आयपांढरीतल्या माणसांचा कानोसा

आयपांढरीतल्या माणसांचा कानोसा


‘चपराक प्रकाशन’च्या या आणि इतरही पुस्तकासाठी आमच्या www.chaprak.com या संकेतस्थळाला जरूर भेट द्या.

पुस्तकासाठी संपर्क – 87679 41850

श्री. सुधाकर कवडे यांच्या ‘आयपांढरीतील माणसं’ चैतन्यदायी, प्रेरणादायी आहेत. मराठी साहित्याच्या विश्‍वात दमदार पाऊल टाकणारा, नवा उमेदीचा व अस्सल मराठमोळ्या मातीतल्या नात्यांची वीण घट्ट करणारा, शब्दांवर प्रेम करणारा, माणसांतलं वेगळंपण जपणारा आणि आपल्या शब्द सामर्थ्यानं सामान्य माणसाच्या जगण्याला असामान्य उंचीवर बसवण्याची किमया, विद्यादेवतेचा वरदहस्त लाभलेले नवोदित लेखक सुधाकर कवडे यांनी काळजांत जपलेली माणसं शब्दबद्ध केली आहेत.

मराठी साहित्यामध्ये आजवर लाखोंनी आत्मचरित्र आली, हजारो जीवनचरित्रे झाली; परंतु व्यक्तीचित्रणे मात्र हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढीच लिहिली गेली आहेत. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील यांनी अस्सल ग्रामीण ढंगातील वृत्ती, प्रवृत्ती, विकृती, संस्कृती यासह मानवी स्वभावाचे गुणवर्णन करून खेड्यापाड्यातील, ग्रामसंस्कृतीतील माणसांच्या गुणवैशिष्ट्यासह मराठी साहित्यात मराठी वाचकांना व्यक्तीचित्रणाद्वारे नवं साहित्याचं दालन निर्माण करून दिलं आहे. यामध्ये अनेक मान्यवर साहित्यिकांनी आपलं योगदान नक्कीच दिलेलं आहे. परंतु बदलत्या पिढीबरोबर काळाच्या पडद्याआड चाललेल्या ग्रामसंस्कृतीचा आयपांढरीच्या मातीत वाढलेल्या, घडलेल्या ग्रामसंस्कृतीवर, ऐक्यावर, परंपरेवर श्रद्धा ठेऊन निखळ मनाने, निष्पाप वृत्तीने आपल्याच धुंदीत जगणारी, जगायला शिकवणारी, जीवनावर भाष्य करणारी, समाजमनाला भुरळ घालणारी, प्रसंगी डोळ्यात अंजन घालणारी, श्रद्धेच्या निष्ठेच्या वाटेवर अखंड वाटचाल करणारी, आगळी-वेगळी ही झपाटलेली ‘आयपांढरीतील माणसं’ मराठी साहित्य विश्‍वातही आपलं ‘वेगळेपण’ सिद्ध करतील.

अस्सल गावरानी, गावबोली, त्यांच्या सवयी, लकबी, ग्रामीण भागातील परंपरेशी जोडलेली नाळ जपत नव्या पिढीला माणूसपण शिकवणारी, माणुसकी जोपासणारी, शब्द निष्ठ, ध्येयनिष्ठ आणि कर्तव्यनिष्ठ माणसांची ओळख व्हायला ही माणसं नक्कीच मदत करतील. लेखकाची जबरदस्त निरिक्षणशक्ती, मातीशी एकरूप होऊन जगताना पाहिलेली, अनुभवलेली माणसं, पुस्तक वाचताना चित्रपटातील कथानकाप्रमाणे डोळ्यासमोर तरळत जातात. पुढे काय? या आतुरतेने वाचावी वाटतात. वाचक वाचता-वाचता त्या-त्या व्यक्तीचित्रणांत गुंग होऊन जातात. ही माणसं आयपांढरीपुरती मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या कसदार साहित्यभूमीत आपली मुळं घट्ट रोवून राहतील, असा मला आशावाद वाटतो.

पुस्तकातील घटना, प्रसंग, व्यक्ती विशेषण, संवाद आणि त्या-त्या व्यक्तीमत्त्वाबद्दल वाढत जाणारी कुतुहलता त्याचबरोबर ग्रामीण ढंगाचा, बोलीभाषेचा तसेच माणसांतला राग, द्वेष, रांगडेपणा, आपुलकी, सौजन्य, प्रेम, त्यांचं चालणं-बोलणं, रंग-ढंग शब्दात मांडण्याचं प्रचंड सामर्थ्य हे लेखकाच्या लेखणीची जमेची बाजू आहे.

खाऊन-पिऊन समाधानी असलेल्या कुटुंबातील रामभाऊ साखर कारखान्यातील सामान्य कामगार. परंतु वडीलांच्या राजकीय संबंधामुळे कामगार नेता बनतो. संघशक्तीला श्रमशक्तीची प्रतिष्ठा मिळवून देतो. अव्याहतपणे सत्य व न्यायासाठी निडरपणे लढणारा कामगार नेता, आयुष्यभर तत्व आणि स्वत्व जोपासणारा, सामान्यांच्या मदतीला धाऊन जाणारा गावचा आधारवड होतो. नेकीनं आयुष्यभर वागताना गावकी, भावकी, मतलबी, राजकारणातील बेकी त्यांनी जवळून बघितली. अनुभवलीही होती. कधीच स्वत:च्या स्वार्थाची पोळी भाजून न घेता परार्थ भावनेनं विश्‍वासाचा, आपुलकीचा हातभार लावला. जे द्यायचं ते भरभरून देत राहिले. त्यांनी हातचं काही राखून ठेवलं नाही. कर्तृत्वाचा, श्रीमंतीचा अहंकार मनाला शिवला नाही. गावासाठी, सामान्यांसाठी तन, मन, धन अर्पूण सर्वांना सुखावणारे झाड म्हणजे रामभाऊ.

तुकाबाजी जि.प. बांधकाम विभागात मजुराची नोकरी करून इमाने इतबारे गुजराण करणारा सामान्य गावकरी. आयपांढरीवर अफाट प्रेम करणारा ध्येयवेडा अवलिया. आयपांढरीतील घरा-घरातील माहिती असणारा आधुनिक सी. सी. टीव्ही कॅमेराच म्हणा ना! तोरणापासून मरणापर्यंत प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्तपणानं हजेरी लावणारा. मरणादारी आप्तस्वकियांचं दु:ख हलकं करणारा. कर्तव्यात जे कसूर करतात त्यांना सडेतोड बोलणारा. जे आईवडीलांची प्रामाणिक सेवा करतात त्यांचं जाहीरपणानं कौतुक करणारा बाजी प्रसंगी कुणाचाही मुलाहिजा न बाळगता स्पष्टपणानं बोलताना दिसतो. गावच्या सण, यात्रा उत्सवांत आनंदाने सहभागी होणारा. आयपांढरीतील मुला-माणसांवर प्रेमाची पाखरण करणारा. कर्तव्यात जागणारा. अंधश्रद्धेविरूद्ध ढोल बडविणारा, सोंगी-ढोंगी लोकांचं पितळ उघडं पाडणारा तुकाबाजीसारखा एकतरी अवलिया महाराष्ट्रातील गावा-गावामध्ये वावरत असतो याची जाणीव वाचकांना हे पुस्तक वाचताना होईल.

जन्मदात्या आईच्या मायेला पारखा झालेला, दारूच्या व्यसनांत बुडालेला बाप, थकलेल्या आजीच्या कष्टाच्या कमाईवर हाता-तोंडाशी गाठ पडणारा मुंगळ्या. कधी भरल्या पोटानं तर कधी उपाशी पोटानं राहणारा झोपडपट्टीतीला कुमारवयीन अवलिया. अंधारलेलं आयुष्य जगताना रूपेरी पडद्यावरील हिरोची स्वप्नं पाहणारा, झोपडपट्टीतल्या, समवयस्क पोरांचा हिरो होतो. ना उद्याच्या जगण्याची भ्रांत ना उपाशी पोटाची चिंता. तरीही भन्नाट कल्पनेच्या स्वैर वारूवर स्वैरपणानं स्वार होण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती त्याच्या नसा-नसात ठासून भरलेली अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. स्वप्न हे स्वप्न असतं. त्याला जात-धर्म, वय, लिंग, दारिद्र्य या कुठल्याच भिंती रोखू शकत नाहीत ते सत्यात उतरवण्यासाठी अंगी बाणावी लागते जिद्द आणि श्रमाची प्रतिष्ठा हेच ध्येय साध्य करण्यासाठी मुंगळ्याची अखंड धडपड आपणास जाणवते. वडीलांच्या मृत्यूनंतर मुंगळ्या अंतर्मुख होतो. मुंगळ्या वयाने लहान असूनही मोठ्या भावाच्या नोकरीसाठी प्रयत्न करतो.

जीवनातील सुख-दु:खाकडे समान नजरेनं पाहणारा, मुंगळ्यामध्ये वडीलांच्या निधनाने अचानक जाणतेपणा आल्याचं जाणवते. हा प्रसंग लेखकाने अतिशय हळव्या मनानं साकारला आहे. त्याचं मन सामाजिक, आर्थिक विषमतेमुळं ज्ञानगंगेपासून, विकासापासून शेकडो मैल दूर असणार्‍या घटकांसाठी व्यथीत झालेलं जाणवतं. आपल्या अवतीभोवतीच्या झोपडपट्टीतील मुंगळ्यासारखी तरूणाईच्या उंबरठ्यावरील पिढी. राष्ट्राचे उद्याचे वैभव सध्या कशी वाटचाल करीत आहेत याचं वास्तववादी, हृदयस्पर्शी, भावनेतून अभिव्यक्त करण्याचा लेखकाचा प्रयत्न प्रामाणिक व प्रांजल वाटतो. अत्यंत डोळस वृत्तीने समाजातील घटकांकडे, स्वप्नांकडे, पाहण्याचा आशावादी, मानवतावादी दृष्टीकोन मांडण्यात लेखक यशस्वी झाल्याचे जाणवते.

‘हुमान’ घालणारा, कोडी घालणारा सुरेशनाना. हुमान घालून बुचकळ्यात पाडणारा सुरेश नानाच्या कोड्याचा एक नमुना लेखकाने अतिशय खुबीने, चपखलपणे मांडला आहे. मोटारसायकलवर जात असताना दोघांना अडवून पोलीस प्रश्‍न विचारतो, ‘‘तुमचं दोघांचं नातं काय?’’ तेव्हा तो पुरूष मोठ्या खुबीने म्हणतो ‘‘हिची सासू माझ्या सासूला आई म्हणते.’’ तर त्या दोघांचं नातं काय! तुम्हाला जमल तवा हे नातं सांगा अन् घरच्या आंब्याचं दोन डझन आंबे घेऊन जावा. माणसाची मती गुंग करणारा, स्वत:च्या आमराईतील गोड रसाळ आबे खाऊ घालणारा नाना बोलण्यात पटाईत. दारूच्या व्यसनात सराईत पण, कर्तव्यात उभं राहणारा, आडल्या-नडल्यांच्या मदतीला उभं राहणारा, कसलीही अपेक्षा न ठेवता, मानवतेचा, माणुसकीचा मुलमंत्र घेऊन जगत राहिला. सुरेशनाना म्हणजे कोडं घालणारे, हुमान घालणारे, आनंदी वृत्तीनं स्वच्छंदी जीवन जगणारे आणि जगता-जगता आयपांढरीशी एकरूप होणारे व्यक्तीमत्त्व वाचकांच्या मनात, हृदयात घर करून राहतील, यात शंका नाही.

प्रत्येकाची फिरकी घेणारा, अयोग्य बाबीवर, वर्मावर बोट ठेवणारा, इरसाल शब्दागणिक इरसाल शिवी हासडणारा, अफलातून कृती करत मनोरंजन करणारा, सत्याचा ठाव घेणारा, गावात आणि बाहेरगावी आपल्या बेरकी वागण्यांतून आपल्या हिकमती डोक्यानं धम्माल उडवून देणारा पांडा वाणी स्वत:चे दु:ख, व्यथा-वेदना बाजूला ठेवून झाकरीतील बिंग वेगळ्या पद्धतीने फोडणारा. कळीचा मुद्दा निर्माण करून सहीसलामत बाहेर पडणारा, आपल्या इरसाल शिवीचा प्रमाद सगळ्यांना देत, गावची बितंबातमी चव्हाट्यावर आणणारा, अपप्रवृत्तीने वागणार्‍यांना, बाहेरख्यालीपणा करणार्‍यांना, आपल्या शब्दाने ताळ्यावर आणणारा, मृत्यूनंतरही आपल्या मुलाच्या काळजीत अडकलेल्या पांडा अण्णाच वर्तन आयपांढरीतल्या माणसांना कधीच दुखावत नाही. त्याच्या कल्पक डोक्यातून निघालेल्या हिकमती, त्यांनी बोलता-बोलता सहज दिलेली इरसाल शिवी आयपांढरीला आजही भाषणागत वाटते. मनस्वी छंदिष्ट वृत्तीची, निस्पृह वृत्तीची परोपकारी वृत्तीची माणसं आयपांढरीची महती वाढवतच राहतील. मराठमोळ्या, रांगड्या मातीतील जिगरबाज माणसं वाचकांचं मन वेढावून घेतील.

जालिंधर आयरे या शाहिराचा जीवनपट मांडून लेखकाने महाराष्ट्राची शाहिरी परंपरा, कलगी-तुरेवाल्याचा सामना, भेदीक पोवाडे, विररसाने ओथंबलेले शाहिरी पोवाडे, अध्यात्माची शिकवण देणारे, शिव-शक्तीचे, गुणगान करणारे वर्णन रास्तपणानं केले आहे. बदलत्या जमान्याबरोबर लोककला, लोकपरंपरा, लोकजीवन, नजेरआड व काळाच्या पडद्याआड होत असताना त्यांना ठळकपणे मांडून लोककलेची, लोकपरंपरेची ओळख नव्या पिढीला होण्यात नक्कीच हातभार लावला आहे. जालिंधर आयरे याच्या कवनाचं श्रवण गुणग्राहकतेतून करून त्याच्या तडफदार शैलीचं वर्णन उत्तम निरिक्षणाच्या माध्यमातून लोककलेच्या संदर्भात शाहिरांच्या संदर्भात अत्यंत जवळून घेतलेलं दर्शन माणसांच्या स्थूल भावनाबरोबरच सुक्ष्म स्वभावाचे केलेले दर्शन यथार्थ हुबेहुब मांडण्यात लेखक अत्यंत कमालीचे यशस्वी झाले आहेत.

कलाकार किती कलंदर असतात, किती बिलंदरपणे मनसोक्त जीवन अनुभवताना त्यांची परिणीती शेवटी काय होते, व्यसन जणू काही कलावंताला शापच आहे. पहाडी आवाजाचा, निधड्या छातीचा कलंदर गायकी असलेल्या जालिंधर शाहिराचा जीवनपट उगलडून दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न लेखकाने केला आहे. लेखकाने या करता सखोल मनन, चिंतन करून आयपांढरीच्या रूपानं मराठी वाचकांना आगळी वेगळी मेजवाणीच दिली आहे, असे मला वाटते.

व्यसनाची उच्चत्तम पातळी गाठलेला मोहन फिटर परंतु इच्छाशक्तीच्या आणि श्रद्धेच्या बळावर व्यसनमुक्त होतो. व्यसनाधिनतेमुळे शारिरीक, मानसिक, आर्थिक हानी झालेल्या मोहनला उपरती होते. व्यसनाच्या दृष्ट चक्रातून मोहन बाहेर पडतो. मोहन फिटरच्या परिवर्तनाने आयपांढरीतील व्यसनाधिन पिढी नक्कीच बोध घेईल. व्यसनापासून अलिप्त राहून सुखी जीवनाचा आस्वाद घेईल. काहीअंशी दारू मुक्तीच्या कामाला खर्‍या अर्थाने प्रबोधन पार पाडेल, अशी मला आशा वाटते.

खरं तर धोंडिबानाना काय किंवा हरिबाआप्पा काय ही सर्वपरिचित माणसं पण त्यांचही आगळंवेगळं महत्त्व वाचकांसमोर आणण्याचं काम मोठ्या कौशल्यानं लेखकाने केले आहे. धिप्पाड देहाचा, धिप्पाड मनाचा हजारो माणसातही सहज लोकांच्या नजरेत भरणारा धोंडिबानाना खरंतर जीवनाच्या अखेरपर्यंत मोठ्या साहेबांवर निस्सीम प्रेम असणारा, सच्चा दिलाचा हाडाचा कार्यकर्ता. धोंडिबानानाची तळमळ, नेत्यावरची अढळ श्रद्धा आणि त्याग व भक्तीचा त्रिवेणी संगम म्हणजे धोंडिबानाना. या धोंडिबानानाच्या जीवनातील अखेरची संध्याकाळ माणसाला हळहळ करायला लावते. तर अपार कष्टाच्या व जिद्दीच्या बळावर प्रामाणिकपणे रात्रंदिवस काळ्या आईच्या सेवेला सलाम करत गरीबीतून समृद्धीकडे वाटचाल करणारे, एकत्र कुटुंबपद्धतीचं वैभव दिमाखात मिरवणारे, शाण-घाण काढत शेतीक्षेत्राबरोबर पुढच्या पिढीच्या शिक्षणाचा ध्यास घेऊन समाजसेवेचा वसा घेणारे हरीबाआप्पा हे चालतं बोलतं विद्यापिठच वाटते. मुख्य म्हणजे आयपांढरीतील प्रत्येकाचं आदराचं, आशेचं आणि मायेचा कृतार्थतेनं बहरलेला महन्मंगल असा वटवृक्ष आहे.

आयपांढरीतील या माणसांवर लेखक सुधाकर कवडे यांची अपार माया आणि श्रद्धा आहे. त्याच श्रद्धेतून त्यांनी या माणसांचं आगळं-वेगळं रूप वाचकांसमोर आणलं आहे. आयपांढरीतील माणसं कर्तृत्व, हरहुन्नरीपणा, माणुसकीचं नातं जपत वाचकांच्या मनात घर करून राहतील. वाचक सुधाकर कवडे यांच्या आयपांढरीतल्या माणसांवर भरभरून प्रेम करतील, असा विश्‍वास वाटतो. लेखकांनी त्यांच्या लेखनीतून मराठी सारस्वताच्या दरबारात टाकलेलं हे दुसरं पाऊल निश्‍चितपणानं त्यांची स्वत:ची वेगळी वाट निर्माण करेल.

– आयपांढरीतली माणसं
लेखक – सुधाकर कवडे
प्रकाशक – चपराक प्रकाशन
पुस्तकासाठी संपर्क – 87679 41850

– प्राचार्य शिवाजीराव बागल
ग्रामीण साहित्यिक
चलभाष : 9860294573

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा