फ्रॉइडचे मानसशास्त्र आणि मनाचे श्लोक

फ्रॉइडचे मानसशास्त्र आणि मनाचे श्लोक

रामदास स्वामींच्या श्लोकांत आणि फ्रॉईडच्या तात्त्विक बैठकीत विश्लेषणात्मक फरक असला तरी दोघेही एकाच झाडाची मशागत करत आहेत, हे सत्य नाकारता येत नाही. अर्थात फ्राईड मनरुपी झाडाची मुळे कुठवर पसरली हे सांगतो तर समर्थ रामदास स्वामी त्या मुळांना अधिकाधिक तग धरून राहण्याचे सारतत्त्व देतात.

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणे नीच सोशीत जावे ।
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥

मनाला धाडसी, धैर्यशील आणि विनम्र होण्याची शिकवण देताना समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या असंख्य आवर्तनांची यथेच्छ उजळणी घेतली आहे. प्रत्येक श्लोक मानवी मनाच्या भावनेला अत्यंत जिकिरीचा उद्बोधक संदेश देतो. हे श्लोक ऐकायला जितके संवेदनशील आहेत तितकेच अंगिकारायला कठोर वाटतात. शाळेत असताना मनाचे श्लोक पठण करतच सकाळ व्हायची! पण खर्‍याअर्थाने मनाच्या श्लोकांची किंमत तर आयुष्याच्या नैराश्यकाळात समजली. आजही शाळेत जाणारे विद्यार्थी मनाचे श्लोक म्हणतात त्यावेळी आवर्जून माझ्या मनाच्या कोपर्‍यात बसलेला सिग्मंड फ्रॉइड आपोआप बाहेर येतो! याचे कारण मनाची रचनाच मुळी गुंतागुंतीची आहे हे महत्त्वपूर्ण भान त्याने दिले. या मनावर संस्काराची रुजवण करणे हे काम जिकिरीचे आहेच पण ते मन समजून आणि उमजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्या मनाला काय चांगलं आणि काय वाईट हे समजणं आवश्यक आहे. मनाचे श्लोक मनावर ताबा मिळवून अतिशय संयमित आचरणातून जीवन जगण्याचा एक सुखकर मार्ग दाखवतात पण माझ्या मनातला फ्रॉइड मात्र ते मन समजून घेण्याच्या संघर्षात पुरता सोलून निघतो. कारण त्या मनात असंख्य भावभावनांचा पसारा पडलेला असतो आणि फ्रॉईड म्हणतो त्याप्रमाणे तो पसारा दमन करून स्वच्छ करता येत नाही. अप्रभाषित भावना कधीही मरणार नाहीत. त्यांना जिवंत पुरले आहे आणि नंतर ते कुरूप मार्गांनी पुढे येतील. (Unexpressed emotions will never die. They are buried alive and will come forth later in uglier ways.) मानवी कुरूपता ही मुख्यत्वे मानवाच्या आसक्त वृत्तीतून प्रदर्शित होते.

मुळातच आसक्ती वाईट असते पण ती तेवढीच नैसर्गिक सुद्धा आहे हे आपण नाकारू शकत नाही. मानवी मन हे आसक्तीने व्यापलेले आहे हे समर्थ रामदास पुरे जाणून आहेत आणि फ्रॉइड तर या आसक्तीला मानवाच्या जगण्याचा गाभाच मानतो. फक्त मन समजून घेण्याच्या या दोघांच्या भूमिकेत वेगळेपण आहे. नैसर्गिक आसक्तीने मोहित होऊन मानवी मन असंख्य कर्मक्रीडेत अडकत जाते. त्या अडकण्याचे परिणाम काय होऊ शकतात हे आपण आसपासच्या विविध प्रकारच्या नैराश्यग्रस्त किंवा आशादायी मनुष्यवर्तणुकीत बघत असतो. ही आसक्ती मुळातच मनाच्या बोध, अबोध आणि बोधपूर्व अशा तिन्ही अवस्थेत नांदते हे फ्रॉइडचे विश्लेषण! त्या विश्लेषणाच्या आधारे मानवी मनाचे मानसशास्त्र उलगडते खरे पण ते मानसशास्त्र उलगडल्यानंतर त्या मनाला प्रकाशाची वाट कशी दाखवावी याचे उत्तर म्हणजेच रामदास स्वामींचे मनाचे श्लोक!

