माझं बहुमूल्य मत वाया गेलं

माझं बहुमूल्य मत वाया गेलं

ज्या प्रमुख उमेदवाराच्या भरवशावर मी राज्याच्या विधानसभेसाठी मतदान केलं होतं ते महत्त्वाचं मत वाया गेलं. आजची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता कुठे उभे आहोत आपण? मला अक्षरशः आपला महाराष्ट्र एका अनाथ मुलासारखा भासायला लागला आहे.

केंद्र सरकार ज्या पक्षाच्या हातात आहे त्यांची सत्ता इथे नाही म्हणून ते आपल्याकडे लक्ष देत नाही, असा याचा अर्थ होतो का? ज्यांच्या हातात ती गेली आहे ते फक्त आपल्या खुर्चीसाठी आजच्या कठीण परिस्थितीत ठाम निर्णय घेऊ शकत नाहीत? आज जनतेला काय काय हाल सोसावे लागत आहेत? लसीकरण, ऑक्सिजन, हॉस्पिटल, औषधे, इंजेक्शन कुठेही समाधानकारक परिस्थिती नाही. ही सगळी बिकट स्थिती निर्माण झाली आणि अजून वाढत आहे. हा सावळा गोंधळ संपूर्ण राज्यभर माजला आहे. हा कोण सुधारणार? कधी आपली गाडी रुळावर यायला सुरुवात होणार?

चार महिन्यात परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पाणी डोक्यावरून गेलं आहे. समाजातील प्रत्येक वर्ग हा त्रास सोसत आहे. तो रस्त्यावर भाजी विकणारा असो, की फॅक्टरी चालवणारा माणूस असो, अशीच परिस्थिती आहे मी मान्य करते. आपल्याला कुठेतरी सावरायची, व्यवस्थित प्लॅनिंग करून काम करायची गरज होती की नाही याचे उत्तर सर्व मंत्री महोदय, खुर्चीवर बसलेल्यांनी द्यावीत. फक्त लॉकडाऊन करायचा म्हणून वृत्तपत्रांत रोज काहीतरी नवीन बातम्या येतात आणि तुम्ही त्यांना बदलता. याला जबाबदार कोण? रोज पब्लिक वेड्यात निघते. 11 तारखेला जो गोंधळ नाशिकमध्ये झाला कडक लॉकडाऊनच्या निर्णयामुळे आणि दुसर्‍या दिवशी परत तुमची मतं बदलली. अफाट गर्दी झाली होती. त्यामुळे पेशंट वाढले नसतील का? आणि परत दुसर्‍या दिवशी तुम्ही मत बदलले की आता नियमांमध्ये बदल करूया. हा खेळखंडोबा झालेला वाटत नाही का?

आपण कडक निर्णय घेऊन दहा दिवसांसाठी ही साखळी तोडण्याचा प्रयत्न करून पाहू शकत नाही का? अशा कठीण परिस्थितीत तुम्ही जर काही काही ठाम निर्णय घेतले तर भलेच होणार आहे ना जनतेचे? डॉक्टर, नर्सेस, मेडिकल स्टाफ, मेडिकल शॉप, हॉस्पिटल, पोलीस होमगार्ड, सरकारी कर्मचारी या सगळ्यांत मदत करणारे या सगळ्यांवरचा बोजा वाढत चालला आहे. शेवटी तीही माणसं आहेत.

कुठे कुठे आम्ही प्रत्येक वेळी अ‍ॅडजेस्ट करत जायचं? सरकारने निर्बंधाचा निर्णय मार्च किंवा एप्रिलमध्ये घेतला असता दहा ते पंधरा दिवसांसाठी तर कदाचित ही साखळी तेव्हा तुटली असती आणि त्या दहा दिवसांमध्ये पुढचे शंभर दिवस आपल्याला वाचवता आले असते. आजची आपली आर्थिक परिस्थिती खूप भयंकर होत चालली आहे आणि यापुढे आपण काय करणार आहोत शिक्षणाचा तर बँड वाजला, खुपशा नोकरदार लोकांच्या नोकर्‍या गेल्या, हातातली कामं गेलीत. बचतीचे पैसे संपत आलेत आणि ही साखळी तुटायला तयार नाही! पण यासाठी कोणाकडे हाक द्यावी तेच कळत नाही. कोणीही मजबूत प्लॅन करून जनतेसाठी तो उपस्थित करायला तयार नाही. फक्त गोंधळ निर्माण केला आहे. म्हणून माझ्यासारख्या नागरिकाने मतदान केलं याचा आता पश्चाताप करायला हवा का?

स्मिता जेथलिया, नाशिक

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा