निर्वाण

निर्वाण

कथाकार गदिमांचा इतका सुंदर परिचय दिनकर जोशी यांनी करून दिल्यानंतर खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी गदिमांची एक कथा पुनर्प्रकाशित करीत आहोत. मूळ कथा असल्याने यातील भाषा आणि व्याकरण अर्थातच त्यांच्या त्यावेळच्या कथेतल्याप्रमाणे आहे. आजच्या कट्टरतावादाच्या काळात ही कथा वाचकांना एक वेगळा विचार देऊन जाईल.
– संपादक

मासिक साहित्य चपराक, एप्रिल 2021

महाराष्ट्रीय खेड्यांतून पंचायती स्थापन झाल्या. कुलकर्ण्यांची दप्तरें उपरे तलाठी वागवूं लागले. पाटीलक्या चोराहातीं गेल्या. रामोशांची नायकीचीं वतनेंहि नष्ट झालीं. महारांच्या महारक्या सरकारजमा झाल्या. कोट-पँट घातलेलें एकादें पोर गांवचावडींत बसून धनंतर शेतकर्‍यांना दाब देऊं लागलें. गांवांतल्या माळवदी शाळेवर कौलारांची बंगलोरी टोपी बसली. गांवठाणभर चौकोनी कंदिलाच्या काठ्या उभ्या राहिल्या. गांवालगतच्या गांवंदरीत बिघ्याबिघ्यांना बांध पडले. कालव्याची बोलवा उठली आणि मावळतीकडच्या तांबड्या रानांत पाचशे कुदळी कामाला लागल्या. पांढर्‍या टोप्या घातलेल्या पुढार्‍यांची ये-जा सुरु झाली. इतकें सगळें झालें तरी आरणगांवचा गांवगांडा अजून पहिल्याच धोपटवाटेनें चालला होता. बावर्‍या वेसकर घराघरांतून हक्काची भाकरी मागत फिरत होता. बांधाबद्दलच्या भांडणानें कातावलेला कुळवाडी कायद्याची रेघ पुसण्यासाठी अप्पाजीपंत कुलकर्ण्याच्याच दारांत बसत होता. गावकरांच्या घरात होऊ घातलेल्या मंगल समारंभाचें आंवतण पहिल्यांदा जानू पाटलाच्या वाड्याकडेच जात होते. गावात पोलीस गेट आलें तरी गांवच्या नायकांनी आपली रखवालदारी सोडली नव्हती. महारवाड्यांतील आठी-सोळा महार कुळवाड्याच्या मळ्यांतील सर्‍यावाकोर्‍या पाडीत होते. सुतार औताची कुणी बसवून देत होता. लोहार लोखंडी मोटा दुरुस्त करीत होता. गुरव घरोघरी बेल-पत्रावळी वांटीत होता. कुंभाराचे चाक गांवासाठी फिरत होते. तुटकी वहाण सांधण्याचा मोबदला नव्या पैशांत मागण्याची हिम्मत व्हलाराला होत नव्हती. गांवच्या मध्यभागी बांधलेल्या कौलारू इमारतीवर ‘समाज-मंदिर’ अशी पाटी लटकली होती, पण गांवकरी अजून तिला चावडीच म्हणत होते. विकास योजनेचे अधिकारी आरणगांवचा विकास पुरा झाल्याच्या समाधानात होते. आरणगांव मात्र होता तसाच होता.
एका संध्याकाळी पंढरपुराकडे जाणार्‍या एस .टी.तून पिवळे कपडे पांघरलेला एक उतारू आरणगांवांत उतरला. वाट विचारीत विचारीत गांवाबाहेरच्या महारवाड्याकडे गेला. त्याच्या येण्याने सारी महारवस्ती आनंदित झाली. दिवसभर घाम गाळून थकलेला महारवाडा नेहमींसारखा रात्रीं तक्क्यांपुढें जमला. त्या पिवळ्या जवानाने महारांच्या कानी कांहीं नवी औषधें ओतली. महारवाडा बिथरला. त्या दिवशी रात्रभर सारी महार जमात जागी राहिली. दहा-पांचदां ‘भगवान बुद्ध की जय!’ अशा गर्जना निजल्या गांवकर्‍यांच्या कानीं आदळल्या.
सकाळी वार्ता पसरली की महारवाडा बाटला. बुद्ध झाला. म्हणजे काय झालें हें गांवांत कुणालाच कांहीं कळलें नाही. सकाळच्या कोंवळ्या उन्हांत गांवामध्याच्या पारावर जेठा मारून बसलेल्या आप्पाजीपंत कुलकर्ण्यांनी भाकीत केले.
‘आता महारवाडा गांवांपासून तुटणार.’
तसा तो आधीच तुटलेला होता. गांवठाण बसल्या दिवसापासून महारांची वस्ती गांवापासून वेगळीच होती. महारवाडा तुटणार तुटणार म्हणजे काय होणार हे पारावरच्या कुणबी श्रोत्यांना उमगलें नाहीं. उन्हें चांगली तापल्यावर म्हातारा बावर्‍या महार महारवाड्याकडून गांवांत आला. वयानें वाढ आणि कालमानाने निरुद्योगी अशी पाटील कुलकर्ण्यांची जोडी अजून पारावरच होती. शेतकीच्या कामाला निघालेले चार दोन कुणबी त्यांच्या अंवतीभंवती बसलेले होते. म्हातारा बावर्‍या महार त्या जागीं आला. हाताची चार बोटं कपाळाला लावीत तो खाली वाकला. जमलेल्या सार्‍याच गांवकर्‍यांना उद्देशून मान खाली झुकवीत त्याने म्हटले,
‘जोहार मायबाप.’
‘राम राम…’ बोतरा आप्पाजीपंत खलबत्त्यांत पान कुटतां कुटतां बोलला. जानू पाटील आणि बाकीचे कुणबी त्या वांकलेल्या महाराकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. बावर्‍या गांगरल्यागत झाला. रिवाज असा कीं, पारावर गांवकर्‍यांच्या गप्पा सुरु झाल्या म्हणजे महारहि बेतानें पाराखालच्या धुळींत बसायचा. गावकर्‍यांच्या बोलाचालीत भाग देखील घ्यायचा. आज बावर्‍याच्यानें बसवले नाही. अवघडल्यासारखा तो तसाच उभा राहिला. हातांतल्या काठीवर दोन्ही पंजे ठेवून त्यानें आपली सुरकुतली लोंबती हनुवटी त्या हाताच्या पंजावर टेकली. भुंवया आकसून, दांत नसलेलें आपलें तोंड वासून तो पारावरच्या गावकर्‍यांकडे पाहात उभा राहिला. त्याला काही बोलायचे होते. कांही सांगायचें होतें. आपलें भारावलेलें काळीज गावकर्‍यांच्या पायापाशी रितें करायचे होतें. आपणहून बोलणें सुरु करण्याचा आगाऊपणा त्याच्या रक्तात नव्हता. कुणींतरी आपल्याला पुसावें आणि मग आपण जबाब द्यावा अशा हिशेबानें तो उभा होता. बराच वेळ कुणी गांवकरी त्याच्याशी कांहीं बोलला नाहीं. त्यांच्या गप्पा आपसांतच होत राहिल्या. शेवटी चाहूर रानांतला उंचेला सिताराम, परवानगी घेऊन जायला निघाला तेव्हां आप्पाजीपंत कुलकर्ण्यानें त्याला थांबवलें. कुलकर्णी म्हणाला,
‘थांबा थोडें सितारामबापू, रातसार महारवाड्यांत काय चाललं होतं ते विचारूया या बावर्‍याला.’
आप्पाजीपंताच्या या बोलण्यानें बावर्‍याला हवी होती ती संधि मिळाली. दुखावलेल्या आवाजांत तोहून बोलला.
‘समदं कसंनुसं झालं…’
‘काय झालं काय?’ घोगर्‍या आवाजाचा जानू पाटील म्हणाला. त्यानें प्रश्न आधी विचारला आणि नंतर हनुवटी आणि भुंवया वर उचलल्या. बावर्‍या आपल्या दमगीर आवाजांत बोलूं लागला.
‘तालुक्याच्या गांवासनं कुनी एक संन्यासी आला वता. त्यानं देवाधर्माचं काय सांगाटलं न्हाई. गांवाकडनं महारावर किती जुलूम होतोय ह्याचाच पाढा वाचला. त्यो सांगत व्हता त्यात लबाड काही नव्हतं. नव्या पोरास्नी ते एकदम पटलं. त्या समद्यांनी संन्याशी बुवाला त्यावर इलाज इचारला. बुवा म्हणाला, ‘बुध व्हा.’ महारांनी माना डोलावल्या. बुवानं सगळ्यांस्नी उभं केलं आन आपल्या रामू भटावानी त्येनं काहीतरी अवघाड भाषांन म्हनाय सांगटलं. समद्या महारांनी ते चुकतमाकत म्हटलं. बुवा म्हनला, तुमी बुध झाला…’
‘बरं झालं, पीडा गेली. ब्राह्मणांचं ब्राह्मण्य गेलं. महारांचं महारपण तरी हवं कशाला?’ आप्पाजीपंत म्हणाले.
‘असं कसं म्हणतां पंत? धरम् सोडला महारांनीं.’ बावर्‍या काकळला होता.
‘सोडतो म्हणल्यानं कुठं धरम् सुटतो?’ हातवारे करीत घोगरा पाटील म्हणाला. बावर्‍याची जखम वाहूं लागलीं. पाटील म्हणाला तेंच त्यानें अनेकदां आपल्या भाईबंदांना सांगितलें होतें.
‘धरम सोडून करणार हाईत काय? पोटाला तर पायजेस त्यास्नीं कामं, करत्यात तींच करावीं लागनार. मग धरम् बदलला म्हंजे काय? गोम्याचं नाव सोम्या ठेवलं म्हणून का आभाळातानं तहानलाडू भूकलाडू पडणार हायत त्यांच्या पुढ्यांत?’ जायला निघालेला सिताराम सहजावरी म्हणाला.
‘तसं नाहीं तें…’ तोंडातला पानाचा पिंक आवरीत आप्पाजीपंत बोलले.
‘मग?’ जानू पाटलाला पडला होता तो प्रश्न सार्‍याच जमलेल्या गांवकर्‍यांपुढें पडला. आप्पाजीपंत थोडे थांबले. बुडानेंच पाडाच्या कडेपर्यंत सरकून, हाताचीं दोन बोटें ओंठवर धरून त्यांनी पानाचा पिंक पाराखाली फेकला. पाराशी उभा राहिलेल्या सितारामनें आपला पाय वहाणेंतून मोकळा केला. अप्पाजीपंतांच्या पिंकावर त्या पायानें माती लोटली. पाय परत वाहणेंत घालीत तो त्यांच्याकडे बघत राहिला. अघळ-पघळ बसलेल्या अप्पाजीपंतानें आपले गुडघे आवळून उभे केलें. अंगावरचें उपरणें कमरेमागून घेऊन गुडघ्यापाशीं गुंडाळलें. जेठा मारला. आपल्या दोन्ही हाताच्या बोटांनीं दोन्ही गालावरचे दाढीचे खुंट कुरवाळीत त्यांनीं बावर्‍यालाच विचारलें,
‘तू रात्रभर त्यांच्यांत होतास का बावर्‍या?’
‘जी.’
‘बुद्ध झाल्यावर कांहीं आणाशपथा झाल्या कीं नाहीं?’
‘जी झाल्या.’
‘त्या काय झाल्या तें सांग’
‘तेंच मोठं कसनुसं झालं. घरं चांगली चुंगलीं राखावीं, समद्यांनीं पोरंबाळं शिकवावी, कापडं खळनी घालावीं… हें समदं ठीकच हाय… पर…’ बावर्‍या अडखळला.
‘बोल, पुढें बोल…’
‘मेलेली ढ्वारं ओढूं ने, अशी शपथ घेतली. मेलेल्या जनावरांचं मांस खाऊं ने हेंबी आलं सरळ; पर मेलेलं ढ्वार म्हारांनी वडायचं न्हाई तर वडायचं कुनी?’
‘ज्याचं त्यानं ओढावं.’ अप्पाजीपंत बोलला. पिवळ्या कपड्यांतला बुवाहि नेमकं तेंच बोलला होता.
‘आणखी काय काय ठरवलंय् महारांनी?’
‘का रया हाय् तें समदं सांगन्यांत? वाडवडलापासनं आमी करत आलों तें कामच आतां करायचं न्हाई असा हिशेब मनांत धरलाय त्यांनीं. मी मस्त आरडलूं, पर मला कोन इचारतंय् म्हातार्‍याला? त्यो बुवा परगांवचा. सांगून आन् शपथा घेऊन निघून गेला सकाळच्या मोटारीनं. पर आमाला गांवांतच र्‍हायचं का न्हाई?’
‘हं…’ लांब सुस्कारा टाकीत अप्पाजीपंत म्हणाले, ‘हें असंच व्हायचं आतां बावर्‍या. घाटावर गांवोगांव असं झालंय्. आपल्याकडं नव्हतं. तें आतां आलं…’
अप्पाजीपंत आणखी कांहीं बरेंच या विषयावर बोलणार होतें. पाराजवळच्या त्यांच्या वाड्याच्या दरवाजांतून त्यांच्या नातीनें हरळी दिली, ‘अप्पा, पाणी तापलंय आंघोळीचं.’ अप्पाजीपंतांनीं जेठा मोडला. आपल्याच गुडघ्याचा आधार घेत ते उठून उभे राहिलें. ‘बराय’ म्हणत पाराच्या पायर्‍यांकडें वळलें. अप्पाजीपंत उठले तसा जानू पाटीलहि उठला. बाकीचे कुणबीहि हलले. गांवाच्या मध्यभागी, तळपत्या सूर्याखालीं, एकटा बावर्‍या महारच काय तो मागें उरला. रात्रभराच्या जाग्रणानें त्याचें अंग आंबलें होतें. महारवाड्याचा आडमुठेपणा आणि गावकर्‍यांची उदासीनता ह्या दोहोंच्या जाणीवेनें तो कष्टी झाला होता. घडत होतें तें घडायला नको होतें असें त्या भाबड्या महाराला मनापासून वाटत होतें. गांव आणि महारवाडा ह्यांत यापूर्वी नुसतेच अंतर होते. आतां ह्या दोन वस्त्यांच्या मधें एक जळती खाई पैदा होणार अशी त्याची अटकळ होती. त्या खाईचे चटके त्याच्या मनाला जाणवत होते. काळजाला होरपळत होते. बराच वेळ बावर्‍या तसाच उभा राहिला. एखाद्या थकल्या गाढवासारखा, तसाच उभा राहिला. घडीभरानं एक लांब सुस्कारा टाकून, हातातली काठी आणि खांद्यावरची कांबळी सावरीत तो निघून गेला. कुणीकडे निघून गेला कुणास ठाऊक.
दुसर्‍या दिवशींपासून महारवाड्यांतले महार, गावात कामाला येईनासे झाले. गांवकर्‍यांची हाक ते कानाआड टाकूं लागले. गांवकरी चडफडूं लागले. महारड्यांना शिव्या घालीत आपलीं कामें आपण करूं लागले. तशी रानांत अजून नांगरण डोंगरणच चालली होती. बागाईतांत कुठें कुठें व्हंडीची हिरवी थाटें उभीं दिसतं होती. कांद्या-लसणाच्या पाटी उबदारीला आल्या होत्या. वांगीं लोंबकळण्याइतकीं अंगीं भरलीं होतीं. राताळ्याच्या वेलांनी रानचे ओले वाफे आपल्या हिरव्यातांबड्या पानांनी गादलेले होते. जिराईतांत तर अजून कसणीचाच अंमल होता. खताच्या गाड्या वाहण्याचेंच काम महारांचे वाटचें होतें. तें गांवकर्‍यानीं हाती धरलें होतें. बांध-बंधारीची तोडजोडहि ज्यांची त्यांनीच आरंभली होती.
वैशाख महिना आकाराला आला तरी महारं गांवांत फिरकलीं नाहींत. रताळं मागण्याच्या निमित्तानं एखादा महार कुणा मळेकर्‍याच्या बांधावर उभा राहिला नाहीं, कीं एखादी महारीण ‘वैस कोरड्याशाला’ मागायला भाजीच्या वाफ्याशी आली नाही.
महारवाडा एका रात्रीत पालटला तो पालटलाच. महिना पंधरा दिवसांत वाड्यांतली पांचपंचवीस महारं अकलूजच्या साखरेच्या फॅक्टरींत कामाला गेलीं. कांहींनीं सरकारी कालव्याचें काम धरलें. महारणी तर घोळाघोळानें कालव्याचें कामावर हजेरी लावूं लागल्या. गांवकर्‍यांच्या रागालोभाची त्यांना कुणाला पर्वाच उरली नाही. या सगळ्या घाटघोलाण्यांत बावर्‍या मात्र गुदमरल्यासारखा झाला. तो जमातीबरोबर चालू शकेना. त्याला गांवाबरोबर चालण्याची बहाई होती. तो एकटाच गावात यायचा. रानोमाळ भटकायचा. न सांगतां दिलेलें काम होईल तसें करायचा. दिवेलागणी झाल्यावर गांवांतल्या मोठ्या मोठ्या वाड्यांच्या अंगणांत जाऊन काठी आपटायचा. त्याची मानाची भाकरी त्याला मिळायची. ती तो पाराच्या पायरीशीं बसून खायचा. उरलेली उद्यांच्या दिवसासाठी ठेवांयचा. महारवाड्यानें गांवांत येणें टाकलें आणि बावर्‍यानें महारवाड्यात जाणें वर्ज्य केलें.
कुणी एखादा गावकरी कुत्सितपणे त्याला विचारी, ‘का बावरा, घराकडं नाहींस का जात?’
बावरा गप्प राही. दुसरा एखादा गावकरीच पहिल्याच्या सवालाला जबाब देई. ‘त्यो कशाला जातोय म्हारवाड्यांत. लंकेत बिभिषेन!’
वैशाख वाद्यांतील एका अंधार्‍या रात्री बावरा पारापाशींच पटकूर घालून पडला होता. घर असून त्याला घर नव्हतें. जमातीच्या चुकीनें गावाचे गांवकरीहि त्याला जुन्या मायेनें वागवीत नव्हते. तसें खरेंच होतें कीं, ज्याला त्याला त्याचें वागणे पहिल्यागत वाटत नव्हतें. काय होतें कोण जाणे! बावरा उदास होता, कष्टी होता. इतके मात्र खरे! अलिकडे अलिकडे त्याला झोंपहि नीट लागतं नव्हती. राखणीच्या कुत्र्याच्या झोंपेंसारखी त्याची झोंप उचलजागती झाली होती. त्यां रात्रींदेखील तो निजला होता, पण कांहीं केल्या त्याचा डोळा लागत नव्हता. होतें कसें आणि झालें कसें या विचारांतच तो तळमळत होता.
पाराजवळ असलेल्या आप्पाजीपंत कुलकर्ण्याच्या वाड्यांत गेले कांहीं दिवस गडबड चालली होती. पाहुणेरावळे येत होते. जेवणें-खावणें चाललीं होतीं. आज तर अंगणांत मेढी रोवण्याचें काम चालूं झालें होतें. बावर्‍याला त्यांच्या वाड्यांतल्या कुणाहि माणसानें हटकलें नव्हतें. लांकडें फोडण्याचें हमखास काम देखील त्याला सांगितलें नव्हतें. आप्पाजीपंतांच्या लेकीचें लगीन होणार होतें. इतकी वार्ता त्याला मिळाली होतीं. गांवांतल्या गांवकर्‍यांच्या कार्यात महारांची सावली देखील नसावी याचे त्याला मनःपूर्वक वाईट वाटत होतें. आपणहून आप्पाजीपंतांच्या अंगणांत जाऊन उभें राहावें व आपलें काम हक्कानें मागून घ्यावें असा विचारहि त्याच्या मनांत येऊन गेला होता. हे काम एकट्यानें करणें त्याला नामुष्कीचें होतें. आटीसोळा महारांनीं यावें आणि बामणाच्या कार्यातलें अधिकारानें काम मागावें ही गोष्ट त्याला शानीची वाटत होती. तें घडणें आतां शक्य नव्हतें. एकटा बावरा कदाचित् धुडकावून लावला जाईल अशी भीती त्याची त्यालाच वाटत होती. तो दुःखी होता. फार दुःखी होता. देवानेच आप्पाजीपंतांना बुद्धि द्यावी आणि त्यांनी आपल्याला साद घालावी अशी त्याची ‘विच्छा’ होती. बोलाफुलाला गांठ पडली. खरोखरच कुरकळण्याच्या वाड्यातून हरळी आली,
‘बावर्‍या बावर्‍या हेऽऽऽऽ’
बावर्‍या आनंदातिशयानें उठला. अंथरलेलें कांबळें खांद्यावर टाकीत तो ओरडला,
‘आलू आलू जी….’
‘पंत बलावात्यात तुला..’ दरवाजांतून हरळी भरणार्‍या म्हमू चौगुल्यानें सांगितलें. बावरा वाड्याच्या चौकांत आला. चौकात मंडप घालण्याचें काम चाललें होतें. चारी सोप्यावर गॅसच्या बत्त्या तेवत होत्या. अंगणांतच एका सतरंजीवर आप्पाजीपंत बसले होते. जानू पाटील, पवार, कृष्णा मास्तर इत्यादि गांवांतली ठळक मंडळी त्यांच्या सभोवती होती.
‘ज्वार’ बावरा ओरडला.
‘आलास का बावरा?’ आप्पाजीपंत त्याचाकडें पाहूं लागले, पण बत्तीच्या झगझगाटानें त्यांचे दोन्ही डोळे गच्च मिटले गेले.
‘जी, आलु जी.’
‘बस.’
‘हाय की.’ बावरा बसला नाही.
‘तुला अशासाठी बोलावलं होतं…’
‘जी.’
‘आपल्याकडे लगीन आहे.’
‘ठावं हाय जी…’
‘म्हारं काही कुणी आली नाहीत.’
बावरा बोलला नाही.
‘महारांना आमंत्रण करण्याची काहिं प्रथा नाहीं आपल्या गांवांत.’
बावरा बोलला नाही.
‘तूं वयानं वडील आहेस. तराळकी केलेली आहेस. बाकीची कामं कशींबशीं केलीं गावकर्‍यांनी. एक काम उरलं आहे. तें पिढीजात तुम्हीच लोक करीत आलां आहांत. परवां वरात निघेल मुलामुलीची. तेव्हां या गॅसच्या बत्त्या कोण धरणार?’
‘महारांनींच धरल्या पाहिजेत,’ बावरा म्हणाला.
‘पाहिजेत ना? तुला मागचं सारं आठवत असेलच. बत्त्या ह्या आत्ता निघाल्या. मागं हिलाल असत. दिवट्या असत. त्या महार मंडळीच वागवीत. काय?’
‘जी.’
‘सातआठ तरी गाडी लागतील.’
‘जी.’
‘विचार जाऊन तुझ्या मंडळींना आणि सांग मला. नाहींतर मोलानं माणसं आणली पाहिजेत परगावाहून.’
‘तसं कशापायी? म्या इचारतु की.’
‘तुजं त्यांचं बोलणं हाय का न्हाई?’ जानू पाटलाने मध्येच विचारले.
‘अशील नाहीं तर नशील. जाऊन इच्यारनं माज्याकडं लागलं.’
‘बावरा…’
‘जी….’
‘हें एवढं नेमं घे अशीक.’ मेढी रोंवण्याच्या कामी गुंतलेला एक गांवकरी म्हणाला. बावर्‍याचा आनंद काळजांतल्या काळजांत नाचूं लागला. त्यानें मुंडासे-पैरण काढून ठेवली. पहार घेतली. अंगणात खड्डा पाडण्याचे काम तो नेटानें करूं लागला. बाकीच्या म्हारवाड्यासारखे आपण अलग झालेलों नाही सारे यात्रेकरू अर्ध्या वाटेंतून उलटे वळले तरी आपण रस्ता सोडला नाहीं, या जाणीवेनें त्याचें म्हातारें शरीर रसरसून आलें. एखाद्या जवानाच्या गतीनें तो पहार चालवूं लागला. बघतां बघतां त्यानें पाचसहा वितीवितींचीं नेमें पाडून टाकली. मंडपाच्या त्या नेमांत मेढी उभ्या राहिल्या.
कितीतरी दिवसांनीं बावर्‍या महारवाड्याच्या हद्दींत पाय घालीत होता. गांव आणि महारवाडा यांच्या मधोमध रिजगी दगडाचे एक पडकें घरच काय तें उभें होतें. महारवाडा ‘बुद्ध’ झाल्या दिवसापासून त्यानें ते ओलांडलें नव्हतें. आज भल्या सकाळींच तो महारवाड्यांत आला. महारवाडा होता तसाच होता. तशाच केंबळी झोंपड्या. तशींच माती उकरीत हिंडणारीं कोंबडी. तशींच उघडीं-नागडीं पोरें. तशाच ओंगळवाण्या बायका. तसाच धूर. तसाच गलबला. बावर्‍या तक्क्यासमोर आता. रात्री तक्क्यांत झोपलेलीं महारमंडळी जागी झाली होती. त्यांच्या अंथरुणांच्या वळकट्या तक्क्याच्या पाठभिंतीस लगटल्या होत्या. कुणी दांतांना तमाखूची माशिरी चोळीत होतें. कुणी समोरच्या आडावर तोंड धूत होते. बावर्‍याच्या येण्याची दाद कुणीच घेतली नाहीं. त्याला मनस्वी वाईट वाटलें. तेथूनच परत फिरावेंसें वाटलें. तो परतला नाहीं. कशीहि असली तरी महारवाड्याची ती वस्ती त्याची होती. मुस्काड फिरवून वागणारी ती सारी महार मंडळी त्याच्या रक्ताची होती. तो तक्क्याच्या जोत्यावर जाऊन बसला. भिंती न्याहाळूं लागला. भिंतीवरचा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्याच्या ओळखीचा होता. तांबड्या रंगानें रंगवलेली कांहीं अक्षरें मात्र भिंतीवर नव्यानें उमटली होती. त्यांच्याशी त्याचा परिचय नव्हता. कसल्याच अक्षराची आणि त्याची तोंडओळख उभ्या जन्मात झाली नव्हती. विहिरीवर तोंड धुवून परत तक्क्याची पायरी चढणारा एक तरणा मुलगा थांबून बावर्‍याकडे बघत राहिला.
‘का, वळख लागेना का फकीरा?’ बावर्‍या कडवटपणानें म्हणाला.
‘फार दिवसांनी आलायस. त्यानं तसं झालं?’
‘हं, यावं असं ठेवलंय कुठं तुम्ही?’
‘मग आज तरी कशाला आलायस्?’
‘आलोंय. काय काम हाय?’
‘आमच्यासंग?’
‘व्ह्यय.’
‘कसलं?’
‘समद्यांस्नीं इउंदे की.’
‘सभा सांगणार हायीस का?’
‘मी बुध झाल्यालो न्हाई लेंकरा. म्हारच हाय!’
‘म्हारांचं काय काम हाय ह्या वस्तीत?’
फकिराच्या त्या हुमदांडग्या जवानानें बावर्‍याचें काळीज कातरलें. उरातला डोंब उरात आंवरीत तो म्हणाला, ‘गांवकर्‍यांचा सांगावा घिऊन आलोंय.’
‘कुठल्या गांवकर्‍यांचा?’
दुसरा एक महार जवळ आला. बघतां बघतां चार-आठ जण फकिराच्या आसपास गोळा झाले. त्यांचा आविर्भाव ओळखून बावर्‍या म्हणाला, ‘ए, मला असं भ्या घालुं नगा. आप्पाजीपन्तांच्या घरीं लगीन हाय. लगनाकार्व्यात दिवट्या मशाली धरन्याचं काम डुयान् डुया म्हारं करींत आल्यात. ह्या लगनात तुमी येणार न्हाई तें इचाराय आलोय.’
‘कुरकळण्याला तोंड नाहीं इचारायला का पाय नाहीत इथवर यायला?’ फकीरा उसळी घेत डाफरला.
‘तूं कशाला आलाईस सांगावा घिऊन?’ दुसरा ओरडला.
‘आयला, म्हातारं थकिला झालंय पर गावंदरी चरत न्हाई.’
तिसर्‍याने नाक फुगवलें.
बघता बघता बावर्‍याभोंवतीं महारकालवा झाला. खोपटा-खोपटांतली बायकापोरं तक्क्याभवती गोळा झालीं. बावर्‍याला कुणी बोलूं देईना. सारी जमात त्याच्यावर जणूं तुटून पडली. प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली. बावर्‍याच्यानं बोलणं सुधरंना. त्याच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. नाक वाजू लागलें, हातांपायांत कापरे भरले. बातमी लागतांच बावर्‍याचा लेक आपल्या खोपटांतून धांवत आला. माणसांची गर्दी हटवीत तो पुढें झाला. दोन्ही काखांत हात घालून त्यानें बावर्‍याला उभें केलें. तिरसट सहानुभूतीनें त्याने बापालाच दटावले. ‘चल, मरचील एकांदवख्ती. तुजं शानपन ठिव गुंडाळून भानुशीवर. उरल्यांत तेवढं दीस गुन्यागोइंदानं काढ. उद्या मेलास तर काय गाव खांदा देनार न्हाई तुला. महारांच्याच बोकांडी बसचील.’
लेकरानें बापाला चालवीत खोपटाकडे नेला.
बावर्‍या परत गावाकडे फिरकला नाही. आप्पाजीपंतांच्या घरचें कार्य व्हायचें तितक्याच थाटानें साजरें झालें. महारांनी गांवाशी वैर धरलें आहें हे जाणून मांगवाडा गावाच्या सेवेला धावला. व्हलारांनी वाजंत्री वाजवली. मांगांनी बत्त्या धरल्या. वरात मिरवली. गावजेवण झाले. गव्हाच्या खिरीच्या काहिलीच्या काहिली रिकाम्या झाल्या. महारवाड्यावांचून सारा गाव कुलकर्ण्याने जेवू घातला.
आपल्या पिढीजात खोपटांतील एका अंधार्‍या खोलींत बावर्‍या तळमळत होता. त्याचें अंग जळत होतें. डोक्यातलें रक्तं उसळत होतें. त्याला वारंवार वाताचे झटके येत होते. त्या झटक्यासरशी तो म्हातारा महार उसळून उठत होता. बंद कवाडावर लाथा बुक्क्या मारत होता. तोंडानें एकसारखें बडबडत होता. ‘अरं मला सोडा… मी गांवचा तराळ हाय… मला पाटलाच्या वाड्यांतली भाभळीची गाठ फोडायची हाय. पवाराचा बैल मेलाय… अरं मला जाऊ द्या… तालुक्याला वसूल पोचवायचा हाय… आप्पाजी कुरकळण्याकडं लगीन हाय… बरातीचा वखुत झाला… तराळनी मला तुझ्या चोळीची चुंबळ करून दे.’
त्याचें म्हणणें कुणी ऐकत नव्हतें. तो बडबडतच होता. वातांतच बोलत होता. बावर्‍याच्या खोलीचें दार वैशाख महिना सरेतों बंद राहिलें. गांवाला काही पत्ता लागला नाही. महारांच्या घरांत जाण्याचे प्रयोजन कुणाहि गावकर्‍याला कधीच भावले नाही. बावर्‍या मेला नाहीं म्हणून जगला. भुकेच्या वेळीं त्याच्यापुढें अन्नाची थाळी ठेवण्याइतकी माणुसकी त्याच्या लेकानें दाखवली पण त्याला सोडला मात्र नाहीं. ओरडून ओरडून बावर्‍याचा घसा बसला. घसा बसलेल्या अवस्थेंतहि तो ओरडत राहिला. आता त्याच्या ओरडण्याला रागाचा रंग राहिला नाहीं. त्याच्या अंगांतला जाळ आणि डोक्यातलीं आग दोन्हीहि थंडावली. त्याचा अवतार एखाद्या वेड्या गोसाव्यासारखा दिसूं लागला. सारा महारवाडा जाणून चुकला की बावर्‍याला वेड लागलें. त्या वेडाच्या लहरीत तो बसल्या जागी बसूं लागला. टाळ्या वाजवीत गाऊं लागला…
‘देहाचे विराळ, मानिती सकळ
आत्मा त्यो नीरमळ, सुद्ध बुद्ध…’
‘बुद्ध ! मी बुद्ध झालोंय!’ घसा खरवडून ओरडत तो खदखदून हसूं लागला. बावर्‍याचें काय झालें त्याची वास्तपुस्त गावानें केली नाहीं. महारवाड्यानें त्याला मोजणें सोडून दिलें. वैशाख सरला, जेष्ठ निघून गेला. आखाडाच्या आरंभाला पावसानें काळी रानवट हिरव्या पोपटी रंगाने रंगवून टाकली. महारांच्या मदतीवांचून गांवगाडा पुढे जात राहिला. दरसालसारखींच पिकें डुलूं लागली. रानलक्ष्मी फुलूं लागली. महारवाड्यानें आपला सवतासुभा सजवीत आणला. फॅक्टरीत नोकरी लागलेलीं जवान पोरें एखाद्या दिवसाच्या सवडीनें गांवीं परतूं लागली. नव्या नोकरींतलें सुख तक्क्यांत बसून सांगूं लागलीं. बावर्‍या आतां हिंडू फिरूं लागला होता. त्याचें डोकें तळ्यावर नसल्यामुळें त्याला कुणी हटकत नव्हतें कीं त्याच्याशीं कुणी बोलत नव्हतें. त्याचें उघडे डोळें सारं कांहीं पाहत होतें. म्हातारे कान, कष्टानें का होईना पण सारे काही लक्षपूर्वक टिपीत होते. महारवाडा ‘बुद्ध’ झाला म्हणजे काय झालें हें त्याला अजूनहीं कळलें नव्हतें. अजून तशीच केंबळीं घरे होती. तशाच कोंबड्या माती विस्कटीत फिरत होत्या. ओंगाळवाण्या बायका तशाच पारोशानें भाकरी थापीत होत्या. नाही म्हणायला कांहीं झोपड्यांतून रोकडीचा आवाज येत होता. ती देणगी अकलूजच्या कारखान्याची होती. महारांनी महार राहून कारखान्याची चाकरी केली असती तरीहि तो पैका महारवाड्यांत आला असता.
आखाडी पुनवे दिवशीं तिन्हीसांजेला वेडा बावर्‍या तक्क्याच्या बाजूला नांद्रुकीच्या पारावर बसला होता. आभाळ तांबडेंलाल झालें होतें. वार्‍याच्या भरारीला ओलसर वास येत होता. महारवाड्यांतला कालवा कानावर येत होता. बावर्‍याचें डोकें थंड होतें. हातपाय लुळ्यागत झाले होते. चांद उगवायच्या टिपणाला गांवांतून एकाएकीं हलगीची घाई ऐकूं आली. लेझमीच्या भिंगर्‍या बोलूं लागल्या. बैलांच्या डरकाळ्या घुमल्या. माणसांचे साद उसळले. बावर्‍याला एकदम आठवलें. न बघतांच दिसल्यासारखें झालें. गांवांत बेंदराची मिरवणूक निघाली होती. शेलक्या शेलक्या बैलांचा जथा गाववेंशींतल्या मारुतीच्या देवळाकडें येत होता. त्या बैलांचीं शिंगें हिंगुळानें रंगलेली होती. त्यावर झगागणारे बेगड गोंदानें डकवलें होतें. शिंगांच्या टोंकांना पितळेच्या चकचकीत ‘शेम्ब्या’ बसविल्या होत्या. बैलांच्या कपाळावर कावेचे गोल उठवले होते. अंगावर झुली घातल्या होत्या. त्या झुलींना भिंगें बसवलीं होतीं. बैलांच्या मेळाव्यापुढें हलग्या झडत होत्या. पिपाण्या बोलत होत्या. गांवांतलीं तरणी पोरे लेझीम खेळत होती. त्यांच्या पटक्यांचे शेंव हवेंत उडत होतें. बैलांच्या बरोबर दमदार पावले टाकीत बैलांचे धनी चालत होते. बैलांच्या देखणेपणाचा गरूर मालकांच्या चालीत उमटत होता. एकादा अंडील खोंड डरकत होता. त्याच्या इसाळानें दुसरा फुसफुसत होता. गांवाची दौलत गांवांतून मिरवीत होती. आखाडाचा महिना आल्यानें ढग केव्हा गोळा होतील आणि चांद कधी लपेल याची खात्री नव्हती. मिरवणुकीच्या बरोबर गॅसच्या बत्त्या होत्या. त्या बत्त्या मांगांनीं धरल्या होत्या. महारांनीं त्या कामाला नकार दिला होता. आप्पाजीपंतांच्या घरच्या लग्नाच्या वेळीं एकहि महार बत्त्या धरण्यासाठी गेला नव्हता. आपण सांगायला आलों तेंव्हा सार्‍यांनीं आपल्याला बुकलून कोंडून ठेवलें होतें. आज पुन्हा मोका आहे. गावानें महाराची दाद घेतली नाही. गाव आणि महारवाडा यांचे संबंध तुटले. गाव महारवाड्यात येत नाही तर महारानें गावात जाण्याचे कारण काय? आज मिरवणूक गावाची नाही, बैलांची आहे. बैलांशीं कशासाठीं महारांचं वैर? बैलांनी पिढ्यांन पिढ्या कष्ट केले. शेती पिकली. शेतीवर गांव पोसला. महारवाडा पोसला. बैलाचं ऋण गांवावर. बैलांचं ऋण महारवाड्यांवर. त्यांच्या मिरवणुकींतील बत्ती महारानं धरलीच पाहिजे. बैल आपल्या पिढिजात कामांत आजतागायत चुकले नाहींत. महारानं का चुकावं?
विचाराच्या हिसक्यासरशीं बावर्‍या उठला. त्याच्या अंगांत कुठलें बळ संचारलें कोण जाणें? वार्‍यासारखा धांवत तो गांवच्या दिशेनें निघाला. एका पोरगेल्या महारानें पळतां पळतां त्याचा बाहुटा पकडला.
‘कुठं चाललास आज्या?’
‘बेंदराला जातो. बत्ती धरायला. सोड.’ बावर्‍या त्या पोराला हिसडा मारून सुटला. कुडाच्या भिंतीवरून त्यानें उडी घेतली. बघतां बघतां तो मिरवणुकीशीं भिडला. एका मांगाच्या डोक्यावरची बत्ती त्यानें पाठीमागून उचलली. आपल्या डोक्यावर घेतली. लेझमीच्या तालावर तो नाचूं लागला. मांग बघतच राहिला. वेड्याच्या वेडचाळ्याविरुद्ध तक्रार ती काय करायची? लेझिमवाले नाचत राहिले. वाद्यें वाजत राहिलीं. बावर्‍या नाचत राहिला. पांचशें बैलांच्या डौलदार मिरवणुकींत त्या वेड्या महाराकडे कुणाचें लक्ष गेलें नाहीं. मिरवणूक शिवेजवळ आली. तेव्हां दगडी कुसाच्या आंत सारा महारवाडा जमला होता. लाल डोळ्यांनी फक्त बावर्‍याकडें पाहत होता. मिरवणूक देवळापुढें आली. विसावलीं. धनगरांच्या मेंढरांनीं पटक्यांवरून उड्या घेण्याचीं कमाल केली. गांवकर्‍यांनी टाळ्या पिटल्या. दरसाल महाराचा तमाशा व्हायचा. आज झाला नाही. बैल परतले आणि गांवकरी देवळापुढें बसलें. दरवेश्याच्या भेदिक गाण्यांनी पहांटेपर्यंत सूर धरला. घोंगड्यांच्या भाळी मारून ऐकत बसलेले गावकरी पेंगुळलें. कुणी बसल्या जागीच आडवें झालें. बावर्‍या उभा होता. डोईवर बत्ती घेऊन पहाटेंपर्यंत उभा होता. त्याचें पाय ताठरले नाहींत कीं हात अवघडलें नाहींत.
तांबडें फुटलें तशा सर्व बत्त्या पारावर बसल्या. बत्तीवाल्या मांगानें बावर्‍याच्या डोक्यावरचा उजेडहि अलगत उचलून घेतला. बावर्‍या आज खूश होता. त्यानें पिढिजात काम हट्टानें केलें होतें. डोक्यावरची बत्ती उतरल्यावर मात्र तो अधांतरी झाला. त्याला कुठें जावें ते समजेंना. दीड पावणे दोन महिने तो बिनताप पडला होता. गांवांतल्या एकाहि माणसानें त्याची चौकशी केली नव्हती. गांवाला त्याची गरज नव्हती. त्यानें आपलें काम केलें होते. आपल्या माणसांत परत जायला आतां तो मोकळा होता. तीं माणसें तरी त्याचीं होतीं का? तीं तर सारी ‘बुद्ध’ झालीं होतीं. गांवांत त्याचें कोणी नव्हतें. महारवाड्यांत त्याचें कुणी नव्हतें. तरी तो निघाला. बधीर मनानें निघाला. जेथून आला होता त्या जागेकडे निघाला.
उजाडतां उजाडतां तो दगडी कुसाजवळ आला आणि त्याच्या भाईबंदांनीं त्याला घेरला. त्याच्या डोक्यावर काठ्यांचे प्रहार बसले. जीव मुठींत धरून तो तिथून निसटला. रानोमाळ धांवत जगू पाटलाच्या पडळीवर आला. त्याला आठवत होतं, पाटलाची म्हातारी वैद्यकी जाणते. पडळाच्या अंगणांत येऊन त्याने जोराने हाक मारली, ‘आई….’
‘कोण हाय?’ म्हातारीचा आवाज आला.
‘मी बावर्‍या तराळ. मार बसलाय मला आई, दव्यासाठी आलोय.’
‘वर ये बाबा, मला दिसत न्हाई.’
‘म्या वर कसा येऊं? मी म्हार हाय.’
‘आजार्‍याला जात नसती. ये वर ये.’
पाटलाची म्हातारी ओरडून म्हणाली. म्हातारीच्या त्या बोलण्याने बावर्‍याचा जीव थंडावला. जाती-गोतीचें अंतर क्षणार्धांत भरून आलें. जन्मांत पहिल्यांदां तो पाटलाची पडळ चढून वर जाणार, एवढ्यांत त्याच्या काळजांतून भयंकर कळ निघाली. पडळीच्या पायरीशींच तो मटकन खालीं बसला. बसतो न बसतो इतक्यात तो खालीं कोसळला. त्या जखमी महाराची सारी हालचाल बंद पडली. तुटकी घोंगडी जिथल्या तिथें टाकून त्याचा निर्मळ आत्मा निघून गेला.
‘आम्ही बावर्‍याच्या मुडद्याला शिवणार देखील नाहीं’ या महारवाड्याच्या निरोपानें गांवांतली शेलकी मंडळी बिथरली. हट्टाला पेटली. त्या जुनाट महाराचा देह पाटलाच्या अंगणांतच गरम पाण्यानें माळ-बुक्का ल्याला. त्याच्या शेवटच्या पालखीला आप्पाजीपंत कुलकर्णी, जानू पाटील, सिताराम पवार अशांनी खांदा दिला. आंधळी पाटलीण म्हणाली, ‘पुण्याई हुती बिचार्‍याची.’ बावर्‍याच्या अंत्ययात्रेपुढे भजनी मंडळी गात होती, ‘आम्ही जातों आमुच्या गांवा, आमुचा राम राम घ्यावा.’ गांवीं जाणार्‍या त्या पाहुण्याला निरोप देण्यासाठी सारा गांव जमला होता. त्याच्या यात्रेमागोमाग सारें गांव चालत होतें. बुक्का-गुलाल उधळत होते.
दगडी कुसाच्या आत उभा राहून सारा महारवाडा तो सोहळा पाहत होता. त्या दृश्यानें भारावून कीं काय न कळे, बावर्‍याचा लेक ओरडला, ‘बघा लेको, तुम्हांला जगून मिळवतां आलं न्हाई त्ये माज्या म्हातार्‍यानं मरून मिळवलं!’ कुणीतरी त्याच्या तोंडावर हात ठेवला.
सारा महारवाडा मुक्यानें बघत राहिला. बावर्‍याची अंत्ययात्रा पाहून त्यांचींहि मनें कळवळली होती.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

2 Thoughts to “निर्वाण”

  1. Sanjay D. Gorade

    कथा कशी असावी याचे उत्तम उदाहरण….. सूंदर कथा

  2. Anil Patil

    छान

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा