कोरोनोत्तर काळातील विज्ञान कथेच्या दिशा

कोरोनोत्तर काळातील विज्ञान कथेच्या दिशा

चपराक दिवाळी अंक 2020

प्रास्ताविक :
कोरोनोत्तर काळ हा साधारणपणे पहिल्या जनता कर्फ्यूपासून मानता येईल. कोरोनोत्तर काळ म्हणजे घरकोेंडीचा काळ. घरकोंडीनंतच्या या संक्रमण काळात मराठी विज्ञानकथा कोणत्या दिशेने जावी अथवा जाऊ शकते याचे काही दिग्दर्शन करता येते. कोरोनोत्तर काळातील विज्ञानकथेच्या दिशांचे सूचन करावयाचे असल्याने आजवरची मराठी विज्ञानकथा कशी आहे? तिची आशयसूत्रे काय आहेत? हा तपशील तसा फार महत्त्वाचा ठरत नाही.

तिला पुढे कोणत्या वळणाने जायचे आहे? तिच्यासमोर कोणती नवी आव्हाने आहेत? कोणते नवे विज्ञान सिद्धांत तिची वाट पाहत आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. कोरोनोत्तर काळातील विज्ञानकथेची संभाव्य वाटचाल मांडण्यापूर्वी काही मर्यादांचे भान ठेवायला हवे. विज्ञानकथेत अजून दुसरी-तिसरी पिढीच लिहिते आहे. या कथेत अभिप्रेत असलेली सामाजिक परिवर्तनाची पहिली लाट अजून यावयाची आहे. मर्यादित वाचकांची मर्यादा ओलांडायची आहे. विज्ञानकथेच्या समीक्षेचे निकष अजून सर्वमान्य व्हायचे आहेत. तिच्यातला कलावाद अजून चर्चिला जायचा आहे. विज्ञानाने संपूर्ण जगाला प्रभावित केले असले तरी विज्ञानाचा साहित्यातला सहभाग अजूनही नगण्यच आहे. कोरोनोत्तर काळातील विज्ञानकथेसमोरील काही आव्हाने जुनीच आहेत. तेव्हा या नव्या काळातील आव्हाने ती कशी पेलू शकेल हे पाहणे रंजक ठरणार आहे.

कोरोनोत्तर काळ व नवी आव्हाने :

कोरोनोत्तर काळात काही सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक, शासकीय आव्हाने उभी ठाकली आहेत. या आव्हानांकडे विज्ञानकथा कोणत्या अंगाने पाहणार आहे? कोरोनोत्तर काळात निर्माण झालेल्या प्रश्नांवर विज्ञानकथा कोणते उपाय सुचवणार? हे पाहणे महत्त्वाचे आहे. विज्ञानकथेची पुढील वाटचाल पाहण्यापूर्वी नवी सामाजिक, सांस्कृतिक आव्हाने आपण बघू या. या काळात म्हणजे घरकोंडी काळात कौटुंबिक जिव्हाळा दाखवला गेला. हा जिव्हाळा निरंतर ठेवणे हे कौटुंबिक आव्हान आहे. मानवाच्या मूळ स्वार्थी व अहंकारी अशा विकारांना उचल खाऊ न देणे हे आव्हान आहे. घरकोंडीच्या काळात बहुतांश युवा वर्ग व्हाट्स अ‍ॅप वगैरे माध्यमांवर सतत ऑनलाईन होता. हिंसा आणि सेक्स यांना प्राधान्य देणार्‍या वेबसिरीज तो पाहत असल्याचीही शक्यता आहे. रोज दीड जीबी डाटाच्या भुलभुलैय्यात आपली बेरोजगारी तो विसरत होता. अशा युवांना आत्मभान देण्याची गरज आहे.

परत गेलेल्या परप्रांतीय मजुरांच्या जागी भूमिपुत्रांना सामावून घेण्याची चर्चा सुरू झाली पण भूमिपुत्रांना त्यासाठीचे प्रशिक्षण दिले गेलेले नाही. कोरोनोत्तर काळात ते द्यावे लागेल. वर्क कल्चर न रुजलेल्या युवकांना प्रशिक्षणासाठी तयार करणे हे आव्हान आहे. स्टार्ट अप इंडिया, स्किल इंडिया, मेक इन इंडिया यांसारख्या योजनात मराठी तरुणांचा सहभाग नगण्य आहे. लग्न, मर्तिक यांसारख्या विधीत लोकसहभागावर संख्येचे बंधन टाकले गेले ते योग्यच आहे पण ते तसेच मनापासून पुढेही पाळणे हे आव्हान आहे कारण आपण गर्दीप्रेमी, उत्सवप्रेमी आहोत. खरेतर पैसा, श्रम, वेळ, जोखीम यांची बचत करणारा, पर्यावरण रक्षण करणारा, लग्नातील मानापमान थांबवणारा हा संख्या मर्यादेचा निर्णय योग्य आहे पण कोरोना गेल्यानंतरच्या काळात किंवा कोरोनासह दीर्घकाळ जगणे भाग पडल्यावर आपण ही बंधने मनापासून पुढेही निरंतर पाळणार आहोत का? खोटी प्रतिष्ठा, बडेजावपणाचे आकर्षण नष्ट करणे हे आव्हान आहे. मृत्युविधीच्या विविध बंधनांमुळे मृत्युगीतांचा, शोक गीतांचा र्‍हास होण्याचा संभव आहे. यामुळे मात्र लोक वाङ्मयासाठी हा काळ प्रतिकूल आहे. घरकोंडी काळात फास्ट फूडची सवय सुटली ती तशीच टिकून रहावी. या काळात इतर आजाराचे रुग्ण जवळपास नाहिसेच झाले. आजारांचा बाऊ करण्याची, तत्संबंधीची काल्पनिक भीती बाळगण्याची आपली वृत्ती आता तरी नष्ट झाली पाहिजे. ‘जगण्यासाठी फार पैसा लागत नाही’ हे या काळाने दाखवून दिले. ज्यादा पैसा लागतो तो चंगळवादासाठी लागतो. बडेजावपणासाठी लागतो. या काळात नवे कपडे, सौंदर्यप्रसाधने, प्रवास, ब्युटी पार्लर यांसारख्या गोष्टी जगण्यासाठी अपरिहार्य नाहीत हे कळून आले. मानवी जीवनाला कोरोनाने दिलेला हा साधेपणा आम्ही टिकून ठेवणार आहोत का? हा साधेपणा मजबुरीतून आला होता का? हे स्पष्ट होईल.

ऑनलाइन शिक्षण ही चौथी क्रांती म्हटली जाते पण यासाठी लागणारी डिजिटल साधने सर्वांना उपलब्ध होतील का? परीक्षा रद्द झाल्यामुळे कोरोना बॅच म्हणून युवकांना नोकरीत डावलले जाईल का? होय रे आणि नाही रे ही दरी अधिक रुंद होईल का? गरीब पालक आपल्या पाल्यांना महागडी डिजिटल साधने घेऊन देऊ शकतील का? अशी अनेक आव्हाने शिक्षण क्षेत्रासमोर आहेत. यापुढे वर्क फ्रॉम होम ही जीवनशैली होणार असल्याने जास्तीत जास्त देशी अ‍ॅप वैज्ञानिकांनी शोधले पाहिजेत. शारीरिक अंतरामुळे आता गुरुजी विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप ठेऊ शकणार नाहीत. ऑनलाईन शिक्षण हे ऑफलाईन शिक्षणाची जागा घेऊ शकणार नाही असेही म्हटले जाते. लॉकडाऊनमुळे निसर्गाने मोकळा श्वास घेतला. हा श्वास या पुढेही आम्ही असाच घेऊ देणार आहोत का? निसर्गाची लूट आम्ही थांबवणार आहोत का? निसर्गाचा मूळ चेहरा जो अनेक वर्षांनी लॉकडाऊनमुळे समोर आलाय तो आम्ही तसाच निर्मळ ठेवणार आहोत की नाही? की पुन्हा समुद्रकिनारे प्लास्टिक कचर्‍याने आणि नद्या जैविक कचर्‍याने भरून काढणार आहोत? या काळात शासनाच्या अनेक त्रुटी लक्षात आल्या. व्हेंटीलेटरची संख्या, आयसीयू बेडची संख्या, पीपीई कीट्स यांच्याबद्दल मोठी चर्चा झाली. आरोग्यावरील बजेट अपूर्ण असल्याची चर्चा झाली. अशा पार्श्वभूमीवर आरोग्य बजेट वाढवणे, कर्मचार्‍यांची भरती करणे, देशांतर्गत वैद्यकीय उपकरणे तयार करणे ही आव्हाने आहेत. महसुलात मुख्य वाटा दारू या वाईट घटकाचा आहे असे लक्षात आले तेव्हा महसूल वाढीची इतर पवित्र क्षेत्रे शोधावी लागतील. तिजोरी भक्कम करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल. विदेशी कंपन्यांची गुंतवणूक वाढवावी लागेल. उत्तम दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर बांधण्यासाठी साधने व कुशल कारागीर पुरवावे लागतील. पर्यावरणवाद्यांची समजूत घालावी लागेल. स्थिर सरकारे द्यावी लागतील. स्थानिकांचा विरोध हाताळावा लागेल. बेरोजगारांना आलेलं नैराश्य दूर करावं लागेल. कारखानदारांनी मजुरांशी अधिक मानवतेनं वागायला हवं. कोरोनोत्तर काळात पैसा विरुद्ध जीवन असं मानवी जीवनाचं ध्रुवीकरण झालं. पैसा हवा असेल तर घराबाहेर पडावं लागेल. घराबाहेर पडल्यावर काळजी घेतली नाही तर कोरोनाची भीती अशा कचाट्यात मानवी जीवन सापडलं आहे. मृत्युचा विजय होईल की भाकरीचा अशा निर्णायक क्षणावर आपण येऊन पोहोचलो आहोत.

महिला विश्वावर या काळाचा मोठा प्रभाव पडला. आपल्या दिसण्यापेक्षा आपल्या असण्याला महत्त्व आहे हे ब्युटी पार्लर बंदीमुळे लक्षात आले. सर्व सण महिलांनी साधेपणाने साजरे केले. कुटुंबियांना नवीन पाककृती खाऊ घातल्या. त्यांचे श्रम वाढले. कोरोना प्रतिबंध हेच ध्येय ठेवल्याने एरवी मोलकरणीकडून करून घ्यावयाची कामे स्वतः केली. यातून स्वास्थ्यसंवर्धन झाले. साधेपणानं राहण्याची महिलांना सवय झाली. त्यांचा ऑनस्क्रीन वेळ वाढला. त्यातून त्यांनी नव्या पाककृती शिकून घेतल्या. यामुळं स्त्रीवाद होता तिथंच थांबला. कष्टकरी महिलांचे मात्र हाल झाले. त्यांचा रोजगार बुडाला. जीवनासाठी काय गरजेचं नाही हे कळून आलं. त्यानुसार कोरोनोत्तर काळातही जगता येईल का? सर्व प्रकारचा सोस कमी होईल का? साधेपणा टिकवून ठेवण्यासाठीचे सातत्य ठेवता येईल का? ही आव्हानं आपल्यासमोर आहेत. ऑनलाइनचा भडिमार झाल्यामुळं आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. ऑनलाइनची साधने पाल्यांना उपलब्ध करून दिली नाही तर गरीब पाल्य आपल्या पालकांचा तिरस्कार तर करणार नाहीत ना? सर्व प्रकारच्या सरकारी मदतीची अपेक्षा करणारी मानसिकता हे आपलं वास्तव आहे.

अशा लोकाना एका रात्रीतून आत्मनिर्भर कसं करणार? यापुढील काळात संरक्षण विषयक साधनं देशातच तयार करावी लागतील. कुटीर उद्योगांना चालना द्यावी लागेल. सेवा क्षेत्रात प्रचंड संधी निर्माण होतील. ती घेण्यासाठी श्रमसंस्कृतीची आवड तरुणात निर्माण करावी लागेल. प्राचीन कलांचे पुनरुज्जीवन करून आपलं सांस्कृतिक वैभव जगावर ठसविण्याची संधी अनेक जाणकारांनी सुचविली आहे. त्यासाठी देशप्रेम, एकात्मता, श्रमसंस्कृती, सजगता, सकारात्मकता इत्यादी मूल्यांची रुजवण करावी लागेल. त्याला वेळ लागेल. स्वातंत्र्य क्रांती, जलक्रांती, विज्ञान क्रांती, धवलक्रांती अशा क्रांती मालिकेतील ही एक नवी सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय, वैज्ञानिक, शैक्षणिक असे अनेक अंग असलेली ही क्रांती आहे. कोरोनोत्तर जगात जगताना आपल्याला बदलावं लागणार आहे. खळखळाट करून उपयोगाचा नाही. स्वप्नरंजन, आळस, नव्या बदलास विरोध, बडेजावपणाचा सोस यांसारख्या वाईट सवयी सोडाव्या लागतील, तरच जगात आपला निभाव लागेल. जो फीट असेल तोच टिकेल हे निसर्गाचं तत्त्व आहे. तेव्हा नव्या बदलाला आपण आत्मविश्वासानं आणि सकारात्मकतेनं सामोरं जाऊ या . यासाठी विज्ञान आपणास काही मदत करू शकेल. विज्ञानसाहित्य काही दिशा आपल्याला दाखवू शकेल. ही आव्हाने वैज्ञानिकांकडून पेलवली जावी म्हणून विज्ञानकथा लेखकांनी नव्या शोधांना चालना देणार्‍या विज्ञानकथा पुढील काळात अपेक्षित आहेत .

कोरोनोत्तर काळातील विज्ञान कथेच्या दिशा :

कोरोनोत्तर काळात विज्ञान कथेसंदर्भात पुढील दिशा संभवतात. मेकॅनिकल एज्युकेटर ही एक संकल्पना सुबोध जावडेकर यांच्या एका विज्ञानकथेत आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या मेंदुत एकाच वेळी ज्ञान भरले जाते. कोरोनोत्तर काळात या विज्ञान संकल्पनेच्या पुढच्या पायर्‍या विज्ञानकथेत अपेक्षित आहेत. आजपर्यंत विज्ञानकथेत काही सूत्रे किंवा वैज्ञानिक कल्पना येऊन गेल्या. त्याची यादी डॉक्टर नंदकुमार कामत व इतरांनी अशी दिली आहे. त्यानुसार संगणकाचे दुष्परिणाम, अवकाश व त्यासंदर्भातील कल्पना, प्राणिविज्ञान, भूविज्ञान, युद्ध विज्ञान, गर्भलिंग चाचणी, टाईम मशीन, वीर्य गोठवणे क्लोनिंग, यांत्रिक कुत्री व यंत्र मानव, परग्रहीय जीव, कामजीवन, हार्मोन्समधील बदल, स्त्रियांचे माणस विज्ञान, शास्त्रज्ञांचे भावविश्व, जनुक अभियांत्रिकी, अनु युद्ध, वायुदुर्घटना, यांत्रिक मातृत्व, काळाची समानता, धूमकेतूचे भ्रमण, संभाव्य रोगराई , उडत्या तबकड्या, पौराणिक प्रतिमा, टेलीपथी, परामानसशास्त्र, वैद्यकीय रोमांच, इनर स्पेस, दूरसंवेदन, अमरत्व, काळ ही चौथी मिती, किरणोत्सर्जन, सागरी जीव, अचाट प्राणी व वनस्पती, समांतर विश्व, संहारक शस्त्रे इत्यादी विज्ञान कल्पना व आशयसूत्रे आजवरच्या विज्ञान कथेतून आल्या आहेत. आता या पुढील काळात काही नवे वास्तव व कल्पित वैज्ञानिक सिद्धांत अपेक्षित आहेत. उदा. जन्माला येणार्‍या बाळाची नाळ अनेक दुर्धर आजारांवर उपयुक्त ठरते. या संशोधनाच्या संदर्भात जागृती निर्माण करावी म्हणजे विज्ञानकथा लेखन करणार्‍यांनी आपल्या विज्ञानकथेत ही विज्ञानकल्पना उपयोजित करावी.

मी एक अहिराणी विज्ञानकथा लिहिली आहे. त्यात याच विज्ञान सिद्धांताचे उपयोजन आहे. संस्कृतीचा र्‍हास होणार नाही अशी काळजी विज्ञानकथेने घ्यावी. माझ्या एका विज्ञानकथेत संशोधक आपले विज्ञान संशोधन जगजाहीर झाले तर संस्कृतीची चौकट उद्ध्वस्त होईल ही शक्यता लक्षात घेऊन आपले संशोधन नष्ट करतात. पुढील काळातील विज्ञानकथा लेखकांनी संस्कृतीचा र्‍हास होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. शेवटी विज्ञान हे मानवी रक्षणासाठी म्हणजे मानवाच्या संस्कृतीच्या रक्षणासाठीही कार्यरत असले पाहिजे. यांत्रिक गिरण्या आल्यापासून दगडी जाती बंद झाली आणि जात्यावरच्या ओव्या इतिहासजमा झाल्या. येथे श्रमसंस्कृती आणि लोकवाङ्मयाचे रक्षण यांच्या संदर्भात विज्ञानाची भूमिका खलनायकी ठरते. असे येणार्‍या काळात होऊ नये. विज्ञानाचा अंगिकार आणि संस्कृती जतन यांचा समन्वय साधायला हवा. फुफ्पूस रिप्लेसमेंट संदर्भात काही विज्ञानकल्पना विज्ञानकथाकारांनी मांडाव्यात कारण कोरोनामुळे फुफ्फूस खूपच प्रभावित होते आणि मृत्यू घडून येतो. तेव्हा वैज्ञानिकांनी त्याचे प्रत्यारोपण किंवा कोरोनावरील प्रतिबंधक लस यांचा शोध लावण्यासाठी वैज्ञानिकांना चालना देणारी विज्ञानसंकल्पना विज्ञान कथाकारांनी सुचवायला हवी.

कोरोनोत्तर काळातील विज्ञानकथेची नजर ग्रामीण भागाकडे जावी. तेथेही विज्ञान पोहोचले आहे. विज्ञानाने ग्रामीण जीवनावरही प्रभाव टाकलाय. ऑनलाईन शिक्षणक्रांतीत वडिलांनी अँड्रॉइड मोबाइल घेऊन दिला नाही म्हणून ग्रामीण भागातील किशोरवयीन मुले आत्महत्या करतील की काय अशी भीती आहे. म्हणजेच विज्ञानाच्या परिणामांपासून ग्रामीण भागही मुक्त नाही. तेव्हा येणार्‍या काळातील विज्ञानकथा ग्रामीण संवेदनकेंद्री असणे अपेक्षित आहे. विज्ञानकथेचा नायक प्रामुख्याने संगणक तज्ज्ञ, उच्चशिक्षित, अतिमहत्त्वाकांक्षी असा दिसतो. त्यांची नावे सुद्धा श्रीकांत, विप्लव, सुश्रुत अशी विशिष्ट वर्णदर्शक असतात. असे नायक चितारण्याचा एकांगीपणा विज्ञानकथेने आता करू नये. विज्ञानकथेचा नायक आतातरी सुखदेव, दगडू, धोंडू असा का असू नये? विज्ञानाबद्दलची ग्रामीणांची प्रतिक्रिया विज्ञान कथेने लक्षात घ्यावी. वाढते विमान अपघात, स्वयंचलित वाहन अपघात पाहून आपली बैलगाडीच बरी हा ग्रामीणांचा हताश उद्गार सुद्धा विज्ञानकथेने टिपला पाहिजे. विज्ञानाकडून अपेक्षापूर्तीत त्रुटी राहिली तर ग्रामजीवन विज्ञानाची टिंगल करायलाही धजावते. हा विसंवाद ललित विज्ञानाने का दुर्लक्षित करावा?

थोडक्यात कोरोनोत्तर काळात विज्ञानकथेवरचा शहरी उच्चशिक्षित यांची कथा ही प्रतिमा पुसून टाकण्यासाठी अधिक व्यापक होण्याची गरज आहे. विज्ञानकथेचा चेहरा यापुढेही मानवी असायला हवा. विज्ञान कथा विज्ञानकेंद्री असण्यासोबतच मानवकेंद्री कशी राहील याकडे लक्ष द्यावे. विज्ञानकथा लोकप्रिय करण्याचे व ती अधिकाधिक रसिकाभिमुख करण्याचे जुनेच आव्हान कोरोनोत्तर काळातही राहणार आहे. जास्तीत जास्त सामाजिक स्तर विज्ञानकथेत प्रतिबिंबीत होतील तेव्हा तिचा वाचकवर्ग वाढणार आहे. त्यासोबतच तिचा प्रसारही झाला पाहिजे. कथासंग्रहाच्या आवृत्त्या निघायला हव्यात. विज्ञानकथा लोकप्रिय व रसिकमान्य होण्यासाठी तिची नाट्यरूपे तयार करावीत. विज्ञानकथेच्या अभिवाचनाचे उपक्रम व्हावेत. विज्ञानाधारित मालिका पुन्हा याव्यात. भयकथा, गूढकथा यांच्यापासूनचे वेगळेपण विज्ञानकथेने जपले पाहिजे. डॉ. माधुरी शानभाग म्हणतात त्याप्रमाणे विज्ञान कथेतले विज्ञान जेवणातल्या मीठापुरते म्हणजे चवीपुरते असले पाहिजे.1 कोरोनोत्तर काळातही हेच सूत्र अपेक्षित आहे. विज्ञानकथेतून मानवी भावनांचा आविष्कार केंद्रस्थानी ठेवला जावा. यशवंत रांजणकर, सुबोध जावडेकर, बाळ फोंडके यांच्या कथा या अंगाने पाहता येतात. जैविक युद्धाची शक्यता यापूर्वीही चर्चिली गेली आहे. जैविक युद्धाची पुढची पायरी काय असू शकेल याचे अनुमान विज्ञानकथेने मांडावे. विज्ञान लेखकांच्या वेगवेगळ्या फळ्या निर्माण व्हायला हव्यात. एका फळीने विज्ञानातील संकल्पना कथेच्या माध्यमातून सांगाव्यात. दुसर्‍या फळीने विज्ञान शोधाला चालना देणार्‍या कथा लिहाव्यात. असे कार्यनियोजन व्हायला हवे. ललित विज्ञानापेक्षा लोकार्थी विज्ञानाची गरज कोरोनोत्तर कालखंडात अधिक आहे. लोकार्थी विज्ञानात नवे शोध, शोधांमागील तंत्रज्ञानाचे स्वरूप, अंधश्रद्धा व व्यसनांची कारणमीमांसा, व्यसनांचे दुष्परिणाम, दैनंदिन जीवनातील विज्ञानाची भूमिका, वैज्ञानिक घडामोडी, औषधांचे कार्य व परिणाम, संशोधकांचे जीवनकार्य, पर्यावरण रक्षण, आरोग्य वर्धन, नैसर्गिक आपत्तीची कारणमीमांसा व परिणाम यांचा समावेश होतो.

आर्सेनिक गोळ्या विविध सामाजिक संघटनांकडून वाटल्या गेल्या. त्यांच्या परिणामकारकतेची चर्चा लोकार्थी विज्ञानाने करावी. डॉक्टर तडकोडकर म्हणतात खरे तर विज्ञानसाहित्य मानववंशशास्त्र, मनोविज्ञान, गणित, शरीरविज्ञान या व अशा अन्य क्षेत्रातही कल्पनाविस्तार करू पाहील तर मानवी नेणिवा, जाणिवा समृद्ध होतील.2 कोरोनोत्तर काळातील विज्ञानाकडूनच्या अपेक्षाच डॉक्टर तडकोडकर यांनी व्यक्त केल्या आहेत. कोरोनोत्तर काळात आलेले नैराश्य किंवा कौटुंबिक जिव्हाळ्याची लाट हा मनोविज्ञानाचा भाग तर आदिवासी समूहात कोरोना मृत्युचे अल्पप्रमाण हा मानववंश विज्ञानाचा भाग आणि लक्षणे नसलेले रुग्ण हा शरीर विज्ञानाचा भाग कोरोनोत्तर काळातील विज्ञानकथेत वैज्ञानिक संकल्पना म्हणून उपयोजित करता येण्यासारखा आहे. कोरोनोत्तर काळातल्या विज्ञानकथांनी वाचकांना विज्ञानसाक्षर करावे. त्यांचा विज्ञान व्यासंग वाढवावा म्हणजे कुठल्याही साथरोगात नेमके कोणते कृत्य अवैज्ञानिक म्हणून घातक आहे हे त्यांना कळावे. एखाद्या साथीची कारणे, दक्षता, उपाय यांची माहिती द्यावी. यातून वैज्ञानिक प्रबोधन घडून येईल. तथापि अशा कथेवर प्रचारकी असा शिक्का बसणार नाही याचीही दक्षता घ्यायला हवी. येणार्‍या काळात असे साथीचे आजार वाढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर अशा कथा औचित्यपूर्ण ठरतील. अशा विज्ञान कथांनी सामान्य वाचकांच्या कुतूहलाचे शमन करावे. भोवतालच्या विश्वाबद्दलचे त्यांचे ज्ञान अद्ययावत करावे.

जनतेच्या धार्मिक स्वातंत्र्याची बाब मान्य केली, त्यांच्या श्रद्धेचा आदर केला तरी पुराणातील अशा कल्पना ज्यांना कुठलाच वैज्ञानिक आधार नाही, ज्या विवेकी माणसाला पटत नाहीत अशा कवीकल्पना पुराणातच काव्याच्या अंगाने ठीक आहेत. विज्ञानाचा परिस्फोट झाल्याच्या या काळात अशा कल्पना कशा स्वीकृत होतील? तेव्हा अंधश्रद्धा निर्मुलनाची आपली भूमिका कोरोनोत्तर काळात अधिक कटाक्षाने आणि प्रखरतेने बजावण्याची जबाबदारी विज्ञानकथा लेखकांवर येऊन पडली आहे. वैज्ञानिक दृष्टी रुजविण्याचा आपला वसा विज्ञानकथा कोरोनोत्तर काळातही टाकून देणार नाही. भविष्याची पूर्वकल्पना विज्ञान कथेने यापुढेही देत रहावी. भविष्यात विज्ञानात कोणकोणते शोध लावले जातील, त्या शोधांना मानवी जीवन कसे सामोरे जाईल याचे चित्रण विज्ञानकथेने कोरोनोत्तर काळातही करीत रहावे. आयुष्याचे नियोजन, पुढील पिढ्यांच्या संदर्भात पार पाडावयाच्या जबाबदार्‍यांचे नियोजन आधीच करून ठेवण्यासाठी काही पावले वर्तमानात उचलणे गरजेचे असते यांसारख्या गोष्टींचे सूचन विज्ञानकथेने करावे. भविष्यातील माणसांना कशा प्रकारचा संघर्ष करावा लागेल याची पूर्वकल्पना विज्ञानकथेने देत रहावी. वैज्ञानिक उद्बोधन आणि मानवी नात्यांचा व मानवी वृत्तीप्रवृत्तीचा शोध अशा दोन्ही अंगाने विज्ञानकथा कोरोनोत्तर काळातही लिहिली जाईल.

कोरोनोत्तर काळात नव्याने निर्माण झालेले सामाजिक व सांस्कृतिक पेच सोडविण्यासाठीचे उपाय विज्ञानकथेने दिल्यास विज्ञानकथा मुख्य प्रवाहात मानाचे स्थान पटकाविल. ग्रामीण जनांचा कल सार्वजनिक जीवनाकडे असतो. आता कोरोनोत्तर काळात शारीरिक अंतर ठेवावे लागणार असल्याने ग्रामीण जनांना सार्वजनिक जीवनाचा त्याग करावा लागेल. ते करताना कष्ट वाटतील. त्यांची समजूत कशी काढावी? त्यांना व्यक्ती जीवनाकडे वळवण्याचे आव्हान विज्ञानकथेसमोर असेल. विज्ञानकथा ही जर मानवाची कथा आहे तर तिनं हे काम केलंच पाहिजे. मानसशास्त्रीय परिवर्तन घडवून आणणारं औषध म्हणा किंवा सॉप्टवेअर म्हणा त्याचा वापर वैज्ञानिक सिद्धांतन म्हणून अशा विज्ञानकथेतून करता येईल. माझ्या एका कथेत मेंदूरोपण शस्त्रक्रियेतून व्यक्तिमत्त्वच बदलून टाकण्याची कल्पना मी मांडली. सुबोध जावडेकर यांनीही म्हटले आहे की विज्ञानकथांमध्ये रूढ विचारसरणीची झापडे दूर करायची शक्ती असते. नेहमीच्या चाकोरीतून आपल्याला बाहेर खेचून काढायची जी ताकद असते ती केवळ अपूर्व असते.3 ग्रामीण जनांची जी गर्दीत रमण्याची, सार्वजनिकरीत्या जगण्याची वृत्ती आहे, जगण्याची जी चाकोरी ठरून गेली आहे ती कोरोनोत्तर काळात गैरलागू ठरणार असल्याने अशा चाकोरीतून त्यांना बाहेर काढणारा उपाय विज्ञानकथेतून सांगितला जावा. विज्ञान कथेच्या प्रेरणाही कोरोनोत्तर काळात काहीशा बदलणार आहेत. आपली विज्ञानकथा प्रामुख्याने अवकाशविज्ञान, यंत्र विज्ञान, आरोग्य विज्ञान या विज्ञान शाखांनाच केंद्रवर्ती स्थान देत आली आहे. कोरोनोत्तर काळात विज्ञानकथेत परामानसशास्त्र, समाज विज्ञान, संस्कृती विज्ञान यांसारख्या विज्ञान शाखातील सिद्धांतही उपयोजित व्हायला हवेत. याच्याने विज्ञान शाखेचा परीघ विस्तारेल. शिवाय हा विस्तार सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेतून होईल हे जास्त महत्त्वाचं . भविष्यकाळातील सांस्कृतिक दृष्टिकोन अर्थपूर्ण होऊ शकेल याची चिंता विज्ञानकथाकार करतात. ही त्यांची विज्ञान मनस्कता अभ्यासकांनी लक्षात घेतलीच आहे. यापुढील काळातील विज्ञानकथेच्या निर्मितीसाठी अशी विज्ञानमनस्कता पूर्वीप्रमाणेच आवश्यक ठरणार आहे.

कोरोनोत्तर काळातील विज्ञानकथेचा चेहरा सांस्कृतिक असणे अपरिहार्य ठरणार आहे. संस्कृतीचा चेहरा नष्ट होऊ नये म्हणून माझ्या कथेतील शास्त्रज्ञ आत्महत्या करतात तेव्हा हा या कथेचा सांस्कृतिक चेहरा ठरतो. लोकार्थी विज्ञान आणि ललित विज्ञान या दोन्ही शाखांनी परस्सरपूरक कार्य करणे कोरोनोत्तर काळात अपेक्षित आहे. आजपर्यंत दोन्ही शाखा स्वतंत्रपणे कार्यरत होत्या. आता दोन्ही शाखांनी एकाच वेळी विशिष्ट वैज्ञानिक सिद्धांतावर कार्यारंभ करणे अपेक्षित आहे. म्हणजे लोकार्थी विज्ञानाने लोकाना कोविड-19 बद्दलची माहिती द्यावी. त्यांच्या संदर्भातले प्रबोधन करावे. तर ललित विज्ञानानं म्हणजे विज्ञान कथा-कादंबरीनं कोरोनावरील औषधाच्या शोधास चालना मिळेल या संदर्भातील काही दिशांचं सूचन होईल अशी विज्ञानकल्पना मांडावी. कोरेनोत्तर काळात निर्माण झालेल्या सामाजिक, सांस्कृतिक पेचावर विज्ञानाच्या सहाय्यानं तोडगा द्यावा. थोडक्यात कल्पनेतलं जग विज्ञान कथाकारांनी सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून रेखाटावं. कोरोनोत्तर काळानं आपलं दिसणं महत्त्वाचं नाही तर असणं महत्त्वाचं आहे ही गोष्ट बिंबवली. आपण जिवंत राहणं हीच प्राधान्यक्रमाची गोष्ट लोकानी मानली ही बाब लक्षात घेऊन विज्ञानकथाकारांनी अस्तित्ववादाच्या अंगानं आपली कथा लिहायला हवी. मानवाच्या आरोग्याचं रक्षण, आयुर्मानवृद्धि यासाठी विज्ञान धडपड करीत आलं आहे. ही धडपड मानवी अस्तित्व रक्षणाची धडपड आहे. अवयवरोपण हा वैज्ञानिक सिद्धांत निखळ अस्तित्ववादी आहे. यापुढील काळात अशा अस्तित्ववादी अंगानं जाणार्‍या विज्ञानकथा अपेक्षित आहेत. कोरोनोत्तर काळातील विज्ञानकथा रुक्ष होणार नाही याचीही काळजी कथाकारांना घ्यावी लागणार आहे. म्हणजे कलात्मकतेचं आपलं अंग राखून ठेवणं अपेक्षित आहे. कलात्मकतेचा सोप्या भाषेतील अर्थ भाव संक्रमण, त्यातून मिळणारा वाङ्मयानंद, रचनेचा सफाईदारपणा, आशयानुकूल आविष्कार, वाचकांचं अनुभवविश्व विस्तारणं असा होय.

विज्ञानकथा लेखक अगोदर चांगला विज्ञान व्यासंगी असण्याची अपरिहार्यता यापुढंही निरंतर असणार आहे. विज्ञानकथाकाराची वैयक्तिक अशी स्वभाव प्रकृती, विज्ञानाबद्दल कुतूहल व ते शमविण्यासाठी केलेलं वैज्ञानिक वाचन व त्यातून सुचणारं कथाबीज या मार्गानं प्रेरणेचा प्रवास होतो. म्हणून विज्ञानकथाकारांना वैज्ञानिक घडामोडींचा व्यासंग, विज्ञान साहित्याचा व्यासंग यापुढंही सातत्यानं ठेवावा लागणार आहे. विज्ञान लोकप्रियतेसाठी कथाकथनाच्या कार्यक्रमात आवर्जून विज्ञानकथा सादर करावी. विज्ञानकथेतल्या संभाव्यतेच्या आविष्कारासाठी कल्पनाशक्तीचा वारू चौखूर उधळू द्या मात्र वैज्ञानिक सूत्र कायम ठेवून कल्पिताचं शरीर हवं तितकं वाढवा. ज्या कथेतील विज्ञान हिणकस, अपुरं, चुकीचं असल्यामुळं जी विज्ञानकथा दर्जेदार गणली जाऊ शकत नाही तीही केवळ कथा म्हणून वरचढ ठरू शकते.4 असं डॉ बाळ फोंडके म्हणतात. तेव्हा आपण मांडणार असणार्‍या विज्ञान सिद्धांताबाबत न्यूनगंड बाळगू नये. त्यातलं वैज्ञानिक सिद्धांतन अपूर्ण असलं तरी कथा म्हणून ती विज्ञानकथा वरचढ ठरू शकते. कथाबीज शोधण्यासाठी इतरत्र जाण्याची गरज नाही. भोवताली घडणार्‍या अशा घटना ज्यांना विज्ञानाचा स्पर्श आहे, विज्ञानाची पार्श्वभूमी आहे अथवा विज्ञानाचा प्रभाव आहे अशा घटनातून कथाबीजं सुचतील. कोरोनोत्तर काळात अनेक तंत्रस्नेही, वैज्ञानिक वृत्तीच्या युवकांनी काही यंत्रं घरीच तयार केली. नाशिक जिल्ह्यातल्या शेतकर्‍यानं मोठ्या प्रमाणावर सॅनेटाईज करू शकणारं ट्रॅक्टर उभं केलं. अशा विज्ञाननिष्ठ घडामोडीतून कथाबीजं मिळू शकतात. हेवेदावे, रागलोभ कामक्रोध या विकारांचा पगडा मानवावर आहे. तो बदलणार नाही पण त्याचा विज्ञान कथेतला आविष्कार मात्र पारंपरिक ठेवून चालणार नाही. डॉक्टर फोंडके म्हणतात, विज्ञान कथांमधील आजचं कल्पित हे उद्याचं वास्तव असू शकेल.5 त्यामुळं त्या भविष्यातील वास्तवाची आजच कल्पना आल्यास त्यायोगे योग्य मार्ग अवलंबण्याची खबरदारी घेता येणं शक्य होणार आहे. यासाठी विज्ञानकथा हे मराठी ललित साहित्याला लाभलेलं एक परिमाण आहे अशी दृष्टी ठेवायला हवी. तेव्हा भविष्यातील वास्तवाची कल्पना आजच समाजाला देण्याची आपली भूमिका विज्ञान कथाकारांनी पुढील काळातही पूर्ववत ठेवावी.

रत्नाकर मंचरकर म्हणतात, विज्ञान आणि मानवी जीवन यातील संघर्ष, ताण आणि समन्वय यांचं दर्शन विज्ञान साहित्यातून घडतं. हे जीवन सुदूर भूतकालीन, क्वचित वर्तमानकालीन पण बहुदा भविष्यकालीन असतं. आजचा भक्कम वैज्ञानिक पुरावा आणि बुद्धिनिष्ठ अंदाज यांच्या आधारानं भावी काळात विज्ञान कसं विकसित होईल, कोणते शोध लागतील ,त्याचा मानवी जीवनावर कोणता परिणाम होईल, काय घडू शकेल याचे संभाव्य चित्र विज्ञानसाहित्य समोर ठेवते . 6 असे संभाव्य चित्र विज्ञान कथा आपल्या समोर ठेवते. त्यामुळं भविष्यकालीन जीवनाचं व्यवस्थापन करण्यास अवधी मिळतो. कोरोनोत्तर काळात तर असं व्यवस्थापन खूपच जरुरीचं ठरतं. अशावेळी कोरोनोत्तर काळात लिहिल्या जाणार्‍या विज्ञानकथेकडं अपेक्षेनं पाहता येईल. विज्ञानकथेत येणारी नवकल्पनासृष्टी दैनंदिन वास्तव विश्वापेक्षा एका बाजूनं भिन्न असली तरी दुसर्‍या बाजूनं या ना त्या प्रकारानं ती वास्तव विश्वाशीही अनुबंधित असते. कल्पना आणि वास्तव, सौंदर्य आणि सत्य याचा ताळमेळ विज्ञानकथेत साधलेला असावा लागतो.7 असे मंचरकर म्हणतात. त्याप्रमाणे कोरोनोत्तर काळातही असा ताळमेळ विज्ञानकथेने ठेवणे अपेक्षित आहे.

सौंदर्य आणि सत्याचे ताळमेळयुक्त चित्रण हे कलावादाकडे झुकणारे तत्त्व विज्ञान कथेला जपावे लागणार आहे. विज्ञान कथेतले विज्ञान प्रमाण विज्ञान, कल्पित विज्ञान, व्याज विज्ञान असे तीन प्रकारचे असते. कोरोनोत्तर काळ हा रंजनापेक्षा कर्तृत्वाचा व संघर्षाचा राहणार असल्याने रंजनकेंद्री असे व्याजविज्ञान विज्ञानकथेत येऊ नये अशी अपेक्षा आहे. अशक्य तर्क आणि कार्यकारणभाव यांच्या आधारे येणार्‍या विज्ञानकल्पना कोरोनोत्तर काळातल्या अशांत समाजजीवनासाठी विसंगत व अनुचित ठरतील. कोरोनाचा प्रभाव संपूर्ण पृथ्वीवरच्या मानव जातीवर पडला असला तरी भारतीय समाजजीवनावरील कोरोनाचा प्रभाव वेगळा असणार आहे. याचे कारण आपली बहुसांस्कृतिकता व संस्कृतीप्रियता होय. तेव्हा आजवरची विज्ञानकथा पाश्चात्यांच्या विज्ञानकथांच्या प्रभावापासून अलिप्त राहू शकली नसली तरी आता मात्र आपल्या विज्ञानकथा देशी वळणाने जाणे अपेक्षित आहे. कोरोनोत्तर काळात बदललेले भारतीय मानस ही त्यासाठीची सुसंधी आहे. लेखकांना विज्ञानकथेच्या घटकांकडे लक्ष द्यावे लागेल. पात्रांचे मनोव्यापार, कथानकाचा वेग, भावपूर्ण व्यक्तीरेखाटन, निवेदनशैलीची निवड, वैज्ञानिक परिभाषेचे उपयोजन, प्रत्ययकारी वातावरणनिर्मिती, कथेचा प्रारंभ व शेवट, संवादाची उचित मात्रा, मूल्यांची रुजवण, अर्थपूर्ण जीवनभाष्य, लेखकाची वैचारिक भूमिका, त्याची जीवनदृष्टी असे अनेक घटक लेखकांनी लक्षात घ्यावेत.

विज्ञान साहित्याच्या अंगानं महत्त्वाचं भाष्य करताना उषा देशमुख म्हणतात ‘‘विज्ञानाच्या अतीव प्रगतीमुळे विज्ञान साहित्याला बहर आला असेही नाही तर मूळ लेखकाच्या प्रतिभा मुशीतून ते जन्माला आले, त्यात सातत्य निर्माण झाले आणि ते टिकून राहील म्हणून त्याला आपण एक स्वतंत्र परिमाण देत आहोत.’’8 हे महत्त्वाचं आहे. म्हणजे विज्ञान साहित्याला आलेला बहर विज्ञानाच्या प्रगतीमुळं नसून तो लेखकाच्या प्रातिभाशक्तीमुळं आला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना आला म्हणून आता विज्ञानकथा लिहा असे होण्याची शक्यता आहे. असे होऊ नये तर काळाची गरज आणि लेखकाची प्रतिभाशक्ती यांचा मेळ साधला जावा. स्युडो सायन्स म्हणजे छदम्विज्ञान या विज्ञानाचा अवलंब कथाकारांनी करू नये. प्रबोधनाची भूमिका कायम ठेवत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची, सामाजिक बांधिलकीची भूमिका कायम ठेवत कोरोनोत्तर काळातही लेखकांनी लिहित राहिले पाहिजे. विज्ञानकथा लेखकांची कोरोनोत्तर काळातील भाषाविषयक भूमिका काय असावी? सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमाच्या शाळातून विज्ञान विषय इंग्रजीतून शिकविले जातात आणि या माध्यमांकडं मोठ्या प्रमाणावर पालक आकर्षिले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर मराठी माध्यमाच्या शाळांचा आणि पर्यायानं अशा शाळातून विज्ञान विषय मराठीतून शिकवण्याच्या परंपरेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनोत्तर काळात मराठीतून विज्ञान विषय शिकवण्याचा आग्रह कायम ठेवला पाहिजे. बारावी विज्ञानाची परीक्षा मराठी माध्यमातून देता येते हे किती लोकाना ठाऊक आहे? विज्ञान विषय मराठीतून शिकविण्यासंदर्भात आणखी एक मुद्दा येतो तो म्हणजे विज्ञानविषयक परिभाषेचा. मराठीतून विज्ञान विषयांचे अध्यापन बंद झाल्यास विज्ञानाच्या परिभाषेचा प्रश्नही उरणार नाही. विज्ञानाच्या परिस्फोटाच्या या संक्रमण काळात पेन ड्राईव्ह, अँजिओप्लास्टी, अँड्रॉइड, पॉवर बँक, हार्ड डिस्क यासारखे शब्द आहेत तसेच लिहायचे, उच्चारायचे की त्यांना मराठी प्रतिशब्द निर्मून ते योजायचे? भाषिक अस्मिता ही बाब तंत्रज्ञानभारीत पिढीला तितकीशी महत्त्वाची वाटेल का? असाही प्रश्न आहे. विज्ञान कथाकारांनी इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी पारिभाषिक शब्द निर्मून ते योजावेत. असे काही पारिभाषिक शब्द निर्माण करून मी योजले आहेत. उदा. पेनड्राईव्ह. याला मी मजकूर कुपी असे नाव दिले आहे. विज्ञानाचे दुसरे नाव कार्यकारणभाव तपासणे असे आहे. विवेक हा विज्ञानाचा आत्मा आहे. विज्ञान धर्मनिरपेक्ष आहे. सत्य आहे. तेव्हा विज्ञान कथाकारांनी विज्ञानाचे हे पावित्र्य भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. विज्ञान लेखकाची बांधिलकी मानव कल्याणाशी आहे. अवैज्ञानिक गोष्टींचे उदात्तीकरण त्यांच्या हातून कदापि होऊ नये. मी मेलो आहे असे जाहीर न करता समाजाची ढासळलेली नीतिमत्ता सावरणारे, तेजस्वी, परिवर्तन केंद्री विज्ञानसाहित्य लेखकांनी निर्माण करावे. विज्ञान लेखकाचे दैनंदिन आचरणही विज्ञानाधिष्ठित असावे अशी अपेक्षा गैर नाही. कोरोनोत्तर काळात काही बदल विज्ञानकथेला करावे लागतील. उदाहरणार्थ यंत्रमानवासाठी काही नियम आयझॅकने ठरवून दिले होते. तेच नियम आजच्या विज्ञान कथेतल्या यंत्रमानवाने आचरणात आणावेत का? स्वतःचा नाश अटळ दिसू लागताच आयझॅकचे मंत्रमानव आत्मनाश घडवून आणतात. बदललेल्या सांस्कृतिक पर्यावरणात आता हे यंत्रमानव या नियमांना तिलांजली देतील का? विज्ञानकथेतील कल्पनाविलास हा मनोमैथुन स्तरावरचा नसावा असे डॉ. देशपांडे म्हणतात. ज्या कल्पनाविलासामुळे नवसाहित्यातील मनोविश्लेषणाला रंग चढला त्याच कल्पनाविलासाने विज्ञान साहित्याचा घात केला. न लागलेले शोध, असिद्ध सिद्धांत, पुराण परीकथा यांच्यामुळे विज्ञानकथा कादंबरी ही मनोमैथुनाची सुखवस्तू झाली.9

धर्मराज माहूलकर यांच्या ‘झिरो स्पेस क्राफ्ट’ या कथेत आध्यात्माचे केंद्र असलेला भारत नष्ट होऊ नये म्हणून परग्रहीय वैज्ञानिक पृथ्वीचे रक्षण करतात. येथे प्रश्न असा आहे की आध्यात्मचर्चा विज्ञान अंतर्गत व्हावी का? आध्यात्म हे विज्ञान म्हणून सिद्ध झालंय का? साक्षात्कारासारख्या प्रसंगात घडणारं पारलौकिक तत्त्वाचं दर्शन हा आध्यात्माचा भाग विज्ञानानं मान्य केला आहे का? याची उत्तरं अजून मिळायची आहेत.

साधारणपणे असं दिसतं की विज्ञान कथेतील स्त्री चित्रण, स्त्रीचं व्यक्तीरेखाटन हे खुरटलं आहे. बाळ फोंडके यांचा ‘तीन पायांची शर्यत’ हा स्त्रीकेंद्री विज्ञान कथासंग्रह सोडल्यास इतर विज्ञान कथाकार स्त्री चित्रणाकडं दुर्लक्ष करतात. त्यांच्या कथांत स्त्रिया दुय्यम भूमिकेत येतात. तेव्हा कोरोनोत्तर काळातील विज्ञानकथा लेखकांनी विज्ञान साहित्यातील स्त्री चित्रण खुरटणार नाही याची दक्षता घ्यावी.

समारोप ..
अशा रीतीनं कोरोनोत्तर काळातील विज्ञान कथेसमोर विविध आव्हानं आहेत. ती पेलताना तिच्या दिशा काहीशा बदलणं अपरिहार्य आहे.

डॉ. फुला बागूल
68 पित्रेश्वर कॉलनी
शिरपूर जि. धुळे 425405
भ्रमणध्वनी – 9420605208

संदर्भ :

1 शानभाग डॉ. माधुरी (2004) मराठी विज्ञान साहित्य, संपा. प्रा. डॉ. म. सु. पगारे, प्रशांत पब्लिकेशन्स पुणे प्र. आ. पृ. 93

2 तडकोडकर डॉ. सु. म. (2004) मराठी विज्ञान साहित्य, संपा. प्रा. डॉ. म. सु. पगारे) प्रशांत पब्लि. पुणे. पृ. 70
3 जावडेकर सुबोध 2004 मराठी विज्ञान साहित्य, उनि. पृ 89
4 फोंडके डॉ. बाळ, ललित, मुंबई जुलै 1988 पृ. 60
5 फोंडके डॉ. बाळ, उनि. पृ. 64
6 मंचरकर र. बा. अक्षरगाथा, नांदेड, जुलै 2011 पृ. 13
7 मंचरकर र. बा. उनि. पृ. 13
8 देशमुख डॉ. उषा (1987) काव्य दिंडी, सुपर्ण प्रकाशन, पुणे. प्र. आ. पृ. 183
9 देशपांडे डॉ. शिरीष (2001) एप्सिलॉन, ग्रंथाली, प्र. आ. पृ. 11

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा