्रांती घडवण्याचा प्रत्यत्न केला. आपल्या विचारांशी प्रतारणा न करता त्याच्या सरकारने त्याला या कृत्याबद्दल जी शिक्षा दिली… हेमलॉक विषाचा पेला पिण्याची ती त्याने पळुन जाण्याची सहज संधी उपलब्ध असतानाही नाकारली. तो विष प्याला आणि मरता-मरताही तत्त्वज्ञानाचा नव-अनुबंध निर्माण करत. हे अतुलनीय धैर्य व स्व-विचारनिष्ठा जगाच्या इतिहासात क्वचित पाहण्यात येते. ग्रीसने जगाला ज्या अद्भुत वैज्ञानिक, तत्त्वज्ञान व साहित्याच्या देणग्या दिल्या त्याला कारण असे विचारस्तंभ होते म्हणुन!
आपण भारतीय मात्र जे मृतवत राहिलो ते राहिलोच. वेद-उपनिषदे, रामायण महाभारत… पुराणे यात अडकुन पडलो ते पडलोच. चौथ्या शतकात पृथ्वी सपाट नसुन ती गोल आहे व स्वत:भोवती फिरते हा सिद्धांत मांडणारा आर्यभट पुढे ब्रह्मगुप्त, परमादीश्वरादि खगोलज्ञ यांनी साफ फेटाळुन लावला. तोवरच काय, पार कोपर्निकस (सतरावे शतक) येईपर्यंत पृथ्वी सपाट आहे याच भ्रमात अवघे जग राहिले. ज्ञानेश्वरांपर्यंत आर्यभटाची ही कृती पोहोचली ती शंकराचार्यांच्या मार्गे! पण जवळपास 900 वर्षांनी ज्ञानेश्वरांनीही आर्यभटाचाच हात धरत पृथ्वी फिरते, सूर्य स्थिर आहे… पण ज्याप्रमाणे नावेतुन जाताना आपल्याला तीरावरील वृक्ष स्थिर असूनही मागे जातात असा भास होतो तद्वतच न चालता सूर्याचे चालणे वाटते, असे म्हटले. (ज्ञानेश्वरी 4:97-99) पण एका गणिती सिद्धांताचे आध्यात्मिक रुपकात रुपांतर केल्याने गणिताची… शास्त्राची हत्या झाली आहे हे आम्हाला समजलेच नाही!

पायची पाच डिजिटपर्यंतची किंमत काढणारा पहिला गणितज्ञ आर्यभटच. sin आणि cos या गणिती संज्ञा निर्माण करणाराही आर्यभटच! खरे तर आर्यभटाचा अभिनव विचार न हेटाळता अथव अध्यात्मात घुसवत त्याला परलोकवादी सिद्धांतात बदलवत न बसता त्याची शिस्तबद्ध व शास्त्रशुद्ध प्रगती करण्याचा विविधांगी प्रयत्न झाला असता तर कदाचित भारत हाच विज्ञानातील एक महासत्ता बनला असता. गुलामीत खितपत रहावे लागले नसते. या जाती-पातींतील व्यर्थता तेव्हाच कळुन चुकली असती पण या झाल्या जर-तरच्या गोष्टी.
मला अनेकदा प्रश्न विचारला जातो तो हा की गतकाळाची एवढी चर्चा का? मला वाटते ती आवश्यक आहे, कारण इतिहासाकडे डोळे उघडुन पाहिले नाही तर आपल्याला आपल्या चुका कदापि कळणार नाहीत. वर्तमानाचे आकलनही असेच धुसर होत जाईल. मग भविष्य काय असणार? आपण इतिहासाकडे जातीय दृष्टीने व धार्मिक अहंकारांच्या भावनांतुन पाहतो. पूर्वीही तसेच घडत होते. रामकथा जैन व बौद्ध धर्मियांनी आपापल्या सोयीने पुन्हा लिहुन काढली. वैदिकांनीही बालकांड आणि उत्तरकांड घुसवत आणि मूळ कथेत सोयीस्कर घालघुसड करत रामकथेची वाट लावुन टाकली. महाभारताचे तर विचारुच नका! आम्ही सत्याचे बुरुज अंधविश्वासाच्या गहन धुक्यात गडप करुन टाकले. आमची बुद्धी आजही तशीच चालत आहे हे अजून एक दुर्दैव. एकेक जात आपल्या प्राचीनत्वाच्या नव्या मिथककथा निर्माण करत नवी पुराणे लिहित आहेत. कोणाचीही चिकित्सा कोणालाही नको आहे. भावना दुखावतात. दंगे-धोपे होतात… हिंसक हल्ले होतात.

मग टोळ्या करुन राहणार्‍या हिंसक आदिमानवात आणि या आधुनिक आदिमानवांत फरक तो काय? अशी कोणती मानसिक प्रगती त्याने केली आहे? होत्या त्याच मानसिकतेत राहत ज्या विचारव्युहात आपण अडकलो आहोत त्यामुळे वरकरणी आपण एक विचारकेंद्रबिंदु आहोत असे वाटले तरी त्या बिंदुत्वात एक महत्त्वाचे न्यून राहते ते हे की पुढे जाण्याचा मार्ग खुंटलेला असतो. होतो तेथेच… आहो तेथेच आणि अजरामर तिथेच अशी अवरुद्धविचार स्थिती निर्माण होते.

आम्ही भारतीय पुराणपंथीय होतो आणि आहोत. आम्ही कधीच पुरोगामी नव्हतो. आम्ही धर्माशिवायही जीवन असू शकते हा चार्वाक, मस्खरी गोशालांदिचा विचार पुरातन काळातच अव्हेरला. आम्ही विश्वाचे निर्मिती कारण हे इश्वरी तत्त्वात नसून विभिन्न भौतिक मुलतत्त्वांत आहे हा सांख्य विचारही कधीच फेटाळला. आमच्या पूर्वजांनी, त्यात सगळ्यांच जाती-जमाती व भारतात जन्मलेल्या धर्मांचे आले, धर्म, त्यांची कर्मकांडे, त्याला समर्थन देण्यात हवे तसे तत्त्वज्ञान बनवत बसवण्यात आपली प्रतिभा खर्च केली. त्यावरच युक्तिवाद झडत राहिले. आम्हाला धर्ममार्तंडांनी नव्हे तर आमच्याच धर्मलालसेने धर्म-जातीगुलामीच्या बेड्यांत जखडले. त्या बेड्यांत असण्यातच आमची सुरक्षितता होती कारण वैचारिक बंड करत समाजाला पुढे नेण्याची आमची मानसिक शक्तीच नव्हती.

आताही आम्ही तेच करत आहोत. आमच्या गतानुगतिकतेचे पातक आम्हाला कोणावर तरी फोडायचे असते. त्यासाठी कोणी मुस्लिमांना जबाबदार धरतो तर कोणी ख्रिस्त्यांना. कोणी ब्राह्मणांना तर कोणी बौद्धांना! पण मुळात ही सर्वच भारतीयांची दांभिक आणि पराजित फसवेपणाच्या मानसिकतेचे एकुणातील फलित आहे यावर आम्ही कधी विचार करणार? आजही जर आम्ही आम्हाला याने फसवले… त्याने घात केला असे गळे काढत असू तर त्याचा एकमेव अर्थ असा होतो की हा समाजच षंढांचा आहे.

इतिहासाचे अन्वेषन करत रहावेच लागणार आहे. त्याखेरीज आम्हाला आमच्या मूर्खपणाचे रहस्य समजणार नाही. ते रहस्य जोवर समजणार नाही तोवर आम्ही आपापली खुरटी शिस्ने मिरवीत जय अमुक… जय ढमुक करण्यात आणि आम्ही केवढे संवेदनाशील आहोत हे तोडफोडी करुन सिद्ध करण्यात धन्यता मानत राहु.

शेवटी ज्यांना गटार-विचार-व्यूहात कसलेही स्वत:चेही तत्त्वज्ञान नसताना रमायचे आहे त्यांना कोण आवाज देणार? सामाजिक मागासपणा एक वेळ दूर होईल पण या बौद्धिक मागासपणाचे आपण काय करणार?

– संजय सोनवणी
पुणे
9860991205

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “बौद्धिक मागासपणाचे काय करणार?”

  1. Joshi dinkar

    खूप छान, नेहमीप्रमाणेच.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा