भारतीय समाज हा जातीपोटजातीमध्ये विभागलेला समाज आहे. या समाजात प्रत्येक जात जमात ही स्वतंत्र आहे. प्रत्येक जातीच्या रूढी, परंपरा, चालीरीती, रिवाज, व्यवसाय, देवदेवता, सणवार, उत्सव, भाषा आणि जगण्याच्या तर्हा वेगवेगळ्या आहेत. अनेक वर्षापासून अस्तित्वात असलेला जाती जमातींचा समूह म्हणजे भारत देश आहे. जगाच्या पाठीवर एवढ्या मोठ्या संख्येने जाती जमातीत विभागलेला बहुदा भारत हा एकमेव देश असावा. त्यांचे वैशिष्ट्य असे की तो समानतेऐवजी विषम समाजव्यवस्थेवर अवलंबलेला आहे.
भारतीय समाजाचे स्वरूप हे हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये आढळते. या समाजात कोणत्याही प्रकारची जगण्यातील समानता आढळत नाही कारण चातुर्वर्ण्य व्यवस्था हीच मुळात कमालीच्या विषमतेच्या पायावर उभी आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या वर्णव्यवस्थेला बिनशिडीच्या मनोर्याची उपमा देतात. या मनोर्यातील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र यांना जोडण्यासाठी शिडीची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रत्येक वर्णात समाविष्ट असलेल्या जाती जमाती या स्वतंत्र आहेत. त्या जातीजमातीमध्ये प्रत्येकाची प्रतिष्ठा आणि दर्जा वर्णव्यवस्थेने ठरविला आहे. कोणत्या वर्णातील समूहाने (जाती जमातीतील लोकांनी) कसे जगावे किंवा इतर वर्णातील समुहांशी (जाती जमातीशी) कशाप्रकारे संबंध ठेवावेत याचेही नियम लिखित स्वरूपात मनुस्मृतीमध्ये आढळतात. त्या नियमानुसार हजारो वर्षे या देशातील विशेषतः हिंदू धर्मातील वर्णव्यवस्थेतील जाती पोटजाती जगताना आढळतात. गाव किंवा गावगाडा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
हिंदू धर्मातील वर्णव्यवस्थेनुसार निर्माण केलेल्या श्रेष्ठ-कनिष्ठ किंवा स्पृश्य-अस्पृश्य या भेदानुसार गावगाडा आजवर टिकवून ठेवण्यात आलेला आहे. तो टिकवण्याचे दुसरे कारण वर्णव्यवस्थेतील कर्मविपाकाच्या सिद्धांतात लपलेले आहे. जन्मावरून जात आणि जातीवरून धंदा (व्यवसाय) किंवा धंद्यावरून जात असे त्याचे समीकरण आहे. कोणत्या जातीने कोणता व्यवसाय करावा? उदाहरणार्थ ब्राह्मणाने विद्यार्जन करावे, क्षत्रियाने संरक्षण करावे, वैश्याने व्यापार आणि शुद्राने सर्वांची सेवा करावी अशी ही समाजव्यवस्था जात जमातीच्या जगण्यापर्यंत निश्चित करण्यात आली. जसे ढोराने कातडे कमवावे, चांभाराने त्या कातड्याचे जोडे करावेत, मातंगाने दोरखंड वळावेत, कुुंभाराने गाडगे-मडके तयार करावे (मातीकाम करावे), परटाने अस्पृश्य वगळता इतर वर्णातील लोकांचे कपडे स्वच्छ करावेत, न्हाव्याने अस्पृश्यांशिवाय इतरांचे केस कापावेत असे हिंदू धर्म समाजव्यवस्थेचे स्वरूप आहे. तात्पर्य – जातीवर व्यवसाय आणि व्यवसायावर जात असे समीकरण करण्यात आले. त्यामुळे या समाजव्यवस्थेतील जातींमध्ये सुसंगती राहिलेली नाही. समता नाही, बंधुभाव नाही आणि त्यामुळे न्याय ही संकल्पनाही रूजू शकलेली नाही. परिणामी भारतीय समाज हा हजार वर्षांपासून विसंगतीत जगणारा समाज आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
हिंदू धर्मातील ज्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेमुळे हिंदू समाजाची जातवार विभागणी झाली. विषमता निर्माण झाली. त्यामुळे वरवर एक वाटणारा हा समाज अंतर्गत मात्र कमालीचा विघटीत झालेला समाज असेच त्याचे स्वरूप आहे. देशातील भटके आणि विमुक्त समाज किंवा भटक्या विमुक्त जाती-जमाती त्याला अपवाद नाही.
महाराष्ट्रात भटक्या आणि विमुक्तांच्या एकूण 42 मुख्य जमाती असल्याचे मानले जाते. त्या मुख्य जमातींच्या पोट जातींची किंवा तत्सम जमातींची संख्या 150 ते 200 इतकी असल्याचे दिसते. या सर्व मुख्य जमाती आणि तत्सम जमाती स्वतंत्र आहेत. त्यांच्यामध्ये बेटी व्यवहार होत नाहीत. (क्वचित प्रसंगी रोटी व्यवहार होतो) या सर्व जमातींची भाषा, देव-देवता, सणवार, उपासना पद्धती, लग्नविधी, मयतीचा विधी, उत्सवाच्या पद्धती, त्यांचे पाळीव प्राणी, व्यवसाय-उपजिविकेची साधने आणि जात पंचायती (न्यायव्यवस्था) स्वतंत्र आहेत. प्रत्येक जात पोटजातीच्या जात पंचायतीचे नियम गुन्ह्यांचे स्वरूप आणि दिल्या जाणार्या शिक्षा या वेगवेगळ्या आहेत. काही जमातींचा या जमातीचा अपवाद वगळता उर्वरित सर्व जमातींच्या जातपंचायतीचा प्रमुख हा पुरूष व्यक्ती आहे. त्याला पाटील, मुखिया, पंचायत प्रमुख किंवा सरपंच या नावाने ओळखले जाते.
महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या एकूण 42 जमातीपैकी 14 जमाती ‘विमुक्त’ जमाती या नावाने ओळखल्या जातात. ब्रिटिशांनी या देशात 1871 साली निर्माण केलेल्या गुन्हेगारी कायद्यान्वये या जमातींना गुन्हेगारी जमाती म्हणून त्या काळात जाहीर केले होते. त्या जमातींना राहण्यासाठी देशात वेगवेगळ्या ठिकाणी 52 वसाहती (सेटलमेंट) निर्माण करण्यात आलेल्या होत्या. त्या वसाहतींमध्ये गुन्हेगार ठरविलेल्या जमातींना बंदिस्त करण्यात आलेले होते. गुन्हेगारी वसाहतीतील लोक पळून जाऊ नयेत म्हणून त्या वसाहतीला चोहोबाजूंनी तारांचे कुंपण घालण्यात आले होेते. वसाहतीतील लोकांना दररोज तीन वेळा हजेरी द्यावी लागत असे. तसेच त्यांना वसाहतीबाहेर सक्तीचे काम करावे लागत असे. त्यांच्या लहान मुलांच्यासाठी ब्रिटिश सरकारने त्या काळात शिक्षणाची वेगळी व्यवस्था केलेली होती. त्यामुळे वसाहतीतील काही मुलांना त्या काळात शिक्षणाचा लाभ होत असे.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. सर्व भारतीय ब्रिटिशांच्या गुलामीतून स्वतंत्र झाले. मात्र तीन तारेच्या कुंपणात वसाहतीमध्ये बंदिस्त ठेवलेल्या भटक्या जमातीचे लोक स्वतंत्र होऊ शकले नाहीत. ते 1952 सालापर्यंत गुन्हेगार म्हणून त्या वसाहतीत बंदिस्त राहिले. 1952 साली स्वतंत्र भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सोलापूर येथील गुन्हेगार वसाहतीच्या तीन तारांचे कुंपण प्रातिनिधिक स्वरूपात तोडण्यात आले आणि वसाहतीत बंदिस्त असणारे लोक मुक्त करण्यात आले. त्यांना पुढे ‘विमुक्त’ या नावाने ओळखले गेले. त्या महाराष्ट्रातील जमाती उदाहरणार्थ बेरड, बेस्तर, भामटा, कैकाडी, कंजारभाट, कटाबू, बंजारा, राजपारधी, रजपूत भामटा, रामोशी, वडार, वाघरी, छप्परबंध आणि फासे पारधी इत्यादी होतं. या विमुक्त जमातींशिवाय गावोगावी भटकून पोट भरणार्या 28 भटक्या जमाती आहेत. त्या गोसावी, बेलदार, भराडी, भुते, चित्रकथी, गारूडी, घिसाडी, गोल्ला, गोंधळी, गोपाळ, हेळबे, जोशी, काशीकापडी, कोल्हाटी, मैराळ, मसनजोगी, नंदीवाले, पांगुळ, रावळ, सिक्कलगार, ठाकर, वैदू, वासुदेव, भोई, बहुरूपी, ठलारी, ओतारी, घ्यारेकंजर या जमाती पिढ्यानपिढ्या जगण्यासाठी भटकत राहिल्या.
वरील 28 भटक्या आणि 14 विमुक्त अशा एकूण 42 प्रमुख भटक्या जमातींची वर्गवारी खालीलप्रमाणे करता येईल.
1) व्यवसायाच्या निमित्ताने भटकणार्या जमाती
2) पशुपालक जमाती
3) कलावंत जमाती
4) देवदेवतांच्या नावाने भीक मागणार्या जमाती
5) कष्टाची कामे करणार्या जमाती
6) भविष्य सांगणार्या जमाती
7) शिकार करणार्या जमाती
8) प्रस्थापित जातींच्या मागत्या जमाती (रायरंद आणि डक्कलवार जमाती)
भटक्या विमुक्त जमातींची त्यांच्या सामाजिक जगण्यावरून वर्गवारी करण्यात आली आहे. ही विभागणी परंपरेने चालत आलेली आहे. भटक्या विमुक्तांचे व्यवसाय किंवा उपजिविकेची साधने जशी निरनिराळी आहेत तशी त्यांची उपजिविका करण्याची गावेसुद्धा त्यांनी आपापसात विभागून घेतलेली आहेत. त्या विभागणीनुसार भटक्या जमातीतील लोक त्याठिकाणीच उपजिविका करतात. कोणीही कोणाच्या विभागात हस्तक्षेप करत नाही किंवा अतिक्रमण करत नाही. मात्र तसे झाल्यास त्या त्या जमातींची जातपंचायत बसते आणि संबंधीत व्यक्तिला शिक्षा दिली जाते. त्यामुळे अनेक वर्षापासून पोट भरण्याच्या निमित्ताने भटकणारा भटक्या विमुक्तांचा तांडा गावगाड्याच्या भिकेवर चाकोरीबद्ध आणि परावलंबी जीवन जगत राहिला आहे. त्यामुळे स्वतंत्रपणे विचार करण्याची वृत्ती त्यांच्यात जोपासली गेलेली नाही. आपली पारंपरिक जगण्याची चाकोरी तोडण्याची हिंमत त्यांनी केली नाही. आपण, आपले कुटुंब आणि आपली जमात याच मर्यादित परिघात भटक्या विमुक्तांचे सामाजिक जीवन गावगाड्याच्या भोवती भोवर्याप्रमाणे वर्षानुवर्षे फिरत राहिले. परिणामी भटक्या विमुक्तांचे तांडे गावगाड्याजवळ असले तरी ते गावगाड्यापासून कोसो मैल दूरच राहिले. गावगाड्याने त्यांना कधीही आपले म्हणून स्वीकारले नाही. परिणामी ते पिढ्यानपिढ्या स्थिर जीवनापासून वंचित राहिले. सततच्या भटकंतीमुळे शिक्षणापासून आणि नवजीवनाच्या लाभापासून ते दुरावले. भटक्यांचे जगणे त्यांच्या वाट्याला आल्यामुळे त्यांचे जगणे हे परावलंबी स्वरूपाचे राहिले. त्यातून लाचारी आणि गरिबी नकळत त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग म्हणूनच सोबत करीत राहिली. भटक्या जमातींची मातृभाषा, सांकेतिक भाषा आणि काही जमातींचे चित्रविचित्र पेहराव प्रस्थापितांच्यापेक्षा वेगळे असल्यामुळे हे लोक गावगाड्याला नेहमीच परके आणि परदेशी वाटत राहिले. त्यामुळे काही जमातीत तर परदेशी हे त्यांचे आडनाव रूढ झाले. ते आजही कायम आहे.
महाराष्ट्रात असणार्या भटक्या विमुक्तांच्या सर्वच जमाती या मूळच्या महाराष्ट्रातील नाहीत. काही जमाती या महाराष्ट्राबाहेरून उपजिविकेसाठी महाराष्ट्रात आलेल्या आहेत. त्यामुळे स्वाभाविकच महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात त्यांना स्थान मिळू शकलेले नाही. आंध्र, कर्नाटक, गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातून आलेल्या जमाती अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात भटकत राहिल्या. मात्र त्या इथल्या लोेकजीवनापेक्षा सतत आपले अस्तित्व वेगळे ठेऊनच जगत राहिल्या. त्यापैकी गावगाड्याने ज्या जमातींचा वापर आपल्या हितासाठी करून घेण्याचा प्रयत्न केला त्या वडारी, कैकाडी आणि लोहार या महाराष्ट्राबाहेरील जमाती गावगाड्यात स्थिर होऊ शकल्या. त्यामुळे त्यांना स्थिर जीवनाचा लाभ काही प्रमाणात का होईना मिळू शकला. उदाहरणार्थ लोहारांनी गावगाड्यातील शेतकर्यांना शेतीसाठी लागणारी लोखंडी अवजारे तयार करून दिली. धान्य साठवण्यासाठी वेताच्या कणग्या कैकाड्यांनी दिल्या. गावगाड्यात अंग मेहनतीची कामे वडार समाज करीत राहिला. त्यामुळे गावगाड्यात त्यांना आश्रय मिळू शकला. मात्र पिढ्यान पिढ्या गावगाड्यात येणारा वैदू, कोल्हाटी, डोंबारी, रायरंद, दरवेशी, लमाण, मदारी, गारूडी, मरीआईवाले इत्यादी भटक्या जमाती निमित्तमात्र गावगाड्याच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना वरील जमातीप्रमाणे गावगाड्यात स्थैर्य मिळू शकले नाही. विशेषतः इंग्रजांनी ज्या भटक्या जमातींना गुन्हेगारी जमाती म्हणून घोषित केले होते त्या जमातींचे पुनर्वसन स्वातंत्र्योत्तर काळात शासन करू शकले नाही. त्यामुळे गावगाड्याच्या दृष्टिनेही त्या जमाती गुन्हेगारच राहिल्या. परिणामी पारधी, कंजारभाट, छप्परबंध, रजपूत, भामटा अशा काही जमातींना गावगाड्यानेही स्वीकारले नाही. त्यामुळे त्या जमातीकडे आजही गावगाड्यातील लोक गुन्हेगार जमाती म्हणूनच पाहत राहिले. कुठेही चोरीमारी झाली की फासेपारधी आणि तत्सम जमातींच्या लोकांना पकडले जाऊ लागले. आजचे वास्तव यापेक्षा वेगळे नाही. त्यामुळे पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी आजही या जमातींना आपले आयुष्य जाती व्यवस्थेच्या अंधारात चाचपडत जगावे लागत आहे.
महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जमातीपैकी ज्या जमाती कलावंत जमाती म्हणून ओळखल्या गेल्या त्या कोल्हाटी, डोंबारी, रायरंद, वासुदेव, जोगते, जोगतिणी, वाघ्या मुरळी आणि कडकलक्ष्मी यांना जगण्यासाठीचा आधार म्हणून आजवर त्यांनी आपल्या पारंपरिक कला जतन केल्या. त्या कलेतील अंधश्रद्धा, रूढी परंपरा याचे भान या जमातीला नसल्याने आपण उपजिविकेसाठी जे करतो त्यालाच शहाण्या, जाणत्या, शिकलेल्या प्रस्थापितांनी लोककला म्हटले आणि त्याच भ्रमात पिढ्यान पिढ्या या लोकांना बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला गेला. दारोदार पोटासाठी भीक मागणारा पोतराज किंवा मरीआईवाला लोककलावंत म्हणून स्वीकारला खरा मात्र तो नागर जीवनापासून सतत उपेक्षित ठेवण्यात आला. सामान्यांचे मनोरंजन करणारे कोल्हाटी, डोंबारी, रायरंद त्याच पारंपरिक परिघामध्ये बंदिस्त करण्यात आले. तमाशा आणि बैठकीच्या लावण्या सादर करता करता धनदांडगे प्रस्थापित लोक त्यांचे सर्वांगाने शोषण पद्धतशीरपणे करीत राहिले. त्याचे भान त्या कलावंतांना या समाजव्यवस्थेनं कधीही जाणवू दिले नाही. अशा तर्हेने गावगाड्याने आणि प्रस्थापितांनी कष्टकरी, कलावंत, भटक्या विमुक्त जमातींना सतत उपेक्षित, वंचित आणि याचकाच्या भूमिकेतच ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा ‘माणूस’ म्हणून कधीच विचार केला नाही. परिणामी हा समाज गावगाड्यापासून सतत दूर राहिला. स्वतःच्या उपजिविकेसाठी त्यांनी जात व्यवसाय स्वीकारले. त्यामुळे भटका समाज शिक्षणापासून दूर राहिला. तात्पर्य मुलामुलींना शिक्षण द्यावं असं वातावरणच कधी निर्माण झालं नाही. त्यांनी स्वतः निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही. तशी संधीही मिळू शकली नाही. मुलामुलींना शिक्षण देण्यापेक्षा किंवा शिक्षणासाठी आयुष्यातील बरीच वर्षे घालवण्यापेक्षा जाणत्या वयात चार पैसे कमावणारी मुलंमुली त्यांना अधिक जवळची वाटली. शिक्षण देण्यापेक्षा त्यांना पारंपरिक व्यवसाय शिकवणे अधिक पसंत केले. उदा. कलावंत जमातीची मुले पारंपरिक कलेच्या आधाराने उपजिविका करत राहिले. व्यवसाय करणार्या भटक्या जमातीतील मुले मुली जमातीच्या व्यवसायात लक्ष देऊ लागली तर पशुपालक जमातींच्या मुलामुलींना तोच आपल्या उपजिविकेचा व्यवसाय म्हणून पशुपालनातच त्यांचे आयुष्य गेले. देवदेवतांच्या नावाने भीक मागणार्या जमातीतील मुलेमुली आपल्या पालकांप्रमाणेच भीक मागून उपजिविका करत राहिले. अशा कितीतरी वेगवेगळ्या जमातीतील मुलामुलींनी शाळेत जाण्यापेक्षा आपल्या जात व्यवसासात जाणे अधिक पसंत केले. परंपरेने जात व्यवसायाचे साधन मिळाल्यामुळे आणि त्यांच्या आज येथे, उद्या तिथे अशा अस्थिर जीवनामुळे त्यांना शिक्षणाचा लाभ घेता आला नाही. अशा भटक्या जमातींना एका ठिकाणी स्थिर करण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित त्यांच्या मुलामुलींना शालेय शिक्षणाचा लाभ घेता आला असता. लहान वयातच चार पैसे कमाविण्याची सवय लागल्याने आणि त्यांच्या पालकांकडून तशाच पद्धतीची अपेक्षा वाढत गेल्याने शिक्षणाचे महत्त्व त्यांना समजले नाही. शाळा शिकून नोकरी करण्यापेक्षा आपला स्वतंत्र जात व्यवसाय करावा अशातर्हेची मनोवृत्ती प्रत्येक भटक्या विमुक्त जमातीमध्ये प्रकर्षाने जाणवते. याशिवाय पिढ्यानपिढ्यांचे अज्ञान, दारिद्य्र, अंधश्रद्धा आणि प्रस्थापितांपासून दूर किंवा तुटक राहण्याची सवय त्यामुळे या जमाती शिक्षणापासून वंचित राहिल्या.
स्वातंत्र्योत्तर काळात ज्या भटक्या विमुक्त जमातीतील लोकांना शहर वस्तीचा सहवास लाभला, स्थिर जीवन जगता आले, पारंपरिक व्यवसायाशिवाय अन्य व्यवसाय ज्यांनी स्वीकारले त्यांच्यावर अवतीभोवतीच्या वातावरणाचा परिणाम झाल्याने किंवा प्रस्थापितांचे जगणे अधिक जवळून पाहता आल्याने आणि ज्यांना काही प्रमाणात शिक्षण घेता आले अशा भटक्या विमुक्त जमातीतील काही शिक्षित तरूणांना 80 च्या दशकात भटक्या विमुक्त जमातींच्या उपेक्षित जीवनाबद्दल जाणीव झाली आणि स्वतःच्या अस्तित्वाची शोध मोहिम त्यांनी महाराष्ट्रात सुरू केली. वेगवेगळ्या जमातीतील जाणते कार्यकर्ते एकत्र येवून समाजाला आणि सरकारला जाहीरपणे प्रश्न विचारू लागले. हे देशाचे स्वातंत्र्य कोणासाठी? या अशा अनेक प्रश्नांची जाणीव झालेल्या भटक्या विमुक्त समाजातील शिक्षित तरूणांनी आपापल्या जमातीचे संघटन करण्याचा प्रयत्न केला. परिणामी वेगवेगळ्या सामाजिक संघटना आणि संस्थांची निर्मिती होऊ लागली. महाराष्ट्रातील भटक्यांच्या पालावर, तांड्यावर कार्यकर्त्यांचा जथ्था आपली माणसे शोधत फिरू लागला. माणसांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देऊ लागला. आपल्या न्याय हक्कासाठी फुले, शाहू, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे शस्त्र हाती घेऊन संघर्षासाठी ही तरूण मंडळी उभी ठाकली. त्यांचा संघर्ष होता समाजव्यवस्थेविरूद्ध, अंधश्रद्धेविरूरद्ध आणि रूढी परंपरेविरूद्ध! स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय मुल्यांसाठी तो संघर्ष अद्यापही संपला नाही.
भारतातील विषम समाजव्यवस्थेमुळे आणि अंधश्रद्धेमुळे पिढ्यानपिढ्या उदध्वस्त झालेला भटक्या विमुक्तांचा तांडा माणूस म्हणून सन्मानाने जगण्यासाठी आजही संघर्ष करीत आहे. कधी प्रस्थापित समाजव्यवस्थेत राहून तर कधी प्रस्थापित समाजव्यवस्थेला नाकारून. आज गरज आहे त्यांना माणूस म्हणून स्वीकारण्याची!!
– प्रा. रामनाथ चव्हाण
मासिक साहित्य चपराक, दिवाळी 2014