देवा, कसं देलं मन, आसं नही दुनियात
आसा कसा रे तू योगी, काय तुझी करामत.

बहिणाबाई म्हणतात त्याप्रमाणे हे मन फार मोठी करामत आहे पण मानवी जीवनात जागृतपणे हे मन समजून घेण्याचा प्रवास सुरू होतो तो किशोरवयीन काळात. तोपर्यंत मनुष्य आवडीनिवडीपुरते मनाचे कौल घेत असतो. भवितव्याच्या आणि आकांक्षांच्या गगनात उत्साह आणि उन्मादांचे धुमारे फुटतात तेच मुळी या तारुण्याच्या उंबरठ्यावर… सुरवंटाचे फुलपाखरू होताना आसक्तीचा आणि मोहाचा परिचय ओघाने होतोच आणि तो फक्त त्या फुलपाखराचा असतो. अशी असंख्य फुलपाखरं या वर्षी शाळा आणि कॉलेजातून बागडता बागडता अचानक घरकोंडीत अडकली. कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने मानवी जनजीवन किती विस्तृत अर्थाने दुःखी केलं ते आपल्याला माहीत आहेच पण दाबून दडपून एका जागी शांत कोंबून ठेवलेली हवा सुद्धा शेवटी दहा पट अधिक वेगाने बाहेर मुसंडी मारते तसेच मानवी मनाचे असंख्य दबलेले आणि पिचलेले भाव वेगवेगळ्या प्रकारे उत्स्फूर्तपणे बाहेर पडले ते या कोरोनाच्या निमित्ताने! मानवी मनाचे अंतर्मुख करणारे दुःख प्रत्येक वेळी नैराश्येने व्यापलेले असेल असे नाही. बर्‍याचदा सृजनाचा वारसा हा अपरिमित शोकांतातून फुलतो. त्या अनुषंगाने प्रत्येक व्यक्ती आणि त्याचं मन हे उमलतं फुलपाखरू असतं. ज्या प्रकारे या कोरोनाकाळाने जवळचे मृत शरीर पाहिले तसेच अनेक सेवाभावी हातही पाहिले. कुठेतरी नैराश्यग्रस्त आत्महत्या घडल्या तर कुठेतरी एकांतात जाऊन समजून आलेलं, स्वतःच दाबून टाकलेलं नवं अस्तित्वही अनेकांना सापडलं. कित्येकांनी हरवलेलं संसारसुख नव्यानं मिळवलं तर काही संसार कोलमडून पडले. जेवढं वास्तव मृत्युच्या आकड्यांत दिसत होतं तितकंच नव्या जन्मदरात आणि लग्नगाठीत आढळत होतं. कुठेतरी अंत होता तर कुठेतरी अस्त होता. मुळात आधी लय आणि मग निर्मिती! खरं म्हणजे या निर्मिती आणि लयाची शृंखलाच जीवनाला गतिमान करते.

या निर्मिती आणि लयाच्या मधला अनाकलनीय प्रवास म्हणजे आपल्या जगण्याची अपरिमित आंदोलनं! मनुष्य शक्य आणि अशक्यतेच्या मध्यंतरी झुलत असताना खर्‍या अर्थाने त्याने समर्थांच्या मन:शास्त्राची नेमकी व्याख्या समजून घेतली तर जगणे अधिक सुसह्य होईल असे वाटते पण तरीही न जाणो… कोण कुठून…? माझ्या मनातला फ्रॉइड मात्र स्वतःच्या मनाच्या मानसशास्त्राचा अभ्यास करणे सहजासहजी सोडत नाही. खासकरून या घरकोंडीच्या काळातील मनाचे हेलकावे हे फ्रॉइडच्या विश्लेषणातून ताडायचे आणि मग समर्थांच्या मनाच्या श्लोकातून मनःशांतीचा संदेश अनुभवायचा हे इतके सोपे नव्हते. त्यासाठी मला फ्रॉइड आणि समर्थ रामदास हे दोघेही तितकेच महत्त्वाचे वाटतात.
फ्रॉइडच्या अबोध मन आणि मनोलैंगिक शक्तिचा विकास यांचा बोध, अबोध आणि बोधपूर्व असा हा आराखडा एकीकडे सामान्य अनुभवाशी सुसंगत वाटतो. फ्रॉइड यांनी मन ही संकल्पना तीन स्तरांच्या रूपात मांडली. मानवी मनाच्या कक्षा बोधावस्था, बोधपूर्व अवस्था आणि अबोधावस्था अशा तीन थरांत विस्तारलेल्या असतात हा त्यांचा मुख्य सिद्धांत होय. ज्या मानसिक घटना आणि स्मृती यांची वर्तमानकाळात व्यक्तिला जाणीव असते तो बोध स्तर होय. याखेरीज स्मृती व इच्छांचे एक भांडार असते. ते सर्वच्या सर्व प्रत्यक्ष जाणिवेत नसते परंतु सहजपणे उपलब्ध होऊ शकते. हे बोधपूर्व मन आणि अबोध मनात खोल गाडलेल्या स्मृती, इच्छा, प्रच्छन्न प्रेरणा दबून राहिलेल्या असतात. या मनाचा काही भाग आदिम स्वरूपाचा, पाशवी विचार आणि वासनांचा बनलेला व केवळ सुखाची इच्छा धरणारा असतो. तो कधीच बोधकक्षेत आलेला नसतो. उरलेल्या अबोधकक्षेत बोधजाणिवेतून हद्दपार केलेल्या धक्कादायक, क्लेशकारक व लज्जास्पद इच्छा, विचार, स्मृती इ. गोष्टींचा कल्लोळ चालू असतो. यामुळे अबोध मनाच्या ठिकाणीही प्रेरक शक्ती असते. अबोध मनाची कक्षा बोध मनाच्या मानाने खूपच विस्तृत असते. म्हणून फ्रॉइड यांनी बोध मनाला हिमनगाचा पाण्यावरील दृश्य भाग अशी उपमा दिली. अबोध मनात असंख्य अशा दडलेल्या इच्छा असतात, तरी पण बोध असणार्‍या मनाच्या या हिमरुपी टोकापासून सुरुवात करून तळघरातल्या अबोध मनात पोहचावे लागते. म्हणूनच कदाचित रामदास स्वामी म्हणतात की, वरवरचे क्लेश हे मनाची आतली बाजू पोखरून काढतात… आणि इच्छा अपूर्ण राहिल्यास मन दुःखी होते.

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे
अति स्वार्थ बुद्धी नुरे पाप साचे
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे
न होता मनासारिखे दु:ख मोठे

म्हणजे उदाहरणार्थ बघा की, कधी एकेकाळी हव्या असणार्‍या काही चिवट इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तर आपण त्या काळानुसार विसरून गेलोय असे आपल्याला वाटते परंतु या इच्छा मानवाच्या नकळत त्याच्या अबोध मनात जाऊन बसतात आणि अनपेक्षित परिस्थितीत बाहेर येतात. जेव्हा त्या बाहेर येतात तेव्हा त्यावर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया येतात पण एखादा मनुष्य नक्की त्यातील कोणती प्रतिक्रिया व्यक्त करणार? हे त्या व्यक्तिच्या मानवी मनाच्या संतुलनावर अवलंबून असते! परंतु मनोलैंगिक भाव आणि त्यातील तपशीलाच्या अनेक गोष्टी आपल्या संस्कृतीने नेहमी अप्रस्त वा पापी ठरवलेल्या आहेत आणि फ्रॉइड तर कामुकतेला, लैंगिकतेला अत्यंत ठामपणे केंद्रस्थानी बसवून मानसिक आरोग्य आणि विकृती या दोन्हींची खुली चर्चा करतो. त्यामुळे फ्रॉइड क्रांतिकारक वाटतो. फ्रॉईडची मूलग्राही वैज्ञानिक सर्वेकदृष्टी कोणालाच आपले बुरखे टिकवू देत नाही कारण ही तत्त्वे प्रत्येक व्यक्तिच्या मनोरचनेमध्ये कशी अनुस्यूत असतात? हेही त्याने दाखवून दिले होते पण समर्थ रामदास यांचे मनाचे श्लोक मनाच्या या त्रिसूत्री रचनेबद्दल चर्चा न करता ते मन पूर्णतः जाणून घ्या असे म्हणत मनाच्या गुंतागुंतीला सुटसुटीत करण्याचा सरल असा मनाच्या संतुलनाचा पक्का मार्ग सांगतात. त्यांच्या लेखी मनाच्या हिमनगाचे बोधरुपी टोक आणि पाण्याखाली झाकलेली अबोध बाजू सुद्धा नितळ असावी. ती तशी नितळ असेल तरच मनुष्य सुदृढ मनाचा ठरतो. मानवी मन हे नानाविध विकारांनी भारलेले आहेच हे तत्त्वज्ञान त्यांनी फ्रॉइडच्या आधीच सोप्या भाषेत मान्य केले पण मनाच्या गाभ्याचे विश्लेषण न करता त्यानी मनाच्या मानसिक संतुलनसाठी आत्मबळाचा नामी मार्ग सांगितला जे माझ्या लेखी एक सरळ सोपे असे रामबाण मेडिटेशन आहे.

नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नाना विकारी ।
नको रे मना सर्वदा अंगिकारू । नको रे मना मत्सरू दंभभारू ॥

सत्य हे आहे की वर्तनाच्या व मनोव्यापारांच्या उलगड्यासाठी मन ही संकल्पना शरीर यापेक्षा वेगळी कल्पून मनाचे धर्म, मनाचे व्यापार इ. कल्पनांच्या साहाय्याने अनुभवाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न फार प्राचीन काळापासून झालेला आहे. त्यात मनाची संज्ञाशक्ती किंवा जाणीव, स्वप्न, भास, सुषुप्ती, ध्यान, समाधी यांसारख्या जाणिवेच्या अवस्था ‘आत्मा’ हे सूक्ष्मतम तत्त्व कल्पून समाविष्ट केल्या जात होत्या. तेच नेमके पकडून समर्थांनी मानवी मनाला आनंदरूप तेज दिले ज्यात कर्म, संवेदना आणि जाणिवा यांचा प्रगल्भ विचार आहे. त्यामुळे समर्थ रामदास स्वामी मनातील क्रोध, वासना, मद, माज, मत्सर आणि लोभ यासारख्या षड्रिपूंना दूर सारण्याचे आवाहन करतात आणि सकस मानवी मूल्यांचे अधिष्ठान वाढवतात.

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा । मना सत्यसंकल्प जीवी धरावा ।
मना कल्पना ते नको विषयांची । विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥

मानवी विकारांवर गुणकारी प्रयोजन म्हणजे मनाचा सत्यसंकल्प, जर तो संकल्प दृढ नसेल तर मानवी आसक्ती ही सर्वनाश ओढवून घेते. अर्थात स्वत: बरोबर पूर्णपणे प्रामाणिक असणे हा एक चांगला व्यायाम आहे. (Being entirely honest with oneself is a good exercise.) असे फ्रॉईड म्हणतो. म्हणूनच रामदास स्वामींच्या श्लोकांत आणि फ्रॉईडच्या तात्त्विक बैठकीत विश्लेषणात्मक फरक असला तरी दोघेही एकाच झाडाची मशागत करत आहेत, हे सत्य नाकारता येत नाही. अर्थात फ्राईड मनरुपी झाडाची मुळे कुठवर पसरली हे सांगतो तर समर्थ रामदास स्वामी त्या मुळांना अधिकाधिक तग धरून राहण्याचे सारतत्त्व देतात.

मना वासना दुष्ट कामा न ये रे । मना सर्वथा पापबुद्धी नको रे ।
मना सर्वथा नीती सोडू नको हो । मना अंतरी सार वीचार राहो ॥

तमोगुणांचा विकार बाजूला सारून, मनुष्यात जेव्हा प्रामाणिकता या सत्त्वगुणाचा शिरकाव होतो तेव्हा खर्‍याअर्थाने समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेले मनाचे श्लोक सार्थकी लागतात आणि फ्रॉइडच्या मन नावाच्या अज्ञात गुहेची प्रकाशमान बाजू स्पष्ट दिसू लागते. त्यामुळे असे सांगावेसे वाटते की, हे मानवी मन समजून उमजून घ्यायला फ्रॉईड हवा आहे आणि याच मनाचा निकोप व्यायाम करून घ्यायला हवेत ते रामदास स्वामींचे हे मनाचे श्लोक! अर्थात मन समजून उमजून ते घडवणे हा एक अगम्य सुखांत आहे इतकेच!

– ज्योती हनुमंत भारती,
कल्याण
चपराक, 1 ते 15 एप्रिल 2021

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

2 Thoughts to “फ्रॉइडचे मानसशास्त्र आणि मनाचे श्लोक”

  1. जयंत कुलकर्णी

    मनाचा सखोल अभ्यास करून फ्रॉइड आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या वैचारिक भूमिकेतील द्वंद्वाबाबत केलेला सुंदर उहापोह!

  2. रमेश वाघ

    खूपच छान.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा