जैसी दीपामाजी दिवटी
का तीथीमाजी पूर्णिमा गोमटी
तैसी भाषामध्ये मर्हाटी
सर्वोत्तम!
संत ज्ञानेश्वरांनी वर्णिलेल्या या मराठीतील पहिलं वाक्य श्रवण बेळगोळ येथील शिल्पावर ‘श्री चामुंडराय करविले’ हे 1039 साली कोरलेले आढळते. त्यापूर्वीचही एक वाक्य संशोधनात आढळलय. सोलापूर ते विजापूर या रस्त्यावर कुडल संगमावरील मंदिरात सन 1018 मध्ये कोरलेले वाक्य ‘वांछीतो विजयी होइबा’ हे आहे. जो वाचेल तो आयुष्यात यशस्वी होईल, असा त्याचा अर्थ आहे. मुकुंदराज यांनी सन 1196 मध्ये ‘विवेकसिंधू’ हा काव्यरूप तत्त्वज्ञान सांगणारा ग्रंथ लिहिला.
त्यानंतर 100 वर्षात नेवासा येथे संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या पंधराव्या वर्षी ‘भावार्थ दिपीका’ हा ग्रंथ लिहिला. उत्कृष्ट साहित्य निर्मितीच सामर्थ्य मराठीत आहे याची प्रचिती आली. ज्ञानेश्वरीमध्ये काव्य आणि तत्त्वज्ञान या दोन्हीचा मिलाप आहे. प्रत्येक ओवी साडेतीन ओळीची आहे.
बाळक बापाचिये ताटी रिगे
आणि बापाचिये जेवऊ लागे
की तो संतोष बेवी वेगे
मुखची ओढवी
वडिलांच्या ताटातील अन्नाचा घास मुलगा वडिलांना भरवून आनंद घेतो. तसं समाजातील सार ज्ञान मी समाजालाच देत आहे ही भावना ज्ञानोबा माऊलींनी व्यक्त केलीय. संस्कृतमधील ज्ञान त्यांनी मराठीत आणल, हे आपलं भाग्य होय.
ज्ञानदेवे रचिला पाया ।
नामा तयाचा किंकर
एकनाथे खांब दिला भागवत ।
तुका झालासे कळस
पंढरपूरला नामेदव पायरीवरून विठोबाच दर्शन घेणं म्हणजे भक्तीरसाचा कळस होय. आळंदीच्या संत ज्ञानेश्वरांच्या समाधिला झाडाच्या मुळ्यांनी व्यापल ते काढण्याच काम संत एकनाथांनी केलं. पैठणला धर्मग्रंथाची शुद्ध प्रत तयार केली. भारूडं रचून सर्वसामान्यांपर्यंत अध्यात्मिक विचार सोप्या भाषेत पोहोचविले. भाव आरूढ झाले ते भारूड. ते बहुरूढ केले. संत तुकारामांनी कधीही भंग न पावणारे अभंग लिहिले. सर्वांना आपल्यात आणणारी म्हणजेच, सर्वांना गोवी ती ओवी ज्ञानेश्वरांनी दिली. सावतामाळी, नरहरी सोनार, चोखामेळा यांनी अभंग लिहिले. समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक, दासबोध लिहिले. सन 1100 ते 1740 या काळात सातशे मराठी संतकवी झाले. गीतेवर विवेचन करणारे 48 ग्रंथ निर्माण झाले.
मराठी समृद्ध होत गेली. सृष्टीतील ध्वनीच अनुकरण करणारे शब्द मराठीतील नादमाधुर्य वाढविण्यास सहाय्यभूत ठरले. उदा. चिवचिव, काव काव, मॅव मॅव, माऊ, भो भो, धो धो, झिमझिम, मुळूमुळू, हळूहळू, धबधबा, थाडदिशी, किरकिर, सटकन इ. संस्कृत भाषेने तर मुक्त हस्तान मराठीला शब्द बहाल केले. उदा. मंदिर, राजा, मेघ. शेजारच्या कानडीतून मराठीत शब्द आले. उदा. गड्डा, बांबू, नथ, बांगडी, अक्का, आण्णा, अम्मा, ओगर (जेवण), रजई, गादी, गाडगे, झारा, ताम्हण, पेला, अडकित्ता, खिडकी, गच्ची, तागडी. तेलगू भाषेनही मराठीला शब्द दिले. उदा. अनारसा, चाऊम्याऊ, गजगा, अरबी फारसी भाषेचेही शब्द मराठीत रूळले. उदा. इमला, इमान, इमारत, इरसाल, कनात, करार, कर्ज, कलम, कायदा, किंमत, कारकीर्द, मिळकत, दानत, सरकार, तारीख, मजकूर, जिन्नस. गोवा प्रांत महाराष्ट्राला लागूनच आहे. तेथील तेव्हाच्या पोर्तुगीजाशी असलेल्या व्यवहारातून काही शब्द मराठीत रूळले. उदा. काजू, फालतू, फीत, घमेले, पगार, बिस्किट, चावी, कोबी, पपई, पेरू, भोपळा, हापूस.
इंग्रजीमधील अनेक शब्द मराठीत प्रचलीत झाले. टेबल, पेन, डॉक्टर, फी, बील, नर्स, कॉलेज, पेन्सिल, फोटो हे शब्द मराठीच झाले. मराठीनेही इंग्रजीला शब्द दिले. घेराव, बंद, ऐश, चक्काजाम असे शब्द इंग्रजी वृत्तपत्राच्या मथळ्यात आढळतात.
ग्रामीण जनतेन बोलता बोलता शब्द निर्माण केले. चहाला खेड्यात रामघोट म्हणतात. नंद या शब्दाचा अर्थ नांदणे आहे. जी नीट नांदू देत नाही ती नणंद! सैन्यात पुढ असणार्या हत्तीला ढालगज म्हणतात. त्यावरून पुढ पुढ करणार्या बाईला ढालगज म्हणू लागले. भगुल हा शब्द बहुगुणी म्हणजेच सर्वांना एकत्र धरणारा अशा अर्थान प्रचलीत झाला.
मराठीच सामर्थ्य विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी 1874 मध्ये निबंधमाला लिहून दाखवून दिलं. राम गणेश गडकर्यांनी मराठी भाषेला सौंदर्य प्राप्त करून दिलं. मधुरतेत अमृताला हरवतील, असे शब्द मराठीत आहेत. त्यात लावण्य आहे. संगितातील सुरांची कोमलता कोती ठरेल अशी ही भाषा आहे. साने गुरूजीलिखित ‘श्यामची आई’ मध्ये श्यामची अंघोळ झाल्यावर ओल्या पायांना माती लागेल म्हणून कुरबूर करणार्या श्यामला आई म्हणते ‘‘श्याम, पायाला माती लागू नये म्हणून जसे जपतोस तसंच मनालाही घाण लागू नये म्हणून जप हं.’’ अशा शब्दांच्या मोहक गुणांमुळे सुगंधाची महती फिकी पडेल. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सातारा येथील धनिणीच्या बागेतल रहाट गाडग पाहून कवयत्री सरोजीनी बाबर म्हणाल्या, ‘मिळेल ते देत रहायच’ ही वृत्ती वाढविणार हे रहाट गाडगं असतं. आचार्य अत्रे यांचा ‘दिनूच बील’ हा छोटा धडा वाचला तरी मन माणुसकीन भरून जात.
कानाना जीभा फुटतील अशी ही भाषा आहे. पतिव्रतेची पुण्याई पातकी पुरुषालाही परमेश्वर पदवीला पोहोचविते. यातील अनुप्रास ऐकायला छान वाटतं. समाजाची सांस्कृतिक उंची भाषेने कळते.
वरून मारी धपाधपा
आतून आधाराला हात
कुंभारासारीखा गुरू
नाही या जगात
कविवर्य ग. दि. माडगूळकरांच्या या ओळी मनाला निर्मळ करणार्या आहेत.
बहिणाबाई म्हणतात-
जिच्या नयनी नाही आसू
ती कसली सासू
ज्याचा नाही आसरा
तो कसला सासरा
मराठीत सारं काही आहे. मराठीत पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारी वि. स. खांडेकरांची ‘ययाती’ आहे. दुसर्या आणि तिसर्या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणार्या कुसुमाग्रज आणि विंदा करंदीकरांचं साहित्य आहे. पंख्याचा वारा ऐकून ‘यातला पंचम काय छान लागलाय’ म्हणणार्या निर्मळ मनाच्या पु. ल. देशपांडे यांचं विपुल साहित्य आहे. रणजीत देसाई यांची ‘स्वामी’ आहे. शिवाजीराव सावंतांची ‘मृत्युंजय’ आहे. माणसाचं नैराश्य दूर करणारं साहित्य आहे. वि. स. खांडेकरांची ‘अमृतवेल’ वाचून एका कानडी प्राध्यापकानं त्याचं नैराश्य गेल्याचं सांगितलं. त्याचा आत्महत्येचा विचार सोडून त्यानं या कादंबरीच कानडीत भाषांतर केलं.
मराठी ही ज्ञानभाषा आहे. सर्व चौसष्ट कलांचं ज्ञान मराठीत उपलब्ध आहे. ‘बोले तैसा चाले’ याप्रमाणे ‘लिही तैसा बोले’ हा मराठी भाषेचा गुण आहे. समाजास एकसंध ठेवण्याचं सामर्थ्य मराठीत आहे. आई हा शब्द ‘आपला ईश्वर’ या शब्दावरून तयार झाला असं श्री. माधवनाथ म्हणतात. मायबोली या शब्दातील माय म्हणजे आई. म्हणजेच आपली मायबोली मराठी ही आपला ईश्वरच होय.
या आईची अवहेलना नको. मराठीचा अभिमान बाळगा. तिच्याशी कृतज्ञ रहा. मराठीत लिहा. मराठी वाचा. मराठी वाचवा. जागतिक ज्ञानासाठी इंग्रजीची खिडकी असली तरी मराठी डोळे ठेवा. मराठीमध्ये सही करा. घरावरील दारावरील पाटी मराठीत लावा. घरात, दारात, बाजारात मराठीत बोला. दूरदर्शनवरील स्पर्धा कार्यक्रमाप्रमाणे मराठी ही इंग्रजीमधून बुचकाळून काढू नका.
मराठीचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू
वसे आमुच्या मात्र हृदय मंदिरी
जगमान्यता हीस अर्पू प्रतापे
हिला बैसवू वैभवाच्या शिरी
– प्राचार्य श्याम भुर्के, पुणे
9422033500
मासिक साहित्य चपराक, मार्च 2010
सुंदर लेख, माहितीपूर्ण लेख
सुंदर आणि माहितीपूर्ण लेख