आठवणीतील चित्रपटगृहे

आठवणीतील चित्रपटगृहे

साधारणतः १९५१ ते १९७० ही जी २० वर्षे होती तो काळ भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ ओळखला जातो. खरोखरच त्या काळात एकापेक्षा एक सरस नितांत सुंदर अशा चित्रपटांची रेलचेल होती. त्या काळातील प्रत्येक अभिनेत्याने तसेच अभिनेत्रीने आपल्या अंगभूत अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य केले होते. चित्रपट संगीताने त्या काळात सुवर्णकळसच गाठला होता. श्रवणीय तसेच अनवट चालीची गाणी देऊन संगीतकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. काही चित्रपटांत आठ ते दहा गाणी असूनही सगळीच गाणी श्रवणीय असायची. अभिरुचीसंपन्न गीतलेखक, गायक, संगीतकार असल्यामुळे त्यांची गाणी म्हणजे बंदा रूपया असायचा. संगीतकार आपल्या जादुई पोतडीतून एकापेक्षा एक वरचढ चाली काढून रसिकांच्या कानाची तृप्तता करीत असतं.

वर उल्लेख केलेल्या काळात सगळीच चित्रपटगृहे एकल पडदा अशी होती. असे जरी असले तरी चित्रपट पाहण्यास मजा यायची. आजच्यासारख्या सोयीसुविधा त्यावेळेस चित्रपटगृहात नव्हत्या. चित्रपटगृहात वातानुकूल यंत्रणा बसविणे ही कल्पना फारसी रुजली नव्हती. त्यावेळचे सर्वांगसुंदर चित्रपट व त्यातील श्रवणीय गाणी यामुळे चित्रपटगृहातील गैरसोयी याकडे जास्त लक्ष जात नसे पण एवढे असूनही काही चित्रपटगृहे कायमची लक्षात राहिली आहेत. या चित्रपटगृहात सकाळी ११.३० वाजताचे मॅटिनी शो असायचे तसेच काही चित्रपटगृहात फक्त दर रविवारी सकाळी ९ चा मॉर्निंग शो असायचा व त्याचे तिकीटही खूप कमी म्हणजे एक ते दीड रूपया असायचे. मॉर्निंग शोचे तिकीट तर कधी कधी ७० / ८० पैसे असायचे. घरी कळू नये म्हणून हे दोन्ही प्रकारचे शो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपले वाटायचे. त्यामुळेच त्यावेळच्या माझ्यासारख्या अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ते फार जवळचे वाटायचे. या दोन्ही वेळेला चित्रपटगृहात हटकून गाजलेले तसेच सुमधुर संगीतांनी नटलेले कृष्णधवल रंगातील चित्रपट लागायचे. आजच्यासारखेच दर शुक्रवारी मॅटिनीला चित्रपट बदलत असे. त्यामुळे शुक्रवार आला की ठरलेली मित्र-मंडळी न ठरवता चित्रपटगृहावर हजर व्हायची. त्यामुळे एक व्हायचे की ओळखीचे तसेच बिनओळखीचे ठरलेले चेहरे हमखास दर शुक्रवारी दिसायचे. त्यामुळे ओळखी व्हायच्या तसेच काही जणांच्या / जणींच्या बाबतीत ही ओळख परिचयात बदलायची. असो

त्या काळात शिवाजी पार्क भागात टायकलवाडी भागात बादल, बिजली व बरखा अशी तीन चित्रपटगृहे जवळजवळ खेटूनच होती. त्यात सकाळी १२ वाजता, दुपारी ३ वाजता, संध्याकाळी ६ वाजता व रात्री ९ वाजता असे ४ शो असत. त्यातील बादल व बिजली ही दोन चित्रपटगृहे एकमेकांस चिकटून होती व बरखा गल्लीच्या पलीकडे होते. त्यातील फक्त बरखा या चित्रपटगृहात तीन शो असायचे व १२ च्या ऐवजी ११.३० चा मॅटिनीचा शो असे. एकदा आम्ही तेथे देव आनंदचा ‘ज्वेल थीफ’ हा छान चित्रपट पहायला गेलो होतो. हा चित्रपट उत्कंठावर्धक होता हे सांगावयाची गरज नाही. सुरुवातीला एक हात पडद्यावर येतो व चित्रपटाच्या शेवटी त्याची उकल होते पण तो हात दिसल्यावर एकजण मोठ्याने ओरडला की अरे हा बघ अशोक कुमारचा हात. हे तो बोलल्याबरोबर त्याला इतका धोपटला की तो चित्रपटगृह सोडून गेला. तसाच बादल या चित्रपटगृहाचा देखील एक किस्सा आहे. चित्रपटाच्या मध्यंतरात बाहेर जायचे असेल तर ‘बादल’ नाव लिहिलेला पण तारीख नसलेला पास दिला जायचा. आमचा एक मित्र चित्रपट पाहायला गेला आहे हे घरी कळू नये म्हणून तिकीट काढून मध्यंतरात तो पास घेऊन घरी यावयाचा व दुसऱ्या दिवशी त्याच पासवर मध्यंतरानंतरचा चित्रपट पाहायचा. या चित्रपटगृहांपासून १० मिनिटावर ‘रिव्होली’ नावाचे चित्रपटगृह होते. तेथे ‘राम और शाम’, गॅम्बलर, शर्मिली, अंदाज इत्यादी चित्रपट पाहिले. तिथून जवळच ‘सिटीलाईट’ चित्रपटगृहात हातिमताई, भागंभाग, धन्य ते संताजी धनाजी इत्यादी चित्रपट पाहिलेले अजूनही आठवतात. मॅटिनीचे एक चित्रपटगृह म्हणजे रानडे रोडवर आज जिथे नक्षत्र मॉल आहे त्या जागी पूर्वी असलेले कोहिनुर चित्रपटगृह. या चित्रपटगृहाची खासियत अशी होती की मागच्या रांगेत असलेल्या आसनाच्या आजूबाजूला बाल्कनीचे खांब होते. त्यामुळे त्या आसनावर बसलेल्या प्रेक्षकांना ते खांब चुकवून चित्रपट पाहावा लागे म्हणजेच कधी खांबाच्या डावीकडून तर कधी खांबाच्या उजवीकडून. याच चित्रपटगृहात दर रविवारी सकाळी ९ वाजताचा मॉर्निंग शो असायचे. साधारणतः २ तासाचे हिंदीत भाषांतरीत केले दाक्षिणात्य चित्रपट असायचे पण कोहिनुर चित्रपटगृहाची खरी ओळख म्हणजे आपल्या मराठमोळ्या ‘दादा कोंडके’ यांनी सलग आठ (८) महोत्सवी चित्रपट रसिकांसमोर सादर केले.

त्याचप्रमाणे माहीमला ‘श्री’ नावाचे एक चित्रपटगृह होते. त्याची खासियत म्हणजे त्या चित्रपटगृहाच्या बाल्कनी वरच्या बाजूलाच होती पण बाजूच्या भिंतीला लागून होती. साधारणतः श्री चित्रपटगृहात इंग्रजी चित्रपटच लागायचे. या चित्रपटगृहात मुख्य चित्रपट मध्यंतरानंतर चालू व्हायचा. रात्री ९ चा शो बघायचे ठरले की आरामात रात्रीचे जेवण झाल्यावर सहज फिरत फिरत गेलो तरी चित्रपट व तिकीट दोन्हीही मिळायचे. तसेच त्याच माहीम भागात एक पॅराडाईज नावाचे चित्रपटगृह होते. तिथेच दिलीप कुमारचा ‘आन’ चित्रपट पाहिलेला. त्याचेही तसेच तिकीट काढायला रांगेत उभे राहिले की चालू असलेल्या चित्रपटाचे संवाद ऐकू येत असत. त्याचबरोबर माटुंग्याच्या अरोरा या चित्रपटगृहातही रविवारी सकाळी ९ वाजता शो असायचे. तसेच या ‘श्री’ चित्रपटगृहातही रविवारी सकाळी ९ वाजता मॉर्निंग शो असायचे. दादरच्या टिळक पुलाच्या सुरुवातीला प्लाझा नावाचे चित्रपटगृह आहे पण तिथे मॅटिनी नसल्यामुळे तिकडे जाण्याचा प्रश्नच आला नाही. तसेच अजून एक चित्रपटगृह म्हणजे प्रभादेवीचे किस्मत. किस्मत या चित्रपटगृहाबद्दल सांगायचे म्हणजे समस्त रसिकांना नाचायला व डोलायला लावणारा मास्टर भगवान यांचा ‘अलबेला’ या चित्रपटाचा सेकंड रनचा उदयास्त याच किस्मतमध्ये झाला. दादर टीटीजवळ ब्रॉडवे नावाचे चित्रपटगृह होते. हे चित्रपटगृह लक्षात रहाण्याचे कारण की मदन मोहनच्या संगीतांनी नटलेला नितांत सुंदर असा ‘अनपढ’ चित्रपट इथे फक्त मॅनिटी शो ला दाखविला जायचा व तो चित्रपट इथे सलग २५ आठवडे चालला. ‘तीन देविया’, ‘हाथी मेरे साथी’ सारखे दर्जेदार चित्रपट याच चित्रपटगृहात प्रथम प्रकाशित झाले.

तुलना करायची म्हटली तर या चित्रपटगृहाचे तिकीट जरा महाग असायचे. त्यामुळेच प्रेक्षकवर्गही त्याच श्रेणीतील असायचा. तिथून जवळच ‘शारदा’‘चित्रा’ ही चित्रपटगृहे असल्यामुळे पर्याय उपलब्ध असायचे. राजकपूर निर्मित व अभिनित ‘मेरा नाम जोकर’ या दर्जेदार चित्रपटाचा पहिला खेळ याच चित्रा चित्रपटगृहात लागला होता व तेव्हा या चित्रपटाला दोन मध्यंतर होते पण दुर्दैवाने प्रथम खेळानंतरच प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठच फिरविली. या चित्रपटासंबंधी अजून एक आठवण अशी की प्रथम खेळाच्या आधी तिकिटे छापील किमतीपेक्षा कितीतरी जास्त किमतीला विकली जात होती पण दुसऱ्या खेळाला तीच तिकिटे छापील किमतीला किंवा त्यापेक्षा कमी किमतीला सहज उपलब्ध होत होती. त्याचवेळेस रानडे रोडवरील कोहिनूर या चित्रपटगृहात देव आनंदचा ‘जॉनी मेरा नाम’ तसेच शारदा या चित्रपटगृहात दिलीप कुमारचा ‘गोपी’ मोठ्या प्रमाणावर रसिकांची / प्रेक्षकांची गर्दी खेचत होते. प्रथमच प्रसारित झाला तसेच अजून थोडे पुढे गेले की परळचे हिंदमाता व लालबागचे भारतमाता चित्रपटगृहे आहेत. त्यावेळेस त्या चित्रपटाच्या प्रांगणात शिरले तरी चित्रपटाचे संवाद ऐकू येत असत. त्या काळात भारतमाता चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघणे म्हणजे दिव्य होते. तिथे चक्क आसनावर मांडी घालून बसावे लागे कारण चित्रपटगृहात झुरळांचा मुक्त वावर होता. आता परिस्थिती सुधारली आहे असे ऐकिवात आहे पण ही दोन्ही चित्रपटगृहे जवळची वाटायची कारण तिकडे तिकीट मिळणारच याची खात्री असायची. वरळीचे ‘लोटस’ तसेच ‘गीता’ त्याचबरोबर जुहूचे ‘चंदन’ तसेच सांताक्रूझचे ‘मिलन’ तसेच घाटकोपरच्या ‘श्रेयस’ ही चित्रपटगृहेही जवळची वाटायची पण प्रवास खर्चाचा विचार करता त्याकडे पाठ फिरविली जायची.

मुंबईच्या सातरस्ता परिसरात ५ / ६ डब्बा चित्रपटगृहे होती. सगळ्याच चित्रपटगृहांची नावे आठवत नाही पण काही लक्षात आहेत ती म्हणजे ‘गुलशन’, ‘न्यू शिरीन’ इत्यादी. चित्रपटगृहे जरी डबडा असली तरी तेथे चित्रपट अव्वल नंबरी लागायचे. नितांत सुंदर संगीतांनी नटलेले तसेच दिलीप कुमार, भारत भूषण, देव आनंद’ मधुबाला, वहिदा रहमान इत्यादी कसलेले अभिनेते / अभिनेत्री अभिनित चित्रपट पाहिल्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. वांद्रे येथे गॅलॅक्सी, जेमिनी आणि गेईटी अशी तीन चित्रपटगृहे होती. तेव्हा गेईटी चित्रपटगृह वातानुकूलित होते व तेव्हा त्या वेळेस तिथे अनुपम खेर यांचा ‘सारांश’ हा चित्रपट लागलेला. आम्ही वेळ घालविण्यासाठी व मस्त झोप घेण्यासाठी तो चित्रपट पा पाहावयास गेलो होतो पण पहिल्या पाचच मिनिटात आमची झोप उडाली व एक सर्वांग सुंदर चित्रपट बघण्याचा योग आला. चित्रपट संपेपर्यंत आम्ही एकमेकांशी बोलायच्या मनस्थितीत नव्हतो इतके त्या चित्रपटाने आमच्यावर गारुड केले होते. त्याच भागात ‘चेतना’ नावाचे चित्रपटगृह होते तिथे मनोज कुमारचा ‘रोटी कपडा और मकान’ प्रथम प्रकाशित झालेला. वरळी येथे सत्यम, सुंदरम व सचिनम अशी तीन चित्रपटगृहे एकमेकाला खेटून होती. तिथेसुद्धा मॅटिनी स्वस्तात असल्यामुळे ती चित्रपटगृहे जवळची वाटायची तसेच वांद्रे येथे एक ‘ड्राईव्ह-इन’ नावाचे खुले चित्रपटगृह होते. त्यात गाडीत बसून चित्रपट पहाण्याची सोय केली होती. गाडीच्या खिडकीतून माईक गाडीत घ्यायचा व चित्रपट पहायचा. त्यामुळे बाहेर काहीच ऐकू येत नसे. मी त्या चित्रपटगृहात (?) बाजूच्या कट्ट्यावर बसून ‘कोशिश’ हा चित्रपट पाहिलेला कारण त्यात संवाद नव्हते पण संजीवकुमार व जया भादुरी या दोन्ही कसलेल्या कलाकारांचा नितांत सुंदर सहज अभिनय पाहावयाचा योग आला होता. तसेच गल्लीत रस्त्याच्या मध्ये अथवा गच्चीवर पडदा लावून दाखवलेले चित्रपट खूप पाहिले आहेत.

त्या चित्रपटांची खासियत म्हणजे उदारणार्थ ‘अलबेला’ या चित्रपटात भगवानची वहिनी एका बाजूनी महाराष्ट्रीयन पद्धतीची साडी नेसायची तर पडद्याच्या दुसऱ्या बाजूने गुजराथी पद्धतीची साडी नेसायची पण चित्रपट पाहण्यास मजा यायची. मधूनच कोणी उंदीर आला म्हणून ओरडायचे व एकच कल्लोळ व्हायचा. काही जिवाभावाच्या मित्र-मैत्रिणींचे भेटण्याचे ते संकेतस्थळ असायचे. एव्हढे असूनही काही चित्रपटगृहे कधीच मनापासून भावली नाहीत. तिथे चित्रपट पाहिले पण चित्रपटगृहे मनात कधीच बसली नाहीत. इरॉस, कॅपिटॉल, स्ट्रॅन्ड, न्यू एम्पायर, स्टर्लिंग, मराठा मंदिर, अप्सरा, शालिमार, नाझ, नॉव्हेल्टी इत्यादी. आता तर शालिमार बंदच झाले आहे. शालिमारला पाहिलेला पहिला चित्रपट म्हणजे देव आनंदचा ‘प्रेमपुजारी’. अप्सराच्या जागी आता व्यावसायिक संकुल उभे आहे. अप्सराचा पहिला चित्रपट राज कपूरचा ‘संगम’. तेव्हा अप्सराच्या प्रवेशद्वाराजवळ आतल्या बाजूला पाण्याची छोटी छोटी कारंजी होती व त्यात दिव्यांची आरास केलेली. आता या फक्त आठवणी राहिल्या. त्यातील त्यातल्या त्यात जवळचे वाटणारे चित्रपटगृह म्हणजे कॅपिटॉल. अगदी चाळीत गेल्याचा भास होत असे.

शेवटी एवढेच सांगता येईल की चित्रपटगृह कसेही असले तरी चालेल पण चित्रपट चांगला पाहिजे. त्याकाळची खूपशी चित्रपटगृहे आजच्या तुलनेत अगदीच डब्बा चित्रपटगृहे होती पण त्यात लागणारे चित्रपट एकापेक्षा एक होते. कधी कधी एकाच वेळी वेगवेगळ्या ४/५ चित्रपटगृहात अवीट संगीताने बहरलेले तसेच आवडत्या अभिनेते / अभिनेत्रींचे चित्रपट लागलेले असायचे तेव्हा प्रश्न पडायचा की हा पाहू की तो पाहू. त्यामुळेच ती चित्रपटगृहे जवळची वाटायची. चित्रपट बघणाऱ्यांपैकी फार कमी जणांनी ‘गीता मेरा नाम’ हा चित्रपट पाहिला असेल पण मी त्या कमी जणांच्यात आहे. प्रत्येकजण आपल्या महाविद्यालयीन जीवनात चित्रपट पाहतो व तोच आनंद त्याला / तिला आयुष्यभर आनंदात ठेवतो.

मिलिंद कल्याणकर

नेरुळ, नवी मुंबई
9819155318

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा