राज्यघटनेचे स्वयंघोषित ‘बॉडीगार्ड!’

राज्यघटनेचे स्वयंघोषित ‘बॉडीगार्ड!’

प्रवीण विठ्ठल तरडे हे एक चित्रपट निर्माते आणि अभिनेते आहेत. त्यांनी त्यांच्या घरातील गणपतीची सजावट करताना विद्येची देवता असलेल्या गणनायकाला वंदन म्हणून पुस्तकांची आरास करायचे ठरवले. तशी आरास केली आणि ती करताना इतर पुस्तकांबरोबर गणपतीच्या खाली भारतीय संविधानाची प्रत ठेवली. समाजमाध्यमावर त्यांनी या देखाव्याचा फाटो टाकताच अनेकांकडून त्यांना कडवा विरोध सुरू झाला. ते पाहता त्यांनी त्यांची पोस्ट काढून टाकली आणि जाहीर माफी मागितली. विशेषतः ही माफी मागताना ‘आरपीआय, भीम आर्मी, पँथर अशा काही संस्था-संघटनांची नावे घेत त्यांनी ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर आपण ती सुधारली आणि दुखावल्या गेलेल्या दलित बांधवांची आपण माफी मागतो’ असे त्यांनी सांगितले. तरडे यांनी केवळ दलित बांधवांचीच माफी मागितली म्हणून पुन्हा त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. या प्रकरणात मुळात त्यांना विरोध करणारे कोण होते हे बघितले तर त्यांनी हा शब्दप्रयोग का केला हे लक्षात येईल.

खरेतर प्रवीण तरडेंनी भारतीय संविधान गणपतीच्या मूर्तीच्या खाली ठेवले. तरडेंना भारताचा राज्यकारभार या घटनेच्या जीवावर चालतो हे माहीत असेल. त्यांच्या या कृतीमुळे त्यांना भारतीय राज्यघटनेविषयी आदर नाही असे म्हणणे मात्र त्यांच्यासाठी अन्यायकारक होईल. त्यांनी माफी का मागितली? तर काही संघटनांनी त्यांना धमक्या दिल्या किंवा त्यांना तशा विनंत्या केल्या. भारतीय राज्यघटना ही या देशात सर्वोच्च आहे आणि ती या देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी आहे. आपले संविधान, आपली घटना ही आपल्यासाठी आहे म्हणून ती सर्वोच्च आहे. ती कुणी लिहिली हा भाग नंतरचा. ती केवळ आंबेडकरांनी लिहिलीय म्हणून वंदनीय आहे असे नाही तर ती आपल्या सर्वांसाठी आहे म्हणून महत्त्वाची आहे. सध्या मात्र काही विशिष्ट समाजाला, संघटनांना संविधान ही त्यांची खाजगी मालमत्ता वाटतेय हे धोक्याचे आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजाचे, एका जातीचे किंवा एका धर्माचे नव्हते, नाहीत. त्यांनी ही घटना विशिष्ट जाती समूदायासाठीही लिहिली नाही. स्वातंत्र भारतातील प्रत्येक नागरिकाला डोळ्यासमोर ठेऊन घटना तयार करण्यात आली आहे.

आपल्या प्रत्येकाच्या न्यायहक्काची सनद म्हणजे राज्यघटना. त्यामुळे संविधानाचा आदर राखला पाहिजे. प्रवीण तरडे यांचं वर्तन जर कुणाला धोकादायक वाटत असेल तर त्यानंतर येणार्‍या प्रतिक्रिया त्याहून जास्त गंभीर आहेत. राज्यघटना केवळ डॉ. आंबेडकरांनी लिहिली म्हणून तिचा आदर करा असे सांगणारे कट्टरतावादीही पदोपदी घटनेचा अनादर करत असतात. घटनेनं जर प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य दिलंय, आपल्या साामाजिक, आर्थिक हिताची हमी दिलीय, काही हक्क आणि अधिकार दिलेत तर त्याची अंमलबजावणी केली जाते का?

मुळात घटनेने प्रत्येकाला आपले धार्मिक स्वातंत्र्य जपण्याचा अधिकार दिलेला असताना कुणी असे वागल्यानंतर त्याला ट्रोल करणे, त्याचा अर्वाच्य भाषेत उद्धार करणे, त्याला सळो की पळो करून सोडणे हे खरे घटनेचे अपयश आहे. यापूर्वी भाऊ कदम यांनी केवळ गणपतीची पूजा केली म्हणून त्यांच्यावर समाजाने बहिष्कार टाकला होता आणि त्यांना माफीही मागायला भाग पाडले होते. तरडे यांच्या हातून कळत किंवा नकळतपणे चूक झालीय असे कुणाला वाटत असेल किंवा या घटनेनंतर त्यांना स्वतःला तसे जाहीर करावे लागत असेल तर त्यापेक्षा कितीतरी अक्षम्य त्यांना किंवा भाऊ कदम यांना धमकावणे आहे. घटनेच्या तथाकथित फडतूस बॉडीगार्डसनी हा जो उच्छाद मांडलाय तो लोकशाहीसाठी अत्यंत मारक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा निष्ठावान अनुयायी म्हणून मला या स्वयंघोषित बॉडीगार्डच्या वर्तनाची चिंता वाटते.

वैदिक धर्मात वाढलेल्या कर्मकांडांचा निषेध करताना त्यांना उत्तर म्हणून बौद्ध धर्माची स्थापना झाली. या अनेक कर्मकांडांमुळे सामान्य माणसाच्या जगण्याचा आधार हरवला होता. त्याच्या जीवनातील आनंद संपला होता. भारत हा सुरूवातीपासून उत्सवी देश आहे. कर्मकांडामुळं या उत्सवी देशाचं स्वरूप नष्ट केलं गेलं. त्यामुळं अशा कर्मकांडांना, अंधश्रद्धांना दूर सारण्यासाठी सुधारित, शुद्ध स्वरूपातील बौद्ध धर्माची निर्मिती झाली. जगण्यातलं दुःख दूर होऊन प्रत्येकाच्या जीवनात आनंद कसा निर्माण होईल याकडं बौद्ध धर्मात जाणीवपूर्वक लक्ष देण्यात आलं. असा बौद्ध धर्म स्थापन केल्यानंतर वैदिक धर्मातील कर्मकांडं करणारे जे भिक्षुक आहेत त्यांना त्यांची चूक लक्षात येईल आणि आपल्या असंख्य अनुयायांसह ते बौद्ध धर्मात समाविष्ट होतील अशी भगवान गौतम बुद्धांची अपेक्षा होती. मात्र आजचं बौद्ध धर्माचं स्वरूप पाहता भगवान गौतम बुद्धही हतबल होतील.

आपली राज्यघटना हवी तशी बदलता येते. आजवर त्यात अनेक दुरूस्त्या केल्या गेल्यात. घटनेच्या सरनाम्यात सुद्धा बदल केले गेलेत. घटनाकारांनी आपली घटना ही सर्वोच्च आहे आणि सर्वश्रेष्ठ आहे असा अहंकार कधीही बाळगला नव्हता. काळाच्या ओघात गरज पडेल तिथे त्यात दुरूस्त्या करता याव्यात अशीच तरतूद त्यामुळे त्यांनी केली. अशा परिस्थितीत राज्यघटना म्हणजे आमच्या अस्मितेचा भाव आहे आणि बाकी सगळा अभाव आहे असं समजणं हा खुळेपणा आहे. आपली घटना ही कुणा एकासाठी नाही. ती सर्वांसाठी आहे. जर कुणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना हीच सर्वोच्च वाटत असेल तर मग त्याची अंमलबजावणी व्हायला हवी.

जे कोणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानतात, त्यांच्या घटनेवर विश्‍वास ठेववात त्यांनी आधी आपली जात सोडायला हवी. धर्माच्या चौकटीतून बाहेर पडायला हवे. जातीमुळे-धर्मामुळे मिळणारे कोणतेही लाभ घेता कामा नयेत. आरक्षण तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर केवळ दहा वर्षे दिले जावे अशी डॉ. बाबासाहेबांची इच्छा होती. ते पुढे साठ वर्षे चालू ठेवणे आणि आरक्षणाचा लाभ घेऊन अन्य समूहांना वंचित ठेवणे हीच घटनेची पायमल्ली आहे. आरक्षणामुळे ते घेणार्‍यातही एक सवर्ण वर्ग तयार झालाय आणि त्याचे लाभ तो त्यांच्याच अन्य समाजबांधवांना घेऊ देत नाही.

आरक्षणाला विरोध केला की घटनेला विरोध केला म्हणून कालवा करायचा. ‘तुम्ही संविधानविरोधी आहात’ असं त्यांना सांगायचं. नरेंद्र मोदींना विरोध केला की त्याला ‘देशद्रोही, राष्ट्रद्रोही’ ठरवायचं आणि त्याला पाकिस्तानला जायला सांगायचं. हा दोन्हीकडचा कट्टरतावाद घटनाविरोधी आहे. आणीबाणी असेल किंवा अनेक एकतर्फी निर्णय असतील त्यातून आपल्या राज्यकर्त्यांनी अनेकदा लोकशाही व्यवस्थेवर बलात्कार केलाय. तो कुणालाही घटनेचा अपमान वाटला नाही.

सुप्रसिद्ध लेखक आणि इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी ऍट्रॉसिटी कायद्याला विरोध केलाय. ‘‘विषमतेचा पाया समता कशी प्रस्थापित करणार?’’ असा रोकडा सवाल त्यांनी केलाय. विशिष्ट समूदायासाठी अशा पद्धतीचे कायदे आणि त्यांचा वेळोवेळी होणारा गैरवापर हा घटनाद्रोह नाही का?

कोलंबिया विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा महामानव अठरा-अठरा तास वाचन करायचा. आपल्याला इथं यायची संधी अन्य लोकाच्या शिष्यवृत्तीवर, मदतीवर मिळालीय त्यामुळं जास्तीत जास्त अभ्याय करायचा, भरपूर वाचन करायचं अशी त्यांची भावना होती. आंबेडकरांनी वाचायला शिकवलं. आज त्यांचे अनुयायी म्हणवून घेणारे अनेकजण नाचायला आणि इतरांना नाचवायला शिकवतात. मुळात कर्मकांडाला विरोध असताना पंढरपूरचे विठ्ठल मंदिर उघडा म्हणून प्रकाश आंबेडकरांनी मागणी करणं हाच त्यांच्या विचारांचा पराभव आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कुठल्याही राखीव जागा नसताना डॉ. आंबेडकरांसारख्या महामानवानं स्वतःला सिद्ध केलं. वैयक्तिक गुणवत्तेच्या बळावर प्रगती कशी करावी, आपल्या समाजाला उन्नतीकडे कसं न्यावं असा ध्यास त्यांनी घेतला होता. वंचित-उपेक्षितांच्या कल्याणाचा मार्ग आखून देणार्‍या या लढावू योध्याचं, या महापुरूषाचं महत्त्व त्यांचे काही तथाकथित अनुयायी घालवत आहेत.

प्रवीण तरडे हे गणपतीबाप्पाला जर विद्येची देवता समजत असतील, ज्ञानाचं प्रतीक मानत असतील तर तिथं भगवतगीता असू द्या, कुराण असू द्या, बायबल असू द्या, गुरूग्रंथसाहिबा असू द्या किंवा संविधान असू द्या. तो त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे. संविधानाचा अपमान करायचा म्हणून कोणताही विचारी माणूस असं कृत्य करणार नाही. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे माझे अनेक मित्र अशी सर्व पुस्तकं गादीवर लोळत वाचत असतात आणि रात्री उशीर झाल्यावर ती तशीच उशाला घेऊन झोपतात. कोणत्याही ग्रंथाचा अपमान करणं हा त्यांचा उद्देश नसतो. म्हणजे आता यापुढे घरात, कार्यालयात असे कोणतेही पुस्तक असेल तर ते कसे ठेवावे, कसे हाताळावे याचीही आचारसंहिता आखायची का?

भारतीय राज्यघटनेनुसार या देशाचा कारभार चालतो. तो चालवताना या देशातील प्रत्येक माणसाला न्याय मिळेल आणि त्याचं जगणं आनंदी होईल हा हेतू घटनाकारांचा होता. असं जरी असलं तरी घटनेचा दुरुपयोग कसा करता येतो हे आपल्या अनेक राज्यकर्त्यांनी अनेकदा दाखवून दिलंय. राज्यघटनेनं सर्वोच्च न्यायालयाला इतकं स्वातंत्र्य दिलंय. मात्र तरीही अनेकजण त्यावरही आपली मते मांडतात. अनेक जबाबदार लोकाकडून सातत्यानं न्यायव्यवस्थेवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केली जातात.

घटनेबाबत सामान्य माणसाला प्रेम वाटावं असं वाटत असेल तर अशी झुंडशाही करता कामा नये. प्रवीण तरडे यांच्यासारख्या कुणाकडून जर अनावधानाने काही चुका झाल्या असतील तर त्यांना समजावून सांगायला हवे. अशा पद्धतीने त्यांच्यावर तुटून पडत त्यांना अपमानास्पदरित्या माफी मागायला भाग पाडले तर त्यांनी आपल्याला घटनेविषयी किती आदर वाटतो हे जाहीरपणे सांगितले तरी त्यांच्या मनावर जे ओरखडे उमटतील त्यामुळे ते कधीही या विचारधारेच्या जवळपासही फिरकणार नाहीत. अशी दहशत निर्माण करण्यापेक्षा प्रत्येकाला प्रेमाने जिंकणं हेच तर भगवान गौतम बुद्धांनाही अपेक्षित होतं.

प्रत्येक भारतीय नागरिक हा राज्यघटनेचा पालक आहे. त्यामुळे कुणीही स्वतःला राज्यघटनेचे स्वयंघोषित बॉडीगार्ड समजू नये. अशा फडतूस बॉडीगार्डसना आवरण्याची वेळ आता आलीय. अशा अनेकांचं बोलणं, वागणं, त्यांची मग्रूरी यामुळं जी दरी निर्माण होतेय ती घातक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर, प्रतिभेवर, त्यांच्या कर्तृत्वावर आमचा इतका अढळ विश्‍वास आहे की त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचं संरक्षण करण्यासाठी अशा बॉडीगार्डसची गरज नाही.

प्रत्येकानं भारतीय राज्यटनेचं सार्वभौमत्त्व ओळखणं गरजेचं आहे. राज्यघटना आपली आहे, आपल्यासाठी आहे म्हणून आपण राज्यघटनेचा आदर राखला पाहिजे. त्याला सांभाळण्याची जबाबदारी आपलीच आहे या उन्मादातून कुणी काही लादत असेल तर त्यांना जुमानण्याची गरज नाही.

मुळात आपल्या देशात लोकशाही आहे, असं म्हणणं हेच हास्यास्पद ठरावं अशी परिस्थिती निर्माण झालीय. लोकशाहीचे सर्वच स्तंभ भुसभुशीत झालेत. त्यांना भ्रष्टाचाराची वाळवी लागलीय. माणूसच माणसाकडे अविश्‍वासाने पाहतोय. संविधानाचं, लोकशाही व्यवस्थेचं वस्त्रहरण करणार्‍या अनेक घटना आजूबाजूला सातत्यानं घडतात. त्यावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न करण्याऐवजी असे वाद आणि वितंडवाद निर्माण केले जातात आणि दहशत पसरविली जाते. प्रवीण तरडे असतील किंवा भाऊ कदम! त्यांना ओळखणारा कोणीही त्यांच्या प्रेमातच पडेल. त्यांच्या देशभक्तीवर, त्यांच्या सामाजिक जाणिवेवर कोणीही शंका घेणार नाही. असं असूनही त्यांना इतक्या निर्लज्ज शैलीत ट्रोल केले जात असेल, त्यांच्यावर जरब बसवण्याचा अनाठायी प्रयत्न केला जात असेल तर ही अत्यंत क्लेशकारक आणि दुर्देवी बाब आहे हे मात्र नक्की.
– घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक, ‘चपराक,’ पुणे
7057292092

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

20 Thoughts to “राज्यघटनेचे स्वयंघोषित ‘बॉडीगार्ड!’”

 1. शशी त्रिभुवन

  घनश्याम पाटील सर, *आरक्षण तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर केवळ दहा वर्षे दिले जावे अशी डॉ. बाबासाहेबांची इच्छा होती. ते पुढे साठ वर्षे चालू ठेवणे आणि आरक्षणाचा लाभ घेऊन अन्य समूहांना वंचित ठेवणे हीच घटनेची पायमल्ली आहे.* हे विधान मला एकूण विवेचनात विसंगत वाटते. त्यातही आरक्षण तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केवळ दहा वर्षे दिले जावे अशी डॉ. बाबासाहेबांची इच्छा होती.., असं आपण म्हटलंय त्याचा आधार काय? हे आणि नेमके राजकीय आरक्षण की सामाजिक, शैक्षणिक, आणि नोकरीतील आरक्षण याबद्दल म्हटलंय हेही स्पष्ट करून सांगावे.
  -शशी त्रिभुवन, अहमदनगर

  1. योगेश

   आरक्षण हा मुद्दा घेतल्यापेक्षा. ह्या मिद्द्यापेक्षा जर तुम्ही जाती चे उच्चाटन करून आपण सर्वात रोटी आणि बेटिचा व्यवहार करून जर सर्व जाती नष्ट केल्यास. आपली यास सहमती असेल का ?

 2. राहुल गायकवाड

  एवढं लिहून काही उपयोग नाही. ते तुमची देखील जात,पात,धर्म, प्रांत,गट बघून कसं वागवायचं तर ठरवणार. काही गोष्टींपासून लांब राहिले तर काही बिघडत नाही. द्वेष आणि मत्सराने ग्रस्त असलेली टाळकी आहेत.

 3. Mayur Balkrishna Bagul

  खुप छान लिहिले आहे यातील डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचे संदर्भ उत्तम कुठल्याही आरक्षणाचे कुबड्या घेऊन शिक्षण नाही पूर्ण केलं तर स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर शिक्षण घेतले👌👌👍

 4. Surekha Borhade

  सद्यस्थितील समाजातील व्यवस्थापनातील चित्र आपल्या प्रखर शब्दांनी समोर उभे राहिले.

  1. जयश्री खरे

   आदरणीय सर नमस्कार🙏🏻अर्थात माझी इथे फार काही ओळख नाही.आपण जे लेखन करून स्वयम घोषित बॉडीगार्ड म्हणत आहात रू.त्याचे अनेक अर्थाने विवेचन केलं आहे सर.अर्थात ते कुणाच्या बाजूने आहे ते समजत.मुळात संविधान कुणी कसे मानावे हे त्या त्या भारतीयांना माहिती आहे असे आपण समजू यात.मग काल सर्वात आधी याची नोंद आपल्याला का घ्यावीशी वाटली नाही सर? आपण का तत्काळ यास विरोध केला नाही.संविधान यावर कुणी बसविण्याची, पाट आहे असे समजून बसविण्याची जागा तर नाहीच ती.प्रत्येकास त्याचा अर्थ समजला आहे. अर्थात हा प्रश्न मला पडला.म्हणून आपणास हा प्रश्नच.आपल्या सर्व सारख्या किंवा बरोबरीचे अनेक व्यक्ती आहेत त्यांना का वाटल नाही ही चूक आहे.भारताचे सर्वोच्च संविधान आहे. नंतर प्रत्येकाच्या भावना.तेव्हा आपण कोणी पुढे आले नाही.हो संविधान प्रत्येकाचा स्वाभिमान असावा यासाठी आज पर्यंत आपला कोणताच लेख माझ्या वाचण्यात नाही आला.आपली चपराक तेव्हा का थांबली सर,ज्या वेळी संविधान दिल्लीत जाळले तेव्हा तुमची लेखणी झिजली असती तर तुम्हाला नतमस्तक नक्की झाले असते बांधव. आजुन एक राहिले सर,संविधान दिन असतो कधी तरी ह ! तेव्हा देखील आपण त्या दिवशी काही लिहिलं किंवा त्याचा बोध उपदेश सांगितला हे देखील वाचण्यात नाही.भारतीयांना शुभेच्छा देणे दूरच. ( मला तसा माहिती )मग आज ज्यांनी बाजू घेतली त्यांना का बॉडीगार्ड म्हणता..याचं उत्तर तुम्हीच दिलं लेखात कदाचित संविधान या देशात असुरक्षित असण्याचा प्रकार असेल.तसे होवू शकत. नाही म्हणून तुम्हाला बॉडीगार्ड शब्द आठवला. .अहो सर ज्या स्त्रियांना संविधानाच्या चौकटीत अधिकार प्राप्त झाले त्याचं ऋण फेडण्यासाठी तर बॉडीगार्ड व्हावं लागते.अस म्हणते मी.नसेल पूर्ण संविधानाची कलम पाठ पण अभ्यास थोडा तरी करत आहोत काही लोक, समजून घेत आहोत.म्हणून त्याचे ऋण येतात. ज्यात मानवता शिकवली जाते.एक आहे तुम्हाला त्या संविधानाने लिहिण्याचे स्वातंत्र्य दिले म्हणून तुम्ही इतकं विरोधात उभ राहू शकतात. जागरूक मानस आहेत सर आपली.पण सडके मेंदू गदागदा हलवून नीट होत नाहीत. राहिला प्रश्न तीरडे यांनी याच संघटनेची नाव का घेतली तर त्यास दुसऱ्या संघटनेची नाव घेण्यास लाज वाटली असेल बहुतेक.संभाजी ब्रिगेडने त्यावर गुन्हा दाखल केला.त्यांचं नाव त्याने घेतल नाही.सर आपण या सर्व विरोधकांचे मेंदू आपल्या लेखणीने जागे केले बर झालं. तिरडे याने माफी मागितली तो व्हिडिओ प्रसिद्ध केला त्यावेळी ओळीत लिहिलं (सर्व दलितांच्या भावना दुखावल्या त्यांची माफी मागतो.) हे काय दलितांचे संविधान आहे का? अत्याचार झाले तर त्याची मदत घेता,अन्याय झाला तर संविधान आठवते त्याची मदत घेता,घरचे कलह वादातीत झाले संविधानाची मदत घेता…तेव्हा हे फक्त दलित असतात भारतीय नसतात काहो ..ते का डोळे झाक करतात यावर लिहा. हे झालं तीरडे पर्यंत… पण मध्येच आपण आरक्षण ओढून ताढून आणले..काय मध्येच विधी तज्ञ प्रकाश आंबेडकर यांच्या प्रश्नात गुंतवून विठ्ठ्ल मंदिर खोला , या चर्चेत नेले.राजकीय आहेत काही प्रश्न वंचितांसाठी असेल ते.(त्यांच्या विरोधी अनेक जण गरळ ओकातात. प्रत्येक्ष त्यांना विचारतात की मानस.) म्हणून आपल हे सर्व म्हणण मांडणं असबंध वाटते… आदरणीय सर तेव्हढा संविधान जाळले त्यास तुम्ही विरोधातील लेख लिहिला तो पुन्हा वाचण्यास द्या . नक्की..संविधान सन्मान करावा हे ज्याच्यात्याच्यावर सांगणारे कोणी नाही.ज्याची नितीमूल्ये स्वच्छ असेल तो सन्मान करतो.

   1. Sanghmitra

    योग्य बोलला.

 5. Nagesh S Shewalkar

  सर्व बाजू स्पष्ट करणारा असा लेख आहे. खूप छान.

  1. Shrikant Deo

   अचूक विवेचन!

   तशाकथीत बाॅडीगार्ड्स ना हे कळलं तरी खूप झालं

 6. Vinod s. Panchbhai

  अतिशय मुद्देसूद आणि रोखठोक मांडलंय!
  जबरदस्त लेख! या लेखाच्या माध्यमातून तरी परिस्थितीत सुधारणा व्हावी अशी अपेक्षा आहे!

 7. प्रशांत ठाकरे

  दादा, एकंदर अलीकडील बऱ्याच घटनांमधून हे वातावरण दिसून येऊ लागलं आहे. एकाने कोणीतरी विरोध केला, की बाकीच्यांनी त्याची री ओढायची. तात्त्विक विरोध वगैरे नसतो. असतो तो केवळ द्वेषापोटी विरोधासाठी विरोध. दलित असो की सवर्ण, हिंदू असो की बौद्ध सर्वांनाच राज्यघटनेविषयी आदर आहे. डॉ. बाबासाहेबांबद्दल आदर आहे. मात्र तथाकथित काही अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या नवरदेवांनी इथेही गुडघ्याला बाशिंग बांधून घ्यायला सुरुवात केलीय. समजून घेण्याची तयारीच नाही त्यांची. हीच कृती जर एखाद्या दलित बांधवाने केली असती, तर त्याची पाठ थोपटली असती याच विरोधकांनी. एखाद्या व्यक्तीने कोणत्या उद्देशाने एखादी कृती केलीय, याचा विचार करण्याची देखील जर कुवत नसेल तर महापुरुषांची नावे घेण्याचा वा इतरांवर चिखलफेक करण्याचा अधिकारही यांना नाही. त्यामुळे तुम्ही या सर्व ‘बॉडीगार्ड्स’चे कान उपटले आहेत, ते योग्यच केले आहे.
  तडाखेबंद भाषा वापरून योग्यवेळी तुम्ही समज दिली आहे. शहाण्यांना शब्दाचा मार असतो. कदाचित शहाणे असतील तर ते उलट तरडेंना भेटून त्यांची माफी मागतील. अशी आशा ठेवायला काही हरकत नाही.

 8. Ashutosh Gotey

  धन्यवाद, छान उत्तर दिले, अशीच सत्याची बाजू निर्भिड पणे मांडावी

 9. Gayatri Sonje

  अतिशय मुद्देसुद व रोखठोक

 10. प्रा.धाये राजेंद्र

  घनश्यामजी आपण सद्यस्थितील भारतीय समाजाती वास्तव मांडणी केली….

 11. Yogesh

  आदरणीय लेखक साहेब,
  आपल्या लेखातून आपण घडलेली मूळ घटना ही चूक की बरोबर यावर भाष्य न करता घटनेचा निषेध करणारेच कसे चूक आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. काल तरडेंनी संविधानावर गणपती बसवला, पण भारतीय नागरिक या नात्याने किती लोकांनी याचा निषेध केला ? आपणही या बाबत काही लिखाण केलेले आढळले नाही. या आधीही दिल्ली येथे दिवसाढवळ्या संविधान जाळण्यात आले होते. त्यावरील निषेधाचा आपला लेख आढळला नाही. ( असल्यास कृपया उपलब्ध करावा). राहीला प्रश्न आरक्षणाचा, तर या देशात अमानवी असा जातीय अत्याचार, अस्पृश्यता, भेदभाव होता म्हणून आरक्षणाची देण्याची गरज पडली. जेंव्हा हे जातीय अत्याचार, भेदभाव कायमचे थांबतील तेंव्हा आरक्षणाची नक्कीच गरज पडणार नाही. पण आपल्या लेखनातून देशात होणाऱ्या जातीय अत्याचारांविरोधात निषेध केलेला आढळला नाही. तेंव्हा का बरं भारतीय लोक गप्प बसतात. अशा कृत्यांच्या विरोधात नेहमी हेच बॉडी गार्ड आवाज उठवतात. जेंव्हा अशा अन्यायाविरोधात बोलण्याची कुणाला गरज वाटत नाही तेंव्हाच अशा बॉडी गार्ड ची आवश्यकता असते.

 12. Sanghmitra

  वंचित समाजाला जे अधिकार मिळाले आहेत ,आज ते जे काही आहेत ते sanvidhana मुळे न ते त्याना प्रिय आहे. जशी हिन्दु ची भगवत गीता रामायण मुस्लिम ची कुराण तशी भारताची sanvidhan आहे. याचा त्याना अभिमान आहे. सर्व देव न धर्मा पेक्षा sanvidhaanche स्थान उंच आहे. जे देव 100पिढ्यान देवू शकले नाहीत तो समातेचा हक्क sanvidhana ने दिला. त्या sanvidhanala कोण्या देवाच्या खाली ठेवण्याचा का प्रयत्न करायचा.

 13. Dinkar jogai

  खूप चांगले विचार.

 14. sunil jawanjal

  आपण घेतलेली भूमिका अतिशय योग्य आहे .अनेकदा समाजात अशा अनेक घटना घडतात की ज्यातून संविधान धोक्यात आहे असे वाटतेआपण महापुरुषांच्या जयंत्या साजर्‍या करत असतो त्याच जयंतीला महापुरुषांच्या प्रतिमेसमोर डीजे लावून नाचणाऱ्या पोरांकडे पाहिलं की मनाला खूप वेदना होतात. तुम्ही मांडलेली भूमिका अतिशय योग्य आहे कुणी मुद्दाम हून संविधानाचा अपमान करत नसतं हे सत्य नाकारून चालणार नाही.

 15. Baliram Disale

  रोख ठोख विचार धन्यवाद…

 16. मानसी चिटणीस

  सणसणीत कान उघडणी केलीय. मुद्देसुद आणि रोखठोक

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा