चिरंतनाची ओढ असणारा कवी

चिरंतनाची ओढ असणारा कवी

स्वतःला प्रतिभासंपन्न म्हणवून घेणार्‍या काही कवींचे कवितेशी असलेले नाते फक्त शब्दांपुरतेच असते पण ज्यांच्या धमन्याधमन्यातून फक्त कविता आणि कविताच वाहत होती असे अपवाद्भूत कवी म्हणून सुधीर मोघे यांचा उल्लेख करावा लागेल. मोघे कवितेत रमले पण इतर प्रांतातही त्यांची मुशाफिरी चालूच राहिली. कवितेबरोबरच पटकथा, संवाद लेखन, संगीत दिग्दर्शन, निवेदन या क्षेत्रांमध्येही ते लीलया वावरले.

प्रत्येक कवीच्या लेखणीतून प्रकटणारी कविताही त्या कवीच्या प्रतिभेची साक्ष असते. नुसती अलौकिक प्रतिभा आहे म्हणून अलौकिक काव्यनिर्मिती होत नाही. त्या कवीचे सारे जीवनचिंतन, त्या कवीला असणारी अलौकीकतेची ओढ कवितेतून प्रकटण्यासाठी त्या कवीचे संचितही तेवढेच श्रीमंत असावे लागते. ही श्रीमंती सुधीर मोघ्यांकडे होती म्हणून त्यांची वरवर पाहता तरल आणि सरळ वाटणारी कविता गूढ असा जीवनाशय घेऊन प्रकट व्हायची.

मुळात माणसांचे जीवन त्रिमित आहे. त्यांची रूंदी आणि खोली हे शब्द केवळ क्षेत्रफळाशी निगडीत नाहीत. त्यांचा मानवी जीवनाशी जवळचा संबंध आहे. लांबी म्हणजे माणसाला लाभलेले आयुष्य, रूंदी म्हणजे त्याचे जगणे आणि खोली म्हणजे माणसाला समजलेला जीवनाचा अर्थ. अनेकांच्या कवितांमध्ये केवळ लांबी आणि रूंदी हीच परिमाणे आढळतात. खोली अभावानेच आढळते कारण त्यासाठी जीवनाच्या खोली डोहात डुंबण्याची, मनाचा खोल ठाव घेण्याची त्या कवीची म्हणून एक वृत्ती असावी लागते. त्यासाठी कवीचे मन चिंतनशील असावे लागते. शब्दांच्या पलीकडे असणार्‍या अनुभवांच्या परगण्यात सफर करण्याची त्या कवीची क्षमता असावी लागते. तेव्हाच ते अकल्पिताचे चांदणे त्याच्या प्रतिभेच्या आकाशात आकस्मितपणे प्रकट होऊन त्याचा सारा काव्य आसमंत प्रकाशमान करून टाकते. अशा कविंची कविता मग केवळ टाळ्यांसाठी हात जोडायला भाग पाडत नाही, तर त्या कवीच्या कवितेतून प्रकटणार्‍या चिरंतनाला आपण नमस्कार करीत आहोत, अभिवादन करीत आहोत अशी काव्यरसिकांची भावना होते. अशी कविता केवळ कवीच्या जीवनात प्रकाश निर्माण करीत नाही तर ती रसिकांचेही जीवन प्रकाशमान करते. अशी भाग्यवंत कविता मोघ्यांच्या वाट्याला आली आणि त्यांनीही त्या कवितेचे सोने केले. हे विवेचन करीत असताना त्यांच्या ‘सांज ये गोकुळी’ या कवितेची आवर्जून आठवण येते.

पर्वतांची दिसे दूर रांग
काळजाची जणू दाट रेघ
होई डोहातले चांदणे सावळे
भोवती सार्‍या बाहुली
माऊली सांज अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा
मंद वार्‍यावरी वाहते बासरी
अमृताच्या जणू ओंजळी
सांज ये गोकुळी सावली सावली
सावल्याची जणू साऊली

संध्याकाळ, सांज या कल्पनेकडे मोघे किती वेगळ्या भूमिकेतून पाहतात. हळूहळू दाटत चाललेल्या अंधारालाच सावळेपणा बहाल करतात. मुळात कृष्णडोह आणि सावळेपणा ही चिरंतनाची रूपे मानली जातात. बाहेरून अंधार, सावळेपणा, खोलपणा दिसत असला तरी त्याच्याशी तादात्म्य पावल्यानंतर तो चैतन्याचा प्रकाश दिसणार आहे. मूर्तीमंत उजेडाची अनुभूती येणार आहे. प्रचितीच्या पुढे जाऊन प्रतितीचे तेजस्वी दरवाजे उघडले जाणार आहेत, असे आश्वासन नव्हे तर वचन त्यात आहे. त्या प्रतितीची ओढ मोघ्यांच्या कवितेला आहे.

सावळेपणाचा भारतीय संदर्भही समजून घेतला पाहिजे. सावळ्या रंगामध्ये एक प्रकारचे आकर्षण आहे, निमंत्रण आहे, नियंत्रण आहे, उत्कटता आहे, भावूकता आहे. गोर्‍या रंगाला नुसता विस्तार आहे, तर सावळ्या रंगाला खोली आहे, ‘डेप्थ’ आहे. म्हणूनच या देशातल्या प्रतिभाकारांनी श्रीरामाला आणि श्रीकृष्णाला गोरं न करता सावळं केलं आहे. सावळेपणाचं हे तत्त्वज्ञान अनेक प्रतिमा आणि प्रतिकातून मोघ्यांच्या कवितेत सातत्याने डोकावते आणि त्या कवितांना अर्थांच्या नव्या छटा देते.

परमेश्वर सगुण – साकार आहे की निर्गुण – निराकार याविषयी मतमतांतरे असली तरी तो या ना त्या रूपात नांदतो आहे. याविषयी बहुतेकांचे मतैक्य होताना दिसते. हा श्रद्धेचा विषय आहे, असे अनेकांना वाटते. अगदी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनाही ‘परमेश्वर नाही’ यावर श्रद्धा ठेवूनच पुढे वाटचाल करावी लागते. या जगात वेगवेगळ्या घटना घडत असल्या तरी घडणार्‍या घटना एखाद्या विशिष्ट क्रमाने घडाव्यात आणि आपण पदोपदी असहाय्य असल्याची जाणीव होत रहावी असा अनुभव आपण नेहमीच घेत असतो. एखादी घटना घडून गेल्यानंतर आपल्यापद्धतीने आपण कारणमीमांसा करीत असतो. जीवनातल्या व्यर्थतेतला अर्थ शोधत राहणे एवढेच माणसाच्या हाती असते. आपण कळसूत्री बाहुले आहोत, कुणाच्यातरी हातचे खेळणे आहोत, ही जाणीव त्यावेळी तीव्र होते. काहीजण त्याला देव, काहीजण दैव तर काही जण ‘त्याच्या इच्छेने हे सारे काही होते’ असं म्हणतात. मोघ्यांची कविता बाहेरच्या दुनियेत रमत नाही. ती स्वतः आत डोकावून पहायला भाग पाडते.

कसे कोठुनी येतो आपण
कसे नकळत जातो गुंतून
उगाच हसतो, उगाच रूसतो
क्षणात आतुर क्षणात कातर

खेळ जुना हा युगायुगांचा
रोज नव्याने खेळायाचा
डाव रंगता मनासारखा
कुठली हुरहूर कसले काहूर

किंवा

ये कोरड्या गळ्यात हा सूर कोठला
मी तार वेदनेची छेडित चाललो
तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो
मी बीज सावल्यांचे पेरीत चाललो

यासारख्या त्यांच्या असंख्य कविता लौकिकाच्या कोलाहलातून अलौकिकाकडे कसे घेऊन जातात हे समजत नाही.

सुधीर मोघेंच्या वृत्तीतला हा शांतपणा, त्यांची स्थितप्रज्ञ व्यक्ती ही त्यांना लाभलेल्या उच्च आध्यात्मिक बैठकीतून त्यांना प्राप्त झाली होती. मोघेंचे अध्यात्म हे पूजाअर्चेचे किंवा कर्मकांडांचे नव्हते तर ते साधनेचे होते. कविता म्हणजे शब्दच्छल असं मानणार्‍यातले ते कवी नव्हते. कवितेला त्यांनी जीवनाची उपासना करण्याचे साधन मानले होते.

योगी अरविंदांच्या जीवन आणि तत्त्वज्ञानावर माझी नैनिताल येथे सलग आठ दिवस व्याख्याने झाली. सुधीरजींना हे समजले. त्यांनी मला फोन केला. अरविंदांच्या विचारसूत्रावर आम्ही अर्धातास बोललो. आपल्या आत डोकावून पहायला लावणार्‍या प्रत्येक गोष्टीविषयी त्यांना कमालीचे आकर्षण होते. कवी दत्ता हलसगीकर यांच्या प्रथम स्मृतीदिनी सोलापूरला झालेल्या कार्यक्रमात ते, मी आणि भानू काळे प्रमुख पाहुणे होतो. त्यादिवशी झालेल्या मनमुराद गप्पा सोनेरी आठवणी म्हणून मनाच्या कप्प्यात ठेवल्या आहेत. त्यांचा आणि माझा स्नेह पंधरा वर्षांचा. त्यांच्या आणि माझ्या वयात दोन पिढ्यांचे अंतर, पण ते कधीही मैत्रीच्या आड आले नाही. आम्ही वारंवार भेटलो नाही पण स्मरणाच्या सूत्राने कायम जोडलेले राहिलो. आताही राहू. चिरंतनाशी आता ते एकरूप झाले आहेत. चिरंतनाची ओढ असणार्‍या या कवीला विनम्र अभिवादन आणि आदरांजली!

– प्रा. मिलिंद जोशी
मासिक साहित्य चपराक, एप्रिल 2014

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

4 Thoughts to “चिरंतनाची ओढ असणारा कवी”

  1. रविंद्र कामठे

    खूपच छान रसग्रहण केलेय मिलिंद सर. सुधीरजींशी माझ्या पहिल्या काव्यसंग्रहांच्या वेळेस संवाद साधण्याचा योग आला होता. त्या आठवणी ताज्या झाल्या. एक प्रगल्भ प्रतिभावंत कवी, गीतकार व तितकेच उत्तम चित्रकार होते सुधीरजी. त्यांचे सखी मंद झाल्या तारका… हे गीत तर माझे सर्वात आवडते आहे. धन्यवाद

  2. जयंत कुलकर्णी

    सुधीर मोघे यांची कविता विचारांची खोली असणारी, रसिकांचे जीवन प्रकाशमान करणारी अशी आहे. अलौकीकाकडे घेऊन जाणारी आहे. चिरंतनाची ओढ त्यांच्या कवितेला होती. रामाच्या, कृष्णाच्या सावळेपणातुन त्यांना चैतन्याचा प्रकाश दिसत असे. प्रचितीच्या पुढे जाऊन प्रतीतीचे तेजस्वी दरवाजे त्यांच्यापुढे उघडले जात. मोघ्यांची कविता आपल्याला स्वतःमध्ये डोकावून पाहायला भाग पाडते. परमेश्वरावर, त्याच्या अस्तित्वावर त्यांची श्रद्धा होती. कवितेला त्यांनी ‘जीवन उपासनेचे’ साधन मानले होते. त्यांना विनम्र अभिवादन!!

  3. Vinod Khatke

    मा.मिलिंदजी यांचे विचार नेहमीच मनाचे असंख्य धागे अत्यंत सहज उलगडून दाखवतात मोघे यांच्या कवितेवरील अमोघ वर्णन अप्रतिम

  4. after I read a few sentences above I got useful information for me

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा