तुम्हाला नकार देणे जमते का?

तुम्हाला नकार देणे जमते का?

“माझं थोडं ऐकता का श्यामराव? मला थोडे पैसे पाहिजे होते. आपल्या कंपनीच्या फंडातून मिळाले की लगेच परत करणार तुम्हाला! बघा नाही म्हणू नका, एक महत्त्वाचं काम निघालं वेळेवर म्हणून गरज भासली पैशांची!”

“तुमचं सगळं बरोबर आहे विलासराव पण काय आहे, आता या एक तारखेलाच मुलीच्या शिकवणीचे पैसे भरले मी. नाहीतर नक्की दिले असते. प्लीज समजून घ्या हं!”

अशाप्रकारचे संवाद दैनंदिन जीवनात आपल्या कानावर नेहमी पडत असतात. वेळप्रसंगी पैशाची गरज प्रत्येकालाच भासत असते हे वास्तव आहे! तरीही काही लोकाना मात्र कुठल्या ना कुठल्या कारणासाठी सतत पैसे मागण्याची जणू सवयच जडलेली असते. अशावेळी त्याची शहानिशा न करता आपण बिनधोकपणे पैशाची मदत केली तर ते परत मिळवणे सगळ्यांनाच जमते असं नाही! उदाहरणार्थ आपण एखाद्या गरजवंत मित्राला मदत म्हणून लगेच पैसे काढून दिले आणि त्यानं संध्याकाळी बीयरबारमध्ये जाऊन उडवले तर त्या मदतीला काय अर्थ? तेव्हा अशाप्रकारच्या महाभागांना नकार देणं जमलं पाहिजे!

आपल्या शेजारचे किंवा परिचितांपैकी कोणी दवाखान्यात रूग्णशय्येवर असल्याचं कळलं अन् त्याला त्यावेळी रक्ताची गरज आहे तर अशावेळी मात्र आडेवेढे न घेता, वेळ न दवडता आपण स्वतःहून पुढाकार घेऊन मदत करायलाच हवी! तसंच शेजारी राहणारे काही कामानिमित्त परगावी गेले असतील आणि नेमकं त्याचवेळी अचानक त्यांच्या घरच्या आजी-आजोबांनी तातडीच्या मदतीसाठी बोलावलं असेल तर त्यांना नकार देणं कृतघ्नपणाचं ठरेल! अशावेळी वेळात वेळ काढून सर्व प्रकारची मदत करणं हे आपलं कर्तव्यच आहे आणि या गोष्टीचं आपल्याला भानही ठेवायला हवं. काही काही प्रसंग असे असतात की त्याप्रसंगी आपल्याला नकार देणं अगदी जिवावर येतं. तरीही मनाविरूद्ध काही घडत असल्यास त्यावेळी प्रयत्नपूर्वक नकार देणं पण जमलं पाहिजे. आता एक हा प्रसंग बघा… रुपालीचं लग्न ठरणार होतं. तिच्या घरचे सगळेच आनंदात होते. कारण मनासारखं जवळचं स्थळ सांगून आलं होतं. एकुलता एक देखणा मुलगा. मोठ्या पगाराची नोकरी. घरची परिस्थितीही उत्तम! एवढं सगळं व्यवस्थित असूनही रूपाली मात्र प्रचंड तणावात होती! का तर तिला नेमकं कारण माहिती होतं, मुलगा व्यसनी होता! अशावेळी रूपालीनं संकोच न करता घरातील आई, बाबा, भाऊ, आजी, आजोबांसमोर आपलं मन मोकळं करून स्पष्ट नकार कळवणं आवश्यक ठरतं! लग्नानंतर मुलगा सुधारणार अशा खोट्या आशा बाळगणं इथं मूर्खपणाचं ठरतं!

कधीकधी आपण आपल्या अगदी जवळच्या मित्राला कुठल्यातरी कार्यक्रमाला सोबत जाण्याबाबत, त्याला वाईट वाटू नये म्हणून नाईलाजानं शब्द देऊन बसतो. मग जेव्हा त्याच्यासोबत त्या संबंधित कार्यक्रमाला जाण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपल्या घरगुती अडचणीमुळे किंवा अन्य कारणांमुळे जाणं शक्य होत नाही. त्यावेळी मित्राला नकार कळवणं आपल्याला जिवावर येतं! सरळ नकार देणं जमत नसल्यानं तेव्हा मित्राचा आलेला फोन न उचलणं किंवा स्वतःचा फोन बंद करून ठेवणं असे प्रकार घडतात. मग आपसात गैरसमज वाढत जातात. तेव्हा असे प्रकार टाळण्यासाठी स्वतःहूनच फोन करून नकार कळवणं हे कधीही चांगलं!

एक महत्त्वाचा मुद्दा असा की, ऊठसूट अगदी किरकोळ कारणासाठी लगेच नकार देणंही योग्य नाही. समजा तुम्ही तुमच्या मित्र परिवारातले किंवा नातेवाईक मंडळीत लोकप्रिय व्यक्ती आहात, तुमचा सहवास त्यांना हवाहवासा वाटतो. तेव्हा अशावेळी एखाद्या कार्यक्रमासाठी तुमचा नकार त्यांच्यासाठी भ्रमनिरास होण्यास कारणीभूत ठरू शकतो! याप्रसंगी थोडं सामंजस्य दाखवून आपल्या माणसांसाठी होकार देणंच श्रेयस्कर! तसंच समजा तुमचं समाजात बऱ्यापैकी वजन आहे आणि एखाद्या कार्यक्रमासाठी तुम्हाला प्रमुख पाहुणे किंवा अध्यक्ष म्हणून आमंत्रित केलंय. तशाप्रकारच्या पत्रिका छापून वाटपही करण्यात आलं आहे. तेव्हा मात्र त्या कार्यक्रमाला न जाणं किंवा वेळेवर नकार कळवणं कृतघ्नपणाचं ठरणार याची जाणीव असायला हवी!

आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला दैनंदिन जीवनात बरेच चांगले वाईट अनुभव येत असतात. कधीकधी कुठल्या तरी वस्तूची खरेदी करताना फसवणूकही होते. कारण काय तर आपण त्या वस्तूंच्या मोहात अडकतो. दुकानदार सुद्धा त्या विशिष्ट वस्तूंचे अवास्तव वर्णन करण्यात पटाईत असतात. त्यांना त्यांचा माल विकायचा असतो. मग एकदा का आपण त्या वस्तूंच्या मोहात अडकलो की काही केल्या आपल्या तोंडून ‘आता घेऊ शकत नाही’ असा नकार तर निघत नाहीच शिवाय ‘आज नको नंतर बघतो’ असंही त्यावेळी बोलणं जमत नाही! अशाप्रकारचे अनुभव इतरांकडून आपल्याला पदोपदी ऐकायला मिळतात. एवढंच काय यापुढचं पाऊल म्हणजे आपण दारात येणाऱ्या विक्रेत्याला किंवा फेरीवाल्याला स्पष्ट नकार न देता काहीतरी किरकोळ वस्तू खरेदी करतोच! नंतर मात्र ती वस्तू खराब निघाली की त्या विक्रेत्याच्या नावानं मग बोटं मोडत बसतो. कधीकधी काही किरकोळ विक्रेते ( फेरीवाले ) त्यांचा माल खपवण्यासाठी सतत मागे लागतात. तेव्हा त्यांना स्पष्ट नकार देणं अवघड होऊन जातं. अशावेळी थोडं कठोर होऊन खंबीरपणे त्याला स्पष्ट शब्दात ‘नाही’ किंवा ‘नको’ म्हणता आलं पाहिजे!

काही प्रसंगी स्पष्ट नकार न दिल्यास आपल्यावर नामुष्कीही ओढवू शकते. आता हे एकच उदाहरण बघा… संदीप हा धडाडीचा युवक त्याच्या कामात निष्णात आणि प्रामाणिक असल्यानं त्याच्या कंपनीत नेमून दिलेलं काम तो मन लावून करायचा. वेळेच्या आधीच आपलं टार्गेट पूर्ण करायचा. मग आपल्या इतर सहकाऱ्यांनाही मदत करायचा. नेमक्या याच अतिकामसू वृत्तीमुळे त्याला काही ठराविक मित्र आपलं पेंडींग काम सोपवू लागले. संदीपच्या चांगूलपणाचा फायदा घेऊ लागले. एकदा कामावर असताना त्याला अचानक नातेवाईकाचा फोन आला… कुणाचा तरी अपघात झाला होता! संदीपला तातडीनं निघणं आवश्यक होतं पण नेहमीप्रमाणे त्यानं आपल्या एका सहकारी मित्राचं काम हाती घेतल्यानं त्यातच तो व्यग्र होता. त्यामुळे त्याला तिथून लवकर निघताही येत नव्हतं आणि आपल्या मित्राला कामही सोपवता येत नव्हतं. त्याची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली होती..! अशाप्रसंगी तरी स्पष्ट नकार देता यायला हवा जेणेकरून नामुष्कीची अवस्था ओढवणार नाही!

कधीकधी आपल्याला असेही अनुभव येतात … एखाद्या मित्राला अथवा नातेवाईकास आपण मोठ्या विश्वासानं मदत मागतो. मात्र त्यावेळी तो लवकर होकार तर देत नाहीच अन् स्पष्ट नकार सुद्धा त्याच्या तोंडून बाहेर पडत नाही. तो नुसता मूग गिळून मख्खासारखा आपल्याकडे पाहत असतो! कधी कुणावर कुठल्या प्रकारचा प्रसंग ओढवणार हे कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे ‘वेळ’ बघून किंवा परिस्थिती पाहून नकार देणंही जमलं पाहिजे. नाहीतर ‘आ बैल मुझे मार!’ अशाप्रकारचा बिकट प्रसंग अापल्यावर ओढवण्यास वेळ लागणार नाही! बाकी सुज्ञास सांगणे न लगे!!

विनोद श्रा. पंचभाई, वारजे, पुणे
भ्र. क्र. ९९२३७९७७२५

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

  • चपराक

    पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
    व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
    Email - Chaprak Email ID
  • 3 Thoughts to “तुम्हाला नकार देणे जमते का?”

    1. Vinod s. Panchbhai

      खूप धन्यवाद!😊

    2. Ravindra Kamthe

      खूपच छान लेख. अगदी मनातलं वाटलं.

    3. Nagesh S Shewalkar

      प्रतिक्रिया देण्यासाठीही नकार देऊ नये.
      खूप छान लिहिले आहे, भाईजी।

    तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

    हे ही अवश्य वाचा