कल्पतरू आण्णा

कल्पतरू आण्णा

मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयात बसलो होतो. पीएच.डी. प्रबंधलेखनाचे काम दररोज नित्यनेमाने करत होतो. त्याकरिता लागणारे संदर्भ गोळा करून ते वाचून काढत होतो. त्यांचा आधार घेत-घेत प्रबंधलेखनाला गती देत होतो. त्या दिवशी सकाळी सहा वाजता उठून ठीक सात वाजता जयकर ग्रंथालयाच्या वाचनकक्षासमोर रांगेत उभा राहिलो. ग्रंथालयाचा वाचनकक्ष उघडण्यापूर्वी रांगेत उभे राहणे, क्रमाक्रमाने आपली नोंद करून वाचन कक्षात प्रवेश करणे, आपली जागा पकडणे व तेथे दिवसभर लेखन-वाचन करणे हा माझा नित्य परिपाठ झाला होता.

तो दिवस होता 17/06/2013, वार-सोमवार. मी वाचन कक्षात प्रवेश मिळवून बराच वेळ लेखन-वाचन करत बसलो होतो. साधारण सकाळचे अकरा वाजत आलेले होते. सहज उठलो व बदल म्हणून वर्तमानपत्रे चाळण्यासाठी ग्रंथालयाच्या नियतकालिक विभागात प्रवेश केला. असंख्य मासिके व वृत्तपत्रे तेथे पडलेली होती. आजचे वर्तमानपत्र शोधत असतानाच माझ्या हाती दै. ‘लोकसत्ता’ वर्तमानपत्र लागले. बातम्या चाळताना ‘पाहिजेत’ या शीर्षकाखाली आलेली कै. तुकाराम धोंडिबा पठारे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाची जाहिरात वाचली. त्यामध्ये ‘मराठी’ या विषयाकरिता खुल्या प्रवर्गातील सहा. प्राध्यापक हे पद होते. या पदावर कोणीतरी कार्यरत असेल असा विचार मनात क्षणभर तरळून गेला. मात्र मनाचा हिय्या करून त्याचदिवशी महाविद्यालयाकडे नोकरीकरिता विनंती अर्ज पाठवून दिला. पुढील दहा-पंधरा दिवस पीएच.डी.च्या प्रबंधलेखनामध्ये स्वतःला गुंतवून घेतले. नोकरीकरिता केलेल्या विनंती अर्जाची आठवणही राहिलेली नव्हती.

एके दिवशी पठारे महाविद्यालयातून माझ्या मोबाईलवर फोन आला. तो फोन स्वतः प्राचार्य आर. जी. चवरे यांनी केला होता. ते स्वतः मराठी विषयाचे असल्याने त्यांनी फोनवरूनच मराठी विषयातील माझ्या ज्ञानाची बर्‍यापैकी चाचपणी केली आणि ‘सर्व कागदपत्रे घेऊन भेटावयास या’ असा निरोप दिला. महाविद्यालयात गुणवंत उमेदवाराची निवड करायची, हा आण्णांचा मूलमंत्र प्राचार्यांना पाठ झालेला होता. त्यामुळे त्यांनी माझी विविध प्रश्न विचारून दीर्घ मुलाखत घेतली. त्या मुलाखतीतील माझ्या उत्तरांनी त्यांचे समाधान झाले. पुढे दोनच दिवसांनी प्राचार्यांनी आण्णांशी चर्चा करून त्यांच्या परवानगीने मला महाविद्यालयात तात्पुरत्या स्वरूपात रुजू करून घेतले. तो दिवस होता 7 जुलै 2013. मी यापूर्वी वरिष्ठ महाविद्यालय, इ.एव.अध्यापक महाविद्यालय, डी.टी.एड. अध्यापक विद्यालय असा प्रवास करत-करत जवळपास सात वर्षांचा अनुभव गाठीशी घेऊन दि. 7 जुलै 2013 रोजी या महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रवेश केला होता. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. पंढरीनाथ तथा आण्णासाहेब तुकाराम पठारे व संस्थेचे अन्य पदाधिकारी यांचा व माझा यत्किंचितही परिचय झालेला नव्हता. तो योग आला 15 ऑगस्ट 2013 रोजी.

तो भारताचा 67 वा स्वातंत्र्यदिन होता. प्रमुख पाहुणे वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे प्रथम आमदार बापूसाहेब पठारे हे होते. अन्य सर्व मान्यवर मंडळी कार्यक्रमाला हजर होती. अध्यक्षस्थानी आण्णा होते. आण्णांना पाहण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग होता. सूत्रसंचालक एकेकाला भाषणासाठी आमंत्रित करत होता. प्रत्येक निमंत्रित वक्ते, पदाधिकारी आपले विचार मांडत होते. तोपर्यंत ऐकण्याची सहनशक्ती संपल्याने व उन्हाचा कडाका चांगलाच जाणवू लागल्याने विद्यार्थी चुळबूळ करू लागले होते. सर्वात शेवटी सूत्रसंचालकाने आण्णांच्या नावाचा पुकारा करून त्यांना अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली आणि काय आश्चर्य! सर्व विद्यार्थ्यांची चुळबूळ क्षणार्धात थांबली. परस्परांमधील त्यांचे बोलणे थांबले. सर्वांचे कान आण्णांच्या वक्तव्याकडे लागले होते. आण्णाविषयी वाटणारी आदरयुक्त भीती विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या व सर्व निमंत्रितांच्याही वागण्या-बोलण्यातून पावलोपावली जाणवत होती. आण्णांन्नी बोलायला सुरुवात करण्यापूर्वीच विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडात सुरू केला. तो थांबवून आण्णांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाला सुरुवात केली. मी त्या भाषणातील शब्द न् शब्द मनात कोरून ठेवला कारण त्या भाषणात त्यांची सर्वसामान्यांच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल प्रचंड आस्था दिसत होती. धबधब्याचा प्रवाह अखंडपणे वाहत राहावा, त्याप्रमाणे आण्णांची वाणी बरसत होती. या शब्दरूपी पावसात मी पुरता भिजून चिंब झालो होतो. या क्षणापासून आण्णांना असलेली समाजकार्याची आवड, गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे याकरिता असलेली त्यांची तळमळ व त्यांची अमोघ वाणी या सर्व बाबींचा मला अगदी जवळून परिचय झाला.

पुढे 1 जानेवारी 2014 रोजी विद्यापीठ निवड समितीद्वारा महाविद्यालयामध्ये मुलाखती झाल्या. मी ‘मराठी’ विषयाच्या सहा. प्राध्यापक पदावर काम करत असल्याने व माझे काम समाधानकारक वाटल्याने संस्था व महाविद्यालयाने विद्यापीठ निवड समितीला माझी शिफारस केली. निवड समितीने ती मान्य केली आणि विद्यापीठ निवड समितीने माझी निवड केली. यामध्ये आण्णांनी व संस्थेचे सचिव अ‍ॅड. राजेंद्र उमाप यांनी घेतलेली भूमिका निर्णायक ठरली. गुणवंताला प्राधान्य व त्या पदावर पूर्वीपासूनच काम करत असलेल्याला प्राधान्य या बाबी उभयतांनी त्यावेळी पाळल्या व आजही ते व्रत हे उभयता पाळत आहेत. मुलाखतीच्या दुसर्‍याच दिवशी संस्थेने नेमणूक पत्र व त्वरित रुजू होण्याचा आदेश दिला. या सर्व प्रक्रिया कागदोपत्री पूर्ण करून मी पुन्हा नवीन जोशाने महाविद्यालयात कार्यरत झालो. इथे मला एक गोष्ट जाणवली की, आण्णांनी संस्थाचालक म्हणून आमची निवड करताना कोणतीच आर्थिक अपेक्षा ठेवली नाही. भविष्यात महाविद्यालयाला सरकारी अनुदान आले तर काही संस्थाचालक कर्मचार्‍यांकडून काहीएक रक्कम देण्याचे किमान आश्वासन तरी घेऊन ठेवतात. मात्र आण्णांनी असे काही मनातसुद्धा आणले नाही. महाविद्यालयाच्या कर्मचार्‍याने फक्त इमानदारीने काम करावे, एवढीच अपेक्षा त्यांनी सदोदित ठेवलेली दिसते.

पुढे महाविद्यालयातील प्रत्येक कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आण्णा लाभू लागले. प्रत्येक कार्यक्रमाला ते वेळेवर हजर असतात. त्यांचा वक्तशीरपणा पाहून कार्यक्रम वेळेत सुरू करण्याची दक्षता आम्हाला घ्यावी लागते. आण्णा अध्यक्षीय भाषण सर्वात शेवटी करतात. त्यात विद्वत्ता, मार्मिकता तर असतेच; पण समयसूचकताही असते. एखादा निर्णय ते भाषणात बोलता-बोलता घेऊन टाकतात. महाविद्यालयाच्या सर्व कर्मचार्‍यांना दोन गणवेश शिलाईसकट देण्याचा निर्णय त्यांनी शिक्षकदिनाच्या कार्यक्रमात अशाच प्रकारे अनाहूतपणे घेतला होता. आण्णा आपल्या भाषणातून सर्वांची मरगळ क्षणार्धात झटकून टाकतात. आपला भूतकाळ सांगताना ते आपले काबाडकष्ट, दैन्य, शिक्षणासाठी झालेली परवड, त्याकरिता झालेला खराडी-येरवडा-मुंढवा असा प्रवास उलगडतात. हे सर्व त्यांच्या तोंडून ऐकताना आजही अंगावर रोमांच उभे राहतात. आण्णांनी त्या काळात दहावी उत्तीर्ण होऊन आय.टी.आय. पूर्ण केले. यामधून त्यांची उद्यमशीलता व तांत्रिक ज्ञानाची त्यांना असलेली आवड आपल्या लक्षात येते. खराडी गावच्या सरपंचपदापासून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. पुढे सलग पंधरा वर्षे सरपंच पद भूषवून त्यांनी खराडी गावाचा कायापालट घडवून आणला याची साक्ष आजही कित्येक वृद्ध मंडळी देताना दिसतात. अशा ज्येष्ठ मंडळींकडून आण्णांच्या त्वरित निर्णय घेण्याचे किस्से मी कित्येक वेळा ऐकलेले आहेत. यावरून आण्णांचा तारुण्यातील उत्साह आणि तडफदारपणा माझ्या डोळ्यासमोर सदोदित उभा राहतो. सरपंचपदापासून सुरू झालेला हा राजकीय प्रवास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदापर्यंत पोहोचला. हे सर्व करत असताना त्यांनी आपली लहानपणापासून असणारी कुस्ती व कबड्डीची आवड आजतागायत जोपासलेली आहे. ते पैलवानांचे व कबड्डीपटूंचे आश्रयदाते आहेत. त्यांच्या खुराकासाठी व कसरतीसाठी आजही आण्णा लाखो रुपये खर्च करताना दिसतात. खाजगीमध्ये गप्पा मारताना आण्णा त्यांच्या कुस्तीची आवड आम्हाला वरचेवर सांगतात. चाळीस ते पन्नास किलोमीटरवरील गावांच्या यात्रांमधील कुस्त्यांमध्ये सहभागी होण्यासाठी आण्णा सायकलवर फक्त एकट्याने नव्हे तर आणखी दोन मल्लांना घेऊन गेलेले आहेत. एवढे मोठे अंतर ट्रिपल सीट सायकल चालवून आण्णांनी यात्रेत कुस्त्या जिंकलेल्या आहेत. याची साक्ष आजही खराडी-चंदननगर परिसरातील अनेक ज्येष्ठ मंडळींनी माझ्याजवळ दिलेली आहे. यावरून आण्णांचे कुस्तीवरील प्रेम आपल्या लक्षात येते.

पुढे चंदननगर, खराडी ही गावे पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली. येथील जमिनींना प्रचंड किंमत आली. काहींनी जमिनीची गुंठेवारी केली, इमारती बांधल्या. यातून त्यांच्या हाती प्रचंड पैसा आला. त्यामधून अरेरावी वाढीला लागली. मात्र आण्णा या काळाकडे स्थितप्रज्ञासारखे पाहत होते. त्यांनी वाडवडिलांची जमीन विकली तर नाहीच, याउलट वरचेवर जमीन खरेदी करून त्यामध्ये आधुनिक शेती केली. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी आण्णा नेहमीच सर्वांच्या पुढे असतात. वाडेबोल्हाई येथील त्यांच्या शेतातील पपई, सीताफळ, केळी यांच्या बागा आजही त्याची साक्ष देताना दिसतात. शेतीच्या जोडीला पशुधन असावे हा आण्णांचा दूरदृष्टीपणा मला नेहमीच जाणवत आलेला आहे. आण्णांनी आपला पशुधनाचा छंद केवळ एक-दोन जनावरे पाळून नव्हे तर तब्बल तीनशे-साडेतीनशे म्हशी सांभाळून जोपासलेला आहे. या म्हशींचे दूध पुणे व आसपासच्या परिसरातील तालमीमध्ये व्यायाम करणार्‍या मल्लांना ते आजही अविरतपणे पाठवत आहेत. आण्णांची कुस्तीप्रेमाची व पशुप्रेमाची अशी अनोखी वीण मी आजही ‘याची देही याची डोळा’ अनुभवतो आहे.

आण्णा आयुष्यभर ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हा मूलमंत्र जपत आलेले मी उघड्या डोळ्यांनी अनुभवलेले आहे. आण्णांच्या घरी मदत मागण्यासाठी म्हणून आलेला देशभरातील कोणतीही व्यक्ती रिकाम्या हाती परत गेलेली मी कधीही पाहिलेला नाही. आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका घेऊन दारी आलेल्या कोणत्याही गोर-गरीब वधूपित्याला आण्णांनी रिकाम्या हाती पाठवलेले नाही. आमंत्रण देऊन परत जाताना त्याच वधूपित्याच्या हाती काही रोख रक्कम किंवा भेटवस्तू आण्णांनी सुपूर्द केलेली मी अनेकदा पाहिलेले आहे. सण-समारंभ, उत्सव, खराडी गावची श्री काळभैरवनाथाची यात्रा इ. अनेक प्रसंगी आण्णांनी गोरगरिबांना वस्तू व आर्थिक स्वरूपाची मदत सढळ हाताने केलेली आहे. आजही आण्णा निमंत्रणपत्रिका असलेल्या प्रत्येक लग्नसमारंभाला आवर्जून हजेरी लावतात. त्यांची उपस्थिती बरोबर मुहूर्तावर असते. त्यामुळे वधू-वर पित्यावर व ब्राह्मणावरही लग्न वेळेवर लावण्याचा दबाव आलेला मी अनेकदा अनुभवलेला आहे. कोणाची मयत झाली किंवा कोणाला सावडण्याचा अथवा दशक्रियेचा विधी असेल तर आण्णा त्या ठिकाणीही वेळेवर हजर असतात. सर्वांच्या सुखात आण्णा स्वतःचे सुख मानतात. त्याचबरोबर सर्वांच्या दुःखातही ते सामील असतात.

आध्यात्मिक वारसा आण्णांना वाडवडिलांपासून लाभलेला आहे. त्यांनी आपले वडील कै. तुकाराम धोंडिबा पठारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आळंदी ते पंढरपूर अशी एक दिंडी स्वतंत्रपणे सुरू केली आहे. स्वतःच्या दिंडीतील वारकर्‍यांसाठी एक सामान वाहतूक करणारा ट्रक आणि पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून एक पाण्याची टाकी व ट्रॅक्टर यांची खरेदी आण्णांनी करून खर्‍याअर्थाने घरातून लाभलेला आध्यात्मिक वारसा जपलेला दिसून येतो. दिंडी अखंड चालू राहावी याकरिता आण्णा पदरमोड करताना दिसून येतात. यासाठी ते कधीही हात आखडता घेत नाहीत.

पितृकर्तव्य म्हणून आण्णांनी आपल्या कन्या व चिरंजीव यांना योग्य मार्ग दाखवला आहे. त्यांच्या कन्या सासरी सुखासमाधानाने नांदत आहेत. पठारे घराण्यातील संस्कारांचे रोपण सासरी करत आहेत. चिरंजीव कै. राजेंद्र यांनी वाडेबोल्हाई गावचे सरपंचपद भूषवून पुढे हवेली पंचायत समितीचे सभापती पदही भूषविले होते. द्वितीय चिरंजीव श्री. महेंद्र हे गेल्या 15 वर्षापासून सलग तीन वेळा चंदननगर प्रभागाचे नगरसेवक म्हणून पुणे महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले आहेत. त्यांनी क्रीडा समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. सध्या ते स्थायी समितीचे सदस्य आहेत. आण्णांच्या धर्मपत्नी सौ. विमलताई (त्यांना आम्ही आदराने ‘आई’ असे म्हणतो.) या जिजामाता सहकारी बँकेवर संचालिका आहेत. या सर्वांवर एक नजर टाकल्यास आपणास असे दिसते की, या संपूर्ण कुटुंबाने समाजसेवेचा वसा स्वीकारलेला आहे. या पाठीमागची प्रेरणा आण्णा आहेत.‘ज्याच्याजवळ दातृत्व आहे, त्याच्याकडे लक्ष्मी धाव घेते’ असे म्हटले जाते. या उक्तीचा प्रत्यय मला आण्णांकडे पाहून येतो. आण्णांनी समाजसेवेचे घेतलेले व्रत त्यांच्या सर्वच कुटुंबीयांनी अत्यंत नेटाने पुढे चालविलेले दिसून येते.

गरीबीत दिवस काढल्याने आण्णांना गरिबीची जाणीव आहे. ते कोणत्याही गोरगरिबाला टाकून बोलत नाहीत. घरी आलेली कोणीही व्यक्ती चहा किंवा दूध पिल्याशिवाय परत जाणार नाही असा दंडकच त्यांनी घरामध्ये सर्वांसाठी घालून दिलेला आहे. त्यामुळे मी सुद्धा प्रत्येक भेटीवेळी चहा किंवा दूध न पिता कधीही परत आलेलो नाही. आण्णांनी समवयस्क लोकांसाठी ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली आहे. या परिसरातील सर्व जेष्ठ नागरिक जमवून आण्णा त्यांच्यामध्ये मिसळतात, गप्पागोष्टी करतात आणि रमून जातात. सर्वांची ख्यालीखुशाली विचारून काही समस्या असल्यास तिचे त्वरित निवारणही करतात. अधूनमधून ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थक्षेत्रांच्या सहलींचे आयोजन पदरखर्चाने करतात. हे दातृत्व आण्णांच्या ठायी उपजतच आहे. चंदननगर-खराडी परिसरातील नागरिकांची श्रद्धा असलेल्या साईबाबांचे मंदिर आण्णांनी साईनगरीत स्वतः पुढाकार घेऊन उभारले आहे. त्याच्या शेजारी एक प्रचंड मोठा हॉल उभारून तो गोरगरिबांना विविध शुभकार्यासाठी नाममात्र दरामध्ये आण्णा उपलब्ध करून देतात. माझ्या महाविद्यालयातील लेखापाल श्री. सचिन गाढे या होतकरू तरूणाचा विवाह याच हॉलमध्ये संपन्न झालेला मी पाहिला आहे. त्यावेळी या हॉलचे एक रुपयाही भाडे आकारण्यात आले नव्हते, याचा मी स्वतः साक्षीदार आहे.

कुस्ती म्हणजे आण्णांचा जीव की प्राण. चंदननगर-खराडीचे ग्रामदैवत असलेल्या श्री काळभैरवनाथाच्या यात्रेकरिता आलेल्या सर्व यात्रेकरूंना आण्णा भोजनाच्या पंगती घालतात. दुसर्‍या दिवशी दूरवरून आलेल्या मल्लांच्या कुस्त्या शेवटपर्यंत पाहतात. प्रत्येक मल्लाला खुराकाचा खर्च म्हणून काहीएक बिदागी त्याची कुस्ती पाहून देतात. सर्वात शेवटची मोठी कुस्ती पदरखर्चाने एक ते पाच लाख रुपयांपर्यंतची लावतात. शेवटची कुस्ती निकाली झाली पाहिजे हा त्यांचा अट्टहास असतो. कुस्ती निकाली झाल्यास त्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतो. मात्र कुस्ती अनिर्णीत झाल्यास ते नाराज होतात. क्वचितप्रसंगी दोघा मल्लांना बोलावून घेऊन त्यांची कानउघाडणीही करतात.

दिनांक 24/10/2018, वार-बुधवार रोजी आण्णांचे थोरले चिरंजीव कै. राजेंद्र यांचे दीर्घआजाराने निधन झाले. सात ते आठ महिने रुग्णालयात त्यांचा मृत्युशी चाललेला लढा अपयशी ठरला आणि ते इहलोक सोडून गेले. मात्र अंत्यविधीसाठी कै. राजेंद्र यांचे शव घरी आणल्यानंतरही आण्णांच्या डोळ्यात मला एक थेंबही दिसला नाही. त्यांच्यातील धीरोदात्त पुरुष त्यांना रडण्यासाठी रोखताना मी पाहिला. आपणच जर रडलो, दुःख व्यक्त केले तर सगळे घर कोसळून पडेल याची जाणीव त्यांना होती. म्हणून ते स्थितप्रज्ञासारखे बसून होते. चेहर्‍यावर दुःखाचा लवलेशही दिसू देत नव्हते. अंत:करणात मात्र दु:खाग्नीच्या ज्वाळा भडकत होत्या. पोटच्या पुत्राला गमावल्याचे प्रचंड दुःख आण्णांनी उरात दडपून जो धीरोदात्तपणा दाखविला त्याला तोड नाही. शव घरातून उचलून स्मशानभूमीपर्यंत नेताना अथवा त्यास अग्नी देतानासुद्धा आण्णांनी थेंबभरसुद्धा अश्रू ढाळला नाही. बहुतेक आपल्या ज्येष्ठ पुत्राच्या या दुःखद बातमीची त्यांना यापूर्वीच चाहूल लागलेली होती. तरीही त्यांनी उपचाराकरिता पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. मात्र नियतीचे फासे आण्णा चांगलेच ओळखून होते. त्यांनी नियतीला धीरोदात्तपणे सामोरे जात एक आदर्श वस्तुपाठच आम्हा सर्वांसमोर घालून दिला होता. या अंत्यविधीला श्री.झ.ढ.पठारे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. दिलीप मोडक व कै. तू. धों. पठारे वरिष्ठ महाविद्यालयाचा प्रतिनिधी या नात्याने मी असे आम्ही दोघे हजर होतो. आम्हा दोघांच्या डोळ्यांतून गंगा-यमुना वाहत होत्या आणि आण्णा मात्र स्थितप्रज्ञासारखे स्तब्ध होते. काय तो दैवदुर्विलास! दुसर्‍या दिवशी सावडण्याच्या विधीवेळी आण्णांना आपल्या ज्येष्ठ पुत्राचे पिंडदान करावे लागले. जी वेळ कोणत्याही पित्यावर येऊ नये, ती वेळ आण्णांवर आली. आण्णांनी पिंडदान करताच जवळच्या झाडावर बसलेल्या कावळ्यांनी भाताच्या पिंडावर झेप घेतली व ते त्यावर तुटून पडले. यावेळी मात्र आण्णांच्या संयमाचा बांध फुटला. ते धाय मोकलून रडू लागले. आम्हा उपस्थितांना गहिवर अनावर झाला. संबंध जनसागर शोकसागरात बुडून गेला. मात्र आण्णांनी काही वेळातच आपल्या शोकाला आवर घातला व आपल्या ज्येष्ठ पुत्राच्या स्मृतिप्रीत्यर्थ खराडी येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार व नवीन बांधकामासाठी अकरा लाख रुपये रोख देत असल्याची घोषणा केली. त्याचबरोबर विविध नामवंत मल्लांना प्रत्येकी एक लाख रुपये रोख मदत देत असल्याचीही घोषणा केली. मुलाच्या सावडण्याच्या विधीनंतर शोकसभा घेऊन त्या शोकसभेत जवळपास 25 लाखांचा दानधर्म करणारी व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो.

20 फेब्रुवारी 2017 रोजी डॉ. रा. गो. चवरे हे नियत वयोमानानुसार वयाच्या 65व्या वर्षी महाविद्यालयातील प्राचार्य पदावरून निवृत्त झाले. यामुळे विद्यापीठ मान्यताप्राप्त व पीएच.डी. अर्हताधारक प्राध्यापक या दोन्ही निकषांमध्ये मी बसत असल्यामुळे आण्णांनी व संस्थेचे सचिव मा. अ‍ॅड. राजेंद्रजी उमाप यांनी माझ्या खांद्यावर ‘प्रभारी प्राचार्य’ पदाची धुरा सोपविली. मी ती धुरा समर्थपणे पेलण्याचा मनोमन निश्चय करून महाविद्यालयीन कामकाजाच्या निमित्ताने आण्णांना वरचेवर भेटू लागलो. आण्णांना भेटण्याचे कोणतेही दडपण मला कधीही आले नाही. भक्ताने मंदिरात नि:शंक मनाने देवाकडे जावे व आपली व्यथा सांगावी, तसे मी नि:संकोचपणे आण्णांच्या भेटीला दर सोमवारी जात असतो. आण्णांच्या व आईच्या पाया पडून साप्ताहिक कामकाज कानी घालतो. अडचणी सांगतो. त्यावर देवाने प्रसन्न होऊन तथास्तु म्हणावे व इच्छित वर भक्ताला द्यावा, त्याप्रमाणे आण्णा लगेच संबंधित बाबीवर निर्णय देऊन मला चिंतामुक्त करतात. त्यांच्या भेटीतून त्यांना असलेली शिक्षणाविषयीची आस ध्यानात येते. शिक्षणासाठी आपली ज्या पद्धतीने परवड झाली, त्याप्रमाणे कोणाचीच होऊ नये असे त्यांना मनोमन वाटते. त्यामुळे गोरगरिबांच्या मुलांना अल्प फी मध्ये शिक्षण मिळाले पाहिजे, हा त्यांचा सदोदित हट्ट असतो. ‘विद्यार्थी व पालकांना टप्प्याटप्प्याने फी भरण्याची सवलत द्या’ असा त्यांचा मला थेट आदेशच असतो. एका बाजूला दरवर्षी फी वाढ करणारे व सर्व फी एकाच वेळी भरा असे म्हणणारे शिक्षणसम्राट कोठे? आणि ‘कमी फी घ्या व ती पण टप्प्याटप्प्याने घ्या’ असे म्हणणारे शिक्षणमहर्षी आण्णा कोठे? असा प्रश्न माझ्या मनात सदोदित निर्माण होतो. आण्णा शिक्षणसम्राट झाले नाहीत. त्यांनी शिक्षणमहर्षीच राहणे पसंत केले. दोन-चार वर्षानंतर फी वाढीचा प्रस्ताव घेऊन गेलो तर आण्णांनी त्याला स्पष्ट नकार दिला.

शिक्षणाचा बाजार मांडून, त्याचा व्यवसाय करून स्वतःची तुंबडी भरणारे शिक्षणसम्राट आजही या दुनियेत कमी नाहीत. मात्र आण्णा याबाबतीत निष्कलंक राहिले. बर्‍याच वेळा त्यांनी मला ‘‘तुमच्या कॉलेजच्या फी वर माझे घरदार चालत नाही, तुम्हाला पैसे कमी पडत असल्यास माझ्याकडून घेऊन जा’’ असे सडेतोड बोल सुनावले आहेत. यामधून त्यांचा महाविद्यालयाकडे ‘सरस्वतीचे मंदिर’ म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन दिसून येतो. श्री. झ. ढ. पठारे कनिष्ठ महाविद्यालयाला 20 टक्के सरकारी अनुदान मिळण्याच्या बेतात असताना आण्णांनी जवळपास 17 प्राध्यापकांना एकाच वेळी रीतसरपणे नेमणूक पत्रे दिली. यावेळी त्यांनी संबंधित प्राध्यापकांकडून कसलीही अपेक्षा ठेवली नाही. या प्राध्यापकांच्या निवडीवेळी त्यांनी गुणवत्ता व त्या प्राध्यापकाने महाविद्यालयात केलेली सेवा या दोनच गोष्टी विचारात घेतल्या. महाविद्यालयाला आवश्यक असणारी कोणतीही वस्तू घेताना ही बाब त्यांच्या कानी घातल्यावर ‘‘तुमच्या अधिकारात घेऊन टाका’’ असे म्हणून आण्णा त्वरित होकार देताना दिसतात. ‘वृद्धि’सारखे 50 हजार रुपयांचे सॉफ्टवेअर घेण्याचा प्रस्ताव मी मांडल्यावर आण्णांनी त्याला चुटकीसरशी परवानगी दिली. यामधून त्यांचा महाविद्यालयाचा प्रशासक म्हणून कार्य करणार्‍या प्राचार्य, म्हणजेच माझ्यावर असलेला विश्वास प्रतीत होतो. आण्णांनी मला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नेहमी दिले. घरी गेल्यावर आण्णा अगोदर चहा-दूध पाजूनच विचारपूस करतात. समस्या ही सोडविण्यासाठीच असते हे मला त्यांच्या सहवासातून उमगू लागलेले सत्य होय. घरी गेल्याबरोबर ‘‘या सर, बसा! अरे कोणीतरी दूध आणा रे’’ असा खर्ज स्वर कानावर पडतो. चर्चा करून, समस्या निराकरण करून आण्णांच्या घराच्या पायर्‍या उतरताना मी खूप मोकळा झालेला असतो आणि दुप्पट उत्साहाने पुढील कामकाजामध्ये स्वतःला झोकून देतो. या भेटीत आण्णा जसे त्वरित निर्णय देतात, तसे ते विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याची वरचेवर ताकीतही देतात. ते शिस्तीचे भोक्ते आहेत. बेशिस्त व्यक्ती व खोटे बोलणे त्यांना अजिबात रुचत नाही. अशा व्यक्तिला ते आपल्या वाग्बाणांनी घायाळ करून सोडतात व पुन्हा असे न करण्याची तंबी देऊन माफही करून टाकतात. असा हा संयम त्यांच्याकडे येतो तरी कुठून? असा मला वरचेवर प्रश्न पडतो. कदाचित ही देणगी त्यांना त्यांच्या वयाने व अनुभवाने दिली असेल असे म्हणून मीच माझ्या शंकेचे निराकरण करतो.

आण्णा अलीकडील पिढीवर नाराज असल्याचे त्यांच्या बोलण्यातून वरचेवर जाणवते. मोबाईलचा वाढता अतिरेकी वापर, विद्यार्थ्यांमधील बेशिस्तपणा, वाढत चाललेला चंगळवाद आणि विद्यार्थ्यांसहित सर्वांचे व्यायामाकडे म्हणजेच शरीर स्वास्थ्याकडे होत चाललेले दुर्लक्ष या विषयावर आण्णा आमच्याशी आजही भरभरून बोलतात. ते स्वतः आजही या वयात दररोज न चुकता व्यायाम करतात. या सर्व उणिवा विद्यार्थ्यांसहित आमच्यामध्ये दिसत असल्या तरी ते समन्वय साधण्याचा, संवाद साधण्याचा प्रयत्न मोठ्या मनाने करतात. कामात कसूर केल्यास प्राचार्य, प्राध्यापक,क्लार्क, शिपाई, विद्यार्थ्यांना ते कडक शब्दात तंबी देतात. विद्यार्थ्याने अरेरावी केल्यास त्याच्या पालकांना बोलावून कडक समज देण्याचे सांगतात. वेळप्रसंगी ‘माझ्याकडे पाठवा’ असाही आदेश देतात. महाविद्यालयाचा निकाल कमी लागला तर विषयनिहाय आकडेवारी मागवून प्रत्येक प्राध्यापकाला भर मीटिंगमध्ये जाबही विचारतात. यामधून त्यांच्यातील कठोर प्रशासक डोकावताना दिसतो. महाविद्यालयात नुकत्याच सुरू झालेल्या पदवीप्रदान समारंभात आण्णा न चुकता वेळेवर हजर राहतात. या समारंभास शिक्षणक्षेत्रातील नामांकित व्यक्तिला बोलवा असा त्यांचा आदेश असतो. कितीही खर्च झाला तरी चालेल पण विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन मिळाले पाहिजे ही त्यांची भावना या पाठीमागे असते. असा महत्त्वपूर्ण कार्यक्रम वेळेवर सुरू न झाल्यास आण्णा सर्वांची झाडाझडती घेतात.

मी शै. वर्ष 2014-15 ते शै. वर्ष 2016-17 या तीन वर्षांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी होतो. राष्ट्रीय सेवा योजनेतील हिवाळी शिबिराचे उद्घाटन व समारोपाचे प्रमुख पाहुणे म्हणून आण्णा हमखास आजही हजेरी लावतात. या तिन्ही वर्षी आण्णांनी वेळेवर हजेरी लावून आमची भंबेरी उडवून दिलेली मला आजही आठवते. शिबिरातील 50 विद्यार्थ्यांना ते आपल्या भाषणातून श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व नेहमी समजावून देतात. या शिबिरातील प्रत्येक विद्यार्थ्याला दररोज किमान 250 मिली दूध मिळावे यासाठी ते वाडेबोल्हाई येथील आपल्या म्हशीच्या गोठ्यावरील व्यवस्थापकाला फोन करून दररोज दहा लिटर दूध पाठवून देण्याचे फर्मान सोडतात. डेअरीवरून लागेल तेवढे तूपही घेऊन जाण्याचे बजावतात. राष्ट्रीय सेवा योजनेतील समाजसेवेचे कार्य करणारा स्वयंसेवक धष्टपुष्ट असला पाहिजे व त्याने व्यायाम करून शरीरसंपदा कमावली पाहिजे, हा आण्णांचा त्यापाठीमागील हेतू असलेला दिसून येतो. राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये मी व्रात्य विद्यार्थ्यांना घेण्याचे सहसा टाळत असे. त्यांच्यामुळे राष्ट्रीय सेवा योजनेची शिस्त बिघडते असे मला नेहमी वाटत असे. मी त्यामुळे गरीब, हुशार, आज्ञाधारक विद्यार्थ्यांची निवड करत असे. त्यामुळे मी निवड केलेले स्वयंसेवक हे फक्त सांगकामे असायचे. माझी ही पद्धत पाहून आण्णांनी मला त्यामध्ये बदल करण्याचा आदेश दिला. व्रात्य विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेत प्रवेश द्या, असा आण्णांनी आदेश दिल्यावर माझी तर धडकीच भरली होती. मात्र आण्णांनी अशा विद्यार्थ्यांना योग्य दिशा दिली, योग्य काम दिले, त्याला नेतृत्व करायला लावले अथवा त्याच्यावरच जबाबदारी दिली तर तो लवकरच सुधारतो असा कानमंत्रही मला दिला. मी त्याप्रमाणे कृती केल्यावर मला त्याची प्रचीती आली. आता माझ्या राष्ट्रीय सेवा योजनेत सांगकाम्यांऐवजी उत्साहाने विधायक कार्य जबाबदारीने करणारे स्वयंसेवक दिसू लागले. हा केवळ आण्णांच्या अचूक निरीक्षण शक्तीचा मला झालेला फायदा होता.

आण्णांना शेती व दुग्ध व्यवसायाची असलेली आवड मी जवळून अनुभवली आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू करून त्यांनी मल्लांच्या दुधाचा व खुराकाचा प्रश्न कायमचा मिटवून टाकला आहे. तालीम उभारणीसाठी सढळ हाताने मदत करताना मी त्यांना अनुभवले आहे. आण्णांच्या घरी एक-दोन पैलवान सतत त्यांच्या दिमतीला असतात. त्यांचा खुराक, कसरत व तंत्र यावर आण्णा स्वतः बारकाईने नजर ठेवून असतात. या मल्लांचा सर्व खर्च ते स्वतः करतात. आण्णांनी जवळपास तीस वर्षांपूर्वी म्हणजे इ.स.1991 साली ‘संत तुकाराम शिक्षण संस्था’ स्थापन करून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. पुढे 7 जून 2002 रोजी ‘विकास प्रतिष्ठान’ या नावाची आणखी एक शिक्षण संस्था स्थापन केली. ते या दोन्ही शिक्षण संस्थांचे अध्यक्ष आहेत. या दोन्ही शिक्षण संस्थांची वेगवेगळी युनिट केजी ते युजीपर्यंत आहेत. या शाळा-महाविद्यालयांमधून आजतागायत हजारो विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत. कित्येक विद्यार्थी मोठ्या पदावर कार्यरत आहेत. काही प्रशासकीय कारभार चालवत आहेत तर काही सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. या सगळ्याचे श्रेय आण्णांना जाते. सामाजिक बांधिलकी मानून उभ्या केलेल्या शिक्षण संस्था त्याची साक्ष आहेत.

आण्णांची क्रीडा क्षेत्राविषयीची आपुलकी व तळमळ वादातीत आहे. पुणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन खराडी गावातील राजाराम भिकू पठारे क्रीडा संकुलामध्ये करण्यात आले होते. त्यावेळी सलग दोन ते तीन दिवस आण्णा देशोदेशीच्या मल्लांच्या कुस्त्या पाहण्यामध्ये दंग होते. ते उद्घाटक असले तरी उद्घाटन करून लगेच निघून न जाता, त्यांनी देशोदेशीच्या मल्लांचे, त्यांच्या डावपेचांचे अचूक निरीक्षण केले. याच स्पर्धेमध्ये आण्णांनी ‘रिवो ऑलिंपिक स्पर्धे’मध्ये पदक प्राप्त करणार्‍या कु. साक्षी मलिक हिचा पाच लाख रुपये रोख रक्कम देऊन गौरव केला. यावरून त्यांचे दातृत्व व क्रीडा क्षेत्राविषयीची तळमळ आपल्या लक्षात येते. आण्णांचा वाढदिवस 25 डिसेंबर रोजी असतो. या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यादिवशी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्याची प्रथा मी या महाविद्यालयामध्ये येण्यापूर्वी सुरू असलेली दिसून येते. तत्पूर्वी महाविद्यालयात संपूर्ण एक आठवडा आम्ही ‘क्रीडा सप्ताह’ साजरा करतो. या क्रीडा सप्ताहातील व मॅरेथॉनमधील विजेत्यांना आण्णांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्याची परंपरा गेली कित्येक वर्षे अखंडितपणे, अव्याहतपणे सुरू असलेली दिसून येते.

आण्णांच्या क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक इत्यादी क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र सरकारने त्यांचा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरव केला आहे. सदर पुरस्कार आण्णांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत सन्मानपूर्वक देण्यात आला. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या सर्वांगीण कार्याची दखल घेऊन त्याची पोचपावती या पुरस्काराच्या रूपाने दिलेली दिसून येते.

खराडी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ याच्यावर आण्णांची नितांत श्रद्धा आहे. ही यात्रा आण्णा अत्यंत भव्यदिव्यपणे साजरी करतात. स्वतःच्या घराच्या वरील विस्तीर्ण भागावर भोजनाच्या पंगती घालतात. पंक्तीमध्ये स्वतः फिरून सर्वावर लक्ष ठेवतात. आग्रह करून सर्वांना पोटभर जेवू घालतात. वाढप्याला आवाज देऊन दोन घास अधिक खाण्यास प्रवृत्त करतात. पंक्तितला प्रत्येक व्यक्ती ढेकर देऊनच उठला पाहिजे, हा त्यांचा अट्टाहास असतो. शाकाहारी व मांसाहारी असा भोजनाचा बेत अनुभवावा तो फक्त आण्णांच्याच घरी! असे हे वटवृक्षासारखे पांथस्थाची सावली बनणारे आण्णा आपल्या एखाद्या कर्मचार्‍याच्या निरोप समारंभप्रसंगी भावूक, हळवे होतात. वरिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. रा. गो. चवरे सेवानिवृत्त झाल्यावर आण्णांनी भर निरोप समारंभात खिशात हात घालून खिशात असतील तेवढे पैसे काढून त्यांना पोशाख खरेदी करण्यासाठी दिले होते, हे मी अनुभवले आहे.

अशाप्रकारे गोरगरिबांचे मसीहा असणारे आण्णा आम्हा सर्वांना हवेहवेसे वाटतात. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो अशी मनोकामना मी व्यक्त करतो.

डॉ. राहुल बबन जगदाळे
प्र. प्राचार्य, कै. तुकाराम धोंडिबा पठारे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय चंदननगर, पुणे-411014.
मोबा : 9822948469

मासिक साहित्य चपराक एप्रिल 2021

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

2 Thoughts to “कल्पतरू आण्णा”

  1. Ravindra kamthe

    खूपच छान.

  2. रमेश वाघ

    सुंदर शब्दचित्र रेखाटलं आहे

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा