निवडणुकीतली बाई

निवडणुकीतली बाई

डॉ. वृषाली किन्हाळकर, नांदेड

भारतातली बाई तशी नशीबवान आहे एका बाबतीत! मतदानाच्या हक्कासाठी तिला संघर्ष करावा लागला नाही! पण खरंच या गोष्टीचं काहीतरी मूल्य तिच्या मनात आहे का? मतदानाचा हक्क तिला आपसुकपणेच लाभलेला आहे पण मतदानाचा अर्थ प्रत्येक भारतीय बाईला कळलाय का? नवर्‍याच्या राजकारणामुळे माझा निवडणुकांशी प्रत्यक्ष संबंध आलेला आहे. गेल्या 25 वर्षांत सुमारे सहा सलग विधानसभा निवडणुका लढण्याच्या माझ्या नवर्‍याच्या अनुभवामुळे मला जे काही चित्र दिसलं, ते एक भारतीय माणूस म्हणून मी नोंदवून ठेवतेय माझ्या मनात.

‘बाई’ हा माझा तसा जिव्हाळ्याचा अन् चिंतनाचा विषय. मी आजवर निवडणुकीत पाहिलेली बाई कशी आहे? असा प्रश्न मीच मला विचारला आणि मन सुन्न झालं माझं….

स. 1985 : विधानसभा निवडणुकीचे दिवस. माझ्यासाठीचे नवेनवे अनुभव! अनेक खेड्यात बायांना भेटत होते. सभा वगैरेंना बायका येतच नसत. नातेवाईकांच्या घरी जायचे अन् ‘चिन्ह’ सांगायचे असा प्रचार. बायकांना कोणत्या भाषेत बोलावे हेच मला कळायचे नाही. त्यांचे चेहरे इतके शुष्क असायचे की आपण काही बोलून तरी उपयोग होईल का याची शंका. त्यावेळी समाजवादी कांँग्रेसचे चिन्ह होते ‘चरखा’. मी चरख्याचे चित्र काढून बायांना सांगायचे. तेव्हा चिन्हांची पोस्टर्स बॅनर्स मुबलक नसायचीच. कुठलीच बाई मनाने निर्णय घेत नसावी असे जाणवले. घरची माणसं सांगतील तिथं शिक्का मारायचा एवढाच मतदानाचा त्यांना कळणारा अर्थ. आमदार म्हणजे नेमकं काय, त्यांची कामं काय, कर्तव्य काय असं तर बाया विचारत देखील नसत.

इ.स. 1990 : पुन: विधानसभा निवडणूक! यावेळी माझ्या नवर्‍याचं चिन्ह ‘पंजा!’ बायकांना गावोगावी भेटत होते. जरासा बदल जाणवला. एक अपक्ष उमेदवार होते. त्यांची पत्नी झंझावाती दौरे करीत होती. तिच्या भेटी-गाठीमुळे बाया सुखावल्या आहेत हे चित्र मला स्पष्ट जाणवले. निवडणूक म्हणजे आपल्याला कुणीतरी भेटायला येतं, आपल्याजवळ काहीतरी आहे, म्हणजे मतदानासाठीची संधी! अन् त्यामुळे उमेदवार व त्यांचे नातेवाईक आपल्याला भेटतात. यामुळे बायका सुखावल्याचं नक्की कळलं. पण मतदान कोणत्या आधारावर त्या करतील, याचा मात्र अंदाज त्यांच्या वागण्यातून, चेहर्‍यावरुन मला आला नाही. पण अगत्य मात्र दिसलं माझ्या भेटण्याचं.

इ. स. 1995 : पुन्हा विधानसभा निवडणूक ! नवरा कॉंग्रेसच्या मंत्रिमंडळात गृह, महसूल, सहकार, राज्यमंत्री! निवडणुकीत आणखी जरासा बदल जाणवला. बायकांना भेटले तेव्हा शिवसेनेचं वारं स्पष्ट जाणवलं. वयस्क बायकांची मुलं शिवसैनिक झालेली. त्यामुळे माझ्या भेटीत अगत्य दिसलं, पाहुणचार दिसला, पण बायका काही ठिकाणी ‘आता या मुलांचं काय मनावर घिऊ नका बाई, पोरं हायत ती’ असं म्हणत होत्या. अगदी ओळखीच्या घरांमध्ये देखील भगवे रुमाल दृष्टीला पडले! पण बायका स्वत:च्या मनाने मतदान करतील असं काही वाटलं नाही. पूर्वीच्या दोन निवडणुकात नवर्‍याच्या मनाने मतदान करणारी बाई आता तरुण पोरांच्या शिवसैनिकी बाण्यापुढे दबली आहे असं मला वाटून गेलं.

मंत्र्याची बायको घरी आली आहे, तर चार मागण्या पुढे ठेवाव्या असं कळणार्‍या काही शिकलेल्या बाया, रस्ता, पाणी इत्यादी प्रश्न सांगू लागल्या होत्या हा एक ठळक बदल जाणवला!

इ. स. 1999 : पुन्हा निवडणूक! आता राष्ट्रवादीची स्थापना झालेली! नवर्‍याचे चिन्ह ‘घड्याळ’! खेड्यातल्या बायका ‘निराधार योजनेचे पैसे मिळत होते, ते बंद झाले’ अशी तक्रार करीत होत्या. पैसे मिळू लागले तेव्हा आनंदी झालेली बाई, पैशाचा विनियोग कसा करायचा हे जरी नीट शिकली नाही, तरीही सवलती बंद झाल्यावर तक्रार करायची, एवढं कळण्याइतपत सजग, शहाणी झालेली जाणवली! मुस्लिम स्त्रियांमध्ये मात्र अजून ‘घडी’ पोचली नव्हती नीट. ‘हमको कॉंग्रेस मालूम है’ असंच त्यांच्याकडून ऐकायला आलं. अनेक घरी अप्रत्यक्षपणे उमेदवाराकडून काही आर्थिक लाभ होतोय का, होईल का, अशी कुणकुण मात्र जाणवली.

इ. स. 2004 : पुन्हा निवडणूक… यावेळचा लढा अपक्ष म्हणून होता! फार स्पष्टपणे, ठळकपणे जाणवलं, प्रत्येक बाईला निवडणुकीत पैसेच हवे होते. प्रत्यक्ष मतदार बाई आणि एखाद्या गल्लीमधली प्रचार करणारी प्रमुख बाई, दोघीही मनातून पैशासाठी हापापलेल्या अशा वाटल्या. ‘मै तुम्हारे साथ पूरा गाव घुमती हूँ’ असे म्हणणारी बाई, दिवस मावळताना उघडपणे पैसे मागू लागली.

आपली जात किंवा धर्माच्या गठ्ठा मतदानाचा मोबदला मागायचा असतो हेच ज्ञान बाईला प्राप्त झालेय हे मला स्पष्ट जाणवले. त्यांच्या गावातील अस्वच्छता, गैरसोयी यांचा पाढा वाचून मग आम्ही तुमच्याच पाठीशी आहोत याबद्दलची उपकार केल्याची भावना देखील तीव्रतेने सांगायला बाई संकोचत नव्हती.

एकूणच निवडणूक म्हणजे पैसावाटप हेच चित्र मला दिसले. निवडणूक संपल्यावरचा एक प्रसंग; मी दवाखान्यात पेशंटस् पाहत होते. एक बाई आली. ‘दवाखाना चालू केला मॅडम?’ असे विचारले. उत्तरादाखल मी मान डोलावली. पुढे तिचे वाक्य – ‘म्याडम, तुम्ही इलक्शनमदी पैसाच सोडत नाही मग कसं निवडून येणार बरं?’ निवडणुका आणि त्यातली सामान्य बाई ही अशी भराभर बदलत गेली!

अजून एक वेगळा अनुभव, एक बाई इलेक्शनचा पूर्ण काळ माझ्याच हाताने ऑपरेशन करण्यासाठी थांबली होती. जवळपास महिना दीडमहिना ती माझी वाट पाहत होती! यथावकाश येऊन ती म्हणाली, ‘तुमच्याशिवाय कोठेच जावे वाटत नाही मला.’ मग निवडणुकीचा विषय निघाला. मी सहज विचारले, ‘मतदान तर तू केलेच असशील, मग तू कुठे केलेस?’ मला वाटले एवढी माझ्यावर तिची भक्ती आहे तर तिने माझ्या नवर्‍यालाच मतदान केले असणार! पण ती सहजपणे म्हणाली, ‘आमचे भावजी (मोठे दीर) धनुष्य बाणाच्या जीपमदी फिरत व्हते म्हणून मग आमाला बाणाला मतदान करायला तेंनी सांगितलं,’ तोंडदेखलं, माझ्या समाधानापुरंत तरी खोटं बोलाव हेही न कळण्याइतकी ती भाबडी होती का? मलाच प्रश्‍न पडला. मग माझ्याच लक्षात आलं की या मतदारांच्या मनात आपल्याबद्दलचे वेगवेगळे कप्पे असतात. डॉक्टर म्हणून माझ्यावर भक्ती असेल, पण निवडणुकीच्या चित्रात तिला ते तिथं महत्त्वाचं वाटत नसावं. कदाचित आपल्यासाठीची तिच्या मनातली मान्यता ही फक्त डॉक्टर म्हणूनच आहे. तुम्ही कुणीही असा, निवडणुकीतली उमेदवारासाठीची मोजपट्टी वेगळीच असते काहीतरी, हे खरं…

इ. स. 2009 : पुन्हा निवडणूक! हा सहावा अनुभव… पंचवीस वर्षांचा काळ मागे पडत असलेला… ही लढाई खूप वेगळी. माझा नवरा अपक्ष उमेदवार अन् प्रतिस्पर्धी राज्याचे मुख्यमंत्री! एका खेड्यात गेले. सभा झाली. परतीच्या मार्गावर एका घरी कुंकू लावणं झालं. ओसरीवरची पुरुष मंडळी सावरून बसली. मला पाहून एक मुलगी म्हणाली, ‘बाई छान समजावून सांगितलं तुम्ही पण एक भूक राहूनच गेली.’ मला वाटलं रात्रीची वेळ – भूक म्हणजे पैसा मागतात की काय? पण अनपेक्षित उत्तर आलं – ‘बाई, कविता नाही ऐकवली तुम्ही!’ क्षणभर सुखावली माझ्या आतली कवयित्री!

1985 ते 2009 या काळात एक जाणवलं – माझी कविता देखील माझ्या नवर्‍याच्या राजकारणाबरोबरच एव्हाना खेडोपाडी पोचली होती!

महाराष्ट्रभर पैशाच्या अतिप्रचंड वापराने गाजलेल्या या निवडणुका! पण एका खेड्यात कवितेची देखील भूक निवडणुकीच्या रणधुमाळीत शिल्लक होती, हा अनुभव कुठेतरी माणुसकीचे अवशेष उरले आहेत हेच सांगणारा!

गेल्या पाच वर्षांत महिला बचत गटांमुळे बायकांचे जगणे सुधारलेय. खरंच वाटतं बाया प्रगती करत आहेत. पण निवडणुकीत फार वाईट अनुभव आले. एका खेड्यात एक बाई सौदाच करायला बसली. ‘काई फिरायचं काम न्हाई म्याडम तुमाला, माझ्याकडे 12 बचत गट हायेत. मीच अध्यक्ष आहे. समद्या बाया माजं ऐकतात. पण खर्चापानी करावं लागन. तीन हजार रुपये द्या. मग गावात पुना नाई आलं तरी जमंल…’ अजून एक विचित्र अनुभव… बचत गट अनेक गावी काढून देणारा एक माणूस. तो म्हणाला, ‘माझ्या हातात 300 बचतगट हायेत. मला रोजचा खर्च, गाडी द्या. समदं साडेतीन हजार मतदान एकगठ्ठा तुम्हाला पडल अन् तो एका दिवसात तीस गावं फिरणार म्हणाला. अशक्यच होतं ते. कुणीतरी माणूस एका दिवसात तीस गावे फिरून साडेतीन हजार मतांची खात्री देऊ शकेल का?

बचत गटांच्या नावाखाली अशी सौदैबाजी मात्र प्रत्येक गावात जाणवली. निवडणूक येते-जाते, गड्याला दारू मिळंती, आमाला काय? आमाला पैसं तरी द्या असं उघडपणे बायका म्हणत होत्या! दलित, मुस्लिम, गरिब वस्तीतल्या, झोपडपट्टीतल्या बायांना तर निवडणूक म्हणजे कमवण्याचा सीजन वाटू लागला आहे! ‘परचार करतो, तीनशे रुपये रोज द्या’ असं सरळ म्हणू लागल्या बायका. उघडपणे बायका सांगतात प्रत्येक उमेदवाराच्या लोकांनी किती पैसे दिले ते. मग मी कुतुहलाने विचारले, ‘सगळ्यांकडून पैसे आले तर घेता का? मग मतदान कुणाला करता?’

तर काही बायका बेरकी हसल्या. ‘सांगत न्हाई’ म्हणाल्या. तर काहीजणी म्हणाल्या, ‘मनाला वाटल तेला टाकतो.’ खेड्यातल्या बाया म्हणाल्या, ‘गावचा मेन माणूस सांगल तेला टाकतो.’

एखादी उमेदवार बाई आहे म्हणून तिला मत देता का? या प्रश्नाला बायकांनी फारसे मनावरच घेतले नाही. बाईला मतदान पडेल असे गणित मुळीच नाही. निवडणुकीच्या या धुळधाणीमध्ये स्त्री-पुरुष समानता अशी विचित्र अर्थाने जाणवली मला! निवडणुकीतला आर्थिक मुद्दा स्त्रियांपर्यंत पोहोचलाच आहे. त्यांच्या हक्कांची जाणीव त्यांना इतक्या प्रखरतेने झालीय की ‘इलेक्शन मदी गड्यांना दारू मिळंती, आमाला काय? पैसा तरी द्या’ ही प्रतिक्रिया, ही विचार सरणी! खरेच मतदानाचा अर्थ कुणाला तरी कळलाय काय? स्वतंत्र भारत देशातल्या, साठ वर्षांच्या या लोकशाहीत प्रजासत्ताक राष्ट्रात, स्त्रियांना अनेक शिक्षणाच्या सवलती मिळाल्यावर अन् मतदानाचा हक्क सहजपणे प्राप्त झालेला असताना एका बाईची ही प्रतिक्रिया विषण्ण करणारी आहे.

पूर्वप्रसिद्धी – ‘चपराक मासिक,’ नोव्हेंबर 2009

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

2 Thoughts to “निवडणुकीतली बाई”

  1. Ravindra Kamthe

    खूपच छान लेख

  2. Vinod S. Panchbhai

    विचार करायला लावणारा लेख!

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा