ब्रेकिंग न्यूजचा पोरखेळ

ब्रेकिंग न्यूजचा पोरखेळ

मंदार कुलकर्णी,
पुणे
9922913290
साहित्य चपराक दिवाळी 2020

‘सर्वांना महत्त्वाची वाटणारी घटना म्हणजे मुख्य बातमी’ या सूत्राकडून ‘त्या क्षणी ताजी असेल ती मुख्य बातमी किंवा ब्रेकिंग न्यूज’ असं सूत्र विशेषतः टीव्ही वाहिन्यांनी आणलं. या सूत्रामुळे अनेक चुकीचे पायंडे पडले, दिशा बदलल्या. प्रेक्षकांसाठी म्हणून केलं जात आहे असं सांगितलं जात असलं तरी प्रेक्षकच यातून खूप त्रस्त व्हायला लागला. ब्रेकिंग न्यूजच्या सूत्रानं एकप्रकारे बातम्यांचा पोरखेळच करून टाकला. तो कुठपर्यंत चालणार?

‘श्रीदेवी की बॉडी का अभी इंतजार…’ कुठल्या तरी हिंदी चॅनेलवर ही ब्रेकिंग न्यूज वाचली तेव्हा खरं तर तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा वृत्त-प्रकार पचवायची सवय असूनही मी थिजून गेलो. ‘श्रीदेवी की बॉडी का अभी इंतजार’ ही ब्रेकिंग न्यूज असू शकते? नाही. ‘लोगों का तांता लगा हुवा है’, ‘लोगों का जमावडा लगा हूवा है’ या ब्रेकिंग न्यूज असू शकतात, तर हीही होऊच शकते की! पण काही म्हणा, पत्रकारितेच्या विश्वात इतकी वर्षं काम करूनही आणि अनेक धक्के पचवूनही हा धक्का बसलाच. मग सहज म्हणून त्या चॅनेलचा स्क्रीन बघितला तेव्हा वरच्या बाजूला एक पट्टी, खालच्या बाजूला तीन पट्ट्या अशा सगळ्या मिळून चार ब्रेकिंग न्यूज दर सेकंदाला त्या चॅनेलवर येत होत्या. त्यामुळे ही तरी फारच बरी ब्रेकिंग न्यूज घेतली होती त्यांनी. एका चॅनेलवर कुठल्याशा मराठी कलाकारानं केलेलं ट्वीट ब्रेक केलेलं होतं, एका चॅनेलवर कुठल्या तरी खेड्यात लागलेल्या आगीनं तिथल्या प्रोड्युसरच्या बातमी-भानाला आग लावली होती, तर कुठं ‘अग्नी की शक्ती दे सकती है आपको ये ताकद’ ही ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवत होते. अर्थात ती जाहिरातीची पट्टी होती पण तिचं रूपडं मात्र इतर ब्रेकिंग न्यूजसारखं होतं, त्यामुळं गोंधळ होणं साहजिक होतं.

मला आठवले ते पत्रकारितेत प्रवेश करण्याआधीचे दिवस. जेव्हा टीव्ही म्हणजे दूरदर्शन किंवा फार तर झी टीव्ही एवढंच होतं, आकाशवाणीवर एफएम चॅनेल्सनी आक्रमण केलेलं नव्हतं आणि वृत्तपत्रं हेच बहुधा बातम्या मिळवण्याचं साधन होतं तेव्हाचा तो काळ. बहुतेक वर्तमानपत्रांमध्ये बहुधा एकच मोठी बातमी असायची (जिला मेन फिचर, हेडलाइन, टॉप न्यूज असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी संबोधनं असतात). ‘राजीव गांधी यांचं निधन’, ‘लातूरमध्ये भूकंप’, ‘काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला’ अशा या बातम्या असायच्या. (अजूनही असतात.) दूरदर्शनवर बातम्या लागायच्या, तेव्हाही याच बातम्या ‘ठळक बातम्या’ म्हणून सांगितल्या जायच्या. म्हणजे थोडक्यात एकच बातमी सगळ्यांसाठी महत्त्वाची असायची किंवा ती सगळ्यांना महत्त्वाची वाटायची. हेडलाइन ही ब्रेकिंग न्यूज झाली नव्हती तेव्हा!! त्यामुळं मग त्या बातमीचे तपशील जाणून घेणं, चर्चा करणं, माहितीची देवाणघेवाण करणं हा भाग अनेकांना आवडायचा. त्या काळात फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप या गोष्टी नव्हत्या, त्यामुळंही हा भाग रंजक असायचा हे तर काही वेगळं सांगायला नको.

बातम्यांचे स्रोत कमी असतानाच्या काळात मुख्य बातम्या विशिष्ट असायच्या. त्या खरंच मुख्य असायच्या, म्हणजे आत्ताही ठळक घटना घडतातच की पण ती प्रत्येक घटना ‘ब्रेकिंग न्यूज’ बनतेच असं नाही किंवा दुसरीच घटना ब्रेकिंग न्यूज होते. हे सगळं गौडबंगाल काय आहे हे आपण पुढं बघणारच आहोत पण एक गोष्ट निश्चित की चॅनेल्सपूर्व, फेसबुकपूर्व, व्हॉट्सअ‍ॅपूर्व जमान्यात मुख्य बातम्या या अक्षरशः ‘ठळक’ असायच्या. सगळ्यांसाठी त्या समान असायच्या. कोणती बातमी मुख्य होणार याचे काही सर्वमान्य निकषही होते. म्हणजे ती बातमी खरंच धक्कादायक असली पाहिजे, एकाच वेळी वेगवेगळ्या प्रदेशांतल्या लोकाना ती महत्त्वाची आहे असं वाटलं पाहिजे, तिच्यात समीपता पाहिजे, औचित्य पाहिजे, अनेक जणांवर ती परिणाम करणारी पाहिजे असे किती तरी. या निकषांवर घासलं की अर्थात जो काही लसावि यायचा त्यातून ती मुख्य बातमी निवडली जायची.

इतके सगळे निकष असल्यामुळंच की काय, विशेषतः वर्तमानपत्रांमध्ये दुसर्‍या दिवशी कोणती बातमी मुख्य बातमी म्हणून प्रसिद्ध होणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता असायची. आपल्याला वाटतेय ती घटना महत्त्वाची की दुसरी हे ताडून घ्यायला मजा यायची. अमुक वर्तमानपत्रात अमुक मुख्य बातमी असेल आणि दुसर्‍या वर्तमानपत्रात दुसरी असेल तर तुलना व्हायची. अनेकदा कुणाला तरी बोलणी खायला लागायची. संबंधित बातमी मुख्य ठरवण्याचे निकष चुकलेत की काय याबाबत चर्चा व्हायची.

अर्थात या सगळ्यात एक गोष्ट नक्की की तेव्हा जास्त बलशाली वर्तमानपत्रं होती आणि त्यांना ती बातमी द्यायला कमाल चोवीस तासांचा कालावधी मिळायचा आणि मिळतो. म्हणजे आजचं वर्तमानपत्र प्रसिद्ध झालं, की पुढचं थेट चोवीस तासांनंतर प्रसिद्ध होतं, त्यामुळं त्या बातम्या ठरवणं, निकष तपासणं, तपशील मिळवणं या सगळ्या गोष्टींसाठी कमाल चोवीस तासांचा कालावधी मिळतो. एक असाही भाग आहे, की ‘वर्तमानपत्र’ असं म्हटलं जात असलं, तरी तिथं दिलेल्या बातम्या इतर माध्यमांप्रमाणं ‘वर्तमान’ नसतात तर त्या काल घडलेल्या असतात. त्यामुळं थोडक्यात ‘कालच्या दिवसात घडलेली सगळ्यांत महत्त्वाची बातमी’ म्हणजे मुख्य बातमी असं थोडक्यात असायचं.

वर्तमानपत्रांकडून हळूहळू वृत्तवाहिन्यांकडे भर वाढत गेला तेव्हा खर्‍या अर्थानं ब्रेकिंग न्यूजची व्याख्या बदलली. खरं तर बातम्यांचं बाजारीकरण झाल्यावर असं म्हणू या! खरं तर पूर्वीही वृत्तवाहिन्यांवर ब्रेकिंग न्यूज म्हणजे ठळक बातमीच असायची. सतत ब्रेकिंग न्यूज देण्याची गरज आणि स्पर्धा नसायची. त्यामुळं अमुक ठळक बातमी देणं, तिचे तपशील देणं, अनुषंगिक बातम्या देणं हे काम अगदी छान पद्धतीनं चालू होतं. हळूहळू बातम्यांचं हे मार्केट वाढायला लागलं तेव्हा वृत्तवाहिन्यांचं स्वरूपच बदलायला लागलं. मला वाटतं साधारण 98-99 पासून बातम्यांचे निकष, मांडणी, सादरीकरणाची पद्धत हे सगळं फार वाईट पद्धतीनं बदलत गेलं. विशेषतः पूर्वी बातम्यांचे व्यवसाय पत्रकारितेशी संबंधितांकडे होते, तेव्हाही बरी परिस्थिती होती मात्र खूप वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्या उतरत गेल्या तेव्हापासून परिस्थिती बिकट झाली. आत्ताच्या स्थितीबद्दल तर बोलायलाच नको.

एक गोष्ट नक्की होती की प्रिंट म्हणजे मुद्रित माध्यमांकडे बातमी देण्यासाठी कमाल चोवीस तासांचा अवधी असणं हे त्यांचं बलस्थान होतं आणि ती मर्यादाही होती. ती मर्यादा टीव्ही वाहिन्यांनी तोडली. त्यांना आता अमुक घटना घडल्यानंतर ती दुसर्‍या दिवशी देण्यापर्यंत वाट बघायचं कारण नव्हतं. त्यांना ती लगेच देता येत होती. त्यामुळे तो मोका त्यांनी साधायला सुरवात केली. ती खरं तर सगळ्याच माध्यमकर्मींसाठी आनंदाचीच गोष्ट होती पण या सगळ्या काळात तारतम्य कमी झालं तेव्हापासून जास्त चिंताजनक स्थिती निर्माण झाली. मुद्रित माध्यमांचं बलस्थान होतं आणि आहे कारण त्यांना त्या घटनेबाबत थोडा विचार करणं, तिच्याबाबत खातरजमा करणं, तपशील जमवणं, चर्चा करणं या गोष्टी शक्य असतं. त्यामुळे ती मुख्य बातमी अधिक विश्वासार्ह पद्धतीनं मांडणं त्यांना शक्य होतं किवा आहे. टीव्ही चॅनेल्सना मात्र ही मुभा नाही कारण त्यांना त्या बातमीवर फार चर्चा करणं, खूप तपशील जमवणं वगैरेसाठी वेळ नाही. ताबडतोब देण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. खरं तर यातूनच ब्रेकिंग न्यूजची गोची सुरू झाली.

श्रीदेवी यांचं निधन झालं तेव्हा वर्तमानपत्रांसाठी दुसर्‍या दिवशी ‘श्रीदेवी यांचं निधन’ हीच मुख्य बातमी असणार! पण टीव्ही चॅनेल्सना एकदा ही ब्रेकिंग न्यूज देऊन झाली की तेवढ्यावर थांबता येत नाही ही त्यांची मर्यादा! कारण तिथं ब्रेकिंग न्यूज म्हणजे ‘ब्रेक होणारी बातमी’ एवढाच निकष राहिलाय. त्यामुळं एकदा ही बातमी देऊन झाली की मग पुढं तेवढ्यावर थांबून चालणार नाही. मग ‘अमिताभ बच्चन का ट्वीट’, ‘पीएमने मनाया शोक’ वगैरे गोष्टी ब्रेकिंग न्यूज द्याव्या लागणार. खरी गोम आहे ती इथं. श्रीदेवी यांचं निधन ही घटना महत्त्वाची की पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केल्याची घटना महत्त्वाची? अर्थातच श्रीदेवी यांचं निधन ही! पण आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे सतत बदलत जाणारी, त्या क्षणी नवीन असलेली बातमी हा फॉरमॅट असल्यामुळं मग ‘पीएमने मनाया शोक’ ही ब्रेकिंग न्यूज कदाचित जास्त भाव खाऊ शकते.

या फॉरमॅटमुळे मग अनेकदा अनेक अनावश्यक, औचित्यहीन आणि अनेकदा तथ्यहीनही तपशील ब्रेकिंग न्यूज म्हणून येतात पण मुद्रित माध्यमांमध्ये एकदा दिलेला कंटेंट हा बदलण्याची संधी नसते. तशी संधी इथं असल्यामुळं चुका सुधारताही येतात पण जेव्हा चुका सुधारण्याची मुभा मिळते तेव्हा जबाबदारीनं वागण्याची शक्यताही कमी होते. सध्या सगळीकडे झालं आहे ते हेच.

ब्रेकिंग न्यूज म्हणजे फक्त त्या त्या क्षणी नवीन असलेली बातमी असा फॉरमॅट एकदा सगळ्यांनी स्वीकारला की मग सतत नवीन ब्रेकिंग न्यूजचा हव्यास वाढतो. घटना नसल्या की तयार करण्याची घाई वाढते. स्पर्धा वाढल्यानं खूप जलदपणे देण्याच्या खटाटोपात चुका वाढतात. या सगळ्यातून मूळ घटना बाजूला राहते ही गोष्ट तर खरीच पण त्यापेक्षाही त्या घटनेच्या मुळाशी जाणं, थोडी तथ्यं तपासून घेणं, सारासार विचार करून त्या घटनेचं महत्त्व तोलणं या गोष्टी संपल्याचं लक्षात येतं. माध्यमकर्मी म्हणून खंत वाटते ती याची. मान्य आहे की तुम्हाला सतत नवीन काही तरी द्यायचं आहे? पण प्रेक्षकांनी हे मागितलं आहे का याचा विचार तुम्ही कुठं केला आहे? सतत अनावश्यक तपशील असलेल्या बातम्या प्रेक्षकांना खरंच हव्या आहेत काय? अर्थातच नाही! त्याला अजूनही मुख्य घटनांबाबतचेच तपशील हवे आहेत पण नव्या फॉरमॅटमुळं त्याला हाताशी काहीच लागत नाही.

ब्रेकिंग न्यूजचा हव्यास ही गोष्ट तर आणखी चिंताजनक आहे. अनेकदा खूप कमी तपशील हाताशी असताना बातम्या ब्रेक केल्या जातात. त्याचे खूप वाईट परिणाम होतात. कोरोनाच्या वेळी मुंबईत कमी तपशिलांच्या आधारे एक बातमी ब्रेक केल्यामुळं झालेली गर्दी हे त्याचं एक उदाहरण. दंगली, जातीय तणाव किंवा ज्या घटनांचे वाईट परिणाम होऊ शकतात त्या बातम्यांचे तपशील कमी द्यायचे असा एक अलिखित संकेत मुद्रित माध्यमांमध्ये अजूनही आहे. मात्र, ब्रेकिंग न्यूजच्या हव्यासात हा संकेत केव्हाच धुळीला मिळाला. अनेक अनावश्यक तपशील ब्रेकिंग न्यूज म्हणून दिले जातात आणि त्यातून कित्येक प्रकारचे तणाव वाढतात. मुंबईमध्ये झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्याच्या वेळी हेच तपशील त्या अतिरेक्यांनी कसे वापरून घेतले होते ही बाब फार महत्त्वाची. खूप अर्धवट तपशिलांच्या आधारे बातम्या दिल्या जात असल्यानं अनेक जिवंत व्यक्तिंनाही आपण बातम्यांपुरतं मृत्युच्या दारी पोचवलं आहे हेही तितकंच खरं. ब्रेकिंग न्यूजच्या बाजाराला वाईट म्हणायचं कारण नाही पण त्यात तारतम्य नावाची एक गोष्ट जी अपेक्षित असते ती मात्र हरवून गेली आहे ही गोष्ट जास्त चिंतेची वाटते.

एक असंही आहे, की वर्तमानपत्रांत एका पानावर समजा दहा बातम्या असल्या, तरी त्यांची मांडणीही अशी असते की त्यातली मुख्य बातमी कोणती हे वाचकांना बरोबर कळावं. त्यामुळं एक प्रकारे वाचकांचं शिक्षणही होतं. अमुक घटनेला फार महत्त्व द्यायचं कारण नाही किंवा तमुक घटना जास्त गांभीर्याची आहे हे त्या मांडणीतून अधोरेखित होतं पण वृत्तवाहिन्यांवर ‘राज्यात भाजप सरकार स्थापणार’ ही पण ब्रेकिंग न्यूज आणि ‘अकोला पंचायत समितीत शिवसेनेचं वर्चस्व’ हीही ब्रेकिंग न्यूज. त्यातली महत्त्वाची घटना नक्की समजणार कशी? किंवा तौलनिक अभ्यास प्रेक्षकांनी करायचा कसा? त्यांचं शिक्षण होणार कसं? हे शिक्षण नीट न झाल्यामुळं अनेकदा लोक अनावश्यक गोष्टींवर जास्त भर द्यायला लागतात, समाजमाध्यमांवर जास्त चर्चा करायला लागतात आणि त्यातून अनेक दीर्घकालीन चुकाही होऊ शकतात.

इतक्या ब्रेकिंग न्यूजची गरज आहे का? हा प्रश्नही आता विचारायला हरकत नाही. सतत हॅमर व्हाव्यात अशा, लोकाच्या तणाव वाढवणार्‍या, अर्धवट तपशील असलेल्या बातम्या ब्रेकिंग न्यूज म्हणून द्यायची गरज आहे का? लोकाना प्रत्येक क्षणी काही तरी घडायला हवं असं वाटतं का? अजिबातच नाही. त्याचं प्रत्येक सेकंदाला बीपी वाढवायची काहीच गरज नाही. बीबीसी, सीएनएन अशा वृत्तवाहिन्यांमध्ये कुठं क्षणोक्षणी ब्रेकिंग न्यूज दिल्या जातात? अतिशय शांतपणे, लोकाच्या माहितीत भर घालणार्‍या, त्यांना काही तरी देणार्‍या बातम्या दिल्या जातात आणि त्या प्रेक्षकांना नक्कीच आवडतात. भारतात मात्र विशेषतः हिंदी वृत्तवाहिन्यांनी ट्रेंड्स बदलले आणि आता बहुतेक सगळ्या भाषिक वाहिन्यांनी ते आपलेसे केले आहेत. ब्रेकिंग न्यूजचा हव्यास आता इतक्या पराकोटीला गेला आहे की एकाच वेळी तीन-तीन बातम्या स्क्रीनवर वेगवेगळ्या भागात ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून सादर केल्या जातात. त्यातून खरं तर हाताशी काहीच लागत नाही. ही सगळी फरफट कशासाठी? अनेकदा तर चुकीच्या ब्रेकिंग न्यूजची दखल इतर माध्यमांना घ्यावी लागते इतकी अवस्था बदलली आहे.

  • ब्रेकिंग न्यूजचं हे लोण कुठवर जाईल असं लोक विचारतात. हे लोण आणखी कुठं जायचं राहिलं आहे? पण आता चिंता आहे ती आणखी वेगळीच. टीव्हीवरच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये अनेकदा तपशील अनावश्यक असले तरी किमान काही घटना तरी घडलेली असते पण गेल्या काही काळात फोफावलेल्या ऑनलाइन पोर्टल्सनी न घडलेल्या घटनांनाही ब्रेकिंग बनवलं आहे. ‘यांनी दिला ऋषी कपूर यांना धोका’, ‘यांना हवे आहे माणसाचे रक्त’ अशा शीर्षकाच्या बातम्या या पोर्टल्सवरून सगळीकडे व्हायरल होतात. त्या पूर्ण वाचल्या की त्यात शीर्षकाशी संबंधित बातमीच नाही असंही आता लक्षात येतंय. म्हणजे फक्त शीर्षकावरून लोकाची उत्सुकता वाढवायची, त्यांना गुंतवून ठेवायचं आणि त्यात काहीच द्यायचं नाही असा हा नवीन खेळ सुरू झाला आहे. तो तर आणखी धोकादायक आहे. विश्वासार्ह, खरंच पोटेन्शिअल असलेल्या बातम्यांकडून बातमीमूल्य नसलेल्या ब्रेकिंग न्यूजकडे आता प्रवास झाला आहे पण आता ऑनलाइन पोर्टेल्समुळे बातमीच नसलेल्या ब्रेकिंग न्यूजकडे प्रवास चालला आहे. हे सगळं कुठवर चालणार माहीत नाही पण मला वाटतं शेवटी या गोष्टींना महत्त्व किती द्यायचं हेही शेवटी वाचकांच्या, प्रेक्षकांच्या हातात आहे. अनावश्यक गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करायला सुरवात केलीत की आपोआप हा खेळ कमी व्हायला मदत होईल. ‘श्रीदेवी की बॉडी नही आ रही है’ या ब्रेकिंग न्यूजमुळे तुम्ही उत्कंठा ताणून ती बॉडी आल्यावर काही तरी चमत्कार घडणार अशी अपेक्षा ठेवायला लागलात तर तुम्ही या चुकीच्या व्यवसायाला उत्तेजन देण्यातले मानकरी ठराल! पण चांगल्या, विश्वासार्ह बातम्या देणारी चॅनेल्स, वृत्तपत्रं यांना तुम्ही प्रतिसाद द्यायला सुरवात केलीत की हळूहळू त्यांचं प्रमाण वाढेल.

    शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की ब्रेकिंग न्यूजचा अनावश्यक खेळ सुरू झाला आहे तो प्रेक्षकांना सतत उत्कंठा वाढायला लावणारं काही तरी पाहिजे त्यासाठी. त्यामुळे प्रेक्षक म्हणून तुम्ही अनावश्यक गोष्टींना महत्त्व कमी द्यायला सुरवात केलीत किंवा चुकीच्या ब्रेकिंग न्यूजकडे दुर्लक्ष करायला सुरवात केलीत की सगळं संपेल. मला असं वाटतं की ज्यांनी पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आहे, त्यावर ज्यांची निष्ठा आहे ते चुकीच्या गोष्टी अजिबातच करणार नाहीत. शेवटी चुकीच्या ब्रेकिंग न्यूज कशा द्यायच्या याचं शिक्षण कुठल्याही माध्यमसंस्थेत अर्थातच दिलं जात नाही. अनावश्यक स्पर्धा, पत्रकारांऐवजी पत्रकारेतर व्यक्तींकडे गेलेली सूत्रं, कॉर्पोरेट कंपन्यांनी पसरलेले हातपाय, कंटेंटपेक्षा तंत्राला आलेलं महत्त्व अशा अनेक गोष्टींमुळं ब्रेकिंग न्यूजचा पोरखेळ सुरू झाला आहे. तो बंद करणं तो देणार्‍यांच्या हाती नाही. तो खेळ बंद करणं फक्त आणि फक्त प्रेक्षकांच्या हाती आहे… शेवटी रिमोट तुमच्या हातात आहे!

    प्रिन्सच्या घटनेनं रचला पाया

    भारतात अनावश्यक ब्रेकिंग न्यूजची सुरवात नक्की कधी झाली हे सांगता येत नसलं तरी बोअरवेलमध्ये पडलेल्या प्रिन्स नावाच्या मुलाच्या घटनेनं त्याला एक अधिष्ठान मिळवून दिलं हे नक्कीच सांगता येतं. कुठल्या तरी एका खेड्यातला हा मुलगा बोअरवेलसाठी खणलेल्या खड्ड्यात पडला. त्याला बाहेर काढण्याच्या कसरतीनं देशभरातल्या माध्यमांना-विशेषतः टीव्ही माध्यमांना हलवलं आणि ही एक राष्ट्रीय बातमी झाली. एरवी एक मुलगा अशा खड्ड्यामध्ये पडणं आणि त्याला बाहेर काढणं ही गोष्ट स्थानिक पातळीवरच मर्यादित राहिली असती! पण ‘ब्रेकिंग न्यूज’ नावाच्या गोष्टीनं ही घटना सगळीकडं पसरली. त्यातले क्षणाक्षणांचे तपशील दिले जाऊ लागले. सगळ्या देशवासियांचे श्वास रोखले गेले. पुढं काय होणार? याची उत्कंठा वाढू लागली. प्रिन्स बाहेर आला, तो सुखरूप राहिला! पण त्यानं ब्रेकिंग न्यूजचा वणवा देशभर पेटवला. त्यानंतर शेकडो मुलं अशाप्रकारे खड्ड्यांमध्ये पडली पण त्यांतलं नावीन्य संपल्यानं त्या ब्रेकिंग न्यूज झाल्या नाहीत. प्रिन्सच्या घटनेत उत्कंठा होती, क्षणाक्षणाला बदल होते, काही तरी नावीन्य होतं. ते नंतर संपलं. मात्र, या घटनेनं ब्रेकिंग न्यूजचा राक्षस जागा झाला ही गोष्ट खरी.

    आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
    Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

    चपराक

    पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
    व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
    Email - Chaprak Email ID
  • तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

    हे ही अवश्य वाचा