आईचं पत्र हरवलं...

आईचं पत्र हरवलं…

Share this post on:

चपराक दिवाळी 2020

सणासुदीचे दिवस होते. वर्गातील पाच-सहा विद्यार्थी आज अनुपस्थित होते. काहीजण आईबाबांसोबत खरेदीला गेले होते. काही जवळच्या देवदेवतांच्या दर्शनासाठी गेले होते. वर्गात हजर असणार्‍या मुलांची मानसिकता आज जरा निराळीच होती! मित्र-मैत्रिणी आले नाहीत म्हणून कुणी उदास होतं तर कुणी उगाच चुळबुळ करत होतं! सकाळ सत्रात एक कविता शिकवून झाली होती. बर्‍याच जणांनी ती पाठही केली होती!

बेरजेची बरीच उदाहरणंही सोडवून झाली होती! काहीजणांनी टेबलावरील गोट्या, काड्या, चिंचुके वापरून खाली फरशीवर प्रात्यक्षिक करून दाखवली होती! आता मध्यांतरानंतर मात्र मुलांचा खेळायचा मूड होता. ‘‘मॅडम, कुठलातरी नवा खेळ खेळूयात का?’’ मधूनच आवाज आला आणि सार्‍याजणांनी ‘‘हो हो’’ म्हणत एकच गलका केला. ‘‘नवा खेळ उद्या सारेजण आल्यावर घेऊ. तोपर्यंत ‘आईचं पत्र हरवलं’ खेळूया’’ असं म्हणून मी मुलांना मैदानावर नेलं. ‘आईचं पत्र हरवलं… तेच आम्हाला सापडलं’ असं म्हणत मुलं खेळण्यात दंग होऊन गेली पण त्या खेळामुळं माझं मन विचारचक्रात गुंतलं! हृदयाच्या पेटीतली पत्रं सहस्त्र कमलदलांनी उमलून यावीत तशी उमलून आली.

माझे एक काका गावात पोस्टमास्टर होते. त्यांच्याकडे आजूबाजूच्या पाच-सहा खेड्यातील पत्रं आलेली असायची. त्यांच्या बैठकीत ते एका सतरंजीवर बसलेले असायचे आणि आम्ही त्यांच्या अवतीभोवती कुतुहलापोटी घुटमळत राहायचो. त्यांच्याजवळ आंतरदेशीय, पोस्टकार्ड, लिफाफे, पोस्टाचा शिक्का, एक पिशवी असे साहित्य असायचे. उघडी असलेली कितीतरी पत्रं आम्ही तेव्हा वाचून काढली होती. तसे करणे चुकीचेच होते पण त्यातील मजकूर वाचून आम्हाला आनंदाच्या गुदगुल्या झाल्यागत व्हायचं!

माझे तिन्ही मामा शहरात रहायचे. तेव्हा कधीतरी वर्षा-सहा महिन्याला आईची मामाची भेट व्हायची. आई प्रत्येक राखीपौर्णिमेला न चुकता मामाला राख्या पाठवायची. त्यासोबत एक पत्र ठरलेलं असायचं. मोत्यासारखं अक्षर असणारी माझी आई त्या पत्रात तिचा जीव ओतायची. पत्र लिहिताना कधीकधी तिच्या नेत्रातूनही मोती पडायचे पण हे मोती तिच्या मनातल्या भावनांना मुक्त वाट करून द्यायचे! तिचे नाव राधा. माहेरचे सारेजण मात्र तिला प्रेमाने ‘माई’ म्हणायचे! मामाकडे गेल्यावर आईने पाठवलेल्या पत्राचा आवर्जून उल्लेख होई! मामी म्हणायची, ‘‘माई, तुम्ही पत्र फार सुंदर लिहिता, पत्रं नसून तो खराखुरा संवाद वाटतो.’’ खरंतर ती पत्रातून बोलायची! कधी तरी हे पत्रलेखनाचं काम माझ्याकडे असायचं! तेव्हा ती जे सांगेल ते मी लिहीत जाई आणि तिच्या नितळ अंतरातल्या प्रेमाच्या झर्‍याचं मला दर्शन होई!

आईच्या लग्नाआधी मोठ्या मावशीची मुले लहान होती. त्यांना सांभाळण्यासाठी आई मावशीजवळ रहायची. मावशीची तब्येत नाजूक असल्यानं तिला एकटीला घरकाम व लेकरांना सांभाळणं व्हायचं नाही. तेव्हा आईनं तिच्या लेकरांना जिवापाड जपलं! त्यामुळे तिच्या दोन्ही मुलांचाही माझ्या आईवर फार जीव. काळ पुढे सरकत गेला. मावसभाऊ शिक्षणासाठी दूर गेले. तेव्हा त्यांनाही आई मायेनं ओतप्रोत भरलेली पत्रे ती पाठवायची! भावांना बाहेरगावी राहताना आईची पत्रे आधार बनायची. ती म्हणायची, ‘‘या पत्रातून मला भेटीचा आनंद मिळतो गं!’’ दूर राहणार्‍या पाखरांना ती पत्रातून भेटायची.

माझ्या मोठ्या ताईलाही पत्र लिहिताना मी अनेकदा पाहिलं होतं. ती तिच्या मैत्रिणीला, मावशीला, मामाला पत्र पाठवायची. तिची कुण्या देवी-देवतांची लिहीलेली पत्रं मी वाचायची! ‘अकरा जणांना, सात जणांना अशी पत्रं पाठवा एवढ्या एवढ्या दिवसात तुम्हाला साक्षात्कार घडेल… आनंदाची वार्ता येईल’ असला काहीतरी मजकूर त्यात असायचा. आधी तिला असे पत्र आलेले असायचे आणि ती त्यात सांगितलं तसं करायची! माझ्या मनाला त्याचं आश्चर्य वाटायचं! पण ती मात्र मनोभावे पत्रं लिहायची! ती बर्‍याच पत्रांच्या शेवटी ता. क. असं लिहायची. तेव्हा ते ता. क. काय असावं याचं कुतुहल असायचं.

मोठ्यांसाठी आलेल्या पत्राच्या शेवटी आम्हालाही स्थान असायचं. ‘छोट्यांना गोड गोड पापा.’ अशी एकच ओळ सुखावून जायची. दूरवरून आलेला तो पापा साखरेपेक्षाही गोड असायचा!

आनंद देणार्‍या पत्रासारखीच काही पत्रं दुःखही देऊन जायची. या पत्रात जवळचं कुणीतरी वारलेला मजकूर असायचा. ही पत्रं वाचून बरेचदा आईला रडताना पाहिलं. वडिलांना, आजीला व्याकूळ होताना पाहिलं आणि त्यांना अशी पत्रं फाडतानाही पाहिलं. ‘‘अशी पत्रे फाडून टाकावीत’’ असं ते म्हणायचे. आनंदाची पत्रं जपून ठेवली जायची अन् दुःखाची पत्रं फाडली जायची! माणसाचं असंच असतं ना! गोड आठवणी चघळत बसतो आणि कटू आठवणी विसरण्याचा प्रयत्न करतो.

घरातील धार्मिक वातावरणानं आमच्या मनाच्या भूमीला कायम पवित्रतेची गोडी लागलेली असायची! आजी नेहमी हरिविजय, विष्णुसहस्त्रनाम, शिवलीलामृत, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी अशा पोथ्यांचं वाचन करायची… वडिलांजवळ तर संतसाहित्याची कितीतरी पुस्तकं होती… चांगदेवानं लिहिलेल्या कोर्‍या पत्राबद्दल आज्जी फार सांगायची… चांगदेवाहून वयानं लहान असल्यानं संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांना पत्राच्या सुरूवातीला काय लिहावं हेच लक्षात येत नाही आणि म्हणून तो कोरं पत्र पाठवतो…! अशी कोरी पत्रंही खूप काही सांगून जातात! वयानं वाढलेला चांगदेव बुद्धिनंही कोराच.! असं म्हणणार्‍या मुक्ताईला पुढं चांगदेव गुरूस्थान देतात…! अशा कोर्‍या पत्राची कथा आज्जीकडून ऐकलेली…!

आमच्या मराठीच्या व हिंदीच्या मॅडमची व्याकरण शिकवण्याची पद्धत फार प्रभावी होती! अगदी बारीक बारीक मुद्दे त्या व्यवस्थित सांगायच्या! पत्रलेखनाचे प्रकार… औपचारिक-अनौपचारिक… मायना कसा लिहावा… पत्ता वगैरे सारं सारं त्या तळमळीने शिकवायच्या… आणि वेगवेगळ्या पत्रांचे आमच्याकडून लेखन करून घ्यायच्या! अर्थात परीक्षेत व्यवस्थित लिहिणार्‍याचं निकाल लागल्यावर कौतुक ठरलेलं असायचं!

शिक्षणासाठी मला आईवडिलांपासून लांब रहावं लागलं… सोबतीला कुणी न भेटल्यानं किरायाच्या एका खोलीत मी एकटीच रहायचे! साडे सात ते साडेबारा कॉलेज संपल्यावर घरी येऊन स्वयंपाक, भांडे, धुणं, झाडझुड यात दिवस संपायचा. रात्री तीन तास-चार तास अभ्यास… त्यानंतर अंथरूणाला पाठ टेकताच आईवडिलांच्या आठवणीनं मन भरून यायचं! तसंच उठून आईला पत्र लिहित बसायचं! घर सोडून शंभर-दीडशे किमी लांब राहतेय म्हणून तिला माझी फार काळजी वाटायची! या पत्रातून तुझी फार आठवण येतेय… तू माझी काळजी करत जाऊ नकोस… मी चांगली राहते… अभ्यास करते… मी खूप शिकवून तुझं स्वप्न पूर्ण करून दाखवीन असं वारंवार सांगितलेलं असायचं! खरं तर ओसाड वाळवंटात या पत्रांनीच माझ्या मनाला पालवी फुटली!

तेव्हाच एका वडिलांनी आपल्या प्रिय कन्येला अर्थात जवाहरलाल नेहरूंनी इंदिरा गांधी यांना लिहिलेल्या पत्राबद्दलही बरंच ऐकण्यात होतं! इंदिराजी तेरा वर्षाच्या असताना लिहिलेल्या पत्रात त्यांनी लाडक्या इंदूला जीवनात कसं जगावं… कसं वागावं… याविषयी लिहिलं होतं! इंदूचे बाबा कारागृहात होते आणि माझ्या बाबांनीही मला शिकायला येताना अशा बर्‍याच गोष्टी सांगितल्या होत्या! नेहरूंनी नंतरच्या काळातही इंदिराजींना बरीच पत्रं लिहीली. तेव्हा स्वातंंत्र्य, भारतीय जनतेसमोरील समस्या, भारतातील राजकीय परिस्थिती विषयीचे विचार ते पत्राद्वारे मांडत.

अब्राहम लिंकन यांनी हेडमास्टरांना लिहिलेलं पत्रही किती प्रभावी! आपल्या मुलाला त्यांनी काय काय शिकवावं हे किती ओघवत्या शब्दशैलीतून सांगितलं त्यांनी! आपल्या मुलांनं जिकडे सरशी तिकडं धावत सुटणार्‍या गर्दीत सामावू नये. जशास तसे वागायला शिकावं. उरातलं दुःख दाबून त्यानं हसायला शिकावं पण आसू ढाळायची लाज वाटू देऊ नये. त्याला मायेनं वागवा पण लाडावू नका, अशा कितीतरी जीवनमूल्यांची ओळख या पत्रातून होते.

मृत्युंजय, पानिपत, छावा, व्यक्ती आणि वल्ली, झाशीची वाघीण, कुणास्तव कुणीतरी, वणवा अशी बरीच पुस्तके मी वाचली होती… जी. ए. कुलकर्णी यांच्या पत्राबद्दल मी वाचलं होतं… पण अत्यल्प! नंतर तेही विस्मरणात गेलं! पुन्हा ओघाओघात कधी विस्ताराने त्याबद्दल काही वाचलं नाही…!

आईला गाण्याची फार आवड! ती आम्हा सार्‍या भावंडात रूजली! घरी ग्रामोफोन असताना बरीच गाणी ऐकली होती. एका काकांकडे साउंड सिस्टीमवरही या पत्रावर बरीच गाणी ऐकली होती. हिंदीतील कितीतरी गाणी तेव्हा ओठावरती रूळायची!

पत्राला इंग्रजीत लेटर तर हिंदीमध्ये पत्र, खत, चिठ्ठी या नावांनीही संबोधलं जातं.

‘सरस्वतीचंद्र’ चित्रपटातील ‘फूल तुम्हें भेजा है खत में फूल नहीं मेरा दिल है…’ हे ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट जमान्यातील अजरामर गीत…!
‘लिखे जो खत तुझे वो तेरी याद में…’
‘ये मेरा प्रेमपत्र पढकर के तुम नाराज ना होना…’
‘आपका खत मिला आपका शुक्रिया…’
‘मुझे प्यार में खत किसीने लिखा है…’
‘तेरे खुशबू में बसे खत मै जलाता कैसे…’
‘नाम’ चित्रपटातील पंकज उदास यांनी गायलेलं ‘चिठ्ठी आयी है, आयी है,चिठ्ठी आयी है…’
‘प्यार की कागज पे दिल की कलम से… मैने खत महेबूब के नाम लिखा।’
‘खत लिखना है पर सोचती हूँ…’
‘हमने सनम को खत लिखा…’
‘जाते हो परदेस पिया जाते ही खत लिखना…’
‘प्रेमपत्र आया है उसीने बुलाया है…’
‘कबुतर जा जा जा… पहेले प्यार की पहेली चिठ्ठी साजन को दे आ…’
‘चिठ्ठी ना कोई संदेस जाने वो कौनसा देस…’
‘प्यार का पहेला खत लिखने में वक्त तो लगता है…’

अशी गाणी तेव्हा तरूणाईत फार लोकप्रिय होती!

आयुष्यात कधीही न पाहिलेल्या व्यक्तिवर फक्त त्याने लिहिलेल्या पत्रातून प्रेम कसे जडते यावर आधारित मध्यंतरी ‘सिर्फ तुम’ नावाचा चित्रपटही बराच गाजला! पत्र हा विषयच इतका जीवनाशी जुळला की त्याचं प्रतिबिंब चित्रपटाच्या पडद्यावर दिसू लागलं!

कॉलेजमध्ये असताना वर्तमानपत्र नियमित वाचण्याची सवय होती. घरमालकाकडे ‘लोकमत’ पेपर यायचा. लोकमतची ‘मैत्र’ पुरवणी युवावर्गात लोकप्रिय होती! तसंही लोकमतच्या चित्रगंधा, स्पंदन, सखी, मंथन याही पुरवण्या वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या होत्या! तर सांगायचं म्हणजे त्यातल्या ‘मैत्र’ पुरवणीत ‘प्रेमपत्रा’वर एक खास सदर होतं! नावासहित किंवा नाव न प्रकाशित करता कितीतरी सुंदर सुंदर पत्रं प्रकाशित व्हायची! पेपर आला की कधी एकदा ती पत्रं वाचू अशी सार्‍यांचीच स्थिती असायची! अशी पत्रं लिहिण्याची स्पर्धा घेण्यात यायची आणि निवडक पत्रांना प्रसिद्धीचा मान मिळायचा! या पत्रात प्रियकर आणि प्रेयसीच्या एकमेकांबद्दल असणार्‍या प्रेमभावना अलगद कागदावर उमटलेल्या असायच्या. तरूण मनाला गारवा देण्याचं काम ही पत्रं करायची.

तो काळच गुलाबी. अंतरातली गुलाबी स्पंदने शब्द बनून कागदावर धडकायची. कॉलेजमध्ये हमखास अशा पत्रांबद्दल कुजबुज असायची. कोण कुणाला पत्र पाठवतो? कोण आपल्या प्रेमाची कबुली पत्रातून देतं? याबद्दल मित्रपरिवारात कुतूहल असायचं!

गुप्तकाळात पत्नीच्या विरहात व्याकूळ झालेल्या एका यक्षाने पत्नीला मेघाबरोबर संदेश पाठवल्याच्या आधारावर ‘मेघदूत’ साकारलं असं मानलं जातं. खरंच कुणाच्या विरहातसुद्धा पत्र जखमेवरील मलम बनून जातात!

जशा विरहातल्या व्यथा पत्रातून व्यक्त होतात तसाच प्रिय व्यक्तीचा अबोला सोडवायलाही पत्रं धावून येतात. प्रेमभरल्या चार ओळींनी आलेला रूसवा क्षणात पळून जातो! फारच जादू असते ना पत्रात!

माझं लग्न झाल्यावर लहान बहिणीने मला चार-पाच पत्रं पाठवली होती. ‘माई तू गेल्यापासून घर अगदी शांत झालंय. तू असताना भिंतीही बोलक्या वाटायच्या. तू नाहीस तर करमत नाही गं. तू सुखात रहा. आम्हाला विसरू नको’ अशा आशयाच्या ओळी नव्या घरात भावनिक करून जायच्या! मी शिकायला असताना तिला बरीच पत्रं लिहिली होती. या नव्या विश्वातून मात्र मी तिला एकही पत्र नाही पाठवलं…!

सहा-सात वर्षे झाली असतील माझ्या लग्नाला… सासूबाईंचं किडनीच्या आजारानं निधन झालं… त्यानंतर बाबा म्हणजे माझे सासरे फार एकाकी पडले होते… घरात आम्ही सारे होतो पण त्यांना या उतारवयात संसारातून जीवनसाथी जाण्याचं दुःख सलत होतं. तेव्हा सासूबाईंच्या भावानं त्यांना एक पत्र लिहिलं होतं… ते पत्र मीच त्यांना वाचून दाखवलं होतं…‘माझी बहीण फार शांत आणि संयमी होती… तुमच्या एकत्र कुटुंबात तिनं स्वतःचं दुःख कधीही दाखवलं नाही… मुलं मोठी झाली… पायावर उभी राहिली… त्यांच्या लग्नानंतर सुखाचे दिवस आले पण ती अकाली गेली… आता तुम्ही असं खचून कसं चालेल? मुलांना आईनंतर तुम्हीच धीर देणार… दुःख करू नका… स्वतःला सावरा… वाचनात, मित्रमंडळीत मन रमवा’ अशा आशयाचं जवळपास पाच-सहा पानांचं पत्र होतं! त्यात सासूबाईंच्या बालपणापासूनच्या बर्‍याच आठवणींना त्यांनी उजाळा दिला होता… बहिणीच्या आणि भावाच्या नात्याची सुरेख वीण त्यात होती! मी वाचत असताना आमचा सारा हॉल स्तब्ध झाला होता! कुणाच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या! खरंच मामांच्या या धीर देणार्‍या पत्रानं बाबांनीही स्वतःला थोडं सावरलं!

सुवर्णा माटेगावकरच्या गोड आवाजात ‘हे पत्र तुला लिहिताना का अबोल होते शाई…’ ऐकलं होतं! अगदी डोळे बंद करून शांतपणे ऐकावं असं हे पत्र… काही पत्रं दुसर्‍याच्या तोंडून ऐकली तरी कर्ण तोषवून जातात! तसंच हे पत्र… खरंतर या पत्राला गोड पत्र म्हणायला हवं!!

या पत्रानंतर काही दिवसांपूर्वी अवधुत गुप्ते यांच्या काळीज चिरत जाणार्‍या स्वरातील ‘पत्रास कारण की’ ऐकलं होतं… पावसाअभावी शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं… डोक्यावर सावकाराचं कर्ज… आत्महत्या करण्यापूर्वी एका शेतकर्‍यानं लिहिलेलं ते पत्र होतं… ‘पत्रास कारण की बोलायची हिंमत नाही… पावसाची वाट बघण्या आता गंमत नाही’ असं म्हणत शेतकरी बायकोसाठी दागदागिने, कपडे घेऊ शकलो नाही… पोराला शिक्षण देऊ शकलो नाही… आईसाठी, शेतात राबणारे बैल… ढवळ्या पवळ्यासाठी काही करणं झालं नाही… आजारी आईची सेवा करू शकलो नाही… अशी खंत व्यक्त करतो…! जिवंत असताना जे बोलू शकला नाही ते सारं सांगण्यासाठी त्यानं पत्राचा आधार घेतला.

सध्या महाराष्ट्रातील घराघरात दूरचित्रवाणीवर पाहिला जाणारा कार्यक्रम म्हणजे… चला हवा येऊ द्या! यातील अरविंद जगताप यांनी लिहिलेली पत्रं फारच बोलकी आहेत! इमेल, स्मार्टफोनच्या जमान्यात नव्या पिढीला पत्रलेखन काय असतं हे या कार्यक्रमातून फार उत्कृष्टरित्या समोर आणण्याचं काम या टीमनं केलं आहे!

आईचं पत्र… खेळ एवढा रंगात आला की शाळेची घंटा कधी वाजली समजलंही नाही! शाळा सुटताच एकच कल्ला करत… उड्या मारत मुलं घरी परतली! खरं तर आज कुणाचंही पत्र हरवलं नव्हतं तर आठवणींच्या सुगंधात भिजलेली अनेक पत्रं आज गवसली होती! या पत्रांच्या आठवांनी आतील घन ओथंबून आलं. त्या सुगंधात मन धुंद झालं.

आज दळणवळणाच्या भरपूर सोयी उपलब्ध आहेत. नवीन तंत्रज्ञानानं जग जवळ आलंय! दुसर्‍या गावातील व्यक्तिला आपण हवं तेव्हा पाहू शकतो… बोलू शकतो… आणि तिथं जाऊही शकतो! आता पत्रं कुणाला लिहायची? कधी लिहायची? का लिहायची? घडून गेलेल्या कितीतरी आठवणी जशा जिवंत होतात तशी ही पत्रं जिवंत व्हायला हवीत! फोनवर बोलताना खूप काही सांगायचं राहून जातं… काही गोष्टी सांगूही शकत नाहीत! आत बरंच साचून राहतं… या साचलेल्या गोष्टींना पत्रातून प्रवाहित केलं तर? पत्रातून वैचारिक देवाणघेवाण केली तर? येणार्‍या पुढच्या पिढीसमोर आपण पत्रलेखनाचे उत्तमोत्तम नमुने सादर केले तर यंत्रवत बनलेली पिढी नक्कीच कुठल्या योग्य दिशेकडं मार्गक्रमण करेल! भावनाशून्य बनलेल्या त्यांच्या जीवनात व्यक्त होण्याची प्रेरणा मिळेल! कोर्‍या कागदावर लिहावी वेदनांची गाणी… पाषाणालाही पाझर फुटावा अशी! पत्रं लढायला शिकवतात… संकटात बळ देतात… ग्रीष्मात सावली देतात. जीवनावर प्रेम करायला शिकवतात… खरंच पत्रं खूप काही शिकवून जातात! पत्रं जगायला शिकवतात!

– मनिषा कुलकर्णी-आष्टीकर
मोहिनीराज
रामकृष्ण नगर,वसमत रोड,
परभणी 431 401
संपर्क – 9511875353

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!