‘अक्षर गणगोत’ या अंकात विनोद श्रा. पंचभाई यांनी ‘दरवळ’चे लिहिलेले परीक्षण. संपादक पांडुरंग पुठ्ठेवाड यांचे यांचे विशेष आभार.
माणूस व माणुसकी जाणिवेचं अंतरंग : दरवळ
मध्यंतरी हिंदीतील एका मोठ्या साहित्यिकाच्या पुढील ओळी वाचनात आल्या…
“आवाज उंची होगी,तो कुछ लोग सुनेंगे!
अगर बात उंची होगी,तो बहोत सारे लोग सुनेंगे!”
या ओळी लेखक घनश्याम पाटील यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या “दरवळ” या पुस्तकासाठी तंतोतंत लागू पडतात. कारण ‘दरवळ’ वाचताना त्यातील प्रत्येक लेखातील प्रत्येक परिच्छेदातून आपल्याला निश्चितच लिखाणातील उंचीचा वेगळेपणा जाणवतो. परिणाम साधणाऱ्या वाक्यांची उंची जाणवते! त्यांनी प्रत्येक लेख अत्यंत पोटतिडिकेनं लिहिलेला आहे याची पदोपदी प्रचीती येते. त्यामुळे हे पुस्तक वाचताना ते आपल्या मनाचा ठाव कधी घेतं हे आपलं आपल्यालाच कळत नाही, इतकं त्याच्याशी आपण एकरूप होऊन जातो!
‘स्वतःपासूनची सुरूवात महत्त्वाची!’ या पहिल्याच लेखातून स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग सांगून लेखकानं खूप छान सुरूवात केली आहे. या लेखात ‘चेहरा अाणि मुखवटा यातलं अंतर गळून पडलं की माणसाचं व्यक्तिमत्त्व उजळतं. ते अधिक प्रकाशमान होऊन इतरांच्याही आयुष्यात चैतन्य निर्माण करतं’ असं सांगताना त्यांनी त्यावरच आपल्या देशाच्या प्रगतीचं मूल्यमापन होईल हे नमूद केलं आहे. तसंच क्षमता असूनही काहीच न करणं हा एक मोठा सामाजिक गुन्हा आहे असा इशाराही आजच्या तरुणाईला दिला आहे. तरुणाई म्हणजे एक जाज्ज्वल्य आविष्कार, जबरदस्त उन्मेष! त्यांनी आपल्या ऊर्जेचा राष्ट्राच्या भल्यासाठी उपयोग करायला हवा मात्र सध्या हे चित्र दुर्मीळ दिसतंय अशी खंत लेखकाने व्यक्त केली आहे. भारत हा सर्वाधिक तरुणांचं प्रमाण असलेला देश आहे त्यामुळे तरूणांनी आत्मचिंतन केल्याशिवाय प्रगती साधणार नाही हेही या पुस्तकाच्या माध्यमातून आवर्जून सांगितलं आहे.’दुर्बल सबल व्हावेत’ या लेखातून अनेक महत्त्वपूर्ण दाखले देत लेखकाने मोठे मार्मिक प्रश्न विचारले आहेत… ‘दुर्बलांना सबल करण्यासाठी आपण काय करतो? लोक कल्याणकारी राज्याच्या नावावर कुणाकुणाला कसं अडवलं जातं, नागवलं जातं! बळी तो कान पिळी असा जणू अलिखित नियमच झालाय मग दुर्बलांचं काय? त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काय करता येईल?’
आजघडीला देव, देश आणि धर्माविरुध्द वागण्याला प्रतिष्ठा मिळतेय. एकीकडे महासत्तेची स्वप्नं पाहताना दुसरीकडे आपण आपलं जे अस्सल आहे तेच निकालात काढायला निघालोय अशी तळमळ व्यक्त करून, जे परिस्थितीनं आणि विचारानं ‘दुर्बल’ आहेत ते सबल झाले तरच आजचे चित्र बदलण्याचा आशावाद या लेखात त्यांनी जागवला आहे.’स्त्री म्हणजे जननी, निर्मितीचा आविष्कार! मात्र परंपरेचे गोडवे गाणाऱ्या आपल्या देशात तीच सर्वाधिक पिडली जाते, नागवली जाते!’ हे आजचं विदारक वास्तव लेखकानं ‘अगम्य, अतर्क्य!’ या लेखातून मांडलंय. पुरूषांच्या अंडरवेअरची जाहिरात करताना इथं स्त्रीच लागते आणि एखाद्या परफ्युममुळे त्याच्याकडे आकर्षित होऊन थेट त्याच्याशी शय्यासोबत करायला तयार असणाऱ्या जाहिरातीतही स्त्रीच असते. हा त्यांचा अवमान नाही का? याविरूद्ध कुठल्याही स्त्रीवादी संघटना, कार्यकर्त्या आवाज का उठवत नाही? कोणत्याही मोठ्या कंपन्यांच्या उत्पादनाविरुध्द ‘ब्र’ काढायचं धाडस का करत नाही? असे रोखठोक सवाल लेखकानं विचारले आहेत. स्त्री कुटुंब जोडते तसंच कधीकधी कुटुंब तोडण्यालाही तीच कारणीभूत ठरते. तिची सगळी रूपच अगम्य, अतर्क्य! असं असलं तरी स्त्री-पुरूष नात्यात एक प्रकारचा गोडवा असतो. त्यांच्या समानतेचा जागर करताना आधी एकमेकांविषयी आपल्या मनात व्यापक, उत्तुंग प्रेमभावना ठेवून एकमेकांकडे माणूस म्हणून बघितलं तरी अनेक समस्या सुटतील. एक तरल, निकोप नातंच समाज सुदृढ ठेवू शकतं असा सकारात्मक विचारही मांडला आहे!
देशाच्या पंतप्रधान पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यत आपल्याकडे स्त्रियांना संधी मिळाल्या. सर्वच क्षेत्रात त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली तरीही त्यांना आपण सन्मान देत नाही. अशी खंत लेखकानं ‘पुढे खडतर काळ’ या मर्मस्पर्शी लेखात व्यक्त केली आहे. या लेखातून त्यांनी स्त्रीभ्रूण हत्या घडवून आणणार्या खिद्रापुरे आणि मुंडे या नराधम डाॅक्टरांच्या अघोरी कृत्यावर प्रकाश टाकला आहे. स्त्रीच पुरूषांना जन्म देते आणि आपण तिच्यावरच अन्याय करतो, तिला कमी लेखतो, तिचा स्वाभिमान दुखावून तिचा जन्मही नाकारतो हे कशाचं लक्षण आहे? असा रोकडा याठिकाणी उपस्थित केला आहे. तसंच व. पु. काळे यांच्या पुढील चार ओळी लिहून आजच्या समाज मनाला आरसा दाखवला आहे…
“गर्भवतीला म्हणाले
तिच्या गर्भातले बाळ
नको जन्म देऊस आई
पुढे खडतर काळ!”
‘दरवळ’ या माईलस्टोन पुस्तकात एकसे बढकर एक असे एकूण २५ दर्जेदार लेख आहेत. कुठल्याही अविचारी माणसाला सुद्धा विचार करायला भाग पाडण्याची किमया प्रत्येक लेखात आहे. विचारांचा परिणाम साधणारे शब्द वाक्यावाक्यात आहेत!
“राहिलेलं’ राहूच द्या” मधील लेखकाचं आत्मकथन वाचून कुठलाही वाचक अंतर्मुख झाल्याशिवाय राहणार नाही! त्यांनी त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीचं भांडवल न करता समोर आलेल्या प्रत्येक संकटांचा धिरोदात्तपणे कसा सामना केला आणि संकटांचं संधीत कसं रूपांतर केलं हे हा लेख वाचताना आपल्याला पदोपदी प्रकर्षानं जाणवतं!
येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाताना बालपण कसं सरलं ते कळलंच नाही हे सांगतानाच लेखकानं किल्लारीच्या भूकंपाच्या कटुस्मृती जागवल्या आहेत. ते म्हणतात…
“आम्हा मराठवाड्यातल्या लोकावर भूकंपानं एक उपकार केलाय. कितीही मोठं संकट आलं तरी आम्हाला ते कस्पटासमान वाटतं. मृत्यूचं तांडव बघितलंय आम्ही! या वेदनेपेक्षा मोठी भळभळती जखम अजून कोणती असू शकते? त्यामुळे कितीही संकटं आली, प्रतिकूल परिस्थिती उद् भवली, काही कारणाने होत्याचं नव्हतं झालं तरी आम्ही खचत नाही, डगमगत नाही! पुन्हा नव्यानं तितक्याच जोमात, दमदारपणे सुरूवात करतो. ‘चार द्यायचे आणि चार घ्यायचे’ इतकं साधं सूत्र! मग कसलाच त्रास होत नाही. कितीही गोष्टी राहून गेल्या तरी नवनवीन आव्हानं आम्हाला खुणावत राहतात. म्हणूनच वैयक्तिक आयुष्याची राखरांगोळी झाली तरी मी त्यावर आनंदानं तुळशीपत्र ठेवू शकलो! जे घडणारच नाही त्याचा शोक का बाळगावा?”
हे सगळं वाचताना मनानं अगदी ‘दगड’ असलेल्या माणसालाही आपले अश्रु रोखता येणार नाही हे निश्चित!
‘युगपुरूष स्वामी विवेकानंदांना त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी शंभर युवकांची गरज होती. कशावरून त्या शंभरातला मी एक नसेन?’ असं मोठ्या आत्मविश्वासानं सांगताना मराठी भाषेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी, या क्षेत्रातील नकारात्मकता हटवण्यासाठी, प्रतिभावंतांना त्यांची हक्काची दालनं उभी करून देण्यासाठी कुणी ‘मसीहा’ येणार नाही. त्यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. असा जबरदस्त आशावाद लेखक या लेखात प्रकट करतात!’कशासाठी? भुकेसाठी!’ या लेखाच्या माध्यमातून खूपच मार्मिकपणे विवेचन केलं आहे. जशी खाण्याची भूक असते तशी सत्ता, पद, पैसा, प्रतिष्ठा याचीही भूक असते. मग त्यासाठी लोक वाट्टेल ते करायला तयार होतात. कधीकधी भूक माणसाला काहीही करायला भाग पाडते. या भूकेसाठी अगदी क्षुल्लक कारणावरून माणसांचे खून पाडल्याची अनेक उदाहरणं आपल्या बघण्यात येतात.
‘भुकेसाठी माणूस अनेकांच्या जिवावर उठत असताना जगभर असंख्य लोक एकवेळच्या खाण्यासाठी मोताद आहेत. त्यांची ही तडफड पाहून आपल्या मनात कालवाकालव होईल. या भुकेचा बाजार मांडला जातो. त्यांची भूक भागवण्यासाठी त्यांना आमिषं दाखवली जातात. त्यातून संहार घडतात. ‘हंगर इकाॅनाॅमी’ जगावर राज्य करतेय. आपली भूक भागवण्यासाठी माणूस इतरांवर अन्याय अत्याचार करतो. भूक भागवण्यासाठी तो इतरांच्या अन्यायाला बळीही पडतो.’ हे भयानक वास्तव मांडताना जगात कोणीही उपाशी राहू नये, त्याची भूक भागावी, तो तृप्त व्हावा. त्याच्या भुकेचा हव्यास वाढू नये, त्याला काही कमी पडू नये. असं झालं तर चराचरात चैतन्य बहरून येईल अशी आशाही लेखकाला वाटते! “आपल्या देशाला बौध्दिक क्षत्रियांची गरज आहे आणि असे क्षत्रिय निर्माण झाले तर शस्त्रास्त्रांची मुळीच कमतरता पडणार नाही!” या स्वामी विवेकानंदांच्या वचनानुसार आपल्याला बौद्धिक क्षत्रियांची निर्मिती करावी लागेल. त्यासाठी ज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचं आहे. म्हणूनच आपल्या मुलांना फक्त डाॅक्टर, इंजिनियर न करता त्यांच्यासाठी त्यांचा कल बघून संगीत, नाट्य, नृत्य, चित्र, शिल्प अशा विविध कलांना मोठं व्यासपीठ द्यायला हवं. कला शाखांकडे दुर्लक्ष करण्याचा अविचार मुलांनी आणि पालकांनी करू नये. अशाप्रकारचे मौलिक विचार ‘साहित्यिक जीवनव्रती निर्माण व्हावेत’ या लेखात मांडले आहेत.
“सध्या अत्यंत महत्त्वाचं आणि सर्वात दुर्लक्षित राहिलेलं क्षेत्र म्हणजे साहित्य! मराठी आणि इतर भाषांत लेखन करणाऱ्या तरूणांची संख्या वाढणं ही काळाची गरज आहे. जे लिहिते हात आहेत त्यांना आपण ताकद दिली पाहिजे. आजच्या तरुणाईचं लेखन अव्वल आहे. कुणाच्याही प्रभावाखाली दडपून न जाता ते त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार घडवत आहेत. प्रस्थापित यंत्रणेला चपराक देत त्यांची निश्चित ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे.” असं अत्यंत तळमळीने सूचित करताना या पुस्तकाच्या माध्यमातून लेखक म्हणतात, “मराठीतील प्रकाशक या नात्यानं मी कायम सांगत असतो की नव्यानं लिहिणाऱ्यांची, बोलणाऱ्यांची एक मोठी फळी आपल्याकडे निर्माण झाली पाहिजे. विविध समाज माध्यमांद्वारे सातत्याने व्यक्त होणाऱ्या तरुणाईला थोडी दिशा दिली तर प्रतिभेचे अनेक कवडसे गवसू शकतात. आपल्याकडे ‘पूर्ण वेळ लेखन’ ही कल्पना आजही अनेकांना ‘भिकेचे डोहाळे’ वाटतात. कारण त्यादृष्टीने काहीच प्रयत्न होताना दिसत नाहीत. ‘साहित्य’ आपल्याला आत्मभान देतं, स्व ओळख देतं, अर्थकारण साधतं हे सांगितलं तर तो विनोद ठरावा अशी परिस्थिती काहींनी निर्माण केलीय, मात्र हे सत्य आहे! फक्त त्यासाठी लेखकांनी सजग असायला हवं. त्यांचा दृष्टिकोन व्यापक आणि निकोप असावा. अभ्यासाची, परिश्रमाची तयारी असावी. वाचन असावं. गुणात्मकतेचा ध्यास हवा आणि महत्त्वाचं म्हणजे त्यानं सातत्याने लिहितं असायला हवं!”काहीही तारतम्य न बाळगता आणि विचार न करता आपली प्रतिक्रिया देणाऱ्यांची गंभीर दखल ‘धोका प्रतिक्रियावाद्यांचा!’ या लेखात घेतली आहे. तसंच क्षणिक मोहापायी..!’ या लेखातून आपल्याकडे प्रेम आणि विवाहाच्या संकल्पना कशा बदलत चालल्या आहेत, लग्न न करता एकत्र राहणाऱ्यांचे वाढते प्रमाण याविषयी सडेतोड भाष्य केले आहे. त्याचप्रमाणे मराठी माणसाचं आध्यात्मिक वैभव ठरणाऱ्या, सामान्य माणसात श्रध्दा जागवणाऱ्या, भक्तीमार्गातून जगण्याचा आधार ठरणाऱ्या पंढरीच्या वारीचा मंगलमय सोहळा ‘उर्जादायी भक्तिसोहळा’ या लेखात विशद केला आहे.
दहशतवादाला धर्म नसतो असं कायम म्हटलं जातं. मग अतिरेकी कारवायात पकडले जाणारे बहुसंख्य विशिष्ट धर्माचेच का बरं असतात? असा रोखठोक सवाल लेखकानं ‘दहशतवादाला धर्म असतो’ या लेखातून केला आहे.
दगडाविटांचं स्मारक उभारण्यापेक्षा वाजपेयीजींच्या विचारांचं स्मारक उभारणं कधीही श्रेयस्कर! त्यांचं साहित्य मराठीत आणणं, त्यांच्या नावे कवी लेखकांचा गौरव करणं, लिहित्या हातांना बळ मिळेल अशा काही योजना आखणं असं काही करता आलं तर ते चिरकाल टिकेल. वाजपेयी असंख्यांच्या मनात आणि ह्रदयात घर करून आहेत. त्यांच्या अशा कुठल्याही स्मारकाची गरज नाही. असे विचार ‘विचारांचं स्मारक बांधा!’ या प्रेरणादायी लेखातून वाचायला मिळतात. “आपल्याकडे औरंगजेब कायम चर्चेत राहतो मात्र संस्कृत तज्ज्ञ असलेल्या त्याच्या थोरल्या भावाकडे दाराशिकोहकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं! कूपमंडूक वृत्तीच्या इथल्या विचारवंतांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्यही सोयीस्कर असतं. भांडारकर इन्स्टिट्यूट ची तोडफोड असेल, दादोजी कोंडदेवांचा पुतळा काढणं असेल किंवा राम गणेश गडकरींचा पुतळा हटवणं असेल या सर्वांतून मेकाॅलेची अवलाद पुन्हा कार्यान्वित झाल्याचं दिसून येतं.” हे परखड भाष्य आहे ‘ही तर मेकाॅलेचीच अवलाद!’ या लेखातील.गावागावात हनुमंताची मंदिरं उभारून बलोपासना करण्यास चालना देणाऱ्या समर्थ रामदास स्वामी यांचं श्रीसमर्थ जांब हे जालना जिल्ह्यातील जन्मगाव! प्रभू श्रीरामचंद्रांनी समर्थांना अनुग्रह देऊन चारशे वर्षे उलटली. त्यानिमित्त चैतन्य ज्ञानपीठानं श्रीसमर्थ जांब येथे समर्थ संगमाचं आयोजन केलं. त्याबाबतचा ‘जागर’ समर्थ महासंगमाचा’ हा वाचनीय लेख ‘दरवळ’ मध्ये आपल्याला वाचायला मिळतो.
‘वाचकांविषयी कायम कृतज्ञ’ या लेखातून वाचनसंस्कृती बाबत मार्मिक आणि अत्यंत सडेतोड भाष्य लेखकानं केलं आहे. तसंच ‘दोन घडीचा डाव’, ‘शाकाहाराची चळवळ राबवा!’, साहित्यिक दहशतवाद घातक’, ‘देशभक्तीची व्याख्या काय?’ ‘हे करायलाच हवं!’, ‘पुरोगामी कोणाला म्हणावं?’ ‘जातीय गंडाची शोकांतिका!’ ‘उमलत्या अंकुरांना बळ द्या!’ ‘मी का लिहितो?’ अशा एकसे बढकर एक दर्जेदार लेखांनी ‘दरवळ’ बहरला आहे.’दरवळ’चं विलोभनीय मुखपृष्ठ, त्याचा अनोखा बाज केवळ लाजवाब! वाचकांनी आपलं वाचन समृध्द करण्यासाठी लेखक घनश्याम पाटील यांचा ‘दरवळ’ हा दर्जेदार वैचारिक लेखसंग्रह नक्कीच आपल्या संग्रही ठेवावा आणि इतरांनाही भेट द्यावा जेणेकरून आपल्या विचारांची ‘बुनियाद’ – पाया पक्का होणार हे निश्चित!!
*दरवळ
लेखक – घनश्याम पाटील
प्रकाशक – चपराक (७०५७२९२०९२)
पाने – १२८, मूल्य – २००
-विनोद श्रा. पंचभाई
९९२३७९७७२५
खूप छान लिहिले आहे.
Woowww mast lihile aahe
खुप छान विवेचन….