विद्येच्या देवतेचा वाचनसंदेश

विद्येच्या देवतेचा वाचनसंदेश

आज गणेश चतुर्थी. ह्या दिवशी आपण घरोघरी पार्थिव गणपतीचे पूजन करतो. त्याच्यापुढे छान आरास करतो. आपल्यातील कलागुणांना वाव देतो! परंतु ह्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना ह्या विषाणूमुळे जगभर अगदी हाहा:कार माजवला आहे. लॉकडाऊनमुळे सगळे जग कसे ठप्प झाले आहे. महाराष्ट्रात तर ह्या विषाणूने कहरच केला आहे. गेले पाच-सहा महिने झाले सगळे व्यवहार बंद होते. सगळ्यांच्या अंगात आणि मनात नकारात्मकता भरली आहे. ह्या सगळ्या नकारात्मकतेत गणपती बाप्पाच्या आगमनाने मनाला आता कुठे थोडीशी उभारी आली आहे. सगळ्यांचा उत्साह वाढला आहे. त्यात सगळीकडे छान पाऊसही झाला आहे. सगळी धरणे ओसंडून वाहिली आहेत. अर्थात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे!

तसेच ह्या घरकोंडीमुळे शिथिल पडलेली शरीरातील यंत्रणा पुनश्च प्रफुल्लीत झाली आहे. बाप्पासाठी आरास करायची म्हटल्यावरच मन कसे प्रसन्न झाले होते. मी तर गेली काही वर्षे शाडूच्या मातीतून गणपती बाप्पाची मूर्ती घरच्या घरी घडवतो. म्हणजे आमचा दीड दिवसांचा गणपती आम्ही एका बादलीत विसर्जन करतो व तो पूर्ण विरघळला की त्यातूनच पुन्हा एकदा पुढील वर्षासाठीची मूर्ती घडवतो. एक सांगतो बाप्पाची मूर्ती घडवताना मन प्रफुल्लीत होते व मनावर आणि शरीरावर आलेला सगळा ताण कुठच्याकुठे नाहीसा होतो. ही घडवलेली मूर्ती साधारणपणे पंधरा दिवस आधी मी रंगवायला घेतो. मंडळी माझा अनुभव सांगतो की, मूर्ती घडवताना जेवढे छान वाटते ना, त्याच्या कितीतरी पटीने आपण घडवलेली ही मूर्ती रंगवताना वाटते. मी तर माझ्या ह्या बाप्पाशी गप्पा मारत मारत त्याच्याशी हितगुज करत करत त्याला रंगवतो व त्या रंगात बुडून जातो. दोन तीन दिवसांचा हा कार्यक्रम मला वर्षभराची उर्जा व चैतन्य देऊन जाते.

यंदाच्या वर्षी ह्या घरकोंडीमुळे आपण सगळे घरात डांबले गेलेलो आहोत. त्यात बहुतेक जणांना जुना वाचनाचा छंद नक्कीच जोपासायला मिळाला असेल पण बरेच जणांना तो जोपासता आलाही नसेल; कारण घरात नसलेली पुस्तकांची उपलब्धता! नेमके हाच तो विषय मनात घोळत होता आणि मला बाप्पाची आरास करतांना काय काय करायचे ते सुचले. सगळ्याच आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी घडवलेल्या एक मूर्ती आमच्या मागच्या बाजूला राहणाऱ्या प्रोफेसरांना खूप आवडली. त्यांनी परवाच ती घरी नेली व उद्या तिची प्राणप्रतिष्ठापना करणार आहेत. केवढं समाधान लाभले मला काय सांगू! आपल्या कलेचे असे कौतुक झाल्यावर मनाला दुप्पट उभारी येते हे नक्की. धन्यवाद सर.

होय, मी मूर्ती घडवतानाच चक्क पुस्तक वाचणारा गणपती घडवला व त्याच बरोबर त्याचे वेगवेगळ्या छटेतील सहा मूषक घडवले. एक सांगतो मागच्या आठवड्यात ह्या सगळ्यांना रंगवले ना, तेंव्हा मन गतकाळात रमले होते. आमच्या पुलाच्या वाडीतील ते जुने दिवस आठवले. शनिवार पेठेतील ग्रंथालय आठवले, जिथे मी नियमितपणे जाऊन दर आठवड्याला एक ह्या प्रमाणे पुस्तक वाचयला घरी आणत असे! एक सांगतो, नोकरीमुळे बरीच वर्षे वाचनाची ही आवड जोपासायला वेळच मिळत नव्हता पण एक आहे की, जेंव्हा केंव्हा खरेदीला जात असू तेंव्हा, एकदोन पुस्तके मात्र जरूर विकत घेत असू. मला, बायकोला आणि मुलीला तिघांनाही वाचनही आवड असल्यामुळे खूपच चांगले ग्रंथालय तयार झाले आहे. बरीचशी संग्रही ठेवण्यासारखी पुस्तके त्यात आहेत, ती जसा वेळ मिळेल तशी पुन्हा पुन्हा वाचलीही जात आहेत. त्यात ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या पुस्तकांची बहुमुल्य अशी भर पडली आहे. अहो एवढे कशाला! माझी स्वत:ची ६ पुस्तके माझ्या ह्या ग्रंथालयाची शोभा वाढवत आहेत! त्यामधील ३ ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केलेली आहेत. अजून काय पाहिजे! माझा हा वाचनाचा आणि लिखाणाचा छंद जोपासण्यासाठीच तर मी दीड वर्षापूर्वीच म्हणजे वयाच्या ५६व्या वर्षीच स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. मंडळी, ह्याच धर्तीवर मी आमच्या गणपतीची यंदाची आरास करून माझ्या कल्पनेतील ग्रंथालय साकारले आहे. ह्यात माझे असे काहीच कौतुक नाही. बाप्पानेच मला बुद्धी दिली आणि माझ्याकडून हे करवून घेतले आहे.

मला तुम्हांला दोन सामाजिक संदेश द्यायचे आहेत;
१. शक्य असेल तर शाडूच्या मातीचीच गणपतीची मूर्ती आणा व तिची प्राण प्रतिष्ठापना करा.
२. ही मूर्ती आपल्या घरातील बादलीतच विसर्जित करा व ती पूर्णत: विरघळल्यावर त्यातून घरच्या घरी मूर्ती घडवा, नाहीतर ते पाणी तुमच्या कडे कुंड्या अथवा बाग असेल तर त्याला घाला. हे काहीच जमत नसेल तर माझ्यासारख्या घराच्या घरी मूर्ती घडवणाऱ्यास द्या अथवा एखाद्या सामाजिक संस्थेला मूर्ती दान करा.

ह्यामुळे दोन गोष्टी साध्य होतील;
१. पर्यावरणाचा ह्रास होणार नाही.
२. तुमच्यातील कलागुणांना वाव मिळेल व मन:शांती लाभेल.

मंडळी, माझ्या अनुभवातून जे मला चांगले वाटले ते मी तुम्हांला सांगितले आहे. ही तर बाप्पाचीच इच्छा आहे.

ह्या निमित्ताने मला तुम्हांला अजून एक आवाहन करायचे आहे ते म्हणजे की, तुमच्याकडे जो काही वेळ असेल तो चांगल्या दर्जाची व तुमच्या आवडीची पुस्तके वाचा. ही पुस्तके विकत घ्या. तसेच तुम्हीं जर कोणाला फुलांचा गुच्छ अथवा बुके भेट देत असाल तर जिथे शक्य असेल तिथे पुस्तक भेट द्या. घरात स्वत:चे ग्रंथालय बनवा. जे सहज शक्य आहे. तुमच्यामुळे तुमच्या घरातल्यांनाही वाचनाची आवड निर्माण होईल. लहानमुले घरात असतील तर त्यांना नक्कीच वाचनाची आवड लावा. मी तर दरवर्षी चपराकच्या दिवाळी महाविषेशांकाच्या २५ प्रती विकत घेतो व त्या दिवाळीत माझ्या नातेवाईक/आप्तेष्ट/मित्रांना मिठाईच्या ऐवजी दिवाळी भेट म्हणून देतो.

कारण ‘वाचाल तर वाचाल’! हा मला मिळालेला कानमंत्र तुम्हीं माझे स्नेहचिंतक आहात म्हणून तुम्हांलाही सांगितला एवढेच!

– रवींद्र कामठे
९४२१२१८५२८

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

2 Thoughts to “विद्येच्या देवतेचा वाचनसंदेश”

  1. रविंद्र कामठे

    खूप खूप धन्यवाद घनश्याम सर. फार छान वाटतयं

    1. सारिता

      सर खूप छान अभिनव कल्पना आणि लेखही खूपच सुंदर सर्वांना प्रेरणा देणारा

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा