महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटींच्या दरम्यान आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शहरीकरण झालंय. आशिया खंडातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आपल्याकडं आहे जी भारताची आर्थिक राजधानी आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, अमरावती यासारख्या विशाल महानगरपालिका महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील चाळीस टक्केपेक्षा अधिक भागाचं शहरीकरण झालेलं आहे. अशा परिस्थितीत सोशल डिस्टंसिंग ठेऊन काम करणं महाराष्ट्रात शक्य होत नाही. भारतभरातून महाराष्ट्रात लोक उद्योगधंद्यासाठी आणि रोजगारासाठी येत असतात. भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यातला माणूस पुण्या-मुंबईत आहे असं म्हटल्यास तीही अतिशयोक्ती होणार नाही. या सगळ्यांना समाविष्ट करून घेऊन महाराष्ट्र पुढे चाललेला असतो. अशा परिस्थितीत कोरोनाच्या लढाईत महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्णसंख्या आढळतेय.
महाराष्ट्रात रूग्णांची संख्या सर्वाधिक सापडतेय हे जसं खरं आहे तसं आपल्याकडील चाचण्यांचं प्रमाण मोठं आहे हेही खरंय. आरोग्यव्यवस्थेपुढे असलेल्या मर्यादा लक्षात घेऊनही प्रत्येकाचा जीव वाचावा यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आत्ताच्या क्षणी केवळ उपचार करणं पुरेसं नसून महाराष्ट्रात प्रत्येक घटकाला लस ही घरी जाऊन देणं गरजेचं आहे. इंग्लंडमध्ये रेल्वे स्टेशनवर लस द्यायला सुरूवात झालीय. सहा-सात कोटी लोकसंख्या असलेल्या इंग्लंडनं चाळीस कोटी लशीचे डोस खरेदी केलेत. दुसर्या देशाला लसींचे फुकट वाटप न करता 134 कोटी लोकसंख्या असलेल्या भारताला तातडीनं जास्तीतजास्त आणि सर्व नागरिकांना लस द्यायची भूमिका घ्यायला हवी होती.
16 जानेवारीला आपण लसीकरण सुरू केलं. आपण विश्वगुरू व्हायचे तेव्हा होऊच पण आत्ता जिवंत राहणं आणि तग धरून राहणं जास्त गरजेचं आहे. आपण आत्मनिर्भरतेच्या कितीही गमजा मारल्या तरी इंग्लंड आणि अमेरिकेतून कच्चा माल आल्यावरच आपण लस निर्माण करू शकतो. तो पुरवठा कमी झाला किंवा बंद झाला तर आपल्याकडीच लशीचं उत्पादन कमी होऊ शकतं, थांबू शकतं. सिरमची कोव्हिशील्ड आणि भारत बायोेटेकची कोव्हॅक्सिन या लशींची गुणवत्ता चांगली आहे. डॉ. रेड्डीज या फार्मा कंपनीच्या सहकार्यानं तयार झालेली स्पुटनिक व्ही, जॉन्सन अॅन्ड जॉन्सन यांचीही परिणामकारकता उत्तम आहे.
अशावेळी महाराष्ट्रानं स्वतःचा निधी स्वतः निर्माण करावा, जगात जिथून शक्य होतील तिथून लस खरेदी कराव्यात आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला लस द्यावी ही कल्पना कुणाला तरी सुचणं गरजेचं होतं. ही कल्पना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना सुचली आहे. राज ठाकरे यांना एखादी गोष्ट सुचल्यानंतर राज्य सरकारला त्याची अंमलबजावणी करावीच लागते, हे अनेकदा दिसून आलं आहे. राज ठाकरे यांच्या हातात दुर्देवानं सत्ता नाही. राज सत्तेपासून बाहेर आहेत आणि सत्तेपासून बाहेर असलेल्यालाच चांगल्या कल्पना सुचतात असा नेहमीचा अनुभव आहे. राज्य सरकारनं निधी उभा करणं आणि जगात जिथं जिथं चांगल्या गुणवत्तेची लस मिळेल तिथं तिथं स्वदेशीचा आग्रह न धरता ती खरेदी करणं, अधिकाधिक नागरिकांना ती लस देणं हा कोरोनापासून बचावाचा महत्त्वाचा मार्ग आहे, हे राज ठाकरे यांच्या लक्षात आलंय. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते गप्प बसले नाहीत तर त्यांनी लगोलग पंतप्रधानांना तशा आशयाचं पत्रही लिहिलं आहे.
एक चांगलं, परिणामकारक पाऊल म्हणून इकडं बघायला हवं. भारतीय जनता पक्ष अशा वातावरणातही केवळ राजकारण करत असताना, दुःखातही त्यांच्यासाठी संधी शोधत असताना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदारही निष्क्रियपणे आणि हतबलपणे बसलेले असताना राज ठाकरे यांनी अशा पद्धतीनं लस विकत घेऊन महाराष्ट्रातल्या जनतेला ती तातडीनं उपलब्ध करून द्यावी अशी भूमिका मांडली असेल आणि त्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिलं असेल तर ही स्वागतार्ह बाब आहे. अशा पद्धतीनं काम केलं गेलं तर महाराष्ट्रावरील कोरोनाच्या संकटाचे गडद झालेले ढग सौम्य होऊ शकतात. त्यातून हे संकट दूर होण्यास निश्चितपणे मदत होईल.
राज ठाकरे यांच्या या चांगल्या कल्पनेचा आघाडी सरकारनंही गंभीरपणे विचार केला पाहिजे. विरोधी पक्षांनीही सोयीस्कर राजकारण न करता राज यांच्या या कल्पनेला साथ दिली पाहिजे. महाराष्ट्र स्वतःच्या निधीतून जर लस खरेदी करणार असेल तर राष्ट्रीय अस्मिता, स्वदेशी, आत्मनिर्भरता हे सर्व बाजूला ठेऊन पंतप्रधानांनी महाराष्ट्र सरकारला संमती दिली पाहिजे. राज ठाकरे यांनी मांडलेली ही भूमिका, हा प्रयोग, ही कल्पना यशस्वी झाली तर इथल्या सामान्य माणसाच्या जगण्याला बळच मिळणार आहे. खरंतर हे सगळं अजित पवारांनी पुढाकार घेऊन करणं अपेक्षित आहे. प्रशासनावर जबरदस्त पकड असलेले अजित पवार सध्या इतके निष्क्रिय का झालेत हे कळायला मार्ग नाही. त्यांच्या पक्षाकडून त्यांना पूर्वीसारखं स्वातंत्र्य मिळत नाही की काय असं वाटण्याइतपत ते शांत आहेत. अन्यथा कोरोनाच्या या महामारीत त्यांनी असं अंग चोरून काम केलं नसतं.
महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असताना, भाजप आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचं स्वार्थाचं राजकारण दिसत असताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांची ही सूचना मात्र विधायक आणि सामान्य माणसाच्या जगण्याचा मूलगामी विचार करणारी आहे. पंतप्रधानांनी, महाराष्ट्र सरकारनं त्यांच्या या भूमिकेचा गांभिर्यानं विचार केला तर महाराष्ट्रावरील कोरोनाचं संकट लवकरच दूर होईल.
– घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092
फारच विचार सकारात्मक आहे.
खरंच राजसाहेबांची कल्पना स्वागतार्ह आहे. महाराष्ट्रावरचे संकट दूर करण्यासाठी याचा उपयोग व्हायला हवा. घनश्याम पाटील सरांनी ज्याप्रमाणे चपराक च्या माध्यमातून या कल्पनेचे स्वागत करून याला वाचा फोडली आहे, त्याचप्रमाणे इतर वृत्तपत्रांनीही दखल घेऊन पाठपुरावा करावा. शुभम भवतू!!