आंबोलीत सुरु आहे, स्वच्छतेचा ‘अभिषेक’

गेल्यावर्षी कोरोना विषाणूच्या संक्रमणापूर्वी महिनाभर अगोदर शेवटची जंगलमय आंबोली पाहिली होती. तेव्हा अनेक ठिकाणी नजरेला खटकलेल्या कचऱ्याने तीव्र दु:खही झालेलं. सोबत असलेले वन्यजीव अभ्यासक रोहन कोरगावकर मात्र प्रत्येक नेचरट्रेलमध्ये जंगलवाटांवर पडलेला कचरा गोळा करत होते. यंदाही कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात सक्रीय होण्यापूर्वी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आंबोलीला गेलेलो. तेव्हाही नेचरट्रेलमध्ये जंगलवाटांवर पडलेला कचरा गोळा करण्याचे काम चालू राहिले.

स्वच्छतेचा अभिषेक
स्वच्छतेचा अभिषेक

दरम्यान ‘आंबोली’त स्वच्छतेचा ‘अभिषेक’ सुरु असल्याची माहिती मिळाली. काहीसं सुखावायला झालं. स्वच्छतेच्या या अभिषेकात आपणही सामील व्हावं असं बोलूनही दाखवलं. पण आम्ही आंबोलीत असताना नेमक्या कचरा भरण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या संपलेल्या होत्या. स्वच्छतेच्या या अभिषेकातून एक-दोन नव्हे तर तब्बल अडीचशे पिशव्यांतून साडेबाराशे किलोहून अधिक कचरा केवळ महादेवगड पॉईंट परिसरातून गोळा झाल्याचे आम्ही पाहिले. आम्ही आंबोलीत सुरु असलेला हा स्वच्छतेचा ‘अभिषेक’ समजून घेतला. चांगलं काहीतरी घडवू पाहणाऱ्या अशा सत्प्रवृत्त कामांना समाजाची खंबीर साथ मिळायला हवी, या हेतूने केलेलं हे विवेचन!
आंबोलीत सुरु आहे, स्वच्छतेचा 'अभिषेक'
आंबोलीत सुरु आहे, स्वच्छतेचा ‘अभिषेक’

१०-१२ वर्षांपूर्वीपर्यंत अभिषेक नार्वेकर हा तरुण (मो. ०९४२३२१३१५३) इतर पर्यावरण प्रेमींप्रमाणे आंबोलीत संशोधनासाठी येणाऱ्या संशोधकांसोबत काम करत होता. अशा साऱ्या कामातून संशोधन पातळीवर ‘आंबोली’ खूप पुढे गेली पण ‘संवर्धन’ विषय मागे पडला. यातला कचरा हा विषय अभिषेकला खटकत होता. तसे आंबोलीच्या स्वच्छतेचे प्रयत्न यापूर्वी ‘मलबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब’ने केलेले होते. पुन्हा त्याची गरज असल्याचे लक्षात आल्याने अभिषेकने एके दिवशी ठरवलं, ‘आंबोलीतील मुख्य रस्त्यावर असलेल्या पोलीस चौकीपासून महादेवगड पॉईंटच्या शेवटपर्यंत आणि रस्त्याच्या दुतर्फा दरीत पडलेलाही सारा कचरा स्वच्छ करायचा’. त्याने आपली ही भूमिका सोशल मिडीयावर, ‘PROJECT CLEAN AMBOLI’ पेजवर जाहीर केली. समाजाचा प्रतिसाद मिळू लागला. अभिषेकने आपले सहकारी चेतन नार्वेकर, राकेश देऊलकर, सुजन ओगले आणि कौमुदी नार्वेकर यांच्या सहकार्याने हा कचरा गोळा केला. यासाठी त्यांनी २५ किलो क्षमतेच्या सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या उपयोगात आणल्या. या टीमने मार्चच्या शेवटच्या आठवडयापर्यंत अडीचशेहून अधिक पिशव्या भरल्या होत्या. या पिशव्यातील कचरा सरासरी ५ किलो वजनाचा गृहित धरला तरी संपूर्ण कचरा साडेबाराशे किलो होत होता. आम्ही आंबोलीत होतो तेव्हा या अभियानाला तीनेक आठवडे झाले होते. आज ४५-५० दिवस होत आलेत. इथले स्थानिक सोशल मिडीयावर फारसे सक्रीय नसल्याने अभिषेकने तीनेक आठवडे कचरा गोळा केल्यावरही प्रशासनापर्यंत याची माहिती पोहोचली नव्हती. कचरा गोळा करायला सुरुवात केल्याच्या पहिल्या दिवशी अभिषेकने चार बॅग कचरा गोळा केला होता. यासाठीची वेळ त्याने सकाळ किंवा संध्याकाळची ठरवली होती. अशाच एके दिवशी त्याने तब्बल १६ बॅग कचरा गोळा केला.

महादेवगड पॉईंट परिसरात खूप कचरा होता. बराच कचरा वाऱ्याने उडून खोल दरीत गेला होता. अभिषेकने गोळा केलेल्या एकूण कचऱ्यापैकी रस्त्याशेजारी पडलेला मोजका कचरा वगळता ९५ टक्के कचरा हा जंगलात उताराच्या बाजूंवर दरीत मिळालेला आहे. माउंटनेरिंगचा कोर्स पूर्ण केलेल्या अभिषेकने गेल्या अनेक वर्षांपासून दरीत गेलेला, अडकून राहिलेला कचरा पहिल्यांदा दरीबाहेर आणला. दरीतून वरती जमिनीकडे पाहिले असता स्वच्छतेसाठी गेलेल्या व्यक्तीला बराच कचरा पानांखाली लपलेला दिसतो. मात्र हा कचरा जमिनीवरून दरीत खोलवर पाहिले असता दिसत नाही. यात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या, मद्याच्या बाटल्या, वेफर्सटाईप कुरकुऱ्यांची पाकीटे पुष्कळ आहेत.

‘PROJECT CLEAN AMBOLI’
‘PROJECT CLEAN AMBOLI’

आंबोलीसारख्या संरक्षित जंगलात कचरा स्वच्छतेची जबाबदारी प्रशासनाची आहे पण ती ‘माहितीचे फलक’ लावण्यापलिकडे किती काळजीपूर्वक तपासली जाते? काय माहीत. असो! तर दरीतला हा कचरा जमिनीवर आणून पुन्हा महादेवगड पॉईंटच्या पार्किंगपर्यंत नेणे वाटते तितके सोपे नव्हते. ज्यांनी आंबोली आणि महादेवगड पॉईंट पाहिला आहे, त्यांना यातले किमान परिश्रम लक्षात यावेत. परिश्रम लक्षात आलेल्या पर्यटकांनी पर्यटनस्थळी कुठेही, कसाही कचरा फेकताना हे काम जरी लक्षात घेऊन जंगल क्षेत्रातील अस्वच्छता टाळली तरी त्यांना ‘कदाचित’ देशसेवा केल्याचं पुण्य पदरात पाडून घेता येईल. हा सारा कचरा तातडीने स्थानिक व्यवस्थेला देऊ केला तर आंबोलीतील कचऱ्याच्या समस्येकडे कोणाचे लक्ष जाणार नाही. म्हणून त्याला महादेवगड पॉईंटवर साठविण्यात आले. भविष्यात आंबोलीतील इतर ठिकाणीही स्वच्छतेचं काम करायचे आहे. महादेवगड पॉईंटवर कचरा ठेवायला पुरेसी जागा उपलब्ध होती. इतर ठिकाणी ती नाही ही अडचणही आहे. आंबोलीत कचऱ्यासाठी डम्पिंग यार्डची आवश्यकता आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे अभिषेकला वाटते. अभिषेकने या कामासाठी कोणालाही आग्रहपूर्वक बोलावले नाही. फक्त आवाहन केले. याचं महत्त्व आणि आवश्यकता माहित असलेले मोजके सहकारी त्याच्यासोबत जोडले गेले. यातले राकेश आणि सुजन हे दोघे स्वच्छतेचे काम आंबोली-चौकुळ मार्गावर नियमित करत असतात. सोशल मिडीयावर रोज सकाळी उठून शुभेच्छा देणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्यासारखे मेसेज करणारे पहाटे उठून अभिषेकसोबत कचरा गोळा करायला पोहोचले नाहीत.

सध्या आंबोलीतील महादेवगड पॉईंट स्वच्छतेचा श्वास घेत आहे. लवकरच तो ‘प्लास्टिक फ्री झोन’ बनेल.
या जंगलात आतवर पुन्हा कचरा जायला ‘कुठेही कचरा फेको’ टाईप पर्यटकांना अजून दोनेक वर्ष मेहनत घ्यावी लागेल. पण हे चक्र असचं चालू ठेवू द्यायचं ? की यावर कडक उपाययोजना करायच्या ? हे स्थानिक प्रशासनाने ठरवायचं आहे. …अन्यथा अभिषेकसारखे तरुण आपलं काम करत राहतील. मात्र अशा स्वच्छता अभियानातून पर्यटक आणि गावाच्या संपूर्ण सुधारणेची जबाबदारी वाहणारे ‘खांदे’ नक्की काय करणार ? हेही पाहाणं महत्वाचं आहे. गेली दहाएक वर्षे अभिषेक पुण्यात एका ट्रॅव्हल कंपनीच्या माध्यमातून देशभरात साहसी आणि वन्यजीव क्षेत्रातील अभ्यासपूर्ण सहलींचे नियोजन करू करत होता. याच कामातून त्याने अनेकदा ‘ट्रेक्स हिमालया’दरम्यान तेथील पर्वतांमध्ये कचरा स्वच्छतेचे प्रयोग केले. त्यावेळी आपण आपल्या, ‘आंबोलीत असे काहीही केलेले नाही’ याची त्याला प्रकर्षाने जाणीव व्हायची. साहसी पर्यटनासह वन्यजीव, सूक्ष्म वनस्पती आणि जीवजंतूचा अभ्यास असलेल्या अभिषेकने २०१२ मध्ये एकाच वर्षात १५० हून अधिक फोर्ट ट्रेक केलेत. २०१५ मध्ये त्याने मनाली ते लेह आणि श्रीनगर पर्यंतची उंच डोंगरावरील सर्वात पहिली एकल सायकलिंग मोहीम पूर्ण केली. २०१७ मध्ये त्याने देशातील नऊ किनारावर्ती राज्यातून ७२ दिवसात ६७८० किलोमीटर सायकलिंग करून केले. ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने असे हे पहिले भारतीय सायकलिंग असल्याचे मान्य केले होते. असा हा अभिषेक गेल्यावर्षी कोरोना संक्रमणात आंबोलीत परतला. गेली अनेक वर्षे मान्सून टुरिझम, वाईल्डलाईफ टुरिझम आदी प्रयोग आंबोलीत सुरु आहेत. हेच काम आंबोलीत सुरु करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अभिषेकच्या नजरेला इथला कचरा खटकू लागला. आपल्या सोबत फिरणाऱ्या साहसी आणि पर्यावरणप्रेमी पर्यटकांना आपण हाच कचरा दाखवायचा का ? या विचारातून स्वच्छतेचं हे काम उभं राहिलं. गप्पांच्या ओघात बोलता बोलता अभिषेक ‘बारा महिने, डेस्टिनेशन आंबोली’ यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्याच्याकडून समजल्यावर आम्हाला खूप आनंद झाला. कारण गेले वर्षभर नेमक्या याच विषयावर आम्ही आणि वन्यजीव अभ्यासक रोहन कोरगावकर विचार करत होतो. वन्यजीव अभ्यासक मल्हार इंदुलकर, सर्पमित्र अनिकेत चोपडे, निसर्गप्रेमी विलास महाडिक ही मंडळी सोबत होती. तीच संकल्पना अधिक विस्तृत आणि खात्रीशीर स्वरुपात अभिषेक ऐकवत राहिला. कोकणातल्या आंबोलीत, थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक बारमाही वावरावा यासाठीच्या प्रयत्नात आता अभिषेकही असणार आहे.

जमलेल्या कचऱ्यातील प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्या, काचा घेऊ शकणाऱ्या मंडळींची अभिषेकला माहिती मिळाली आहे. एकूणपैकी याचाच कचरा ६० टक्क्याहून अधिक आहे. उर्वरित कचरा हा प्लास्टिक वेस्ट आहे. यासाठीची व्यवस्था लावण्यात आणि भविष्यातील स्वच्छता नियोजनात सध्या अभिषेक आणि सहकारी गुंतलेत. त्यांच्या या खऱ्याखुऱ्या सेवाभावी प्रयत्नांना मनापासून शुभेच्छा द्यायला हव्यात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कृत्रिम ऑक्सिजनसाठी वणवण भटकणाऱ्या आपण समाजाने, शासकीय यंत्रणेने अशा पर्यावरणपूरक कार्य साधणाऱ्या प्रयत्नरतांकडे ‘वेडे’ म्हणून बघण्याचे सोडून विशेष सहकार्य भावना दाखवावी. वेळोवेळी आपणहून एक पाऊल पुढे टाकावे, अशी अपेक्षा आहे.

धीरज वाटेकर
9860360948

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा