आठवणींचा सुगंध

आठवणींचा सुगंध

Share this post on:

मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे आपल्या ठायी असलेली स्मरणशक्ती. प्रत्येकाच्या मनात या स्मरणशक्तीसाठी एक कोपरा राखलेला असतो. हव्याहव्याशा वाटणार्‍या आठवणी मनातील या कोपर्‍यात दडविलेल्या असतात. हळूवार फुंकर मारताच या आठवणी ताज्या होऊन आपल्या मनाभोवती व विचारांभोवती रूंजी घालून आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जातात.

त्या विश्वात फक्त आपण व आपण जतन केलेल्या आठवणी असतात. सामान्यतः आपण सकारात्मक व उत्साहवर्धक तसेच मनाला टवटवी देणार्‍या आठवणी मनाच्या कोनाड्यात जपून ठेवतो अथवा नकळतपणे जपल्या जातात की जेणेकरून एकांतात असताना आपण त्यांचा आस्वाद अधिक चांगल्या रीतीने घेऊ शकतो. या सदासतेज आठवणी अशा असतात की त्याचे कधीच निर्माल्य होत नाही. त्या नेहमीच मनावरील मळभ दूर करणार्‍या असतात. ख्यातनाम साहित्यिक व. पु. काळे यांच्या कल्पनेप्रमाणे आठवणी या वारुळातील मुंग्यांप्रमाणे असतात. वारुळाकडे पाहून कधीच अंदाज वर्तवता येत नाही की वारुळामध्ये किती मुंग्या आहेत! पण एक जरी मुंगी बाहेर आली की तिच्यामागे असंख्य मुंग्या एका मागोमाग एक अशा रांगेने बाहेर पडतात. मनातील जपून ठेवलेल्या/नकळतपणे जपल्या गेलेल्या आठवणींचेही तसेच आहे. आठवणींचे बांध फुटले की एका पाठोपाठ एक अशा कितीतरी आठवणी बाहेर पडू लागतात.
मनातून अशा आठवणी बाहेर पडताना त्या असंख्य आठवणींना जन्म देतात. त्यामुळे आठवणींचा एक सुंदर गोफ तयार होतो. या आठवणींच्या शृंखलेतील काही कडी मनाच्या खोल कप्प्यात जपून ठेवाव्याशा वाटतात तर काही कडी गळून पडाव्यात असे वाटते. मनाच्या खोल कप्प्यात जपून ठेवाव्याशा वाटणार्‍या आठवणींचा सुगंध आपला जीवनभराचा आनंद असतो तसेच जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल करून नवी उमेद देतो. तसेच काही गळून पडावीशी वाटणारी अशी जी कडी असते ती त्रासदायक असू शकते. अशी कडी मानसिक दुर्बलता निर्माण करते. अशा नकारात्मक आठवणींना मनातून हद्दपार करणे हेच मानसिक सशक्ततेचे दर्शन घडविते.
सकारात्मक आठवणींचे वर्णन असे करता येईल की नुकत्याच उमललेल्या सुगंधी फुलांचा सुवास जसा आसमंतात दरवळतो तशा या आठवणी मनाचा ताबा घेतात व आपल्याला एका वेगळ्याच आल्हाददायक वातावरणात घेऊन जातात. त्या वातावरणात आपण व आपल्या आठवणी अशा दोनच गोष्टी असतात. अशा आठवणींचा आपल्या मनात एक सुंदर गोफ गुंफला जातो. या गोफातील प्रत्येक मण्याला स्वतःची अशी एक कायम स्मरणात राहणारी आठवण असते. यातील प्रत्येक मण्याला स्पर्श करताच त्या आठवणींची अनुभूती जाणवते. यातील काही आठवणी या स्वतःशी तर काही आठवणी प्रियजनांशी निगडित असतात. काही आठवणी फक्त स्वतःपुरत्या असतात व त्याचमुळे त्या आठवणींची अनुभूती आपण कोणालाही वर्णन करून सांगू शकत नाही.
याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे गर्भार अवस्थेत पोटातील बाळाची होणारी व जाणवणारी हालचाल. हा आनंद फक्त एक आई घेऊ शकते. मनात असूनही पोटातील त्या जाणिवांचे वर्णन ती पतीलाही सांगू शकत नाही. या आठवणीतच ती दंग होऊन आपल्या बाळाच्या भविष्याची स्वप्ने रंगवीत असते. या स्वप्नात पतीचा सहवासही तिला महत्त्वाचा व मोलाचा वाटतो. बाळाच्या चाहुलीची व पोटातील जाणिवांची आठवण या संवेदना तिला सदासर्वकाळ ताज्यातवान्या वाटत असतात. ही आठवण नकळतपणे तिच्या मनात चिरंतर ठसलेली असते.
या अवस्थेचे अजून एक उदाहरण म्हणजे ‘आली हासत पहिली रात’ हे एक नितांत सुंदर गीत. हे गाणे कुठेही कानावर पडले तरी नकळतपणे हे गाणे आपल्याला गतस्मृतीत घेऊन जाते व मन त्या जपलेल्या आठवणींनी रोमांचित होऊन शरीरभर एक गोड संवेदना जागृत होते. काही वेळा असे होते की सहज चालता चालता एखादे खास आवडते गाणे आपल्या कानावर पडते व ते आपणच नकळत गुणगुणू लागतो. त्यावेळेस ते फक्त गुणगुणणे नसते तर त्या गाण्याच्या निगडित असलेल्या व आपण जपून ठेवलेल्या अमीट आठवणींचा ठेवा हळूवारपणे उलगडला जातो व त्याचा दरवळणारा सुगंध आपण गुणगुणण्याच्या रूपाने पुनःप्रत्यय घेत असतो. कधी आपण या गाण्याचा आस्वाद प्रिय व्यक्तिसमवेत घेतलेला असतो तर कधी जीवनातील आनंदी क्षणांच्या वेळेस हे सूर कानी पडलेले असतात.
शाळेतील खोडसाळपणा, शिक्षकांची उडविलेली रेवडी, वर्गमित्रांबरोबर केलेली भांडणे/मारामार्‍या, शिक्षकांचा खाल्लेला मार इत्यादी शालेय जीवनातील आठवणी याच आपल्याला शेवटपर्यंत साथ करीत असतात. वयाची पन्नाशी ओलांडल्यावर जर कधी वर्गातील सवंगडी भेटले तरी आपण सहज 35 ते 40 वर्षे मागे जाऊन कसलीही पर्वा न करता त्या जपलेल्या शालेय आठवणींना मनापासून उजाळा देतो. त्यावेळी असलेले हेवेदावे, भांडणे विसरून जाऊन आपण त्या रम्य भूतकाळातील आठवणींचा मनसोक्त आस्वाद घेतो. एक मात्र नक्की की प्रत्येकजण आपल्या शालेय / महाविद्यालयीन काळातील आठवणीत मनापासून रमतो. त्या आठवणीत एकदा शिरले की त्या काळातील असंख्य आठवणी मनात रुंजी घालू लागतात.
आपल्या सांसारिक जोडीदाराच्या मनात सुद्धा अशाच भावना असतात. म्हणजेच जोडीदारही शालेय आठवणीत रमणारा असतो. त्यामुळे त्या आठवणींची परस्परांत देवाण-घेवाण करणे हाच अनमोल ठेवा असतो. काही वेळेस शालेय जीवनापेक्षा रम्य अशा आठवणी महाविद्यालयीन जीवनात घडलेल्या असतात. महाविद्यालयीन दिवस म्हणजे मोकळेपणा तसेच स्वच्छंदी दिवस. अध्यापकांची/प्राध्यापकांची केलेली टिंगल, जाणून-बुजून मोडलेले महाविद्यालयीन नियम, परीक्षेच्या काळात महाविद्यालयातील वाचनालयात बसून केलेला अभ्यास (?), दांडी मारून पाहिलेले चित्रपट इत्यादी गोष्टींनी मनाचा एक कोपरा व्यापलेला असतो. कधी आपल्या दैनंदिन कार्यक्रमात या आठवणींना नकळत उजाळा मिळाला तर आपल्या महाविद्यालयीन मित्र-मैत्रिणींना भेटण्याची ओढ निर्माण होते. याच काळात काही खास व्यक्ती आपल्या सानिध्यात आलेल्या असतात. त्यांच्या आठवणीने मनाला पंख फुटतात व मन खास व्यक्तिंच्या आठवणीत विहरू लागते. ते चोरून भेटणे, फिरावयास जाणे, वर्गात शिक्षक शिकवीत असताना चोरून पाहणे, एकत्रपणे दांडी मारणे, पुस्तक/वही यातून चिठ्ठ्यांची देवाण-घेवाण करणे, परीक्षेचा अभ्यास एकत्र करणे इत्यादी गोड आठवणी मनाला सुखावून जातात.
नोकरी लागल्यावर स्वतःच्या पहिल्या पगारातून घेतलेली वस्तू कायमची स्मरणात तर राहतेच पण ती वस्तू जपूनही ठेवली जाते. ती वस्तू बिघडली तरी आपण ती कधीच फेकून देत नाही. त्या वस्तुमागे आपल्या अनंत आठवणी दडलेल्या असतात. अशा अनंत आठवणींनी आपले मन नेहमीच भरलेले असते. नोकरीच्या ठिकाणी काही खास व्यक्तिंबद्दल आस्था असते. साहजिकच त्या व्यक्तिबद्दलच्या काही आठवणी मनात घर करून बसलेल्या असतात. संगणकाची कळ दाबल्यावर जशी हवी असलेली माहिती क्षणार्धात मिळते तसेच मनाचेही आहे. काहीही झाले तरी संगणक एक यंत्र आहे. आपले मन भावनाशील तसेच संवेदनशील असल्यामुळे या आठवणी पुनःप्रत्ययाचा आनंद देतात. मनातील एखाद्या हळव्या कोपर्‍याला स्पर्श झाला असता त्या रम्य आठवणी शुभ्र फेसाळणार्‍या धबधब्याप्रमाणे कोसळतात व मनाला उभारी देतात.
शेवटी एवढेच सांगता येईल की प्रत्येकाने या रम्य आठवणींच्या आधारे जीवनात रंग भरले तर जगण्याचा आनंद आगळा-वेगळाच होईल. गेलेले दिवस/क्षण काही परत आणता येत नाहीत पण त्या आनंदी आठवणींनी मन तर उत्साही करता येतं. कधीतरी एकांतात शांत बसून मनात दडलेल्या अविस्मरणीय आठवणींना स्पर्श करून त्याचा मनमुराद आस्वाद घेतला तर जो टवटवीतपणा निर्माण होतो त्यामुळे मनात एक नवीन उमेद संचारते. साठवून ठेवलेल्या आठवणी याच आपल्या एकांतातील सोबती असा विचार केला तर मनाला व त्यायोगे शरीराला उत्साहाचे देणं लाभेल.

-मिलिंद कल्याणकर
नवी मुंबई 9819155318

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!