‘थॉमस कुक’तर्फे आम्ही युरोप सहलीला निघालो होतो. आमच्या तारखा सारख्या बदलत होत्या. शेवटी 3 जुलैच्या ऐवजी 6 जुलै तारीख नक्की ठरली आणि एकदाची आमची तयारी सुरू झाली. सगळा जमानिमा करून निघालो तर कधी न होणारी इमराईट्सची फ्लाईट रद्द होऊन आम्हाला पुढची फ्लाईट पकडावी लागली. त्यामुळे दुबईमधल्या इमराईट्सच्याच आलीशान हॉटेलमध्ये मुक्काम करावा लागला. एवढ सगळं होऊन फायनली आम्ही सहा जण लंडनला पोहोचलो आणि आमच्या थॉमस कुक ग्रुपला जाऊन मिळालो.
पंधरा दिवसांमध्ये दहा देश आम्ही पादाक्रांत करणार होतो. त्यामुळे प्रत्येक देशाला फक्त टपली मारूनच पुढे जावं लागेल असं वाटत होतं. थॉमस कुकने आमच्यासाठी ठरविलेली मर्सिडीज गाडी मात्र फारच मस्त होती. आलीशान, स्चच्छ, आरामदायी, एअरकंडीशन्ड अशी ती बस लंडनमधल्या स्वच्छ, सुंदर, गुळगुळीत रस्त्यावरून जशी वाहत चालली होती. मोठमोठ्या स्वच्छ काचांमधून लंडन शहर आणखीनच सुंदर दिसत होतं. एक्स्पर्ट इंग्लिश स्पीकिंग गाईड आम्हाला बसमधे बसल्या बसल्याच ‘हायलाईट्स ऑफ लंडन्स लँडमार्क’ दाखवत होता. एक तर लंडनला एक दिवस उशीरा पोहोचल्यामुळे विमानातून लँड होऊन आम्ही डायरेक्ट या बस मध्येच बसलो होतो. त्यामुळे बसमध्ये आम्ही शाळेतल्या वांड मुलांसारखे बॅक बेंचर्स होतो. गाईडचे ऍक्सेंट नाही म्हटलं तरी डोक्यावरून जात होते. बर्किंगहॅम पॅलेस, हाईड पार्क, दि बिग बेन, वेस्टमिन्स्टर ऍबे, हाऊस ऑफ पार्लमेंट, ट्रॅफल्गर स्क्वेअर, पिकॅडली सर्कस, टॉवर ब्रीज, थेम्स रिव्हर असं बरंच काही काही गाईड दाखवत होता आणि त्या अनुषंगाने माहिती पण सांगत होता. नीट ऐकू येत नव्हतं. कळत नव्हतं. मला जरा नर्व्हस वाटायला लागलं होतं. सगळं डोक्यावरून चाललंय असंच वाटत होतं. असंच रोज चालणार की काय. मग ट्रीपला काही अर्थच रहाणार नाही असंही वाटायला लागलं होतं; पण नंतर, मस्त इंडियन लंचचा आस्वाद घेऊन झाल्यावर मात्र आमच्या टूर मॅनेजरने आम्हाला, मॅडम तुसाज् वॅक्स म्युझियम, सुप्रसिद्ध लॉर्डस् क्रिकेट ग्राऊंड, आणि लंडन आय यांचं गाडीतून उतरून सविस्तर आणि एक्स्पर्ट गाईडच्या एक्सपर्ट कॉमेंटस्सह दर्शन घडविलं आणि त्या दर्शनाने मात्र आमचे डोळे निवले आणि आत्मा थंड झाला. मग मात्र ट्रीपची खरी मजा यायला सुरूवात झाली. खूप छान वाटायला लागलं.
लंडन नंतर पॅरीस. आयफेल टॉवरच्या सर्वात टॉप (थर्ड) लेव्हलवरून पॅरीसचं रमणीय दर्शन, सीन नदीमधून क्रुझने केलेला प्रवास, ब्रुसेल्स, ऍमस्टरडॅम, हॉलंड ऑफ मिनीएचर वगैरे करत करत, घनदाट वनराईमुळे वर्षानुवर्ष जिथे सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचू शकत नाही अशा सदाहरित ब्लॅक फॉरेस्टमधून प्रवास करत, डोंगर उतारावरच्या चित्रातल्यासारख्या देखण्या घरांची गावं बघत बघत, जगप्रसिद्ध कुकु क्लॉकची शोरूम पाहून, त्याची खरेदी करून आणि जगप्रसिद्ध हाईन फॉल्सच्या अगदी जवळ नेणार्या छोट्या होडीतली धाडसी सफर करून, ट्रीपच्या आठव्या दिवशी आम्ही आमच्या एसी कोचने स्वित्झरलँडकडे प्रस्थान ठेवले.
13 जुलैच्या रात्री जवळ जवळ आठ-साडेआठ तासाचा प्रवास करून, अर्थात मध्ये मध्ये साईट सीईंग करत आम्ही स्वित्झरलँडमधील झुरिच इथल्या हिल्टन हॉटेलवर पोहोचलो. स्वित्झरलँड हा मध्य युरोपातील उंच उंच आल्प्स पर्वत रांगांचा प्रदेश, संख्येने विपुल असलेल्या निळ्या हिरव्या आरस्पानी विशाल तळ्यांचा प्रदेश, परीकथेतल्या सारख्या देखण्या कौलारू घरांच्या गावाचा प्रदेश. इथल्या जुन्या शहरांनी, राजधानी बर्न इथल्या झिट्ग्लॉग क्लॉक टॉवर, कॅथेड्रीलसारख्या मध्ययुगीन काळातल्या त्यांच्या मोठमोठ्या प्रेक्षणीय स्थळांचं सौंदर्यही फार चांगल्याप्रकारे जपलं आहे. इथल्या स्की रिसॉर्टस् आणि हायकिंग ट्रेलस्साठी सगळ्या जगातून पर्यटक इथे गोळा होतात. बँकिंग आणि फायनान्स इथल्या ’की इंडस्ट्रीज’ आहेत आणि इथली चॉकलेट्स आणि घड्याळ तर जगप्रसिद्ध आहेत. कल्पनाशक्ती थिटी पडते इतका अफाट, भव्य आणि देखणा निसर्ग आहे इथे. अतिभव्य आणि डोळ्यांचं पारणं फिटावं असा लॅन्डस्केप. गगनाला भिडणार्या आल्प्स पर्वतांच्या ऊंच ऊंच रांगा, त्यांची शुभ्रधवल हिमाने आच्छादलेली शिखरं, नितांत सुंदर हिरव्या रंगात लपेटलेला अवघा परिसर, हिरव्या रंगाच्या अनेकविध छटांची मुक्त उधळण. सरळसोट बुंधा आणि शेंड्याला एकमेकात गुंतत विस्तारलेल्या फांद्या असे पाईन वृक्ष आणि आकाशाकडे निमुळते होत गेलेली सुरूची झाडे आणि तत्सम वृक्षांचं घनदाट जंगल, त्यांच्या सरळसोट शिस्तशीर बुंध्यांचं मोहवणारं जाळं सर्वदूर पसरलेलं.
दूरवर डोंगरांच्या पायथ्यापर्यंत पसरलेली विस्तीर्ण हिरवीगार कुरणे, डोंगरावरून मधूनच झुळझुळत, खळखळत वाहणारे लहान मोठे झरे, क्वचित कुठे सरळसोट ऊंच कड्यावरून सुसाटत थेट खडकांवर धबा धबा कोसळणारे आणि उरात धडकी भरविणारे धबधबे, ऐल आणि पैल तीरावर हिरवाई घेऊन वाहणार्या हाईन, ल्युसन या नद्या, त्यांचं पारसमण्यासारखं मोरपंखी निळसर, स्वच्छ, नितळ, पारदर्शी पाणी. भरभरून प्रसन्न असलेल्या या देखण्या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर निसर्गाची शोभा शतगुणित करणारी परीकथेसारखी अतीव सुंदर, टुमदार, कौलारू घरे. काही डोंगर उतारावर तर काही सपाटीला डोंगराच्या अगदी पायथ्याला, अगदी एकसारखी. भोवतालच्या निसर्गाशी अगदी एकरूप झालेली. कुठेही वैगुण्य नाही. विसंगती नाही. कुठेही कुरूपता नाही. सभोवतालचं सारंच देखणं, स्वच्छ, सुंदर. घरांच्या आसपास, उमललेल्या टवटवीत अनेकरंगी फुलांची सजावट. भोवताली एकरा दोन एकरामध्ये वार्यावर डोलणारी पिकं. हिरव्या कुरणांमधून मुक्तपणे चरणार्या शेळ्या-मेंढ्या आणि जास्त करून गायी आणि त्यांच्या गळ्यातल्या घंटांचं पार्श्वसंगीत. सगळंच कसं पहाटेच्या सुंदर स्वप्नासारखं.
आठ साडेआठ तासाचा प्रवास करूनही कुणालाही दमणूक झाल्यासारखे जरासुद्धा वाटत नव्हते. आमची आलीशान गाडी, अतिशय स्वच्छ, सुंदर, निरोगी हवा, दोन्ही बाजूला हिरवळीने आच्छादलेल्या अती उंच पर्वत रांगा आणि घनदाट जंगल यातून धावणारा झुळझुळीत रस्ता. त्यामुळे सर्वांचाच उत्साह ओसंडून वाहत होता.
सकाळी सहाला वेक अप कॉल, सातला, ’एवढ्या सकाळी काय भूक लागणार’ असं म्हणत म्हणत केलेला भरपेट नाष्टा आणि आठला गाडीत बसायचं असा रोजचा ठरलेला दिनक्रम असायचा. संपूर्ण युरोप ट्रीपमध्ये ’टॉप ऑफ युरोप’ आणि ’माऊंट टिटलीस’ हे संस्मरणीय अनुभव. ‘हाय पॉईंट ऑफ द एन्टायर टूर’ असं म्हणणं अगदी संयुक्तिक ठरावं. कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट आटोपून आम्ही त्यातल्या ’टॉप ऑफ युरोप’च्या रोमहर्षक अनुभवासाठी जुंगफ्रॉऊ इथे जाण्यासाठी लॅटरब्रुनेन या सुंदर शहराकडे जायला निघालो. अवतीभवती डोंगर उतारावर छोटी छोटी लाल कौलांची, उतरत्या छपरांची घरे, सर्वदूर अनेकविध छटांमधून पसरलेली हिरवी जादू, उंचच उंच पाईन आणि फर वृक्षांची घनदाट गुंफण आणि डोंगरातून झेपावणार्या अनेक लहानमोठ्या धबधब्यांचं पांढरंशुभ्र फेसाळणारं पाणी. मध्येच सर सर शिरवा शिंपणारा हिमवर्षाव, आकाशातून कापूस पिंजल्यासारखे धरणीवर उतरणारे पांढरेशुभ्र ढग असं निसर्गाचं अवर्णनीय रूप किती पहावं आणि किती नाही असं होऊन जात होतं. जुंगफ्रॉऊ येथे जगतातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन आहे. हा सर्व प्रवास करण्यासाठी, भोवतालचं निसर्गसौंदर्य शतगुणित करणार्या अतिशय देखण्या मिटरगेज मिनी ट्रेन्स आहेत. प्रवास एकूण दीड तासाचा; पण मध्ये एका ठिकाणी गाडी बदलावी लागते. लॅटरब्रुनेन ते लीन शेडगे या स्टेशनपर्यंत एका ट्रेनने आणि शेडगे ते जुंगफ्रॉऊ दुसर्या ट्रेनने अशा दोन टप्प्यातून हा प्रवास करावा लागतो. तशी तर ही ट्रेन जवळ जवळ संपूर्णत: आयगर आणि मॉंच या पर्वत रांगांमधून बांधलेल्या ’जुंगफ्रॉऊ’ टनेलमधून जाते परंतु काही ठिकाणी ओपन स्पेसेस ठेवलेल्या आहेत जिथून तुम्ही रेल्वे ट्रॅक शेजारून जात असलेल्या बर्फाने आच्छादलेल्या पर्वत रांगा पाहू शकता आणि त्या अप्रतिम निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकता. या गाडीतून प्रवास करताना पहिल्या टप्प्यात सभोवताली आल्प्स पर्वतरांगावरची हिरवीगार कुरणं, त्यावर चरणार्या धष्टपुष्ट गायी, त्यांच्या गळ्यात वाजणार्या त्या टिपीकल काऊबेल्स आणि जवळून जाणार्या दुसर्या मिनी ट्रेन्स असा सुंदर नजारा पहायला मिळतो. सोव्हिनीयर्स म्हणून या काऊबेल्स सीटीमधल्या अनेक दुकानांमध्ये विकायला ठेवलेल्या आढळतात. या सिनिक रेल्वे ट्रॅकचे काम 16 वर्ष चालू होते आणि 1/8/1912 रोजी युरोपातील 3454 मीटर उंचीवरील, जगातील सर्वात जास्त उंचीवरील हा रेल्वे मार्ग सर्वसामान्य लोकांकरिता खुला झाला.
आल्प्स पर्वतातील जुंगफ्रॉऊ हे सर्वात उंच शिखर असून त्याची उंची 4158 मीटर (13642 फूट) एवढी आहे. आम्ही जाणार होतो त्या जुंगफ्रॉऊ – टॉप ऑफ युरोप या जागेची उंची 3454 मीटर (11333 फूट) एवढी आहे. ट्रेनने जसं जसं वर जायला लागलो तसं तसं पांढर्याशुभ्र बर्फात अवगुंठित झालेल्या आणि हिरव्या अलंकारांनी नटलेल्या सृष्टीच्या स्वर्गीय सौंदर्याचं गारूड मनावर चढायला लागलं होतं. जुंगफ्रॉऊ इथल्या हॉटेलमध्ये आम्हाला इंडियन लंच वुईथ शॅम्पेन असं ऍरेंज केलं होतं. जेवण सुंदरच होतं पण टूर मॅनेजरने आधीच सांगितल्याप्रमाणे इतक्या उंचीवर आल्यामुळे बर्याच जणांना विरळ हवेचा त्रास जाणवायला लागला होता. काही जणांना श्वास घ्यायला त्रास होत होता तर काही जणांना चक्करही आल्यासारखे वाटत होते. काही लोकांसाठी तिथल्या स्थानिक डॉक्टरांनाही पाचारण करावं लागलं. त्यामुळे काही जणांसाठी त्या ठिकाणाहून पुन्हा परत खालच्या पॉईंटपर्यंत जाण्याची सोयही करण्यात आली. अर्थातच टूर मॅनेजरने ह्या सगळ्याची कल्पना आधी दिलेली होतीच. या पॉईंटपासून पुढे अजून उंचावर इथली मुख्य आकर्षणं होती. मोठ्या अक्षरात लिहिलेल्या ’<ढजणठ’ या अक्षरांची खूण पकडून चालत राहिल की स्फिंक्स, ऍलेक्स ग्लेशियर, मॅजिक हट, अल्पाईन सेन्सेशन, आईस पॅलेस असं सर्व बघत बघत आपण आपोआप मूळ ठिकाणी येऊन पोहचतो. स्फिंक्स याच्या टेरेसची उंची 3571 मीटर आहे. 4 जुलै 1931 रोजी इथे एका संशोधन केंद्रांचे उद्घाटन झाले. स्फिंक्सपर्यंत जाण्यासाठीची लिफ्ट 27 सेकंदात इथे येऊन पोहोचते. येथील उघड्या गॅलरीतून ग्लेशियरचा अप्रतिम नजारा पहायला मिळतो. 1934 मध्ये दोन डोंगरी वाटाड्यांनी येथील बर्फामधून गुहा खोदण्याचे काम सुरू केले. या गुहेत अनेक वाटा आहेत आणि स्फटिकाप्रमाणे चमकणारी गरूड, पेंग्विन अशी बर्फातील अनेक शिल्प तिथे जागोजागी उभी केलेली आहेत. असा हा इथला आईस पॅलेस एक मानवनिर्मित चमत्कारच म्हणावा लागेल.
स्वित्झरलँडमधलं दुसरं आकर्षण होतं ’माउंट टिटलीस’. नेहमीचा सोपस्कार म्हणजे ’सकाळी सहाला वेक अप कॉल, सातला, ’एवढ्या सकाळी काय भूक लागणार’ असं म्हणत म्हणत केलेला भरपेट नाष्टा असं उरकून आमच्या आरामबसमधून स्वित्झरलँडच्या स्वर्गीय रमणीय परिसरामधून प्रवास करत आम्ही ’माउंट टिटलीस’च्या पायथ्याशी येऊन पोहचलो. साधारण साडेनऊ वाजता टूर मॅनेजरने गंडोलाचे म्हणजे केबल राईडचे तिकीट काढले. पहिल्या गंडोलाने 1162 मीटर उंचीवर पोहचलो. गंडोला वर वर जायला लागल्याबरोबर ‘तो पहा बर्फ!’ ‘आय सॉ आईस!’ सगळीकडून उत्स्फूर्त उद्गार आले. सगळ्यांच्या नजरा गंडोलाच्या खिडक्यांकडे वळल्या. दूरवर बर्फाने आच्छादलेलं एक शिखर सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकत होतं. बाकी सर्वदूर नजरेला सुखावणार्या निरनिराळ्या छटांमधून हिरव्या रंगाचे पट उलगडत होते.
गंडोला वर वर जायला लागला तसं तसं हिरवळीवर सांडलेले बर्फाचे पुंजके दिसायला लागले. सगळ्या डोंगरदर्या हिरव्या रंगावर पांढरी नक्षी रेखाटलेल्या गालिच्यांनी सजल्या. नंतर दुसर्या गंडोलाने 1796 मीटर इतकी उंची गाठली. अजून वर गेल्यावर गालीचा पांढरा झाला आणि नक्षी हिरवी. नंतर सर्वदूर पांढर्याशुभ्र हिमाचंच आवरण पसरलेलं दिसायला लागलं. आकाशाची पोकळी भेदून ऊंच उभारलेली भली थोरली पर्वतशिखरं, त्यावर आपल्या पूर्ण ताकतीने सर्वार्थाने वाढलेल्या आणि सर्वदूर पसरलेल्या वृक्षांचं घनदाट जंगल, पाताळ भेदणार्या खोल खोल दर्या, त्यांच्या पूर्ण लांबीसकट दिसणार्या हिमनद्या आणि या पार्श्वभूमीवर ठिपक्यांसारखी दिसणारी तुरळक घरं, यांचं उंचावरून, नजरेच्या खालच्या पातळीवर होणार दर्शन. रोमांचक, उत्तेजित करणारं, उत्साहवर्धक, तरीही जरासं उग्र, हृदयात धडकी भरविणारं, जीवनाच्या क्षणभंगूरतेची, अस्तित्वाच्या क्षुद्रतेची जाणीव करून देणारं असं होतं. आम्ही वर होतो आणि नेहमी वर मान करून करूनही नजरेत न मावणारा हा अलौकिक निसर्गराजा, शुभ्रधवल वस्त्र परिधान करून एका पायावर उभ्या राहिलेल्या एखाद्या तेजस्वी ऋषीमुनीसारखा आम्हाला इतक्या वरून पाहता येत होता. या आल्प्स पर्वतांच्या तुलनेत नखाएवढ्या असलेल्या मानवाच्या बुद्धीची झेप या पृथ्वीवरच्या दर्याडोंगरच नव्हे तर अवकाश भेदून पलीकडे पोहचलेली आहे. तिच्यामुळेच आज आपण या चित्तथरारक आणि अविस्मरणीय अनुभवाचे साक्षी होऊ शकलो या जाणीवेमुळे त्या बुद्धीला आणि बुद्धीदात्याला मनोमन प्रणाम करून आम्ही निसर्गाचा तो गूढ अनाकलनिय अविष्कार डोळ्यात, मनात आणि कॅमेरार्यात बंदिस्त करून ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. नंतर जगातील पहिली रिव्हॉल्व्हिंग केबल कार आम्हाला 3020 मीटर उंचीवर घेऊन गेली. ती चहुबाजूने काचांनी बंदिस्त असलेली वर्तुळाकार रिव्हॉल्व्हिंग केबल कार हीसुद्धा मानवनिर्मित चमत्कारच आहे. एव्हाना सुरू झालेल्या हिमवर्षावामुळे केबल कार पांढर्या धुक्यात पूर्ण गुरफटली गेली आणि लहरी निसर्गाने, आमच्यासाठी, गोल गोल फिरत जो नजारा आम्ही बघू शकलो असतो त्यांच द्वार जणू बंद करून घेतलं. मानवावरचा स्वत:चा वरचढपणा जणू पुन्हा निर्विवाद सिद्ध केला. अर्थात जे पहायला मिळालं होतं त्याची धुंदी इतकी होती की आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. इथंच या बर्फाच्या थंडगार कुशीत मरण आलं तरी चालेल असंही काय काय वाटत होतं.
तरीही माणसाची जिद्द पाहिली की अचंबित व्हायला होत होतं. समुद्र सपाटीपासून इतक्या उंचावर हवा विरळ असते. ऑक्सिजन कमी. त्यामुळे धावू नका, पळापळ करू नका, जास्त बोलू नका, जेवतानाही भरपेट जेवू नका अशा सूचना आम्हाला मिळाल्या होत्या. या इतक्या आणि याहूनही कितीतरी कठीण अशा अडचणींवर मात करून एवढी मोठी मोठी स्ट्रक्चर्स माणसांनी कशी उभारली असतील याचं नवल करत आम्ही परतलो. रात्री स्वप्नातसुद्धा बर्फात गुरफटलेल्या त्या खोल गुहा, पांढर्या वृक्षांचं घनदाट जंगल आणि मॅचिंग पांढरा शुभ्र पेहराव केलेले ते अती उंच हिमपर्वत यांच्यात मी कुठेतरी हरवले होते आणि भीती व आनंद यांच्या लहरींवर तरंगत होते.
सरिता कमळापूरकर
पुणे
संपर्क:
9850983369