बदली झाली तसे पुन्हा जुन्या शाळेत म्हणजे शाळेच्या गावाला जायला जमलेच नाही. जाण्याचे कारणही नव्हते. दोन्ही गावे तालुक्याच्या दोन विरूध्द टोकाला. अचानक एका दशक्रिया विधीच्या निमित्ताने जाण्याचा प्रसंग आला. मूलं मला पाहून लपून बसायची. हळूच डोकावून पाहायची. नजरानजर झाली की खुदकन हसायची. दोष त्यांचा नव्हताच. हे होणारच होतं.जवळपास वर्षाने मी गावात जात होतो. खरं सांगायचं तर मीच थोडासा बुजलो होतो. वास्तविक कितीही जवळच्या नात्यामध्ये संपर्काचा खंड पडला की असं होतंच असतं-.
पंधरा वीस मिनिटांनी त्यांची भीड चेपली असावी. एकेका गल्लीतून एकेक जण बाहेर आला. मला काही कळायच्या आत त्यांचा गराडा पडला.
“सर, आमच्या घरी चला. सर आमच्या घरी चला.” प्रत्येकाचा घोषा सुरू झाला.
“अरे, प्रत्येकाच्या घरी जाणे शक्य नाही. आपण इथेच बसून गप्पा मारू. म्हणजे कोणाला रागही येणार नाही.” मी म्हणालो.
यावर सगळ्यांनी होकारार्थी माना डोलावल्या. मंदिरात बैठक बसली. गप्पा सुरू झाल्या.नवीन सर, शाळा, अभ्यास, रोजचे सूर्यनमस्कार, कोणाच्या शेतात काय, कोणाच्या गाईला वासरू झाले, कोणाच्या भावाबहिणीचे लग्न झाले. एक ना अनेक विषय. फार दिवसांतून भेटल्याने लेकरं खुलली होती. कोण आगोदर बोलणार यासाठी मारामार. खूप छान वाटलं. मन एकदम ताजंतवानं झाल्यासाखं वाटलं. मुलांचा निरोप घेऊन निघालो.
निघताना लक्षात आलं, इतका वेळ सगळी मुले इतका कल्ला करत असतानाही पवन मात्र गप्पच होता.
“काय रे पवन, केव्हाचा शांत उभा आहेस? बोलत का नाहीस?” मी जाता जाता विचारले.
“त्येचा मोठा बाबा पका आज्यारी हाये.” सोनालीने माहिती पुरवली. ही सोनाली दुसरीत गेली तरी वाचायची नाही; पण सगळ्या गावातल्या खबरी मात्र तिला पक्क्या माहीत असायच्या.
“चल तुझ्या घरी जाऊ. ” मी पवनच्या खांद्यावर हात टाकून निघालो. मूलं आपापल्या घरी गेली.
घरात मला कोणीच दिसले नाही. कदाचित बाहेरून आल्याने डोळे दिपले असतील. मी पवनला विचारले, “अरे कुठायं सक्याआजा?”
“त्या आंगून हाये त्याचा आथरूण. गोठ्यात.” पवन म्हणाला.
तोपर्यंत आमच्या आवाजाने सक्याआजा सावध झाला होता. तो उठून बसण्याचा प्रयत्न करू लागला पण अंगात उठण्याचं बळ नव्हतं.
” तसेच पडून राहा, उठू नका.” मी म्हणालो.
सक्याआजा गावठी डॉक्टर होता. एकदा माझं पोट प्रचंड दुखत होतं. सगळे उपचार करून झाले पण आराम मिळत नव्हता. शेवटी सकाआज्याने तीन दिवस सारखे चोळून बरे केले होते. आज त्याच्यावर मात्र त्याते उपचार चालत नव्हते. इकडच्या तिकडच्या ख्याली खुशालीच्या गप्पा झाल्या. मला त्याही परिस्थितीत सकाआज्याची चेष्टा करण्याची लहर आली.
“आज्या, आयुष्यभर कष्ट केलेस. शेवटच्या दिवसांत मात्र तुला घर नशिबात नाही. काय उपयोग तुझा इतके कष्ट करून. ” मी म्हणालो.
“अरे त्या जगाची रीतच हाये मास्तर. आज ज्या मालं भोगाया लागतयं, त्याच त्येनलाही भोगाया लागंल.त्याचा काय टेन्शन घ्यायाचा. “लेकासूनांकडे हात करून सक्याआजा म्हणाला.
सक्याआजा बोलत असताना त्याच्या डोळ्यात विषादाची एखादी छटा दिसते का याचा मी शोध घेण्याचा प्रयत्न करीत होतो; पण तो मात्र माझ्याकडे पाहून छद्मीपणे हसत होता. कुठून आणतात इतका सकारात्मकपणा ही माणसं! याने कुठलं पॉझिटीव्ह थिकींगचं ट्रेनिंग घेतलं असावं? तो शरीराने खंगला होता. आवाज निघत नव्हता. डोळ्यातला भाव मात्र तस्साच होता. जसा मी रूजू होताना पाहिला तस्साच. निर्मळ. पवित्र. मला माऊलींची स्थितप्रज्ञाचे वर्णन करणारी ओवी आठवली, ‘नाना दु:खे प्राप्ती|जयासी उद्वेगु नाही चित्तीं|आणि सुखाचिया आर्ती| अडपैजेना ||’
मी सक्याआज्याला नमस्कार करून जायाल निघालो. गोठ्याबाहेर आलो.
तेवढ्यात सकाआज्याने आवाज दिला, “थांब रं मास्तर, असा रिकाम्या हाती जासी नको.”
“पवन्या, दादासला जाब दे. मास्तरला ह्या रामफळ काढून देजो.” आजा पवनला म्हणाला.
“अहो, कशाला? नको. असू द्या तुमची मूलं खातील.” मी नकार दिला.
“तूही तं माझेला नातू जसाच हायेस न र! जा घेऊन तुझेली पोश्या खातील.” आजा ऐकणार नव्हताच. अजून जास्त नकार दिला असता तर त्याचं अंत:करण दुखावलं असतं.
मी रामफळ घेऊन निघालो. मोटारसायकलपेक्षा विचारांनी अधिक गती घेतली.फळाच्या ओझ्याने बॅग आणि उपकाराच्या ओझ्याने माझं मन दबून गेलं होतं. पेशंटला फळ मी द्यायला हवं होतं; पण झालं भलतंच. पेशंटकडूनच मी फळ घेऊन निघालो होतो.
दहा वर्षे मी या गावात होतो. तेव्हापासून आजतागायत सक्याआज्याची परिस्थिती जराही बदलली नव्हती. तशी ती कोणाचीच बदलली नाही म्हणा. आजही कूड तसाच आहे. खायची मारामार आजही आहे. भयाण भौतिक दारिद्र्य. मन मात्र आभाळापेक्षाही मोठं.
कदाचित सक्याआजा अडाणी असेल. त्याला दानाचं शास्त्र माहीत नसेल. ‘दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे’हे गीतेचं दानाविषयीचं तत्व त्याला माहितही नसेल; पण शास्त्रला अपेक्षित दान मात्र तो करतोय. एका वर्षापासून मी त्याला भेटलो नव्हतो. फोन तर त्याच्याकडे नाहीच. मी यानंतर कदाचित कधी तिकडे जाणारही नाही. कदाचित गेलो तरी हा तेव्हा असेल याची खात्री नाही. त्याला माझ्यापासून कशाचीही अपेक्षा नाही; तरीही त्याने माझ्या बॅगमध्ये आग्रहाने रामफळ घातले. निरपेक्ष, निरकांक्ष भावाने.
आज समाजात दानवीरांचा सुळसुळाट झाला आहे. काही समाजसेवी संस्था आणि समाजेवक इतके व्यावसायिक आहेत की एखाद्या वर्षी एखादी आपत्ती नाही आली तर यांना करमत नाही. गरिबांना मदत करणे हा व्यवसाय झालाय. गरिबांच्या नावाखाली आपलीच गरीबी हटवणारे टोळके कुत्र्याच्या छत्र्यांसारखे हल्ली गल्लोगल्ली उगवतात. अमूक ठिकाणी मदत करायचीय, निघालेच कटोरा घेऊन दारोदारी! इतकाच जर गरिबांचा कळवळा येत असेल तर स्वत:च्या खिशातून करावी मदत. गावभरातून पैसे जमा करायचे आणि श्रेय मात्र स्वत: लाटायचे.
यात अजून एक प्रकार आहे. ते दुसर्यांकडून पैसे जमा करत नाहीत, स्वत:च्या खिशातून मदत करतात; पण त्यांना प्रसिध्दीची प्रचंड हाव असते. एखाद्या ठिकाणी मदत केली आणि पेपरात जर नाव नाही आले तर हे प्राणी भविष्यात कधीही त्या व्यक्तीला मदत करणार नाहीत. पैसे देताना त्यांचं एकच म्हणणं असतं, ‘तुम्ही कोणाला मदत करताय याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही.आमचं नाव मात्र पेपरात यायला हवं.’
अजून एक प्रकार असतो पुढारी दाते. मदत करतो पण शंभर टक्के मतदान आपल्यालाच व्हायाला पाहिजे, हा यांचा खाक्या. एखाद्या प्रभागात जर कमी मते पडली तर हे भविष्यात चूकूनही तिथे मदत करणार नाहीत. फायदा असेल तरच काहीतरी हातपाय हलवणार अन्यथा नाही.
जर प्रत्येकजण केवळ स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी समाजसेवेचे ढोंग करत असेल तर त्यांनी स्वत:ला समाजसेवक का म्हणवावे? समाजाने तरी त्यांचा समाजसेवक म्हणून उदोउदो का करावा? जर या कथित समाजसेवकांनी खरी समाजसेवा केली असती तरआज पुन्हा तिची गरजच पडायलाच नको होती ना! डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे
भुकेल्याला भाकरी देण्यापेक्षा त्याला भाकर कमवायची अक्कल दिली; तर त्याला पुन्हा भाकर देण्याची गरज भासणर नाही. त्याची भाकरी तोच मिळवेल.
याची अंमलबजावणी मात्र कोणीही करताना दिसत नाही कारण तसं झालं तर तथाकथित समाजसेवकांची भाकर बंद होईल ना!
दानाविषयी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, ‘नाना दिठी घालूनि आहेरा |अवंतु जाइजे सोयिरा |का वाण धाडिजे घरा |वौसयाचिया ||’ आहेराच्या अपेक्षेने सोयर्यांना आमंत्रण देणारे तेव्हाही होते. आजही आहेत. आज त्याला जरा सूत्रबध्द संगठीत रूप आलंय इतकचं.
दान कसे करावे याचे फार उत्तम णि सविस्तर वर्णन माऊलींनी केले आहे.‘उदकाचिये भूमिके |आफळिलोनि कंदूके |उधळौनि कवतिके | न येइजे हाता ||’ पाण्यावर आपटलेला चेंडू जसा उसळून परत हातात येत नाही त्याप्रमाणे आपण केलेल्या दानाने आपला अप्रत्यक्षरूपानेही फायदा होता कामा नये. तेच खरे दान.
वाढदिवसाच्या निमित्ताने गरिबांना काहीतरी वाटप करून ते फोटो महिनोन महिने स्टेटस, डी.पी. ला ठेवणारे, पेपरात फोटो यावा म्हणून दान करणारे, मतं मिळावीत म्हणून मदत करणारे हेच खरे गरजू आहेत. कधीकधी मनात असाही विचार येतो, की जर भविष्यात रामराज्य आले आणि कोणीही दरिद्री, गरीब, गरजू राहीले नाही तर! या समाजसेवकांचं काय होईल? मनोरूग्ण होतील,की आत्महत्या करतील? स्वत:च्या गरजेपोटी हे लोक गरिबांचे आत्महनन करतात खरंतर! त्यांचा आत्मा मारतात कारण यांच्या चिमूटभर मदतीने हे हिरो ठरतात अन् गरीब अजूनच लाचार. त्यादृष्टीने पाहू जाता खरा हिरो ‘सक्याआजा’ नाही का?
सक्याआज्याला इंग्रजी आली असती तर तो या सो कॉल्ड दानशूरांना म्हणाला असता, “Please, leave your camera’s at home while helping the poor’s.”
(वरील उदाहरणांना काही सन्माननीय अपवाद असू शकतात.)
रमेश वाघ, नाशिक.
चलभाष : 9921816183
खूपच छान लिहलंय मास्तर!
आवडला लेख!😊
खुप छान वाघ सर..
भाउ दादांनी घान केली आहे समाजात.
पण निस्वार्थ मदत करणारे पण लोक आहेत ज्यांच्यामुळे आमच् वृक्षारोपणाचे काम सुरू झाले…👍
वाघ सर सुंदर लेखन .
वाघ सर लय भारी राव! आवडला मला हा लेख, खुपच छान शब्दांकन आणखी पुढे काय, होईल, वाचत राहण्यासारख होत…
अप्रतिम वाघ सर…. वास्तव आहे….
वाघ सर,
खरचं मनातलं बोललात…लेख वास्तववादी आहे,
खूप आवडला.!!
मस्त साहेब एकदम बरोबर बोलता मी तुमच्या मताशी सहमत आहे
खुप छान वाघ सर..👌🏽👌🏽
अप्रतिम अनुभव सर,, खरं आहे, मनापासून देणारा हा निरपेक्ष असतो,👍👌👌🙏🙏
अप्रतिम लेख
समाजाची कानउघाडणी आणि प्रेरणा दायक अनुभव असे अनुभव बघून ऐकून वाचून मन दाटून येतं
जबरदस्त शब्दांकन आणी वास्तववादी लेखन 👌👌
अगदी खरंय… वाघ सर तुमचे
जे दिल्यावर केल्यावर माझ्या लक्षात ही राहणार नाही आणि जे देऊन माझा फायदा ही नाही भले तोटा असू दे…. असे दान पाहिजे.
कर्णाला माहीत होते की आपली कवच कुंडले गेली की आपले प्राण जाणार तरीही त्याने मागितल्यावर ते 1 क्षणाचाही विलंब न करता ते देऊन टाकले. हे दान आहे…. आणि आज आपण जे करतो ती केवळ एक मदत आहे. ती पण आपण आपली गरज पूर्ण झाल्यावर करतो.
वास्तविक घेणाऱ्यांची गरज आणि मजबूरी असते पण देणाऱ्यांची दानत असते… ती चांगली असेल तर दान आणि ती चांगली नसेल तर फक्त आणि फक्त स्वार्थ.
खुपच भावल्ं मनाला .सरजी
काही समाजसेवकांचा समाजसेवा करण्यामागे सापेक्ष हेतू असतोच . अश्या स्वार्थी समाजसेवकांना या लेखातून चपराक बसेल . छान समाज चित्रण करणारा लेख 👌👌
अप्रतिम
Khup chaan lihile aahe…
अप्रतिम लेख सरजी.