आमचे वैचारिक पालक वृत्तपत्रे

आमचे वैचारिक पालक वृत्तपत्रे

– प्रवीण दवणे
‘चपराक दिवाळी विशेषांक 2013’

एका हाताच्या अंतरावर असणारी प्रसारमाध्यमे अगदी मघाचच्या सेकंदाला घडलेली बातमी देत असोत; अजूनही कोट्यवधी घरं सकाळच्या एका बेलची किंवा हळूच वाजणार्‍या कडीची वाट पाहत असतात. एक उबदार घडी, कडीत वाट पाहत असते आपली; अन् आपण त्या ‘घडी’ची! वृत्तपत्रात बातमी वाचल्यावाचून तिचं ‘बातमीतपण’ मुळी जाणवत नाही. मथळ्यांमधून उतरत जाणारी न् वेगळी असेल तर चहाच्या एक घोट घेऊन घरातल्या कुणालातरी वाचून दाखवल्यावाचून ‘बातमी’ पूर्ण होत नाही; हे निर्विवाद सत्य आहे.

का आहे हे अजूनही?

वार्ताहर, बातमीदार किंवा संपादक हा आपल्यासारखाच सुखदुःख जगणारा, आपले हाल सोसणारा-हाडामांचा आपल्यातलाच माणूस आहे. मनातून पानावर ओतून कुणीतरी आपल्यासाठी जिवेभावे वेचून, अभ्यास करून आणि प्रसंगी धोका पत्करून आणलं आहे ह्या जाणीवेचा अदृष्य धागा वृत्तपत्राचा वाचक आणि वृत्तपत्रातील संपादकीय विश्‍व यांच्यात असतो. म्हणूनच ‘दिसलं की टिपलं, अन् टिपलेलं फक्त यंत्रणेमार्फत पोहोचवलं’ अशा माध्यमांपेक्षा वेगळा जिव्हाळा वृत्तपत्र व छापील शब्दांशी असतो. दृक-श्राव्य माध्यमांचं महत्त्व नाकारण्याचा हा प्रयत्न नसून मानवी नात्याच्या अनुषंगानं निर्माण होणारं नातं न् यंत्रांवरून यंत्रवत जुळणारं नातं यातलं अंतर सुचवण्याची ही धडपड आहे.

आचार्य अत्र्यांच्या ‘मराठा’वर वाढलेलं माझं बालपण; या माध्यमाची शक्ती त्यावेळी समजून चुकलं. मध्यमवर्गीय घर आमचं; पण एकाच वृत्तपत्राच्या दोन – कधी तर तीन प्रती घरात यायच्या. कुटुंब एकत्र, विस्तार मोठा. घरात माणस व नात्यांच्या उपशाखा अनेक. ‘मराठा’ यायच्या वेळी दबा धरून बसलेल्या चित्त्याप्रमाणे सावजावर झडप घालावी त्याप्रमाणे मराठा पळवला जाई. मग कधी वितंडवाद होत. मला काका पुष्कळ. अनेकदा मोजतो. आकडा नक्की सांगता येत नाही. सहा काका-आत्या दोन. सर्वांचे पक्ष वेगळे; राजकीय फडच रंगायचा घरात. कुणी जनसंघ, कुणी शेकाप, कुणी कम्युनिस्ट, कुणी समाजवादी. जणू सगळा राजकीय भारत माझ्या घरात एकवटलेला असे. त्यांच्यात खरमरीत चर्चा रंगायच्या. केव्हातरी हमरीतुमरीवर यायच्या. काहीवेळा प्रत्येकांच्या बायकांना आपापल्या नवर्‍यांना आवरावं लागे. हे सगळ मी बघताना माझी बर्‍यापैकी करमणूक असे. काहीवेळा मी भांबावून जात असे पण निर्णायक मत आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे असे. अत्रे म्हणजे माझ्या घराचं साहित्यिक दैवत होतं. अत्र्यांचं लेखन म्हणजे घरातले पवित्र ग्रंथ असत. ‘कर्‍हेचे पाणी’चे खंड असोत की, ‘समाधीवरील अश्रु’ आचार्यांच्या लेखनशैलीतील प्रास्ताविकतेविषयी सर्व (अ) राजकीय काकांचं एकमत असे. अत्र्यांची सभा असली की, सकाळपासनच सगळ्या घराला संध्याकाळचे वेध लागतं. मग घरी आल्यावर आचार्य अत्रे यांच्या सभेतली त्यांची वाक्ये, त्यांच्या कोट्या पुन्हा सांगितल्या जात व हसून हसून सर्वांच्या मुरकुंड्या वळत.

एक पत्रकार घरातली नाती कशी निर्मळ ठेवतो, जोडून ठेवतो हे बघणं, अनुभवन हा केवढा महत्त्वाचा संस्कार कुठल्याही संस्कार शिबिरावाचून माझ्यावर झाला, हे आठवलं की मन कसं भरून येतं.

आज हे आठवण्याच कारण – आज सर्व घराला बांधून ठेवणारं, वाचनाचा, विचारांचा आंनद देत देत नातं जोडणारं असं वृत्तपत्र विश्‍वात कुणी उरलंय का? संदर्भ बदलले मान्य; गतीनं अगतिकता वाढली, हेही मान्य पण विश्‍वासार्हता तेवढ्या टोकाची उरलीय का? आचार्य अत्रे डरकाळी फोडुन म्हणायचे, ‘माझी लेखणी विकत घेणारा कुबेर अजून जन्मायचाय.’ आज असं वाक्य इतक्या नैतिक हिंमतीनं म्हणणारं ‘एक’ तरी व्यक्तिमत्त्व – वृत्तपत्रविश्‍वात खरंच उरलंय का? याचा अर्थ इतक्या विश्‍वासानं आपलं मन सोपवणार्‍या आमच्या ह्या सामाजिक पालकांनी आता आपली तीच समर्पित मूल्य व्यवस्था पुन्हा प्रस्थापित करायला हवी आहेत.

एकाकी योध्याप्रमाणे लढा देत लिहित राहणार्‍या पत्रकारांचाच इतिहास निर्माण होतो. उद्योगपती व राजकीय सूत्रांच्या मालकीची वृत्तपत्रे अनेकदा कळसूत्री असतात. संपादकाला जे मनातून वाटते ते कागदावर उतरविण्याचे बंधन असते. पत्रकाराची कुवत असतानाही ती व्यक्त होत नाही. अशावेळी घरदार वार्‍यावर उधळून जिवाची बाजी लावणार्‍या पत्रकारांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लेखणीच्या जोरावर दिलेली लढत आठवते. ‘भाला’ कार भोपटकरांचे निबंध, ‘भारत’कार चिपळूणकर, ‘सुधारक’कार आगरकर आणि या सार्‍यांचे मुकूटमणी ‘केसरी’ कार लोकमान्य टिळक ही केवळ संपादकांची वा पत्रकारांची नावे नाहीत, तर हा समर्पित पत्रकारितेच्या महाशक्तीचा पानोपानी उलगडत जाणारा इतिहास आहे. ह्या मंडळींनी समाजाचे जे वैचारिक पालन आणि पोषण केले त्याचे मोल कशातही करता येणार नाही.

आजही वृत्तपत्रांनी वैचारिक पालकत्व निस्पृहपणे घेण्याची गरज आहे. जे विकलं जातं तेच विकत राहणार्‍या दुकानाचे रूप वृत्तपत्रांना येऊ नये. काय आवडतंय त्याहून काय आवडायला हवं याचा ध्यास आज पुन्हा निर्माण झाला तर हे पालकत्व निभावल्याचं श्रेय पत्रकारितेला मिळेल. त्यासाठी आजची आव्हानं ओळखायला हवीत. स्वातंत्र्यपूर्व काळात पारतंत्र्य संपावे-ब्रिटिशांना चलेजाव करावे एवढे एकच आव्हान असल्याने शत्रू ओळखणे सोपे होते. आज स्वतंत्र आहोत पण स्वातंत्र्याला अजूनही आरोग्यसंपन्न माणुसपणाचा डौल येत नाही. बेडौल, आकार नसलेले, विस्कळीत स्वातंत्र्य अधिकच धोकादायक. तो धोका नव्या पत्रकारितेने ओळखायला हवा.

तुटणारी नाती, भ्रष्टाचार हाच शिष्टाचार, दृकश्राव्य माध्यमांतील दृश्ये व त्याचा जनमनावर होणारा परिणाम, नव्या पिढीत वाढीस लागणारी कृतघ्नता, घरातील माजघरापर्यंत पोहोचलेली व्यसनाधीनता, घरापासून लोकसभेपर्यंत भ्रष्टाचाराची सलग असलेली लवंगी फटाक्यांची अचूक माळ, असे एक ना दोन असंख्य प्रश्‍न डायनॉसॉरचं उग्र रूप घेत सामोरे येतं आहेतं. हे प्रश्‍नचं सारा देश संपवून टाकणार हे स्वच्छ(अस्वच्छ) दिसत असताना समाजातल्या काही अजूनही निरांजनीसारख्या तेवणार्‍या मनांनी कुणाकडे पाहायचे? एक आतून असहायता येत चालली आहे. सकारात्मकतेची प्रबळ लाट निर्माण झाली तर जणांचा प्रवाह सुरू राहणार आहे. उदासीनता ही सुद्धा झपाटून फैलावणार्‍या संसर्गाप्रमाणे असते, ती वेळीच रोखणं हे सामाजिक पालकांचंच काम आहे. वक्ता, लेखक, शिक्षक, पत्रकार यांना मी सामाजिक पालक मानतो. व्रतस्थ भावनेनं कायम तेवणारे असे हे नंदादीप आहेत.

आज नव्या पिढीची भाषा संगणकाच्या काचपडद्यावर फिरकते. माऊसच्या तालावर किबोर्डच्या लेखणीनं- ती चॅटिंग करते. येणारे नवे सांस्कृतिक प्रवाह थोपवता येणार नाहीत पण त्यातून काय काय वाहत जाणार आहे त्याचा वेध कोण, कसा व कधी घेणार?

‘वाचणारा’ समाज ‘वाचला’ तरच देश वाचेल हे सत्य आहे. म्हणूनच लिखित भाषेचं हरवतं चाललेलं स्वत्व टिकवण हेही महत्त्वाचं आव्हान आहे. भाषेची मोडतोड ही केवळ शब्दांची, मुळाक्षरांची मोडतोड नाही, ती संवेदना आधी खाते अन् नंतर भाषेचे लचके तुटतात; तसेच उलटेही होऊ शकते. म्हणूनच पत्रकार, साहित्यिक हे भाषाप्रवाहीही असायला हवेत. त्यादृष्टिने ज्येष्ठ पत्रकार, संपादकांनी नव्या पत्रकारांची एक सकस मांदियाळी निर्माण करायला हवी.

वार्ताहर-पत्रकार-संपादक ही सर्वच पदे विलक्षण जबाबदारीची आहेत; व्यवसायातला ‘स्व’धर्म जपला तर ही मंडळी समाजाचे नेतृत्व करू शकतात, हा इतिहास आहे अन् ते भविष्यही आहे.

म्हणूनच शुभ प्रभाती वृत्तपत्र घेऊन येणार्‍या व्यक्तिची आजही सारे वाट पाहतात.

नेहमीच्या ओळखीच्या वाजणार्‍या कडीची सारे वाट पाहतात.

दरवाजा उघडला जातो
समोर कुणीही नसतं
मग आपण
खाली बघतो – कुणीकडे –
ती……… घडी विश्वासाने उघडतो.

आपला नवा दिवस, नव्या उमेदीनं सुरू करणारा आपला पालक पानोपानी डोळ्यात उतरतो, मनात विसावतो.

– प्रवीण दवणे
राजहंस, लुईसवाडी, पारसिक बँकेजवळ,
ठाणे (पश्चिम), 400 604
९८२०३८९४१४

‘चपराक दिवाळी विशेषांक 2013’

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा