काही शतकांपूर्वी कुणाचे शिष्यत्व पत्करणे, कुणाकडून अनुग्रह घेणे हे आज जेवढे सोपे आहे तेवढे सोपे नव्हते. त्याकाळी गुरु ज्यांना गुरुमंत्र द्यायचा आहे अशा शिष्याची कठीण परीक्षा घेत असत. गुरुंच्या सत्व परीक्षेतून जी व्यक्ती यशस्वीपणे बाहेर पडत असे त्यावर श्री गुरुंची कृपादृष्टी होत असे त्याला गुरुमंत्र मिळत असे.
प. पू. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनाही अगदी लहानपणीच गुरुला भेटण्याची आस लागली होती. गणपती हे महाराजांचे पाळण्यातले नाव. गुरुंची भेट घ्यावी. विद्यार्जन करावे, गुरुमंत्र घ्यावा ही गणपतीला तळमळ लागली होती. बारा वर्षे वय असताना गणपती गुरुंचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडला. रानोवनी, गावोगावी, तीर्थक्षेत्री गणपती गुरुंचा शोध घेऊ लागले. प्रत्येक ठिकाणी भेटणाऱ्या साधूला, महाराजांना, भक्तांना ते गुरु कुठे भेटतील असे विचारु लागले. त्यांच्या मनात असलेली, त्यांना जळी, स्थळी, स्वप्नी दिसणारी गुरूमाऊली मात्र प्रत्यक्षात कुठे दिसत नव्हती, भेटत नव्हती. या दरम्यान गणपतीला नाना प्रकारची माणसे भेटली. गुरुमहाराज अशी ख्याती असलेल्या अनेक व्यक्ती भेटल्या परंतु त्या कुणाच्याही दर्शनाने गणपतीचे समाधान होत नव्हते त्यांच्याशी चर्चा करताना गणपतीच्या अपेक्षांची पूर्ती होत नव्हती परंतु गणपती हार मानत नव्हता. नव्या जोमाने तो गुरूंचा शोध घेत असताना कुणीतरी सांगितले, की मराठवाडा प्रांतात नांदेडजवळ येहळेगाव या नावाचे छोटे गाव असून त्या गावी तुकाराम महाराजांचे वास्तव्य आहे तेच तुझे योग्य प्रकारे शंका निरसन करु शकतील, मार्गदर्शन करतील. ते ऐकताच गणपतीला खूप आनंद झाला. आनंदाच्या भरात गणपती उत्साहाने मजल दरमजल करीत, रानोमाळ प्रवास करीत येहळेगाव येथे पोहोचले. गावच्या वेशीवर बसलेल्या माणसांना विचारले,
“मला तुकाईमाऊलींचे दर्शन घ्यायचे आहे. कुठे भेटतील?”
“त्यांचा काही ठावठिकाणा नसतो. आत्ता इथे तर घटकाभराने कोसभर दूर दिसतील. कधी रानात असतात, कधी डोंगरावर दिसतील तर कधी नदी- ओढ्याकाठी दिसतील.” एक जण म्हणाला.
“शोधा म्हणजे कुठेतरी सापडतील. त्यांच्या वेशभूषेवर जाऊ नका. ‘वेश असेल बावळा, परी अंगी नाना कळा’ असे त्यांचे वागणे असते.”
“पोरा, बालपणी तुला तुकारामबुवांच्या दर्शनाची ओढ लागली. भाग्यवान आहेस.” दुसरा माणूस म्हणाला.
“मुलांसोबत खेळतात तसेच ते श्वानासंगेही रमतात. कदाचित कुठे आडोशाला चिलीम ओढत बसले असतील. कधी डोक्यावर टोपी तर कधी पागोटे! बाळा, जो माणूस जमिनीचे अंथरूण नि आकाशाचे पांघरूण करतो त्याची ओळख सांगणारे आम्ही बापडे कोण?” तिसरा माणूस म्हणाला.
त्यांचा निरोप घेऊन गणपती गोंदवलेकर नामक ते बालक तुकाराम महाराजांना शोधत निघाले. सारे गाव पालथे घातले. भेटेल, दिसेल त्याला विचारले. मंदिरात शोधले, रानात पाहिले पण गुरु नाही भेटले अशी गणपतीची अवस्था झाली.
‘काय करु? कुठे शोधू? माझी माय का रुसली? कधी भेटेल माऊली मला? का दर्शन देत नसावेत?’ असे प्रश्न स्वतःला विचारत असणाऱ्या गणपतीला अचानक एके ठिकाणी एक व्यक्ती दिसली. त्या व्यक्तीला पाहताच गणपती अंंतर्बाह्य आनंदला. शरीरात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले. लोकानी वर्णन केलेले सारे काही त्या व्यक्तीच्या ठायी दिसत होते. गणपतीच्या आतून एक आवाज आला,
‘अरे, पाहतोस काय? जिच्या दर्शनासाठी तू एवढा तळमळत होतास, आसुसलेला होतास तीच ही गुरुमूर्ती. हीच ती तुकाईमाऊली! गुरुमाऊली! जा…पाय धर… ‘
त्या आतल्या आवाजाने गणपतीच्या शरीरात वेगळीच स्फूर्ती संचारली. धावत जाऊन तो तुकाईच्या चरणी लीन झाला. दुसऱ्याच क्षणी गणपतीला जणू स्वतःचाच विसर पडला. एका क्षणात ते गुरुंचे झाले, जणू एक ज्योत दुसऱ्या ज्योतीमध्ये विलीन झाली. त्या क्षणापासून गणपती सतत माऊलींच्या सान्निध्यात राहून त्यांची सेवा करु लागला. तुकाईने सांगितलेली सारी कामे आनंदाने करु लागला. गुरुंची सेवा करताना तो एवढा एकाग्र होत असे, की स्वतःची तहानभूक विसरून जात असे. अनेकदा तो दिवसभर उपाशी राहत असे. तुकामाय जिकडे धावत जाई, तिकडे गणपतीची पावले वेगाने जात असत. दुसरीकडे तुकाराम महाराज जणू गणपतीची परीक्षा पाहिल्याप्रमाणे कधी त्याला सेवा करायची संधी देत तर कधी गणपतीला झिडकारत, दूर लोटून देत. परंतु गणपतीने कधी कंटाळा केला नाही, की मनात राग धरला नाही. माऊलीची प्रत्येक कृती कृपाशीर्वाद समजून तो महाराजांपासून दूर जात नसे.
तुकाराम महाराजांनी गणपतीला हरतऱ्हेने तपासून, पारखून घेतले. ‘मडके’ पक्के आहे ना याची खात्री करून घेतली. त्यांच्या प्रत्येक कसोटीला गणपती यशस्वीपणे सामोरे जात असूनही माऊली अनुग्रह देत नव्हते. एके दिवशी तुकाराम महाराज एका झाडाखाली बसले होते. गणपती नेहमीप्रमाणे त्यांच्या शेजारी विनम्रपणे उभे होते, जणू प्रभू रामचंद्रांच्या शेजारी भक्त हनुमान! अचानक तुकाराम महाराज म्हणाले,
“अरे, गणपती, त्या वडाच्या झाडाची पाने तोड पाहू.”
गुरुआज्ञा झाली म्हणता मग काय! माऊलींनी मला काम सांगितले या भावनेने कृतकृत्य झालेला गणपती तात्काळ वडाच्या झाडावर चढला. एक- एक पान तोडून टाकत असताना तोडलेल्या पानांच्या जागेवरून चिक गळत असल्याचे तुकारामबुवांनी पाहिले. ते म्हणाले,
“अरेरे! गणपती, हे तू काय केलेस? झाडाला जखमी केलेस की. अरे, बघ. झाडामधून रक्त गळत आहे. असे कर, तू तोडलेली सारी पाने जिथल्या तिथे लावून टाक. उतर पटकन खाली.”
ते ऐकून गणपती सर्रकन खाली उतरला. तोडलेली सारी पाने गोळा केली. झाडावर चढले. परंतु साधा विचारही मनाला शिवला नाही, की तोडलेली पाने पुन्हा झाडाशी एकरूप कशी होतील? ते कसे शक्य आहे? परंतु माऊली म्हणजे प्रत्येक परमेश्वर! त्यांना नाही म्हणायचे नाही. कोणताही प्रश्न विचारायचा नाही. काहीही न बोलता गणपतीने एक- एक पान झाडाला जोडायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे जोडलेले पान पूर्वीप्रमाणेच खोडाशी एकरूप होत गेले. जणू पानं कुणी तोडलेच नव्हते… गुरुकृपा दुसरे काय?
एकदा तुकाईमाऊलींनी चार धडधाकट माणसांना उचलणार नाही अशी ऊसाची मोळी तयार केली. ती जाडजूड मोळी गणपतीच्या डोक्यावर देत म्हणाले,
“चल. लवकर ये…” असे म्हणत तुकाराम महाराज स्वतः झपाझप पावले टाकत निघाले. त्यांचे तसे चालणे म्हणजे जणू वेगाने धावणे! पाठोपाठ डोक्यावर मोळी घेतलेल्या गणपतीलाही धावावे लागत होते. बराच वेळ चालल्यानंतर तुकारामबुवा एका ठिकाणी थांबले. गणपतीच्या डोक्यावरील मोळी स्वतः उतरवून घेतली आणि काय आश्चर्य त्यांनी त्या मोळीतील सारे ऊस रस्त्यावर इतस्ततः फेकून दिले. दुसरीकडे गणपतीला माऊलीच्या त्या कृतीचा, डोक्यावर मोळी देऊन पळवत आणल्याचा राग आला नव्हता, कोणत्याही प्रकारचा शीण वाटत नव्हता उलट एक वेगळेच समाधान, आनंद होता.
एकदा महाराज एका ओढ्याकाठी बसले होते. शेजारी गणपती उभा होता. त्यांच्यापासून थोड्या अंतरावर तीन छोटी बालके खेळत होती. अचानक तुकाराम महाराज म्हणाले,
“गणपती, त्या तिथे एक खड्डा कर बरे.”
माऊलीची आज्ञा शिरसावंद्य मानून गणपतीने थोड्या वेळातच एक खड्डा खोदला. माऊली म्हणाली,
“हं. छान. आता या पोरांना उचलून खड्ड्यात दे टाकून.”
गणपतीने क्षणभरही विचार न करता किंवा ‘का?’ असे उलट न विचारता तिन्ही मुलांना उचलले आणि त्या खड्ड्यात टाकले. तितक्यात पुन्हा गुरुआज्ञा झाली,
“शाब्बास! तो खड्डा वाळूने बुजवून टाक.”
बाप रे! खड्ड्यात मुले असताना तो खड्डा वाळूने भरायचा म्हणजे काय? परंतु असले प्रश्न सामान्य लोकांना पडतात. गणपतीसारख्या श्रेष्ठतम शिष्याला पडत नाहीत कारण गणपतीप्रमाणे सारी निष्ठा गुरुचरणी अर्पण केलेली नसते. गुरुआज्ञा प्रमाण मानून गणपतीने तो खड्डा वाळूने पूर्ण भरला.
“आता एक कर, त्या खड्ड्यावर तू बसून रहा. कुणाला काही सांगायचे नाही, काही बोलायचे नाही. उठायचे तर मुळीच नाही.”
तुकाराम महाराज म्हणताक्षणी गणपती त्या ढिगावर बसला. तिकडे त्या मुलांच्या घरची माणसे परेशान झाली. सारा गाव शोधून झाला. रडवेल्या चेहऱ्याने, डोळ्यांमध्ये आसवं भरलेल्या अवस्थेत ती मंडळी मुलांना शोधत ओढ्याकाठी आली. तिथे शांतपणे बसलेला गणपती त्यांना दिसला. ती सारी माणसे पळत गणपतीजवळ गेली. हात जोडून म्हणाली,
“महाराज, आमची लेकरे पाहिली का हो?” परंतु गणपती उत्तर काय देणार? तसा गुरूंचा आदेश नव्हता. गणपती शांतपणे शांत बसलेले पाहून एक जण म्हणाला,
“महाराज, असे शांत बसू नका. आमच्या कुटुंबावर आलेले संकट दूर करा. डोळे उघडा महाराज, आम्हाला मार्ग दाखवा…” तितक्यात एकाजणाचे लक्ष बाजूला बसलेल्या तुकाराम महाराजांकडे गेले. त्यांना पाहताच सर्वांना हायसे वाटले. आता आपल्याला तुकाईमाऊली नक्कीच मदत करणार, आपली लेकरे शोधून देणार या आशेने ती सारी मंडळी तुकाराम महाराजांकडे धावली. त्यांचे चरण स्पर्श करून हात जोडत म्हणाली,
“माऊली,गुरुमाऊली, तू दिनांची जननी, अनाथांची सावली. धाव, गुरुमाय, धाव. आमचे रक्षण कर. मार्ग दाखव. शरण आलो. देवा, शरण आलो महाराजा, धाव. कृपा कर.”
“अरे, मला काय विचारता? तो माणूस बसलाय ना, त्याला विचारा. तो काही बोलत नाही याचा अर्थ त्यानेच काही तरी डाव साधलाय.
त्याला बोलते करा. मारा.. झोडा. लकडीशिवाय मकडी वळत नाही. कसा सांगत नाही तेच पाहूया. जा. विचारा त्याला…”
प्रत्यक्ष तुकाईमाऊलींची आज्ञा म्हटल्यावर काय? सारी मंडळी पुन्हा गणपतीच्या दिशेने धावली. तो पूर्वीप्रमाणेच शांत बसलेला पाहून सारेच चिडले. सर्वांनी मिळून गणपतीला निष्ठुरपणे मारायला सुरुवात केली. गणपती निमुटपणे सारे सहन करीत होता. शांतपणे सारे झेलत होता. तोंडातून शब्द काढला नाही, की जागेवरून हलला नाही. तितक्यात तुकारामबुवा पुन्हा म्हणाले,
“अरे, त्याला उचलून फेका दूर. यानेच काही तरी करणी केलीय. हा जागचा हलत नाही याचा अर्थ… वेळ घालू नका. उकरा ती वाळू आणि बघा.”
त्या लोकानी गणपतीला बळेच दूर केले. वाळू काढायला सुरुवात केली. काही वेळात वाळू उकरत असताना त्यांना आत मुले दिसली. मुलांची अवस्था पाहून त्यांचे रुंदन वाढले. शोक अनावर झाला. तितक्यात माऊलीची दृष्टी त्या बालकांवर स्थिरावली आणि आश्चर्य घडावे तसे ती बालके झोपेतून उठून यावीत तशी बाहेर आली. मातांच्या कुशीत विसावली. सर्वांना आश्चर्य वाटले. तुकाईमाऊली आपल्या शिष्याकडे धावली. त्यांनी गणपतीला घट्ट कवटाळले आणि हलकेच ‘माझ्या प्रिय शिष्या…’ अशी साद घातली. क्षणार्धात गुरु-शिष्य हे अंतर मिटले. भेद संपले. ह्रदय ह्रदयाशी भिडले. कठोर परीक्षांमध्ये गणपती उत्तीर्ण झाला. आपल्या लाडक्या शिष्याला ‘ब्रह्मचैतन्य’ असे नाव माऊलींनी दिले. त्यांच्या साऱ्या शंका दूर केल्या. वेद, पुराण अशा धर्मग्रंथांची शिकवण देऊन माऊली म्हणाली,
“हे प्रिय शिष्या, ब्रह्मचैतन्या, आता जा. रामनामाची महती वाढव. तुला सारे अधिकार दिले आहेत. लोकाना रामानामाच्या मार्गी लाव. तुझा जन्म रामनामासाठीच झाला आहे. जा लवकर…” असे म्हणत तुकाराम महाराजांनी ब्रह्मचैतन्य महाराजांना गुरुमंत्र दिला, अनुग्रह दिला. आदेश दिला. जबाबदारी सोपवली. अधिकार दिला. तो दिवस होता… रामनवमी! प्रत्यक्ष श्रीरामाच्या जन्मदिनी अनुग्रह मिळणे हे केवढे मोठे भाग्य! परिश्रमाच्या काटेरी रस्त्यावर खडतर प्रवास केल्यानंतर मिळाली ती गुरुकृपा! धन्य ती गुरुमाऊली! धन्य तो शिष्य!
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज तुकाईमाऊलींचे चरणी नतमस्तक होऊन, त्यांचा आशीर्वाद घेऊन निघाले…
शिष्यसमुदाय जोडून रामनामाचे महत्त्व पटवून देताना श्री गोंदवलेकर महाराजांना अनेकदा शिष्यांनी कळत-नकळत घेतलेल्या परीक्षांनाही सामोरे जावे लागले. गुरुंचे एक ठीक आहे परीक्षा घेणे हा त्यांचा अधिकार आहे पण शिष्यांनी घेतलेली परीक्षा? नवल वाटले ना? पण असे घडले आहे. एकदा भागवत आडनावाचे एक अभ्यासू, ज्ञानी भक्त गोंदवले नगरीत आले होते. त्यांनी महाराजांसोबत अनेक विषयावर विस्तृतपणे, सखोल चर्चा केली परंतु भागवतांचे समाधान होत नव्हते. श्रींच्या ज्ञानावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. ते पाहून गोंदवलेकर महाराजांनी भागवताना अतिविशाल अशा रुपात दर्शन दिले. ते भव्यदिव्य रुप पाहून भागवतांनी घाबरून तिथून पळ काढला परंतु महाराजांनी त्यांना भक्तांकरवी बोलावून आणले. भागवत महाराजांना शरण गेले. महाराजांनी भागवताना अनुग्रह दिला. श्रीराम नामाची सेवा करण्याची संधी दिली. चौकस, अभ्यासू भक्त साधूसंतांना आवडतात हे या घटनेवरून लक्षात येते.
एकदा दोन मांत्रिक श्री गोंदवलेकर महाराजांच्या सान्निध्यात आले. महाराजांचे कार्य पाहून त्यांना वाटले, या गृहस्थाजवळ एक अशी विद्या आहे, एक निराळी अशी शक्ती आहे जी आपल्याकडे नाही. अशी विद्या, शक्ती आपल्याजवळ नसल्याने आपण अपूर्ण आहोत. आपले अघोरी ज्ञान अपुरे आहे. काहीही करून या माणसाजवळची विद्या मिळवायलाच हवी. असा हेतू मनाशी बाळगून ते दोघे महाराजांच्या अवतीभोवती राहू लागले, काही हाती लागते का याचा शोध घेऊ लागले. मधूनच महाराजांना विनंती करु लागले, की तुमच्याजवळ असलेली विद्या आम्हाला द्या. प्रत्येकवेळी ब्रह्मचैतन्य महाराज त्यांना सांगू लागले,
“अरे, बाबांनो, तुम्हाला वाटते तसे माझ्याजवळ जे नाहीच ते तुम्हाला देऊ कसे? माझ्याकडे फक्त रामनाम हीच एकमेव शक्ती आहे…”
असे नेहमी ऐकून ते मांत्रिक चिडले. त्यांनी वेगळेच काहीतरी ठरवले. एकेदिवशी बाहेर फिरायला जायच्या निमित्ताने ते महाराजांना घेऊन एका डोंगरावर गेले. अंतर्ज्ञानी असलेल्या महाराजांनी त्यांच्या मनात शिजत असलेला कट जाणला परंतु तो त्यांनी जाणवू दिला नाही. निर्मनुष्य अशा डोंगरावर पोहोचताच एक मांत्रिक म्हणाला,
“तुझ्याजवळ जी विद्या आहे, ती आम्हाला दे. आमची न्यूनता दूर कर. आम्हाला सर्व शक्तीमान कर.”
ते ऐकून महाराजांनी त्यांना पुन्हा तेच समजावून सांगितले. त्यामुळे मांत्रिक संतापले, चिडले. त्यांनी मंत्राच्या सहाय्याने अक्राळविक्राळ, विषारी नाग निर्माण केले. त्या नागांचा दोरीप्रमाणे उपयोग करून त्यांनी महाराजांना करकचून आवळून बांधून टाकले. एक दिवस झाला. दोन दिवस झाले पण महाराज नेहमीप्रमाणे शांत होते. मांत्रिकाच्या मागणीला भीक घालत नव्हते. अखेर एक दिवस महाराजांनी डोंगरावरून नागांसह खाली उडी घेतली. शरीराभोवती वेढलेले नाग त्या प्रकारामुळे अक्षरशः छिन्नविच्छिन्न झाले. ते पाहताच दोन्ही मांत्रिक मनोमन वरमले. ते महाराजांना शरण गेले. महाराजांनी त्यांना रामनामाची महती सांगून सन्मार्गाला लावले.
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा एक परमभक्त होता. त्याला रामनामाशिवाय आणि महाराजांच्या भक्तीशिवाय काहीही सूचत नसे परंतु त्या भक्ताच्या पत्नीला ते सारे थोतांड वाटत होते. तिचा अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास नव्हता. तिने एकदा असे ठरवले, की या महाराजांची एकदा परीक्षा घेऊन चांगली खोड मोडावी. त्याप्रमाणे एकदा तिचा पती बाहेर गावी गेला असताना तिने महाराजांना जेवायला बोलावले. त्याप्रमाणे महाराज तिच्या घरी जेवायला गेले. त्यावेळी त्या महिलेने महाराजांच्या ताटात काय वाढले असेल तर चक्क मिरच्यांचे तिखट आग लाडू! आता काय करावे? दुसरा कुणी असता तर रागारागाने ताट फेकून देत निघून गेला असता पण गोंदवलेकर महाराजांची गोष्टच निराळी होती. त्यांनी तो खमंग लाडूही मिटक्या मारत खाल्ला. ना त्यांना तिखट लागले, ना त्यांना ठसका लागला, ना त्यांच्या डोळ्यात पाणी आले. ती बाई दुरून सारे पाहत होती पण तिचे डोळे उघडले नाहीत. श्रींचे सामर्थ्य तिच्या लक्षात आले नाही. तिला आश्चर्य वाटून ती मनाशीच म्हणाली,
‘रानीवनी सारखा हिंडत असतो हा बुवा. याला जंगलात कुठे मिष्टान्न भेटणार? मिरच्या खाऊनच दिवस ढकलत असणार. सवय असणार याला तिखट खाण्याची…’ असे पुटपुटत त्याबाईने आजूबाजूला पाहिले. तिचे लक्ष शेजारी धगधगत असलेल्या चुलीकडे गेले. चुलीत पेटलेल्या निखाऱ्याकडे पाहताच तिने मनोमन एक निर्णय घेतला. आणि त्या साध्वीने चक्क पेटलेले, धगधगणारे निखारे महाराजांच्या ताटात टाकले. आपण फार मोठे काम केले, जग जिंकले या भावनेने ती महाराजांकडे पाहत म्हणाली,
“घ्या महाराज, घ्या. पोटभर खा. फार भूक लागली असेल ना.”
महद्आश्चर्य म्हणजे महाराजांनी एक वेळ ताटात पाहिले. जळते निखारे पाहूनही त्यांनी त्या बाईला ‘का?’ म्हणून विचारले नाही, दुखावले नाही. उलट त्यांनी हसतहसत एक-एक निखारा तोंडात टाकला. आणि काय आश्चर्य त्यांचे तोंड भाजले नाही, त्यांना चटका बसला नाही. एखादा आवडता पदार्थ मिटक्या मारत खावा त्याप्रमाणे महाराज जळते निखारे खात असलेले पाहून त्या महिलेचे धाबे दणाणले. तिच्या हातापायातील त्राण गेले. तिला तिची चूक समजली. भरलेल्या डोळ्यांनी घाबरून तिने महाराजांचे पाय धरले…
‘जया अंगी मोठेपणा, तया यातना कठीण!’ या वचनातील सत्यता श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे चरित्र वाचताना अनेकदा येते. ।।श्रीराम समर्थ।।
नागेश सू. शेवाळकर
पुणे. ९४२३१३९०७१