म्हाळसा कुठे गेली?

म्हाळसा कुठे गेली?

चपराक दिवाळी 2020
‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी आणि आमची उत्तमोत्तम पुस्तके मागविण्यासाठी व्हाटस् अ‍ॅप क्रमांक – 7057292092

म्हाळसा कुठे गेली? असा काही प्रश्न होऊ शकतो का? मला वाटते असाही प्रश्न होऊ शकतो. या प्रश्नाची उत्तरे अनेक मिळू शकतात. उदाहरणार्थ, ‘जय मल्हार मालिका संपली. त्यामुळे म्हाळसा आता दिसत नाही’ असे एक उत्तर मिळू शकते. तसेच ‘म्हाळसा नेवाश्यातही असेल; कारण म्हाळसा ही खंडोबाची पत्नी होती.’ या म्हाळसेचे माहेर नेवासा होते. त्यामुळे म्हाळासेचे मंदिर नेवाश्यामध्ये आहे. इथे प्रश्नाचा शोध पूर्ण होतो पण हा शोध समाधान देणारा होत नाही. म्हणून पुन्हा शोध घ्यावासा वाटतो. या म्हाळसेच्या काही नोंदी सापडतात, त्या शोधूया.

‘लीळाचरित्र’ हा मराठीतील आद्य ग्रंथ आहे. या ग्रंथाची निर्मिती ‘ज्ञानेश्वरी’च्या आधी चार वर्षापूर्वी, म्हणजे इ. स. 1286 मधील आहे. या ग्रंथामध्ये श्रीचक्रधरांच्या आठवणी येतात. या आठवणी इ. स. 1270 ते इ. स. 1278 या काळतील असाव्या असे मानले जाते. या यादवकालीन ग्रंथामध्ये म्हाळसेचे, तिच्या मंदिराचे वर्णन येते.

महानुभावांच्या पंचकृष्णांपैकी एक, पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर हे नेवाश्याला येतात. या काळात ते म्हाळसेच्या मंदिरात जातात. एकदा श्रीचक्रधरांची साधा नावाची शिष्या त्यांच्या दर्शनाला येते. त्यावेळी श्रीचक्रधर हे साधेला विचारतात की ‘‘तू म्हाळसेला पाहिले का?’’ त्यावर ती म्हणते, ‘‘नाही पाहिलं.’’

श्रीचक्रधर सांगतात की ‘‘जा आणि पाहा!’’

साधा जाते. त्यावेळी म्हाळसा मंदिराचे पुजारी हे म्हाळसेच्या मूर्तीला स्नान घालत असतात. परत आल्यावर साधा श्रीचक्रधरांना सांगते की, ‘‘म्हाळसा काळीमिटकी आहे.’’ तेव्हा श्रीचक्रधर तिला सांगतात, ‘‘तुम्हाला कोणी विचारले की म्हाळसा कशी आहे? तर असेच सांगणार का?’’ असे म्हणून श्रीचक्रधर हे साधाला पुन्हा म्हाळसेला बघायला पाठवतात. त्यावेळी साधेला पुन्हा म्हाळसाची मूर्ती दिसते. त्याचे वर्णन ‘लीळाचरित्रा’त येते. पुजार्‍यांनी म्हाळसेच्या मूर्तीचा संपूर्ण शृंगार केलेला असतो. म्हाळसेला रेशमी साडी, चोळी परिधान केलेली असते. हातात बांगड्या, कानात सोन्याची कर्णफुले, कुंकू, भांग, टिळा आणि नाकात मोत्याची नथनी घातलेली असते. म्हाळसेचे हे तपशीलवार वर्णन आणि साधेने आगोदर केलेले वर्णन हे दोन्ही एकत्र केले की म्हाळसेची संपूर्ण मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. तेराव्या शतकामध्ये म्हाळसेची मूर्ती अशी होती.

‘लीळाचरित्र’ येथेच थांबत नाही तर त्यामध्ये पुढे म्हाळसेचे मंदिर, त्या भोवतीचा परिसर यांचे सगळे तपशील येतात. या तपशीलांमधून आपल्याला कळते की म्हाळसा मंदिराला तटबंदी होती. तटबंदीच्या दक्षिण बाजूला दरवाजा होता. दरवाजावर एक मजला होता. त्याच्या पहिल्या मजल्यावर श्रीचक्रधर हे उभे राहतात. त्यावेळी खाली माघ महिन्यातील शिमग्याचा खेळ चाललेला असतो. म्हाळसा मंदिराच्या तटबंदीला पश्चिमेला आणखी एक दरवाजा होता. एका प्रसंगामध्ये म्हाळसा मंदिराच्या पश्चिमेकडील दरवाजातून बाहेर पडून घाट उतरून श्रीचक्रधर हे नदीच्या वाळवंटात जातात. या देवळाजवळ असणार्‍या नदीच्या घाटावर श्रीचक्रधर बसतात.

या सर्व उल्लेखातून म्हाळसा मंदिर डोळ्यासमोर उभे राहते. म्हाळसा मंदिराच्या तटबंदीला दक्षिणेकडे दरवाजा होता. तो दोन मजली होता. हा दरवाजा गावाच्या बाजूने होता. पश्चिमेकडील दरवाजा हा नदीच्या बाजूने घाटाकडे जाणारा, म्हणजे नदीच्या दिशेने होता. दोन दरवाजे, त्यातील एक दुमजली असणे यातून मंदिराच्या रचनेविषयी काही एक अटकळ बांधता येते. तसेच म्हाळसाचे दागिणे, तिची आरती, त्या क्रियेतील बारीकसारीक तपशील, मंदिराभोवतीचा परिसर हे सर्व पाहिले की म्हाळसामंदिराची भव्यता लक्षात येते.जनमाणसातील स्थान लक्षात येते. त्यावरून अंदाज बांधता येतो की म्हाळसा ही नेवाश्याची नगरदेवता होती. त्यामुळे हे मंदिर नेवाश्यातील एक मुख्य मंदिर होते. हे एक भव्य मंदिर होते. म्हाळसेची यात्रा मंदिराजवळील नदीच्या वाळवंटात भरायची, असे मानण्याला आणखी काही आधार सापडतात.

पहिला आधार ‘ज्ञानेश्वरी’चा आहे. ‘ज्ञानेश्वरी’मध्ये, त्रिभुवनैक पवित्र। अनादि पंचक्रोश क्षेत्र। जेथ जगाचे जीवसूत्र। श्रीमहालया असे॥ अशी ओवी येते. तर ‘ज्ञानेश्वरी’च्या कै. राजवाडे प्रतीत ऐसें युगीं परी कळीं। आणि महाराष्ट्रमंडळीं । श्रीगोदावरीच्या कुलीं । दक्षिणलिंगीं ॥ अशी ओवी येते. मात्र, यातील पहिल्या प्रतीतील ओवी वारकरी परंपरेने स्वीकारली आहे. तसेच ही ओवी अभ्यासकांनीही स्वीकारली; तशीच न्यायालयानेही मानली आहे. ही ओवी नेवासा गावाला अनुलक्षून योजली गेली आहे. ज्ञानदेव हे नेवासा नगरीचा आणि श्रीमहालया यांचा गौरव करतात. ते श्रीमहालयाला जगाचे जीवसूत्र मानतात पण ज्ञानदेव हे म्हाळसा असे न म्हणता श्रीमहालया असे म्हणतात. असे कशामुळे होते? त्याचे एक कारण गद्य ग्रंथ आणि पद्य ग्रंथ असे देता येईल. अनादि पंचक्रोशक्षेत्र असणार्‍या नेवासा नगरीमध्ये म्हाळसेच्या रूपाने जगाचे जीवसूत्र आहे. अशा देवतेचा गौरवाने तसेच काव्यात्म उल्लेख करताना म्हाळसेचे श्रीमहालया झालेले दिसते.

म्हाळसेचा आणखी एक उल्लेख सापडतो. ‘ज्ञानेश्वरी’नंतर शंभर- दीडशे वर्षांनंतरचा उल्लेख सापडतो. बहिरा जातवेध किंवा बहिरा पिसा या नावाचे भागवतटीकाकार चौदाव्या शतकात होऊन गेले. हे निश्चितपणे एकनाथपूर्वकालीन आहेत; कारण एकानाथांनी संतमालिकेत बहिरा पिसा यांचा उल्लेख केला आहे. हे नेवाश्याजवळील घोगरगावचे होते. त्यांच्या मठाच्या अवशेष आजही घोगरगावमध्ये सापडतात. त्यांची कुलदेवता म्हाळसा असावी कारण भागवताच्या दशमस्कंधात ते म्हणतात, हे टीका दशमस्कंधाचि । भाषा महाराष्ट्र देशिचि । अंतर्वेदि गोदेप्रवरेचि । ते प्रदेशिं निर्माण ॥ घोगरग्राम गोदातीरीं । पंचक्रोशा म्हालसा क्षेंत्री । ते निधिवास कुलेश्वरी । विष्णुमुर्ति ॥ ऐसा कुलदेवता गोविंदु । तोचि श्रीगुरु तोचि साधु । तेणेसि बहिरा जातवेदु । आनंदतु आनंदें ॥

‘ज्ञानेश्वरी’ तील ओव्यांमध्ये स्थल – कालाची संदिग्धता येथे नाहीशी होते. यातील निधिवास म्हणजे आजचे नेवासा होय. तेथे ‘म्हालसा’ ही कुलदेवता आहे. थोडक्यात एक निश्चित होते की नेवाश्यामध्ये म्हाळसेचे मंदिर प्रमुख होते. म्हाळसा अनेकांची कुलदेवता होती.

अशा या म्हाळसेचे मंदिर आज कुठे आहे? हे मंदिर नेवासा बुद्रुकमध्ये आहे. म्हाळसेचे एक छोटेखानी मंदिर नेवासा बुद्रुकमध्ये आपल्याला पाहावयाला मिळते. नकळत मनात प्रश्न तयार होतो की मग ते यादवकालीन भव्य मंदिर कुठे गेले? समजा हे मंदिर पडले असेल तर त्याचे अवशेष दिसले पाहिजे. तर तसेही काही आढळत नाही.

यामध्ये आणखी एक वास्तव आहे. नेवासा हे गाव खुर्द आणि बुद्रुक अशा दोन स्वतंत्र गावामध्ये विभागले आहे. यातील खुर्द आणि बुद्रुक हे दोन शब्द मराठीमध्ये फार्सी भाषेमधून आले. फार्सीमध्ये खुर्दा म्हणजे चिल्लर आणि बुजुर्ग म्हणजे मोठा असा अर्थ होतो. मोगलांच्या प्रभावामुळे हे शब्द मराठी भाषेत रूढ झाले. इतके की या शब्दांचा मूळ अर्थ बर्‍याचदा लोकाना माहीत नसतो. तसेच हे मूळ फार्सी शब्द आहेत असेही माहीत नसते. हे फार्सी शब्द मराठीत येताना खुर्दाचे खुर्द झाले आणि बुजुर्गचे बुद्रुक झाले. याचा सरळ अर्थ खुर्द म्हणजे छोटे गाव आणि बुद्रुक म्हणजे मोठे गाव. म्हणजे मुख्य गाव बुद्रुक आणि त्याच्या अनुषंगाने वसलेले दुसरे गाव खुर्द झाले. सामान्यपणे नदीकाठच्या गावांमध्ये हे दोन शब्द प्रचलित असतात. या अर्थानुसार नेवासा या बुद्रुक म्हणजे मुख्य गावामध्ये सध्याचे म्हाळसा मंदिर आहे. आजही आपण तेथे गेलो की हे छोटेखानी मंदिर आपल्याला पाहावयाला मिळते पण ज्ञानेश्वरी निर्मिती स्थळ, मोहिनीराज मंदिर हे सर्व खुर्दमध्ये आहेत आणि बुद्रुकमध्ये छोटेखानी म्हाळसा मंदिर!

म्हणून नेवाश्यात म्हाळसा आहे. तिचे मंदिर आहे पण हे मंदिर पूर्वपरंपरेशी नाते सांगत नाही, फक्त तिची आठवण जागी ठेवते हेही काही कमी नाही! पण भूतकाळाच्या धुक्यात हे मंदिर हरवून गेले आहे. अशावेळी विचारावे वाटते,
‘‘म्हाळसा कुठे गेली?’’

प्रा. डॉ. शिरीष लांडगे
अध्यक्ष, मराठी अभ्यास मंडळ,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
(लेखक हे मराठी साहित्य, संस्कृती, इतिहासचे अभ्यासक आहेत.)
9404980324

चपराक दिवाळी 2020

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

4 Thoughts to “म्हाळसा कुठे गेली?”

  1. Deshmukh Pandurang Bappasaheb

    शिरीष भाऊ
    सस्नेह नमस्कार,
    म्हाळसा कुठे गेली?
    खूप सुंदर लेख….
    वाचून झाल्यावर लिहावे वाटले म्हणून…
    ऐतिहासिक वर्णन लिहीत असताना मराठी चा सर्वागीण अभ्यास असावाच लागतो,
    पण आपण एक निष्णात आणि सिद्ध हस्त लेखक आहात,
    लेख वाचताना म्हाळसा आणि लीळाचरित्र दोन वेगळे मथळ्याचा संयोग सुरेखपणे आपण साधलाय…

    अभिनंदन आणि
    धन्यवाद
    सदैव शुभेच्छा

    1. शिरीष लांडगे

      धन्यवाद, आपली प्रतिक्रिया लेखनाला बळ देणारी आहे.

      1. लांडे काकासाहेब

        प्रा.डॉ. शिरीषकुमार यांनी म्हाळसा बद्दल उत्कृष्ट माहिती दिली, अनेक विचारवंत आणि साहित्य यामधे उल्लेख आहेत परंतू अशा ऐतिहासिक व्यक्तीचे अस्तित्व देखील पुसट झाले कालोघामधे.
        बोध- यावरण माणसाने आपले अस्तित्व किती आणि आपण किती क्षुल्लक आहोत हे समजून सामाजिक आचरण ठेवणे गरजेचे वाटते.

  2. Ra Chi Dhere Yanchi athwan zali

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा