आंबेडकरांच्या विचारविश्वातील स्त्री

आंबेडकरांच्या विचारविश्वातील स्त्री

– प्रा. मिलिंद जोशी
कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
9850270823

1890 साली महात्मा फुले कालवश झाले. एक क्रांतिसूर्य मावळला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने एक ज्ञानसूर्य रूपाला आला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मंत्र बाबासाहेबांनी दलित समाजाला दिला आणि या विचाराने आचरण करणार्‍यांच्या जीवनात परिवर्तन घडून आले. बाबासाहेब म्हणत, ‘‘शिक्षण म्हणजे बहुजन समाज, दलित आणि स्त्रियांच्या मुक्तीलढ्याचे पहिले पाऊल आहे. समाजक्रांतीची तयारी म्हणजे शिक्षण. अन्यायाविरूद्ध लढण्यासाठीचे हत्यार म्हणजे शिक्षण,’’ अशी बाबासाहेबांची धारणा होती.

1848 साली महात्मा फुल्यांनी मुलींसाठीची पहिली शाळा काढली. शाळेसाठी शिक्षिका मिळत नव्हती, म्हणून त्यांनी सावित्रीबाईंना उभे केले. 1882 मध्ये हंटर आयोगापुढे म. फुल्यांचे जे भाषण झाले त्यात त्यांनी ‘‘स्त्रियांच्या प्राथमिक शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे’’ असा आग्रह धरला होता. ब्रिटिश राजवटीत इंग्रजी शिक्षण घेणार्‍या नवशिक्षित तरूणांचा एक वर्ग तयार होत होता. नवरे शिक्षित आणि बायका अशिक्षित अशी एकूण परिस्थिती निर्माण झाली होती. रविंद्रनाथ टागोरांनी ‘‘स्त्री शिक्षणाचा प्रसार केला नाही तर समाजात नवरा-बायकोमधला सुसंवाद नष्ट होऊन कुटुंबव्यवस्था धोक्यात येईल’’ असा इशारा दिला होता. अशा काळात स्त्रियांना शिक्षण द्यायचे ते कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी अशी समाजातल्या विचारवंतांची धारणा होती.

स्त्रीशिक्षणाविषयी आंबेडकरांचा विचार वेगळा होता. मातृत्वाचा गौरव केला जात असताना या देशात स्त्रीत्वाची जी उपेक्षा होत होती ती थांबवली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. केवळ कौटुंबीक जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी शिक्षण नको, शिक्षणाच्या माध्यमातून आत्मप्रगटीकरणाचे युग सुरू झाले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. केवळ दलितांचा, दलित स्त्रियांचा विचार न करता भारतातील एकूण स्त्रीजीवनाचे उन्नयन हाच बाबासाहेबांचा ध्यास होता. शिक्षणाची गंगा दलित समाजापर्यंत पोहचू लागली होती. दलित स्त्रिया शिक्षणापासून वंचित होत्या. अशा काळात बाबासाहेब एकूण स्त्रीजीवनाला उन्नत अवस्थेतपर्यंत नेण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व पटवून देत होते. स्त्रियांच्या शिक्षणासंदर्भातले बाबासाहेबांचे जे विचार आहेत, त्यावरून हे स्पष्ट होते.

‘‘जोपर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले जाणार नाही आणि प्राथमिक शाळांतील प्रवेशाबाबत कडक उपाययोजना केली जाणार नाही; तोपर्यंत मागासवर्गीयांच्या शिक्षणात प्रगती होणार नाही. बहिष्कृत लोकांनी प्राथमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता उच्चशिक्षणाकडे लक्ष पुरवले पाहिजे. एखादी व्यक्ती बी. ए. झाल्याने समाजाचे जेवढे भले होईल तेवढे चौथी पास झाल्याने होणार नाही’’ असं बजावणार्‍या बाबासाहेबांनी दलित स्त्रियांना भावनिक आवाहन केले. ते म्हणत, 1) तुम्ही आमच्या आया-बहिणी आहात. आपल्या मुलांना शिक्षण द्या. 2) मुलगा किंवा भाऊ दारू पिऊन घरात आला तर त्याला घरात घेऊ नका. जेवण देऊ नका. 3) तुमच्या मुलींना शिक्षण द्या. 4) तुमची लुगडे नेसण्याची पद्धत, गळ्यात गळाभर गळसर्‍या आणि हातात हातभर कथलांचे किंवा चांदीचे दागिने घालण्याची पद्धत बंद करा. 5) दागिन्यांपेक्षा कपड्याला जास्त महत्त्व आहे. फाटके का असेनात, पण कपडे स्वच्छ असावेत. 6) आपल्या मुलांच्या मनातली हीनत्वाची भावना काढून टाका. 7) मुलांची लग्नं लवकर करण्याची घाई करू नका. लग्न ही जबाबदारी असते. 8) लग्नानंतर जास्त मुले निर्माण करणे हा सामाजिक अपराध आहे. 9) लग्न करणार्‍या प्रत्येक मुलीने नवर्‍याची दासी म्हणून नव्हे तर बरोबरीच्या नात्याने आणि मित्र म्हणून वागावे. 10) कोणतीही क्रांती प्रथम विचारात होते मगच ती आचारात येते. 11) अस्पृश्यता नष्ट व्हायची असेल तर ती अस्पृश्यांच्याच प्रयत्नाने नष्ट होईल. 12) अस्पृश्यता ही गुलामगिरी व धर्म कधीही एकत्र नांदू शकत नाही.

    बाबासाहेबांनी व्यवस्थेविरोधातले सगळे लढे दिले. त्यात त्यांनी ‘स्त्रियांचा सहभाग असला पाहिजे’ असा आग्रह धरला होता. 1924 साली ‘बहिष्कृत हितकारणी सभा’ स्थापन झाली होती. ब्रिटिश सरकारसमोर गार्‍हाणी मांडण्यासाठीचे ते एक व्यासपीठ होते. बाबासाहेब त्याचे कार्यकारी अध्यक्ष होते. चिमणलाल सेटलवाड अध्यक्ष होते. मुंबई विधिमंडळाने एका ठरावाद्वारे तळी, विहिरी, पातळी या सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्यासाठी अस्पृश्यांना मज्जाव करू नये असा कायदा केला होता. तशा सूचना संबंधित अधिकार्‍यांना पाठवल्या होत्या. सवर्णांची दादागिरी सरकारी आदेश मानायला तयार नव्हती. याविरूद्ध आवाज उठवण्यासाठी बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. या निमित्ताने दलित स्त्रियांना उद्देशून बाबासाहेबांनी भाषण केले, ते अंत:करण हेलावून टाकणारे आहे.

    ते म्हणाले, ‘‘तुम्हीच आम्हा पुरूषांना जन्म दिला आहे. आम्हाला जनावरापेक्षाही वाईट वागणूक मिळते आहे. इतर लोकांना कचेर्‍यात मानसन्मानाच्या जागा मिळतात. आम्हाला पोलिसात शिपायाच्या जागा मिळतात. इतकी आम्हाला हीन वागणूक मिळते. हे सारे ठाऊक असताना तुम्ही आम्हाला जन्म का दिलात? असा प्रश्न कुणी तुम्हाला विचारला तर काय उत्तर देणार आहात?’’ दलित स्त्रियांच्या मनात क्रांतीची ज्योत तेवत ठेवण्याचे काम प्रत्येक लढ्यात बाबासाहेबांनी केले.

    ‘‘चवदार तळ्याचे पाणी पिलो म्हणून आम्ही अमर होणार नाही. आमच्या स्पर्शाने पाण्याची वाफही होणार नाही. सामाजिक समतेच्या स्थापनेसाठी हे लढे आहेत’’ असे बाबासाहेबांनी स्पष्ट केले होते. अस्पृश्य संन्याशाच्या हस्ते त्यांनी मनुस्मृतीचे दहन केले. ‘‘असामान्यतेचे मूळ मनुस्मृतीत आहे. त्यात धर्माची धारणा नाही. असमानतेची धुळवड आहे’’ असं मानणार्‍या बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन सामाजिक उत्थानासाठी करत आहोत हे स्पष्ट केले. ‘न स्त्री स्वातंत्र्यं अर्हति।’ असं सांगणार्‍या मनुस्मृतीने केवळ दलित स्त्रियांचा नव्हे एकूण स्त्री जीवनाचा उपमर्द केला आहे अशी त्यांची भावना होती. याही लढ्यात त्यांनी स्त्रियांना सहभागी करून घेतले होते.

    चवदार तळ्याच्या सत्याग्रहानंतर बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. महाराष्ट्रात हजारो मंदिरे असताना राम मंदिराचीच निवड बाबासाहेबांनी का केली? असाही प्रश्न त्यांना विचारला गेला. त्यावर बाबासाहेबांचे उत्तर होते, ‘‘हिंदुंच्या हृदयातील ‘राम’ जागा व्हायला हवा. म्हणून राम मंदिराची निवड केली आहे.’’

    बाबासाहेबांच्या या लढ्यात सवर्णांचाही त्यांना पाठिंबा होता. पुण्यात काकासाहेब गाडगीळ आणि केशवराव जेधे यांनी पर्वतीच्या देवळात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला होता. बाबासाहेब मुंबईत होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रबोधनकार ठाकरेंनी सभेचे आयोजन केले होते. रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी सावरकरांनी पुढाकार घेतला होता. बाबासाहेब सांगत, ‘‘मंदिर प्रवेशामुळे मोक्ष मिळणार नाही. दु:ख, दारिद्र्य, अज्ञान, लाचारीही संपणार नाही. हिंदू म्हणूनच आम्हालाही मंदिरात प्रवेश करण्याचा हक्क आहे. हा लढा समतेसाठी आणि मानव्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी आहे.’’ या लढ्यात 125 पुरूष होते आणि 25 महिलांचा सहभाग होता. बाबासाहेबांनी समतेसाठी जेवढे लढे दिले त्या लढ्यात त्यांनी स्त्रियांना बरोबरीचे स्थान दिले, हे लक्षात येते.

    1935 साली अस्पृश्य परिषदेच्या अध्यक्षपदावरून येवला येथे बाबासाहेबांनी जे भाषण केले. त्यात ते म्हणतात, ‘‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. हिंदू समाज ही एक मजलेदार इमारत आहे. या इमारतीत वरच्या मजल्यावरील माणूस कितीही श्रेष्ठ असला तरी तो कनिष्ठच गणला जातो. माणसांनी निर्माण केलेल्या माणसांच्या तुरूंगात मी स्वत:ही राहणार नाही आणि माझ्या दलित बांधवांनाही राहू देणार नाही. नव्या विचारांचा सुरूंग लावून हा तुरूंग आम्ही फोडून बाहेर पडू.’’ बाबासाहेबांनी धर्मांतराचा विचार केला तेव्हा देशातल्या कानाकोपर्‍यातल्या मोठ्या लोकांनी त्यांना त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांची भूमिका स्पष्ट होती.

    ते म्हणाले, ‘‘ज्या समाजव्यवस्थेत आणि धर्मरचनेत कोट्यवधी लोकांना त्यांचा दोष नसताना गुन्हेगारांपेक्षा वाईट वागणूक मिळते. तिचा त्याग करण्यात काहीही गैर नाही. हिंदू धर्मातील सुज्ञ लोकांनी दंभ आणि वेडेपणा यापासून आपल्या लोकांना परावृत्त करण्याचा किती प्रयत्न केला?’’ या त्यांच्या प्रश्नावर सारेच निरूत्तर झाले.

    1956 साली पाच लाख दलित बांधवांसमवेत त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. या कामातही स्त्रियांना त्यांनी बरोबर घेतले होते. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी जगातल्या सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास केला होता. बौद्ध काळात शुद्र लोक मालमत्ता धारण करू शकत होते. वैदिक काळात ब्राह्ममणच भिख्खू बनू शकत होते. बुद्ध बिख्खू संघाची दारे सर्वांसाठी खुली होती. आंबेडकरांना हे महत्त्वाचे वाटले. त्यांच्या धर्माकडून काही अपेक्षा होत्या. ‘माझ्या तत्त्वज्ञानाची मुळे धर्मशास्त्रात आहेत, राज्यशास्त्रात नाहीत असं ते म्हणत.’ त्यांना ‘धर्म हा आधुनिक विचाराशी सुसंगत असावा’ असे वाटत होते. तो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मुल्यांनी मुक्त असावा. दारिद्र्याची महती गाणारा नसावा असे त्यांना वाटत होते.

    बुद्धांनी धर्माएवजी ‘धम्म’ हा शब्द वापरला. धर्म आत्मा, परमात्मा, मोक्ष या विचार करतो. धम्म अगम्य, अतर्क्य आणि अनाकलनीय अशा सर्व गोष्टी टाळतो. नीतिमत्ता आणि सदाचरण हा बुद्धांच्या विचारांचा पाया आहे. प्रज्ञा शील आणि करूणा यांना प्राधान्य देणारा बंधुत्व आणि मानवता यांचं गुणगाण करणारा बौद्ध धर्म म्हणूनच त्यांना प्रिय होता. बाबासाहेबांनी पाच लाख स्त्री-पुरूषांसह धर्मांतराचा विचार केला. त्यामागे एवढी वैचारिक पार्श्वभूमी होती. दलित पुरूषांचे दु:ख शब्दातीत आणि कल्पनातीत होते, पण दलित स्त्रियांचे जीवन म्हणजे दु:खभोगाची महागाथा होती. अशा परिस्थितीत आंबेडकरांसारखा विचारवंत दलित समाजाच्या उत्थानकार्यात ‘दलित स्त्री’ला केंद्रस्थानी ठेवून भूमिका घेतो. त्याचवेळी दलितेत्तर स्त्री तिचेही आयुष्य धर्मातील रूढी, परंपरांनी एका वेगळ्या टोकावर नेऊन उभे केले होते. तिच्याही उत्थानासाठी काय करता येईल याची रूपरेषा ते ठरवतात हे त्यांच्या कार्याचे वेगळेपण आहे.

    ‘स्वतंत्र मजूर पक्षा’ची स्थापना करून आंबेडकरांनी राजकारणाला प्रारंभ केला. ‘भारतातील श्रमिकांचा आणि दलितांचा पक्ष’ असं त्याला ते म्हणत. लोकशाही मूल्यांची स्थापना, नागरी हक्क, कामगारांना किमान वेतन, भूमीहीन आभिर गरीब शेतकर्‍यांना जमिनीचे वाटप असे ध्येय डोळ्यासमोर ठेवून या पक्षाने काम केले. 1929 साली मुंबईत कापडगिरणी कामगारांचा संप झाला. त्यात स्त्री-पुरूष कामगार होते. त्यानंतर स्थापन झालेली ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’सारखी संस्था असेल, ‘रिपब्लीकन पक्षा’ची स्थापना असेल अशाप्रकारे, समाजकारणाप्रमाणेच राजकारणातही बाबासाहेबांनी स्त्रियांना सहभागी करून घेतले.

    इंग्लंडमधील स्त्रियांना मतदारांना हक्कासाठी लढा द्यावा लागला. बाबासाहेबांनी घटना समितीत बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे ही वेळ भारतीय महिलांवर आली नाही. हिंदू कोड बिलामुळे भारतीय स्त्रिया त्यांच्या कायम ऋणात राहतील. या जगात गांधीवाद आला, मार्क्सवाद आला, अनेक विचारप्रवाह आले; पण आंबेडकरवाद हा असा एकमेव वाद आहे, की ज्यातून मराठी साहित्याला समृद्ध करणारा दलित साहित्याचा प्रवाह आला. बाबासाहेबांच्या विचारामुळे या समाजाला लिहिण्याचे बळ मिळाले. त्यांनी पिढ्यान्पिढ्या भोगलेल्या यातनांची आणि दु:खाची विदारकता एवढी प्रचंड होती की, त्यांना लिहिण्यासाठी कोणतेही प्रतिभासाधन करावे लागले नाही. केवळ हुंकाराला शब्दरूप मिळाले आणि त्यातून अजरामर साहित्यकृती निर्माण झाल्या. वेदना, विद्रोह आणि नकारातून जन्माला आलेल्या या साहित्यकृतींनी केवळ साहित्याला समृद्ध केले नाही तर समाजाला नवे भान दिले. या साहित्य प्रवासात दलित स्त्रियांनी कवयित्री, लेखिका म्हणून दिलेले योगदान खूप मोलाचे आहे. ही समतेची पताका मिरवणारी साहित्यमंदिरे आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाच्या पायावर उभी आहेत. दलित स्त्रियांचे जीवन आज प्रगतीच्या ज्या टप्प्यावर उभे आहे, त्यामागे आंबेडकरांची दूरदृष्टी आणि विचारसृष्टी आहे याचे भान समाजाने ठेवले पाहिजे.

    मासिक साहित्य चपराक, एप्रिल 2016

    चपराक

    पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
    व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
    Email - Chaprak Email ID

2 Thoughts to “आंबेडकरांच्या विचारविश्वातील स्त्री”

  1. जयंत कुलकर्णी

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची सुंदर माहिती या लेखातून मिळते. स्त्री शिक्षणाविषयी त्यांनी जी जागृती निर्माण केली त्याला तोड नाही.

  2. Surekha Borhade

    आंबेडकरांच्या स्री विषयक विचारांचा आणि कार्याचा खूप छान आढावा आपण घेतला आहे. मेटरनिटी लिव्हची तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये केली आहे हे त्यांचे स्त्रियांसाठी मोठं काम आहे.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा