“दान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे
सत्य शिवाहून सुंदर हे…
इथे मोल ना दामाचे, मोती होतील घामाचे
सरस्वतीच्या प्रेमाचे, प्रतीक रम्य शुभंकर हे…
चिरा चिरा हा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा
अज्ञानी तो पढवावा, थेंब आम्ही तर सागर हे…
त्यागाला या नाव नसे, पुण्यवान हा देश असे
कल्पतरू हा उभा दिसे, त्या छायेतील मंदिर हे”
असं शाळेचं वर्णन गीतकार जगदीश खेबुडकर यांनी ‘जोतिबाचा नवस’ या चित्रपटातील गाण्यात केले आहे. देशाचा उत्तम नागरिक घडविण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. शिक्षणाने माणूस नुसता सुशिक्षित होत नाही तर तो सुसंस्कारित ही होतो. शिक्षण ही एक अशी गोष्ट आहे जी दिल्याने वाढते.
स्वातंत्र्यप्राप्ती नंतर भारत सरकारने शिक्षण प्रसारासाठी विशेष प्रयत्न केले. सत्तर टक्क्यांहून अधिक भारत हा खेडोपाड्यात वसलेला आहे. या प्रत्येक खेड्यात आणि पाड्यावर शिक्षण पोचवणे ही मूलभूत गरज होती. जिल्हा परिषद व ग्राम पंचायती च्या माध्यमातून सरकारने शाळा खेड्यात व पाड्यावर पोचवल्या. शिक्षणा पासून वंचित असलेला समाज या निर्णयामुळे शिक्षित होण्यास मदत झाली. मातृभाषेतून शिक्षण मिळाल्या मुळे मुलांना आकलन सोपे झाले. शाळेत येणे जाणे सोपे झाले. हल्ली इंग्रजी माध्यमाच्या शाळांना महत्व आल्यानंतर सरकारी शाळांमधूनही सेमी इंग्रजीचे वर्गही सुरू करण्यात आले आहेत.
शिक्षकांना शिरगणातीपासून निवडणुकीपर्यंत जी काही कामे शाळेत शिकवण्या व्यतिरिक्त करावी लागतात त्यामुळे शिक्षक शिक्षणाला योग्य न्याय देऊ शकत नाहीत. तेव्हा अशी कामे देताना त्यावर विचार मंथन होणे गरजेचे आहे. या इतर कामांचा वेळ जर ते विद्यार्थ्यांना देऊ शकले तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये जास्तीची वाढ होणे शक्य आहे.
शहरात शाळेच्या फीचा आणखी मोठा प्रश्न आहे. अगदी बालवाडीपासून फीचा आकडा पाच-पन्नास हजार ते लाखाच्या पटीत असतो. ही फी सगळ्यांनाच परवडणारी असतेच असे नाही पण आपले मूल इंग्रजी शाळेत जाणार आणि खूप शिकून ‘साहेब’ होणार या आनंदात पोटाला चिमटा घेऊन, काटकसर करून गरीब घरातील आईबाप सुद्धा आपले मूल अशा शाळेत पाठवतात! वास्तविक मातृभाषेतून शिक्षण घेताना मुलांना आकलन चांगले होते पण शाळेत न्यायला येणारी बस, मुलाचा ड्रेस, टाय, शाळेतील विविध प्रकारच्या सोयी, शाळेची इमारत आणि फाड फाड इंग्रजी बोलणारी मुले पाहून, भले ती व्याकरणाच्या दृष्टीने चुकीचे बोलत का असेना आईबाप मोठ्या रकमेची फी द्यायला तयार होतात!
आणखी एक गोष्ट मला नेहेमी खटकते ती म्हणजे हल्ली लहान मुलांचा सहभाग असणारे टीव्ही वरील ‘सूर नवा ध्यास नवा’सारखे गाण्याचे कार्यक्रम किंवा कांही अशा प्रकारचे नृत्याचे व इतर अनेक कार्यक्रम ज्यामध्ये अगदी छोट्या मुलांचा सहभाग असतो. या कार्यक्रमावर माझा राग नाही, उदाहरण म्हणून नाव दिले इतकेच! पण या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या मुलांची हौस किती आणि पालकांची हौस किती? मला माझ्या आयुष्यात जी गोष्ट मिळाली नाही ती माझ्या बाळाला मिळावी हा भाग किती? पैसा आणि प्रसिद्धी देणारं दूरदर्शन सारखं माध्यम आणि त्याचं आकर्षण किती? सहा महिने किंवा प्रसंगी वर्ष किंवा त्याहून अधिक काळ चालणाऱ्या या मालिकांमुळे त्या मुलाचे होणारे शैक्षणिक नुकसान , त्याच्या मनात निर्माण होणाऱ्या अवास्तव अपेक्षा , नंबर नाही लागला तर त्याच्या मनाची होणारी घालमेल आणि नंबर आला तर पालकांच्या वाढणाऱ्या अपेक्षा! अशी ही न संपणाऱ्या प्रश्नांची मालिका त्या मुलाचं जीवन उध्वस्त करायला कारणीभूत ठरू शकते.
माझा मुलगा किंवा मुलगी ही अभ्यासात हुशार हवी. त्याला किंवा तिला संगीतामध्ये रुची हवी. त्याला किंवा तिला एखादे वाद्य वाजवायला यायला हवं. त्याने किंवा तिने नृत्यात प्राविण्य मिळवायला हवं. त्याला किंवा तिला एखादया खेळामध्ये गती हवी. तो किंवा ती पोहण्यात तरबेज हवी. थोडक्यात ‘सुपरमॅन’ असायला हवं! एवढया पालकांच्या अपेक्षा डोक्यावर घेऊन आणि पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन ते मूल वाकले नाही तरच नवल म्हणावे लागेल!
आहो किती अपेक्षा! थोडेसे मागे वळून तुमच्या स्वतःच्या आयुष्यात डोकावून पहा. यातील एखादी गोष्ट तरी तुम्हाला जमली होती का? उनाडक्या करण्यात तुमचं किती आयुष्य गेलं? आणि मुलांकडून इतक्या अपेक्षा?
त्यापेक्षा त्या मुलांना सामान्य आयुष्य जगू द्या. खेळू द्या , बागडू द्या. त्यांचं ‘बालपण’ त्यांना उपभोगू द्या. नाहीतर आयुष्यभर त्यांना ती खंत राहणार आहे. त्यांना उत्तम नागरिक बनू द्या! उत्तम माणूस बनू द्या!
त्यांना स्वतःला जर एखादया कलेची खेळाची आवड असेलच तर त्यांना जरूर प्रोत्साहन द्या! पण काहीही करून त्यांना तुमच्या अपेक्षांचे ‘बळी’ करू नका!
बाल मजुरी हा देखील शिक्षणा मधील फार मोठा अडथळा आहे. बाल मजुरीच्या विरोधात सरकारने अनेक कायदे केलेले आहेत. सक्त शिक्षा ठोठावण्यात आल्या आहेत. पण तरीही कांही प्रमाणात आजही ही समस्या ‘ त्या ‘ मुलांच्या शिक्षणा आड येते आहे. ‘ ती ‘ मुले शिक्षणा पासून वंचित राहत आहेत. हा प्रश्न सामाजिक आहे. बाल मजुरी चं मुख्य कारण आहे भारताची लोकसंख्या, जी आज एकशे पस्तीस कोटींच्या घरात आहे. या बाबतीत चीनला देखील आपण काही वर्षांत मागें टाकणार आहोत. इथेही पुन्हा शिक्षणाचा प्रश्न येतो. छोट्या कुटुंबाचे फायदे समजण्या साठीही शिक्षणाची गरज आहे. हे शिक्षण नसल्याने ज्यांची कौटुंबिक व्याप्ती मोठी आहे त्या घरातून मुख्यत्वे बाल मजुरी चा प्रश्न भेडसावत आहे.
दोन वेळा खाण्याची भ्रांत असलेल्या अशा घरांमधून मुलांसाठी शिक्षण ही ‘लक्झरी’ असते. सर्वांनीच काही न काही काम केल्याशिवाय अशा घरातून चूल पेटत नाही! आणि अशाप्रकारे ही मुले शिक्षणापासून वंचित राहतात! प्रमाण कमी असेल पण आहे!
भारत सरकार व सर्व राज्य सरकारे शिवाय कांही सामाजिक संस्था बाल मजुरी च्या विरोधात व या मुलांच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्नशील आहेत ही खूप मोठी जमेची बाजू आहे!
सरकारने सामाजिक संस्थांच्या मदतीने मूक-बधिरांसाठी शाळा काढल्या आहेत. अंध, मतिमंद मुलांसाठी शाळा काढल्या आहेत. अगदी ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठीही काही ठिकाणी फिरत्या शाळा आहेत. पण हे सगळं असलं तरी आपल्या मुलाला किंवा मुलीला अशा शाळांमधून पाठवणं ही शेवटी पालकांची जबाबदारी आहे आणि ती त्यांनी पार पाडायला हवी. तरच हा ज्ञानाचा दिवा घरोघरी लागून ही आपली भारतभूमी तेजोमय होईल! मुलींना आवर्जून शिक्षण दिलं गेलं पाहिजे कारण एक स्त्री शिक्षित होणं म्हणजे एक कुटुंब शिक्षित होणं म्हणजेच प्रत्येक घर शिक्षित होणं , म्हणजेच पर्यायाने सुसंस्कारित होणं! आणि प्रत्येक घर सुसंस्कारित होईल तेव्हा हा माझा भारत देश व देशातील प्रत्येक भारतीय उत्तम नागरिक बनून देशाचा आधार होईल! देशाची प्रगती राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर होत राहील!
शिक्षणाच्या आधाराने देशाभिमान जागृत करणारं, देशसेवेला प्रवृत्त करणारं गीतकार ग.दि. माडगूळकर यांचे ‘जिव्हाळा’ चित्रपटातील कृष्णा कल्ले यांनी गायिलेले आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले पुढील गीत खूपच समर्पक आहे.
“देश हीच माता देश जन्मदाता
घडो देशसेवा ऐसी बुद्धी दे अनंता…
धर्म पंथ नाही आम्हा जात-गोत नाही
मुले माणसाची आम्ही वंश माणसाई
मनी आमुच्या ना काही न्यूनता अहंता…
खुली ज्ञान-विज्ञानाची कलांची कवाडे
सुखे लाभ घेऊ त्यांचा शिकू रोज थोडे
उद्या उंच होऊ आम्ही धरू योग्य पंथा…
विस्मरू न आम्ही केव्हा ध्येय, देशनिष्ठा
नव्या भारताला देऊ जगी या प्रतिष्ठा
सर्वसाक्षी सर्वांगत तू आम्हा यशोदाता…
शिक्षणातून देशसेवा आपोआप घडेल!
……..^…….^……..^……..^………^……….^
जयंत कुलकर्णी
फ्लॅट नंबर 3, बिल्डिंग 4 बी, तपोवन सोसायटी, तपोधाम रोड, जिजाई गार्डन जवळ, वारजे, पुणे 411058
दूरभाष 8378038232
आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.
कुलकर्णी सर,
खूप छान लेख आहे.
शीर्षक वाचूनच मी भूतकाळात शिरलो. *साक्षरता अभियान* हा महत्त्वाचा कार्यक्रम सुरू असताना आम्ही शिक्षकांनी गावोगावी, भिंती भिंतीवर *ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा* हे बोधवाक्य लिहिले होते. इतरही मुद्दे वास्तव आणि झणझणीत अंजन घालणारे आहे. एका जिव्हाळ्याच्या विषयाला हात घातला आहे. अभिनंदन!
व्व्व्वा माऊली!
सुंदर लेख, खूप छान लिहलंय!
कुलकर्णीसर अतिशय वास्तववादी लेख आहे तुमचा. डोळ्यात अंजन घालणारा आहे. अभिनंदन