सुमारे १३०० वर्षांपूर्वी संशोधकांना मेस्किकोमधील काबा शहरामध्ये एक प्रचंड चक्राकार खोदकाम केलेली एक शिळा सापडली. ही शिळा कोणी तयार केली याचा संशोधकांनी तेव्हापासून आत्तापर्यंत शोध घेतला पण काहीही हाती लागले नाही. बहुदा स्पॅनिश समुद्रडाकूंनी त्याच्यावर हल्ला करून त्यांना नेस्तनाबूत केले व त्याची सर्व संपत्ती खरवल्यासारखी लुटून नेली.
सुमारे २५०० वर्षांपूर्वी ती संस्कृती नष्ट झाली. त्याची कारणेही समजू शकली नाहीत. शोधण्याच्या प्रयत्नात ती शाळा सापडली. त्या शिळेवरील खोदकाम अत्यंत उत्कृष्ट असून त्यामध्ये अनेक भाग आहेत. सर्व चक्राकार आहेत. बारकाईने शोध घेतला असता ते चक्र म्हणजे एक कालमापन यंत्र आहे हे निश्चित झाले. त्यामध्ये ५१२५ वर्षाचे भविष्य वर्तविले आहे किंवा कालगणना केलेली आहे. त्यासाठी त्यांनी पूर्वीचा एक दिवस शून्य समजून पुढे ५१२५ वर्षाची कालगणना खोदून ठेवलेली आहे. इसवीसनाचा विचार करता इसवीसनापर्यंत ३११३ वर्ष झालेली होती. म्हणजे त्यांचा हिशोब पाहता३११३ + सध्याचा सन २o१२ म्हणजे बरोबर ५१२५ ची गणना पूर्ण झाली. ५१२५ नंतरची त्यांनी काही कालगणना खोदलेली नाही याचा अर्थ डिसेंबर २o१३ अखेर पृथ्वीवरील जीवन नष्ट होईल असा लावला गेला व आजपर्यंत तो समाज कायम राहिला. वास्तविक आजची परिस्थिती पाहता असे काही घडण्याची शक्यता वाटत नाही. कदाचित ५१२५ पुढील कालगणना त्यांनी कुठेतरी निश्चितपणे खोदून ठेवलेली असेल.
त्या शहरात पोहोचलेले द्वारकेतील यादव व त्यापैकी काहीजण एका-एका विद्यामध्ये निपुण होते. खगोलशास्त्र, युद्धशास्त्र, दगडावरील खोदकाम म्हणजे पाथरवट काम व धातुशास्त्र या सर्वांमध्ये ते अत्यंत प्रवीण होते व त्यांचे ज्ञान अत्युच्च होते.
कोण होते ते रहिवासी! ते होते भगवान श्रीकृष्णाचे अनुयायी व द्वारकेचे रहिवाशी! ते एवढ्या दूर कसे पोहोचले ते आपण पाहू. प्रभास तीर्थावरील झालेल्या यादवातील गृहयुद्धात तेथे असलेले सर्वच्या सर्व यादव योद्धे आपसात लढून मारले गेले. युद्धज्वरात त्या योद्ध्यांनी प्रत्यक्ष श्रीकृष्ण व बलराम यांच्यावर शस्त्र चालविण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत तो कलह थांबविण्याचा प्रयत्न करणार्या श्रीकृष्ण बलरामांनीही शस्त्र उचलून समोर येणाऱ्या प्रत्येकास ठार मारले. ते सर्व दृश्य पाहून बलरामांनी समाधी लावून प्राणत्याग केला. त्यामुळे खचून गेलेला श्रीकृष्ण अत्यंत दुःखाने, निराशेने प्रभास तीर्थापासून दूर जाण्यासाठी दिशाहीन चालत निघाला व थकून-भागून भालका नावाच्या जंगलात पोहोचला व गुडघ्यावर पाय टाकून झाडास टेकून डोळे बंद करून बसला. दुरून एका व्याधाने तो पाय म्हणजे हरणाचे डोके आहे असे समजून एक बाण सोडला. तो तीक्ष्ण बाण पायाच्या तळव्यातून आरपार निघाला. ते पाहून व्याध धावत तिथे आला. श्रीकृष्णाने त्या व्याध्यास परत पाठवले. तोपर्यंत श्रीकृष्णाला शोधत त्याचा ११० वर्ष सोबत राहिलेला सारथी दारुक कृष्णास शोधत तेथे पोहोचला. ते दृश्य पाहून दारूक शोक करू लागला. श्रीकृष्णाने त्यास कडक आवाजात शांत केले व सांगितले की येथून ताबडतोब द्वारकेस व नंतर हस्तिनापुरास जावे. द्वारकेतील प्रमुखांना माझा निरोप सांगावा की माझ्या मृत्यूनंतर सागर संपूर्ण द्वारका गिळंकृत करेल. म्हणून जे धनधान्य व सर्व नेता येण्यासारख्या वस्तू घेऊन द्वारका ताबडतोब सोडावी व हस्तिनापूरचा आश्रय घ्यावा. तसेच अर्जुनास निरोप द्यावा की ताबडतोब द्वारकेस जाऊन सर्वांना आपल्या संरक्षणाखाली हस्तिनापुरास आणावे.
दारूक द्वारकेस पोहोचला व प्रभात तीर्थावरील जमलेल्या हजारो यादवांचे सेवक वगैरे यादव वीरांचे आपसातील युद्ध सुरू होताच द्वारकेस पळून गेले व सर्व यादव हे मारले गेले. याची कल्पना द्वारकावासियांना दिली. यादवांच्या या गृहयुद्धास ‘यादवी’ असे नाव पडले. दारुक द्वारकेस पोहोचल्यावर तेथे एकच हलकल्लोळ माजला. तेथे उरलेले सर्व यादव व त्यांचे कुटुंबीय हस्तिनापूरच्या वाटेस लागले. प्रभास तीर्थावरील गोंधळ कळताच तेथे पोहोचलेल्या हजारो यादवांना श्रीकृष्णाचा निरोप समजला व ते आजच्या गुजरातमध्ये पांगले. हस्तिनापुरास निघालेल्या यादव व त्यांच्या कुटुंबीयांवर वाटेतील आदिवासींनी हल्ला केला. त्यांना अर्जुन तोड देऊ शकला नाही व त्यास हार मानावी लागली परंतु हस्तिनापुरातून द्वारकेस निघालेल्या प्रचंड सैन्याची तेथे गाठ पडून त्या सैन्याने सर्वांची सुटका केली. हस्तिनापुरास पोहोचताच अर्जुनाने पांडवांना घडलेली सर्व हकीकत सांगितली.
-
त्याचा अर्थ असा होता पांडवांचे सर्व तेज संपले व ते निर्मल झाले आहेत. पांडवांनी ताबडतोब श्रीकृष्णाचा नातू वृत्र याला इंद्रप्रस्थ राज्याचा राजा घोषित केले व अर्जुनाचा नातू परीक्षित यास हस्तिनापूरचा राज्याभिषेक केला पण याचा परिणाम असा झाला की अगोदरच घरदार गेलेले लक्षावधी यादव अचानक हस्तिनापुरात स्थायिक होण्यास आले व या वाढत्या लोकसंख्येच्या बोजामुळे हस्तिनापूरचा कणा तुटण्याची वेळ आली. त्यामुळे स्थानिक व यादव यांच्यात कुरबुरी सुरू झाल्या. त्यातच पांडव हिमालयात निघून गेले. द्वारकेच्या नागरिकांचे संरक्षण संपले. ताबडतोब यादव प्रमुखांनी हस्तिनापुर सोडण्याचा निर्णय घेतला व सर्वजण हस्तिनापूरच्या बाहेर पडू लागले. आजच्या उत्तर प्रदेशात व बिहार मध्ये हजारो यादवांनी आश्रय घेतला व उरलेल्या सर्वांनी अफगाणिस्थानच्या मार्गाने जाऊन नवीन भूमी शोधण्याचा प्रयत्न सुरू केला.
गुजरात मध्ये गेलेल्या यादवांनी तेथे अगोदरच थोड्याफार असलेल्या नौकानयन शास्त्राचा अभ्यास करुन त्यात प्राविण्य मिळविले व मोठी गलबते तयार करून नवीन भूमीचा शोध घेण्यासाठी सागरात प्रवेश केला. येथे एक गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक लक्षात घेतली पाहिजे की सर्वच यादव गटांमध्ये सर्व शास्त्रातील प्राविण्य मिळविलेले यादव होते. उत्तर प्रदेशातील व बिहारमध्ये हजारो यादव पांगले व उरलेले अफगाणिस्थान मार्गे बाहेर पडलेले यादव यातील काही यादव एकेका विद्येत प्रवीण होते. खगोल शास्त्रातील ज्ञात्यांनी सर्व गलबते एकाच मार्गाने जातील याची काळजी घेतली व काही दिवसांनी ही गलबते मेक्सिको जवळच्या समुद्रकिनाऱ्याला लागली. गलबतातील यादवांनी आत शिरून सध्याच्या मिस्कीकोची भूमी राहण्यास उत्तम आहे असे समजून तेथे आश्रय घेतला. येताना प्रवासातील आकाशाचा अभ्यास करून घेतलेल्या नोंदीमुळे काही यादव अचूकपणे गुजरातमध्येही पोहोचले. तेथील काही यादवांसह पुन्हा मॅक्सिकोपर्यंत पोहोचले. मायन संस्कृतीच्या अभ्यासात भारतातून ५००० हजार वर्षापूर्वी काही टोळ्या मेक्सिकोत उतरल्या याची नोंद संशोधकांनी केली आहे. या टोळ्या किंवा ट्रायबल्स या शब्दांनी संशोधकांना पुढे जाण्याचा मार्ग खुंटला कारण आदिवासी टोळ्या हजारो मैल लांबपर्यंत जाणेच शक्य नव्हते. ब्रिटिशांनी भारताबद्दल व भारतीयांबद्दल अत्यंत अपप्रचार केलेला होता. भारत म्हणजे जंगली लोक व तेथील गावे व छोटी शहरे म्हणजे जनावरांना मोकाट फिरण्याची जागा. तसेच भारत म्हणजे नाग, साप व वाघ, सिंह यांनी भरलेले जग असा तो अपप्रचार होता. त्यामुळे संशोधकांनी भारतातून काही टोळ्या आल्या एवढीच नोंद केली व पुढे अभ्यास केलाच नाही.
-
दुसरी अधिक महत्त्वाची गोष्ट की श्रीकृष्णाबद्दल त्यांनी केलेला अत्यंत हीन दर्जाचा अपप्रचार कारणीभूत झाला. श्रीकृष्णाने सांगितलेली गीता संपूर्ण युरोपात पोहोचले व तेथील विद्वानांनी त्याचे अत्यंत कौतुक केले पण इतिहास सांगणारा श्रीकृष्ण व यादव प्रमुख श्रीकृष्ण एकच आहेत हेच ते समजू शकले नाहीत व आजपर्यंत तीच परिस्थिती बहुतांशी कायम आहे. भारतातून मिस्कीकोत पोहोचलेल्या टोळ्या म्हणजेच यादव हे संशोधक समजूच शकले नाहीत. याचा परिणाम आजपर्यंत मायन संस्कृती म्हणजेच श्रीकृष्णाच्या यादवांची संस्कृती ही बाब संशोधकांच्या नजरेतून सुटली. श्रीकृष्णाच्या मृत्यूची तारीख आजच्या कालगणनेच्या अभ्यासाप्रमाणे इसवीसन पूर्व १८ फेब्रुवारी ३१०२ आहे व कलियुगाचे कालमापन तेच आहे. या दिवशी चैत्र शुद्ध पाडवा होता म्हणजे नवीन वर्ष व नवीन युग यावेळी सुरू झाले ही कलियुगाची सुरवात मानली जाते. मायन संस्कृतीचे कोडे उलगडण्यास मला श्रीकृष्णाची माहीत असलेली जन्मतारीख अत्यंत आधारभूत झाली व हे कोडे सोडवणे सोपे गेले हे निश्चित.
भारतीय पंचांगाच्या त्या कालगणनेच्या माहितीप्रमाणे कलियुगाचे सध्याचे वर्ष ५११३ आहे. महावीर संवंत २५३७/३८ इ.स. २०१२-१२ शालीवाहन शक १६३३, ही जर सन १४३२/३३ पाशी सन १३८०/८१, शिवशक ३३७/३८ याप्रमाणे आहेत. विकम सवंत २०६७/६८ आहेत. ५१२५ – सध्याचा सन २०१२ वजा करता येणारा आकडा ३११३ आहे व तीच कलियुगाची सुरवात आहे. म्हणजेच मायन संस्कृतीच्या चक्रातील कालगणना व आपल्या पंचांगाची कालगणना एकच येते. म्हणजेच मायन संस्कृती जरी नष्ट झाली तरीही आपली कालगणना व्यवस्थित चालू आहे. म्हणजेच आर्यावती नंतरचे नाव हिंदुस्तान व नंतरचे नाव भारत यांची कालगणना मायन संस्कृती सारखीच आहे. त्यात कोणताही फरक नाही हा निव्वळ योगायोग नाही पण डोळ्यात अंजन घालणारे सत्य आहे. कारण दोन्ही कालगणनेची नाळ एकच आहे हे मानावेच लागेल. ही दोन्ही जुळी भावंडेच आहेत.
वरील सर्व निरनिराळ्या कालगणना पाहताना युगपुरुष श्रीकृष्णाची कालगणना का नाही हे समजत नाही. कलियुगाच्या ऐवजी तेथे श्रीकृष्ण संवंत किंवा श्रीकृष्ण शक मानल्यास त्या युगपुरुषाची आठवण सदैव राहील व श्रीकृष्णाच्या चरित्राचा खरा अभ्यास करण्याची इच्छा सर्वत्र वाढेल असे मला वाटते वही श्रीकृष्णाची केलेली सेवा सत्कारणी लागेल हे निश्चित.
दि. १६/१/२०१३ रोजी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये भारत-ऑस्ट्रेलियात जनुकीय संबंध हे सिद्ध झाले असे दिले आहे. कारण ४२३० वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये भारताकडून आलेल्या टोळ्यांनी म्हणजे भारतातील सर्व शास्त्र पारंगत रहिवाशांनी ऑस्ट्रेलिया प्रवेश केला. ४२३० वर्षापूर्वी असा जनुकीय प्रवाह भारताकडून ऑस्ट्रेलियाकडे आला. या शोधामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या पुरातत्त्वीय संशोधनाला ही नवी दिशा मिळाली आहे व अशी माहिती दिनांक १६/१/२०१३ च्या दै. पुढारी मध्ये आहे.
(प्रस्तुत लेखकाच्या श्रीकृष्ण चरित्रावरील आगामी ग्रंथातून)
नरहरी विश्वनाथ पत्तेवार
९८८१५६१२१७
आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.