“मातोश्रीची करिता सेवा, तो प्रिय होतो वासुदेवा
पुंडलिकाचा ठेवावा, इतिहास तो डोळ्यापुढे”
अशी एक ओवी ह.भ.प. श्री. दासगणू महाराजांनी लिहिलेल्या ‘श्री गजानन विजय’ ग्रंथात आहे. आईवडिलांची सेवा करून वासुदेवाला प्रिय व्हा असा उपदेश त्यांनी या ओवीतून केला आहे.
जगभर लोकसंख्येच्या नऊ ते दहा टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. परदेशात ज्येष्ठ नागरिकांची संपूर्ण व्यवस्था सरकारी यंत्रणेद्वारे केली जाते. भारतातही अंदाजे लोकसंख्येच्या नऊ ते दहा टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. पूर्वी पासष्ट वर्षांनंतर व्यक्ती ज्येष्ठ नागरिक होत असे पण आता ही मर्यादा साठ वर्षांवर आणली आहे. आर्थिक सुबत्ता, वैज्ञानिक संशोधन, आधुनिक उपचार पद्धती यामुळे सध्या वयोमर्यादा वाढली आहे. त्यामुळे समाजात ज्येष्ठ नागरिकांची संख्या देखील वाढली आहे पण ज्येष्ठांच्या समस्या मात्र कायम आहेत. मरण येत नाही म्हणून जगायचं आशा अवस्थेत ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्याची होणारी संध्याकाळ आजही दिसून येते. दिवसेंदिवस ही समस्या उग्र रूप धारण करत आहे. या समस्येचा बिमोड करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, शासन व समाज यामध्ये सामंजस्य ठेऊन मार्ग काढणे ही काळाची गरज आहे. आयुष्याची सुरुवात उगवत्या सूर्याप्रमाणे होते. आपले निर्णय कुटुंबातील व्यक्ती शिरोधार्य मानतात. आपण ठरवू ती पूर्वदिशा असते. कुटुंबातील मान सन्मान आदर आशा वातावरणात जीवन जगत असताना केव्हा संध्याकाळ होते ते कळत नाही आणि ती देखील एवढी भयंकर असेल याचा अंदाज येत नाही! तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्या मुलाला जपणारी आई, स्वतः उपाशी राहून मुलाला जेऊ घालणारा बाप पण कालांतराने कुटुंबाचे नेतृत्व करणारा मुलगा आपल्या आईवडिलांचा त्याग विसरतो, आपलं कर्तव्य विसरतो. शारीरिक व्याधी आईवडील सहन करू शकतात पण वैयक्तिक अपमान, कौटुंबिक वादविवाद ज्येष्ठ आईवडील सहन करू शकत नाहीत.
वार्धक्य हा रोग नाही पण शरीर थकल्यामुळे अनेक प्रकारच्या तक्रारी सुरू होतात. सकस आहार, पुरेशी विश्रांती आणि मनाचा विरंगुळा यामुळे प्रकृती उत्तम राहते. मन आनंदी राहतं. वार्धक्याचं स्वागत सकारात्मक दृष्टीने करणं अत्यंत गरजेचं आहे. आहार, विहार, आचार आणि विचार महत्वाचे आहेत. ते आपले व्यवहार आणि आपली जीवनशैली यासाठी महत्वाचे असतात. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, आजारांना पायबंद, आजारांचे वेळेवर निदान आणि योग्य उपचार आणि सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा!
या थकलेल्या हातांनी एकत्र येऊन ‘ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या’ माध्यमातून जगण्यासाठी ताकत एकवटली! गावोगावी ज्येष्ठ नागरिक संघांची स्थापना झाली. यासाठी ज्येष्ठ नागरिक महासंघाने मोलाची कामगिरी बजावली. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या व त्यांच्या संघांच्या कल्याणकारी उपक्रमांचे एका नेतृत्वाखाली एकीकरण व सशक्तीकरण करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ज्येष्ठ नागरिक महासंघ सुरू झाले. ज्येष्ठांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा समाजासाठी उपयोग, ज्येष्ठांच्या कल्याणासाठी उपयोग व्हावा. थकलेल्या हातांना बळ मिळावं. ज्येष्ठ नागरिक संघांचे जाळे विणण्यात पुढाकार घ्यावा. या संघांना एका छताखाली आणून त्यांच्या कार्यात सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न करणं. ज्येष्ठ नागरिकांनी सुखी, निरामय आनंदी जीवन जगावे हा उद्देश ठेऊन ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवणे. ज्येष्ठांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे. त्यासाठी पुस्तके, पत्रके, नियतकालिके या माध्यमातून प्रचार व प्रसार करणं. ज्येष्ठांच्या समस्या, कल्याणकारी योजना आणि आवडीचे विषय यावर परिसंवाद घेणं. केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने ज्येष्ठांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करणे. महासंघामार्फत ज्येष्ठ नागरिकांना संघ सभासदत्व, सहयोगी सभासदत्व, पदसिद्ध सभासदत्व, सन्माननीय सभासदत्व, आश्रय दाता, हितचिंतक सभासदत्व आशा प्रकारची सभासदत्व दिली जातात. राज्यातील ट्रस्टच्या हॉस्पिटल मधून ज्येष्ठांना सवलतीत आणि खासगी हॉस्पिटल मधून प्राधान्याने ज्येष्ठांना आरोग्य सेवा मिळावी या साठी महासंघ प्रयत्नशील आहे. महापालिका आणि नगरपालिका रुग्णालयात ज्येष्ठांना मोफत उपचार दिले जातात.
ज्येष्ठ नागरिक संघांमार्फत सर्वसाधारणपणे राबविले जाणारे उपक्रम…
ऐंशी वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार.
आरोग्य शिबीर भरविणे.
वृक्षारोपण.
महिला सक्षमीकरण व सुदृढी करण.
शासकीय ओळखपत्र मिळवून देणे.
स्वास्थ्यचिकित्सा सवलतीसाठी ओळखपत्र.
कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबिर.
सहलींचे आयोजन.
मनोरंजनात्मक कार्यक्रम.
विरंगुळा केंद्र स्थापन करणे.
साहित्य मंडळ स्थापन करणे.
कविसंमेलनाचे आयोजन.
ज्येष्ठ नागरिकांना समुपदेशन.
ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या शासन दरबारी मांडणे.
प्रादेशिक वार्तापत्र तयार करणे.
वृद्धाश्रम स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘सखा’ चळवळ राबविणे.
याशिवाय ज्येष्ठ नागरिक संघ काही दिनविशेष साजरे करतात. जसे की, प्रजासत्ताक दिन, आंतरराष्ट्रीय महिला दिन, महाराष्ट्र कामगार दिन, आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन, जागतिक वृद्ध छळ प्रतिबंधक जागरूकता दिन, स्वातंत्र्य दिन, स्मृती भ्रंश रुग्ण दिन, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन, फेस्कॉम स्थापना दिन, आइस्कॉन स्थापना दिन वगैरे वगैरे. याशिवाय मासिक सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष समाजोपयोगी कार्य करणाऱ्या ज्येष्ठांना पुरस्कार वितरण इत्यादी.
दोन हजार अकरा साली एकूण लोकसंख्येच्या ९% लोकसंख्या ज्येष्ठ नागरिकांची होती. ज्येष्ठांसाठी राज्यसरकार कडून “पॉलिएटीव्ह केअर” (दुःख निवारण केंद्र) निर्माण करण्याचे ठरवण्यात आले असून त्यासाठी ७० परिचारिका आणि ४० डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येणार असून या कामासाठी वृद्धांसाठी काम करणाऱ्या संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. या संस्थांनी आशा प्रकारचे वृद्ध रुग्ण शोधून त्यांना या नियोजित केंद्रांपर्यंत आणायचे आहे. मानसिकदृष्ट्या खचलेल्या वृद्धांना या केंद्रांमार्फत समुपदेशन करणं, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्यांना बोलतं करणं, त्यांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करणं असे मनाला उभारी देणारे कार्यक्रम या केंद्रामार्फत राबविले जातील. फिरत्या आरोग्य केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार असून ग्रामीण भागात विशेष फिरती आरोग्य केंद्रे पाठवण्यात येणार आहेत.
थोडेसे मागे वळून पाहिले तर आपल्या लक्षात येईल की ज्येष्ठांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सर्व प्रथम संयुक्त राष्ट्र संघाने पुढाकार घेतला. संयुक्त राष्ट्र संघात एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला वृद्धांच्या समस्यांवर सर्वप्रथम चर्चा झाली. त्यानंतर या ज्येष्ठ नागरिक दिनाची संकल्पना पुढे आली. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन पासून सुरू झाला. भारतातील पहिला ज्येष्ठ नागरिक संघ एकोणीसशे सत्त्याहत्तर साली डोंबिवली येथे स्थापन करण्यात आला. रोटरी क्लब चे सदस्य श्री आर.एन.भट यांनी या संघाची मुहूर्तमेढ रोवली. वर्षभरातच या संघाला चांगला प्रतिसाद मिळून त्याचं रूपांतर महासंघात झालं. आर्थिक सुबत्ता व आधुनिक उपचार या मुळे ज्येष्ठांची वयोमर्यादा वाढली आहे. अर्थात ज्येष्ठांची संख्याही वाढली आहे. वाढत्या वयामुळे शारीरिक हालचालींवर व धावपळीवर मर्यादा येतात. त्यामुळे इच्छा असूनही ज्येष्ठांना अनेक गोष्टी करता येत नाहीत.
एकोणीसशे एकोणसत्तर साली युनोच्या आमसभेने जगातील ज्येष्ठांच्या विविध जीवनावश्यक प्रश्नांच्या अनुषंगाने तसेच ज्येष्ठांचे जीवनमान सुखकर करण्याबाबत विचार सुरू केला. युनोच्या कार्यालयात ज्येष्ठांच्या आरोग्य सेवा, आर्थिक उत्पन्न, विकास, आरोग्य संपन्न जीवन, दैनंदिन गरजा, सुरक्षितता, सामाजिक समस्या यासाठी समिती नेमून विविध देशांच्या अहवालांचे एकत्रीकरण करून आमसभेने एकोणीसशे आठयाहत्तर मध्ये ज्येष्ठांसाठी पहिली जागतिक सभा घेऊन जुलै/ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये एकशे एकविस देशांच्या ज्येष्ठ नागरिक प्रतिनिधींची बैठक घेतली. तीन डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी युनो आमसभेच्या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी फेसकॉम् निर्मिती प्रमुख डॉ. राधाकृष्ण भट यांना लाभली.
व्हिएन्ना इथे झालेल्या या ” जागतिक वयोवर्धन परिषदेत ” सर्व देशांनी आपापले ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर करून ते अंमलात आणावे असा आग्रह धरण्यात आला. परिषदेतून परत आल्यानंतर डॉ. भट यांनी अन्य संघटनांसह केंद्र सरकारला भारताचे राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर करण्याचा आग्रह धरला. याचा पाठपुरावा चालूच होता. शेवटी जानेवारी एकोणीसशे नव्व्याणव मध्ये तेव्हाचे पंतप्रधान माननीय श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी ” राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक धोरण ” जाहीर केले. याच धरतीवर भारतातील सर्व राज्यांनी आपले ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर करावे अशी केंद्र सरकारची सूचना होती. त्यानुसार महाराष्ट्राचे धोरण जाहीर करण्यासाठी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ, अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघ व आंतरराष्ट्रीय दीर्घायु केंद्र यांनी पुढाकार घेतला व पुण्याला ‘यशदा’ मध्ये अनेक सभा आयोजित केल्या. धोरणाचा आराखडा तयार करून केंद्र सरकारचे निवृत्त मंत्रिमंडळ सचिव श्री बी.जी.देशमुख यांच्या पुढाकाराखाली हे धोरण तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दोन हजार दोन मध्ये सादर करण्यात आले. पण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ‘अंमलबजावणीसाठी खूप खर्च येईल’ असे सांगून चौदा जून दोनहजार चार रोजी दोन पानांचे ‘महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक धोरण’ जाहीर केले. सर्व ज्येष्ठ नागरिक संघटनांनी त्याला विरोध केला. परंतु संघटनांनी सादर केलेला मसुदा बाजूला ठेवून सरकारच्या विविध विभागांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी काय करावे आशा सूचना देणारी एक सूची सामाजिक न्याय विभागाने बनवली व तेच ‘ज्येष्ठ नागरिक धोरण’ म्हणून तीस सप्टेंबर दोन हजार तेरा रोजी जाहीर केले.
उपलब्ध आकडेवारीनुसार व दोन हजार अकरा च्या जनगणनेप्रमाणे भारतात दहा कोटी तीस लाख ज्येष्ठ नागरिक होते. प्रजननाच्या घटणाऱ्या दरामुळे ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण वाढत आहे. आज देशात अकरा कोटी ऐशी लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यापैकी ऐंशी टक्के ज्येष्ठ नागरिक सांधेदुखी ने त्रस्त आहेत. त्यापैकी निम्म्या ज्येष्ठांना उपचारासाठी आर्थिक पाठबळ नाही. भारतात ज्येष्ठ नागरिक आपल्या मुलांवर अवलंबून आहेत. भारतात केवळ आई किंवा वडील स्वतंत्र राहण्याचं प्रमाण केवळ २.२% आहे. आई – वडील मिळून स्वतंत्र राहण्याचं प्रमाण १०% आहे. राहिलेले ८७.८% ज्येष्ठ नागरिक त्यांच्या मुलांकडे राहतात. पाश्चिमात्य देशात ज्येष्ठ नागरिक सररास एकएकटे राहतात. कुणाच्याही मदतीशिवाय आपल्या गरजा भागवतात. शारीरिक दृष्टीने ते निरोगी आणि कार्यरत असतात. विकसित देशातील आरोग्य व्यवस्थेचा त्यांना मोठा फायदा होतो. नियमित होणाऱ्या आरोग्य तपासण्या व फिजिओथेरपी सारख्या सुविधांमुळे त्यांची प्रकृती उत्तम राहते. याउलट भारतात कुटुंब हाच वृद्धांचा आधार असतो. वाढत्या वयाबरोबर त्यांच्या क्षमता कमी होतात. भारतात फक्त २६.३% ज्येष्ठ नागरिक आर्थिक दृष्टीने स्वावलंबी आहेत. जे सरकारी नोकरी मधून किंवा नावाजलेल्या कंपन्यांमधून निवृत्त झाले आहेत. ज्यांना पेन्शन , भविष्य निर्वाह निधी वगैरे फायदे मिळाले आहेत. २०.३% काही गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून आहेत. आणि ५३.४% म्हणजेच बहुतांश ज्येष्ठ नागरिक आर्थिक बाबतीत पूर्णपणे त्यांच्या मुलांवर अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांना राहण्यासाठी व जगण्यासाठी खूप तडजोडी कराव्या लागतात. अनेक गोष्टी मनाविरुद्ध स्वीकाराव्या लागतात. घरात पटवून नाही घेतले तर वृद्धाश्रमात ठेवले जाण्याची भीती असते. हा वृद्धाश्रम मुलाच्या आर्थिक परिस्थिती नुसार निवडला जातो. सरकारी वृद्धाश्रम थोडे असल्याने विनाअनुदानित वृद्धाश्रमात राहावे लागते. पैसे मुलाने भरले तर ठीक नाहीतर घरातील तडजोडी आहेतच! सासू-सून हा वर्षानुवर्षे चालत आलेला कळीचा, भांडणाचा मुद्दा असल्याने स्त्रियांची वृद्धाश्रमातील संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. पुरुष बऱ्यापैकी तडजोड करून राहतात. खरं तर ज्येष्ठ मंडळी आपल्या नातवंडांना जीवापाड जपतात त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात. नातवंडे ही त्यांच्यासाठी ‘दुधावरची साय’ असतात. याचा विचार करून मुलांनी अर्थात सुनांनी जर आपली मुलं पाळणाघरात ठेवण्यापेक्षा सासू सासऱ्यांकडे ठेवली तर आजी आजोबांचा वेळ चांगला जाईल, नातवंडांवर चांगले संस्कार होतील, मुलगा सून निर्धास्तपणे नोकरीवर किंवा कामावर जाऊ शकतील. आणि मुख्य म्हणजे वृद्धाश्रमांची संख्या कमी होईल पण हे जर तर आहे. वास्तव वेगळं आहे. ‘सासू सासऱ्यांचे उपकार नकोत’ असं म्हणणारी सून आणि ‘त्यांच्या भानगडीत पडायला नको’ असं म्हणणारी सासू जोपर्यंत या पृथ्वी तलावर आहेत तोपर्यंत वृद्धाश्रमांची संख्या वाढणारच!
कधीकाळी अधिराज्य गाजवलेल्या या ज्येष्ठ मंडळींना काहीशी मानसिक कुचंबणा सहन करण्याची वेळ आली आहे. ज्येष्ठ नागरिक संघातून विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम राबवून, आरोग्य तपासणी, व्यायाम व हास्यक्लब तसेच अन्य काही उपक्रम राबवून ज्येष्ठांनी आपले अस्तित्व राखले आहे.
ज्येष्ठांच्या कल्याणासाठी शासनाने सुरू केलेल्या काही योजना पुढीलप्रमाणे आहेत.
१. वृद्धाश्रम योजना –
अनाथ, निराधार, निराश्रित ज्येष्ठ नागरिकांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा म्हणून राज्य सरकारने वीस फेब्रुवारी त्रेसष्ट अन्वये ही योजना सुरू केली आहे. ही वृद्धाश्रम स्वयंसेवी संस्थांमार्फत अनुदान तत्वावर चालवली जातात. आतापर्यंत शासन मान्यताप्राप्त ३२ वृद्धाश्रम अनुदान तत्वावर सुरू आहेत. अनाथ, निराधार, निराश्रिताना या ठिकाणी मोफत प्रवेश दिला जातो त्यामध्ये साठ वर्षांवरील पुरुष व पंचावन्न वर्षांवरील स्त्रिया येतात. वृद्धाश्रमात निवास, अंथरूण, पांघरूण, भोजन, वैद्यकीय सेवा, मनोरंजनाच्या सोयी मोफत पुरवण्यात येतात. गरजू ज्येष्ठ नागरिकांनी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद व संबंधित संस्था यांचेकडे संपर्क साधावा.
२. मातोश्री वृद्धाश्रम योजना –
वृद्धाश्रमा बरोबरच ज्येष्ठ नागरिकांना काही अधिक सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात (उदा. बागबगीचा, वाचनालय, दूरदर्शन, बैठे खेळ इत्यादी) म्हणून सर्व सोयींनी युक्त असे मातोश्री वृद्धाश्रम ही योजना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासन १७ नोव्हेंबर ९५ रोजी स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत सुरू करण्यात आली आहे. या योजनेत शासनाने ३१ जिल्ह्यामध्ये ५ एकर जागेवर सुसज्ज मातोश्री वृद्धाश्रम बांधलेले असून हे वृद्धाश्रम स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विनाअनुदानित तत्वावर सुरु करण्यात आले आहेत. राज्यात सध्या २३ मातोश्री वृद्धाश्रम सुरू असून प्रत्येक वृद्धाश्रमात १०० लोकांना प्रवेश दिला जातो. त्यामधील ५०% जागा शुल्क भरून व ५०% जागा विनाशुल्क तत्वावर देण्यात येतात.
३. ज्येष्ठांना ओळखपत्र देणे –
ओळ्खपत्रामुळे ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवास भाड्यात (राज्य परिवहन महामंडळ) ५०% सवलत मिळते. शिवाय रेल्वे, बँक इत्यादी ठिकाणी या ओळ्खपत्रामुळे सुविधा मिळतात.
४. संजय गांधी निराधार योजना –
या योजनेत निराधार, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारीत महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, घटस्फोटीत महिला यांच्या बरोबर निराधार व आर्थिक दृष्टीने मागास वृद्ध नागरिकांना ही लाभ देण्यात येतो. त्यांना दरमहा ६०० रुपये देण्यात येतात.
५. श्रावण बाळ योजना – (राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना)
या योजने अंतर्गत ६५ वर्षांवरील स्त्री आणि पुरुष ज्येष्ठ नागरिकांना लाभ देण्यात येतो. राज्य शासनाचे रुपये ४०० व केंद्र शासनाचे रुपये २०० असे एकूण ६०० रुपये अर्थ साहाय्य प्रतिमाहC देण्यात येते. ही योजना संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्या मार्फत राबविण्यात येते.
६. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना –
या योजनेतून ६५ वर्षांवरील दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांना लाभ देण्यात येतो. राज्य शासनाचे रुपये ४०० व केंद्र शासनाचे रुपये २०० असे एकूण ६०० रुपये अर्थ साहाय्य दरमहा निवृत्ती वेतन म्हणून देण्यात येते. ही योजना संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांचे मार्फत राबविण्यात येते.
ज्येष्ठ नागरिकांच्या पालन पोषणाची जबाबदारी व ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार यांची जाणीव समाजाला व त्यांच्या पाल्यांना होणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांना कायद्यानेही संरक्षण दिले आहे.
कायद्यांतर्गत महत्वाच्या तरतुदी…
ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या पाल्यांकडून निर्वाह खर्च देण्याची तरतूद आहे.
निर्वाह भत्त्यासाठी तक्रार अर्जावर कार्यवाही करण्यासाठी न्यायाधिकरण स्थापन करण्यात आले आहे.
न्यायाधिकरणाच्या आदेशाविरुद्ध संबंधितांना अपील दाखल करता येते.
ज्येष्ठांचा सांभाळ न करणाऱ्या पाल्याना ३ महिन्यांचा तुरुंगवास, ५ हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे.
प्रत्येकाने आपल्या आईवडीलांचा सांभाळ करणे, त्यांच्या सुखसोयींची काळजी घेणे कायद्याने बंधनकारक आहे.
“आयुष्मान भारत” योजनेमुळे वृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. या योजनेची व्याप्ती वाढायला हवी. वयोवृद्धांना अधूनमधून भेटून त्यांची ख्याली खुशाली जाणून घेऊन त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये मदत करू शकतील आशा सामाजिक कार्यकर्त्यांची फळी उभी राहणं आवश्यक आहे. “हेल्पेज इंडिया” सारख्या काही स्वयंसेवी संस्था या बाबतीत चांगले काम करत आहेत. आशा आणखी संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. ज्येष्ठांविषयी सर्वांनीच आदराची भावना ठेवली पाहिजे. वृद्धांना सांभाळत नसलेल्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी कायदा असला तरी कुटुंबियांना धडा शिकवण्याची मानसिकता ज्येष्ठांची नसते. त्यामुळे ज्येष्ठांच्या सांभाळा बाबत नियमित जनजागृती शासन स्तरावरूनच अपेक्षित आहे. ज्येष्ठांच्या समस्या प्राधान्याने शासनाकडून सुटल्या पाहिजेत. पुण्यात “ह्युमन राईट्स” या संस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी सल्ला केंद्र चालवणारे ऍड. रमा आणि असीम सरोदे म्हणतात, ‘ज्येष्ठ नागरिक आपल्याच मुलां-मुलींविरुद्ध तक्रार अशाच वेळी करतात जेव्हा त्यांच्या समाधानाचे, चर्चेचे सर्व मार्ग बंद झालेले असतात. प्रश्न सुटत नाहीत तेव्हा शेवटचा मार्ग तक्रारीचा असतो.’ ते पुढे म्हणतात, ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी जपान पॅटर्न असावा. जपानमध्ये मुलांच्या कार्यालयीन वेळेत वृद्धांना सरकारी वृद्धाश्रमात ठेवले जाते. दवाखाना ते भोजन सगळे तिथे होते. ज्येष्ठांची काळजी घ्यायला सरकारी यंत्रणा राबते. मुलांचे लक्ष यामुळे कार्यालयीन कामात राहते. ज्यामुळे देशाची उत्पादकता वाढण्यास मदत होते.’
मध्य अमेरिकेतील कोस्टारिका देशातील ‘निकोया’, इटली मध्ये ‘सार्डीनिया’, युनान मधील ‘इकारिया’, जपानमध्ये ‘ओकिनावा’, आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील ‘लोम्बा लिंडा’ या सहा ठिकाणांना शास्त्रज्ञ ‘ब्लू झोन’ संबोधतात. या परिसरात राहणाऱ्या लोकांचं सरासरी वय जगातील इतर भागापेक्षा जास्त आहे. या सहा ठिकाणी राहणाऱ्या लोकांची वयाची शंभरी पार करण्याची शक्यता जास्त असते.
नुकताच १ ऑक्टोबर ला जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन होऊन गेला. त्या निमित्ताने ज्येष्ठांची सद्य परिस्थिती, त्यांचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, सरकार कडून दिली जाणारी मदत, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग या बाबत केलेला हा उहापोह. ज्येष्ठांना सन्मानाने वागवावे, ते तुमच्या आयुष्यातील योग्य मार्ग दाखवणारे “दीपस्तंभ” आहेत. शक्यतो त्यांना वृद्धाश्रमात जायला लागू नये असा त्यांचा सांभाळ करावा या विनंती सह लेखन थांबवतो. श्री. विकास विलास देव यांची आजी-आजोबांची महती सांगणारी एक कविता ….
कधी रागावणारे, कधी हसणारे
तर कधी प्रेमाने बोलणारे
पण प्रत्येक घरात आजी-आजोबा हवेत
असोत ना थोडे म्हातारे
रात्री झोपताना नातवंडांना गोष्टी सांगणारे
पाठीतून वाकलेले का असेनात
पण प्रत्येक घरात आजी-आजोबा हवेत
असोत ना थोडे म्हातारे
घरात नांदणारे देव पूजेत दंगणारे
घराला घरपण आणणारे
म्हातारपणामुळे जर्जर झालेले का असेनात
पण प्रत्येक घरात आजी-आजोबा हवेत
असोत ना थोडे म्हातारे
मुलाला मार्ग दाखवणारे, सुनेचे कौतुक करणारे
घराला आधार देणारे
सुरकुतलेल्या चेहेऱ्याचे का असेनात
पण प्रत्येक घरात आजी-आजोबा हवेत
असोत ना थोडे म्हातारे
जयंत कुलकर्णी
दूरभाष : ८३७८०३८२३२
आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.
खूप मर्मस्पर्शी लेख माऊली… .
व्वाह। समस्या, उपाययोजना, सरकारी मदत, कायदे सर्वांचा उहापोह अगदी आकडेवारीसह केला आहे अत्यंत अभ्यासपूर्ण असा लेख आहे. अभिनंदन!
खूप छान अभ्यासपूर्ण आणि विचारप्रवर्तक लेख आहे 👌
जयंतराव अत्यंत मार्मीक विवेचनपुर्ण शब्दांकन,धन्यवाद.