मृत्युघंटा

मृत्युघंटा

दीपक राइरकर, चंद्रपूर
चपराक दिवाळी विशेषांक 2013

भाषा आणि संस्कृती या नाण्याच्या दोन बाजू आहेत. भाषा मेली तर संस्कृतीचा विनाश अटळ आहे. तसेच जर एखादी संस्कृती लुप्त होत असेल तर भाषा ही लोप पावणारच. जगातील अनेक भाषा आणि त्याच अनुषंगाने त्याच्याशी निगडीत संस्कृती (किंवा त्याउलट) नामशेष होण्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांच्या तपशीलात जाण्याचे कारण नाही. परंतु इथे मुद्दा आहे मराठी भाषा आणि संस्कृती या दोहोंच्या संरक्षणाचा. (संवर्धनाचा मुद्दा खूप नंतरचा) या ठिकाणी भाषेमुळे संस्कृतीचे अस्तित्व धोक्यात येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

वर उल्लेख केल्याप्रमाणे मराठी भाषा आहे म्हणून आपण आहोत. ती नसेल तर आपणही नसू. अर्थात आपली (मराठी असल्याची) ओळखही संपेल. फारफार तर आपले आडनाव शिल्लक राहील. (काहींना त्याचीही लाज वाटल्यास आडनावाऐवजी ‘राव’, ‘भट’, ‘दीक्षित’, ‘पंत’ वगैरे नावापुढे लावून अमुक राव, अमुक पंत वगैरे म्हणवून घेणे पसंत करतील, ही शक्यताही नाकारता येत नाही.) मग ज्या भाषेचा पगडा आपल्यावर आहे, किंवा जी भाषा मराठीला मारक ठरत आहे तिची नि त्या प्रांताची संस्कृती आपसूक मराठीची जागा घेईल.

हे सर्व विस्ताराने नमुद करण्याचे कारण हेच की काही वर्षांनी नाही तरी काही पिढ्यानंतर मराठी भाषेसह आपली संस्कृती नक्कीच नामशेष होईल, यात शंका नाही परंतु दुर्दैव हे की या गोष्टीचे गांभीर्य आपण अजून ओळखले नाही. असे जेव्हा घडेल तेव्हा कदाचित आपण हयात नसू. किंबहुना आपल्या पुढच्या दोन-तीन पिढ्याही नसतील! परंतु त्या पुढील पिढ्यांना या वास्तवाचा सामना करावाच लागणार अशी सद्यःस्थिती आहे. मराठीच्या अस्तित्वाला ज्या भाषेमुळे संभाव्य मरण येणार ती आहे हिंदी! आणि खरी गोम इथेच आहे कारण बहुतेक मराठी जनांना असे वाटते की मराठीला धोका हिंदीचा नव्हे; इंग्रजीचा आहे परंतु हे तितकेसे खरे नाही. वास्तविक पाहता इंग्रजीमुळे मराठीचे फारसे बिघडणार नाही परंतु हिंदी ही मराठीला गिळंकृत करील, हे नक्की! आणि हे माझे मत नव्हे तर तज्ज्ञांचा निष्कर्ष आहे.

इथे एक बाब स्पष्ट करून द्यावीशी वाटते ती अशी की हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. खरे तर भारताची राष्ट्रभाषा अजून ठरलेलीच नाही. (राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, राष्ट्रीय पक्षी हे जसे ठरले आहेत तसे) म्हणून आपण मराठीच्या ऐवजी हिंदीतून व्यवहार करीत असताना हा व्यवहार राष्ट्रभाषेतच करीत आहोत, त्यामुळे मराठीचे काय बिघडले अशा आविर्भावात कोणी राहू नये. उलट घटनेने ज्या पंधरा भाषांना मान्यता दिली आहे त्या सर्वच राष्ट्रभाषेच्या दर्जाच्या आहेत. भारतीय चलनातील नोटांच्या मागील भागात साधारणपणे डाव्या बाजूला या सर्व पंधरा भाषांचा उल्लेख असतो. त्यामुळे एखादी भाषा ‘मोठी’ आणि एखादी ‘लहान’ असे अजिबात नाही. उलट त्या त्या प्रांतात तेथील स्थानिक भाषेला अनन्यसाधारण महत्त्व असणे क्रमप्राप्त आहे. (उदा. गुजरातमध्ये गुजराती, बंगालमध्ये बंगाली वा बांग्ला, तमिळनाडूत तमिळ वगैरे.)

त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात मराठीचा मान सर्वतोपरी असायला हवा परंतु दुर्दैवाने केवळ महाराष्ट्रातच हे चित्र वेगळे आहे. आपल्या राज्याची राज्यभाषा जिला घटनेनेही अन्य चौदा भाषांप्रमाणे राष्ट्रभाषेचा मान दिला आहे, त्या मराठीला महाराष्ट्रातच योग्य तो मान दिला जात नाही. अर्थात याला जबाबदार दुसरा-तिसरा कुणी नसून आपणच आहोत, हे मान्य करायलाच हवे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हिंदी ही प्रामुख्याने बोलली जाते. याला पुणे सुद्धा अपवाद नाही. विदर्भात त्याचे प्रमाण जास्त आहे एवढेच. पूर्वी हिंदीचे प्राबल्य शहरी भागांपुरतेच मर्यादित होते परंतु अलीकडे तर ग्रामीण भागालाही हिंदीचे ग्रहण लागले आहे. ज्याकडे उत्तरेकडे लोकांना इंग्रजीचे आकर्षण वाटते अगदी तसेच हिंदीबाबत महाराष्ट्रातील शहरीच नव्हे तर ग्रामीण लोकांनाही वाटते. त्याला अल्पशिक्षीत वा अशिक्षित स्त्रियांदेखील अपवाद नाहीत.

आपला भारत बहुभाषक राष्ट्र असल्यामुळे बहुतेक राज्यांत तेथील प्रांतीय भाषा अस्तित्वात आहेत. त्या सर्व भाषांचे विशिष्ट असे महत्त्व आहेच. प्रत्येक भाषेला वेगळे सौंदर्यही आहे कारण ती तेथील संस्कृतीचा अविभाज्य घटक असते. म्हणून एखाद्या भाषेबद्दल आकस असण्याचेही कारण नाही परंतु हिंदी भाषेला अतिमहत्त्व देऊन आपण मराठीची गळचेपी करीत आहोत. हिंदीचा अतिवापर करून मराठीला मरणाच्या दारी ओढून नेत आहोत आणि अशा तर्‍हेने जाणता अजाणता आपल्या हातून मातृभाषेची, म्हणजेच आपल्या आईची हत्या होत आहे, हे देखील आपल्याला कळू नये, ही केवढी गंभीर बाब आहे?

आपल्या संस्कृतीचे जतन करणे हे आपले कर्तव्यच होय आणि ते करणे आपल्या हाती असून अत्यंत सुलभ देखील आहे. तसे पाहता विभिन्न स्तरांवर त्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. हे प्रयत्न मात्र अपुरे असून त्यात आणखी भर टाकण्याची गरज आहे. त्यापैकी काहींना योग्य दिशा मिळण्याचीही गरज आहे. आपल्या संस्कृतीच्या संरक्षणासाठीचा सर्वात सोपा उपाय म्हणजे मराठीतून, मायबोलीतून, बोलीभाषेतून संवाद साधणे! घरीदारी, समाजात, सार्वजनिक स्थळी, शासकीय किंवा अशासकीय कुठल्याही कार्यालयात, दुकानात, कुठेही म्हणजे सर्वत्रच आपण मराठीतच बोलायचे. त्यासाठी काही वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही वा पैसे खर्च करण्याची गरज नाही.

सर्वांनी फक्त आणि फक्त मराठीतूनच बोलायचे.
काही ठिकाणी मराठीतून बोलल्यावर हिंदीतून उत्तर येण्याची शक्यता आहे परंतु महाराष्ट्रात वास्तव्यास असणार्‍या बहुतेक अमराठी बांधवास मराठी येते; निदान समजते तरी हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आपणच प्रथम त्यांच्याशी हिंदीत बोलायचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्यांना मराठीची गरज वाटत नाही. ही गरज निर्माण करणे गरजेचे आहे. काही अमराठी लोकांना मराठी बोलताही येतं परंतु त्यांना तशी सोय वा स्वातंत्र्य आपण देत नाही. त्यामुळेही ते हिंदीलाच प्राधान्य देतात. अनेक अमराठी भाषिकांना मराठी शिकण्याची इच्छा असते. ते तोडकं मोडकं का होईना बोलण्याचा प्रयत्नही करतात परंतु अशा लोकांची चेष्टा वा टिंगल करून आपणच त्यांचे प्रामाणिक प्रयत्न हाणून पाडतो, असे धक्कादायक प्रकार माझ्या अनुभवास आले आहेत. त्यामुळे पुढे हे लोक मराठी शिकण्याच्या ‘नादात’ किंवा ‘भानगडीत’ पडत नाहीत.

इथे अजून एक गंभीर बाब मला नोंदवावीशी वाटते. मराठी माणूस मराठी माणसाशीच मराठीतून नव्हे तर हिंदीतून बोलतो. अनेकदा हे माहीत असून देखील की समोरचा माणूस मराठी आहे. अशामुळेही भोवतालच्या अमराठी भाषकांना सहज शिकता येण्याची संधी हुकते. खरेतर आपण समोरच्या परप्रांतीयाशीही त्याला गैरसोय होऊ नये म्हणून हिंदीत बोलत नसून स्वतःच्या सोयीसाठी हिंदीत बोलत असतो कारण मराठीतून शिक्षण घेतलेले, मराठी शिकलेले अनेक मराठी बांधव मराठीपेक्षा हिंदीत जास्त ‘कंफरटेबल’ असल्याचे एका पाहणीत निष्पन्न झाले आहे. याचाच अर्थ असा की मनातल्या मनात विचार करीत असताना काही मराठी बांधव हिंदीचाच वापर करतात. (विचार करायलाही भाषा लागतेच.) त्यामुळे त्यांना ती अधिक जवळची वाटते. मराठीतून बोलत असतानाही अनेकदा बेमालुमपणे हिंदीतून संभाषण सुरू होण्याचे (स्विच ओव्हर) प्रकार यामुळेच होत असतात.

मराठी भाषेत पर्यायी शब्द असून देखील त्या शब्दांऐवजी हिंदी, उर्दूचे शब्द वापरण्याचे प्रकार हल्ली सर्रास सुरू आहेत. मराठी साहित्यातही याची आपणास प्रचीती येईल. कुठलेही ग्रंथ घ्या, कादंबरी घ्या, एवढेच कशाला वर्तमानपत्र घ्या (नावाजलेली, मराठीचे पुरोगामीत्व टिकवणारी देखील) आपल्याला त्याचा प्रत्यय येईल. याशिवाय चित्रपटांची भाषा, दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम, आकाशवाणीवरील निवेदन कुठेही बघा- हिंदीचे प्राबल्य (मराठीत) वाढलेले दिसेल. बातम्यांत ‘पंतप्रधानांची’ जागा ‘प्रधानमंत्र्यांनी’ कधीच घेतली आहे. आपल्याला ते कळले देखील नाही, एवढ्या अलगदपणे; आणि कहर असा की यात दिवसागणिक नवनवीन हिंदी/उर्दू शब्दांची वाढ सातत्याने होत आहे. ही बाब खरच अत्यंत गंभीर असून काळजी करण्यासारखी आहे. वास्तविक पाहता हा विषय एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल, एवढी याची व्याप्ती आहे. एक मात्र खरे की अशा गोष्टींमुळे मराठीचे संरक्षण अजून आव्हानात्मक ठरणार आहे.

मराठी (भाषेसह संस्कृती)चे मरण कसे अटळ आहे, हे आपण या उदाहरणाने पाहूया! हल्ली बहुतेक मराठी घरांत पती-पत्नी मधील संभाषण फॅशन म्हणून गप्पा वा पुरोगामी असल्याचे भासवून पुढारल्यासारखे दाखविण्याचा अट्टाहास म्हणा हिंदीत व्हायला लागले आहे. नाही म्हटल्यास तोंडी लावण्यापुरती मराठी बोलली जाते परंतु हिंदीचे प्रमाण जास्त. ‘प्रगत’ कुटुंबात हिंदीची जागा इंग्रजीने घेतली आहे हे जरी खरे असले तरी हिंदीच्या तुलनेत त्याची टक्केवारी अत्यल्प आहे. आता या अशा ‘प्रगत’ पतीपत्नींच्या पाल्यांना किमान त्यांच्यापेक्षा मराठी कमीच येणार! ही मुले मोठी झाल्यावर/ विवाहानंतर त्यांच्या अपत्यांना मराठी अजून कमी येणार! असे होता होता पुढील पिढ्यांना मराठीचा गंधच असणार नाही. एखाद्या पाल्याने पालकाला ‘व्हाट द ‘हाल’ मराठी इज?’ किंवा ‘ये मराठी क्या होती है?’ असे विचारल्यास वावगे ठरू नये, इतपत परिस्थिती गंभीर झालेली असेल. शिवाय हिंदीमुळे उत्तरेकडील संस्कृतीची रूजुवात आपसूकच होईल.

या पिढीतल्या लोकांचे विवाह एकतर ‘आर्यसमाज’ पद्धतीने होतील किंवा अन्य अमराठी पद्धतीने. मंगळसूत्र वा मंगलाष्टक काय असते हे त्यांच्या गावीही नसणार. भारूड, गवळण, फुगडी, तमाशा वगैरे प्रकार त्यांना माहीत असण्याची शक्यताच नाही. अशा तर्‍हेने मराठी भाषेसह एकूण संस्कृतीच त्या त्या घरातून पूर्णपणे लुप्त होईल. वर नमूद केल्याप्रमाणे आडनावे फार तर मराठी राहतील किंवा तीही राहणार नाहीत. आज अशा कुटुंबांची संख्या कमी आहे परंतु ही मराठीच्या मृत्युघंटेची नांदी तर नाही? विदर्भातील लहान लहान खेड्यात अशी कुटुंबे आहेत परंतु मुंबई-पुण्यासह उर्वरित महाराष्ट्रातील काही शहरांतही या रोगाची लागण झालेली आहे आणि याला गावेही अपवाद नाहीत. हे असेच सुरू राहिले तर काही पिढ्यांनी मराठीचे (नि आपले मराठी असण्याचे) अस्तित्व संपेल, हे कटू आणि भयावह सत्य नाकारता येणार नाही.

मराठीविषयी आपल्या उदासीनतेची कितीतरी उदाहरणे सांगता येतील. परंतु त्यापैकी एक गमतीशीर उदाहरण नमुन्यादाखल देणे योग्य ठरेल.

‘प्रेमविवाह’ ही आता बदलत्या काळात नवीन गोष्ट राहिली नाही, उलट ती काळाची गरज झाली आहे, असेही म्हणता येईल. कुणी म्हणेल मराठीचा प्रेमविवाहाशी काय संबंध? तीच बाब उलगडून दाखवायची आहे. मराठी पुरूष जर अमराठी स्त्रीशी (उदाहरणार्थ बंगाली) जेव्हा प्रेमविवाह करतो तेव्हा तो आपल्या प्रेयसी/पत्नीशी बांग्ला (बंगाली भाषेला बांग्ला म्हणतात.) भाषेत बोलायला लागतो. त्यांची होणारी अपत्येही साहजिकच बांग्ला भाषाच आत्मसात करतात. याउलट जेव्हा मराठी तरूणी बंगाली युवकाशी विवाह करते, तेव्हा त्यांच्या आयुष्याची पुढील वाटचाल मराठीतून होत नसून बंगालीतूनच होत असते. या दोन्ही स्थितीत त्या त्या घरांतून मराठी पूर्णपणे हद्दपार होते कारण चालीरीती, इतर संस्कार पूर्णपणे बंगाली होणे ओघाने आलेच.

आपल्या मातृभाषेबद्दल अनास्था, प्रेमाचा अभाव, आदर नसणे अशा गोष्टी संपूर्ण भारतात केवळ महाराष्ट्रातच आढळतात; ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळेच आपण पुरोगामी म्हणून मिरवणारे खर्‍याअर्थाने मागासलेले आहोत.

या लेखाच्या निमित्ताने सर्व मराठी बांधवांना मी पोटतिडकीने कळकळीची विनंती करतो की, सर्वांनी मराठीच्या संरक्षणासाठी एकजूट व्हावे. यासाठी कुठेही, कोणतेही आंदोलन करण्याची गरज नाही. गरज आहे ती स्वतःपासून सुरूवात करण्याची. आपण सारे ‘मराठीतूनच बोलणार’ असा संकल्प सोडूया! हा एकच मंत्र अंगिकृत केल्यास मराठी (भाषेसह संस्कृतीच्या) संरक्षणासाठी प्रत्येकाचा हातभार लागेल. ते आपले कर्तव्यच आहे. चारचौघात आपण मराठीत संभाषण सुरू ठेवले तर त्यात सामील असलेल्या अमराठी लोकांनाही साहजिकपणे मराठी शिकता येईल आणि कालांतराने तेही आपल्याशी मराठीतून बोलायला लागतील; नव्हे ते आपले/ आपल्यातलेच होऊन जातील.

मराठी शिकण्यासाठी शाळांची वा शिकवणी वर्गांची गरज अजिबात नाही. चेन्नईत वा कोलकात्त्यात वास्तव्यास असणार्‍या परप्रांतीयांस तेथील स्थानिक भाषा (तमिळ, बांगला इ.) शिकण्यासाठी कोणत्याही शाळेत जाण्याची गरज पडली नाही. कुठलेही औपचारिक शिक्षण न घेताही ते बांधव त्या त्या प्रांताची भाषा अस्खलित बोलू शकतात, एवढी की त्यांना ओळखणे एकवेळ कठीण होऊन जाईल की ते मुळचे कुठले?

आपल्या महाराष्ट्रात असे वातावरण आपणही निर्माण करू शकतो. यामुळे मराठीचे संवर्धनही होईल यात शंकाच नाही पण यासाठी ‘मला काय त्याचे?’, ‘मी त्यातला नाही’, ‘माझे गाव तसे नाही’ अशा तर्‍हेची नामनिराळे राहण्याची/समजण्याची वृत्ती सोडणेही गरजेचे आहे. तेव्हा मराठी महाराष्ट्राचा जयघोष करण्याआधी सर्व ज्ञात-अज्ञात भाषा व तेथील संस्कृतीविषयी आदर राखून प्रथम आपल्या मातेचा/मातृभाषेचा प्रामाणिकपणे व प्राणपणाने आदर करूया नि त्यानुसार वागुया! मराठीच्या संरक्षणासाठी आत्ताच सुरूवात करूया!!

– दीपक राइरकर, चंद्रपूर
चपराक दिवाळी विशेषांक 2013

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “मृत्युघंटा”

  1. Manoj Karmankar

    Very nice post and thought,

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा