आठवण पुस्तकाची…  गोडी वाचनाची…

आठवण पुस्तकाची...  गोडी वाचनाची...

मी सहावीत होते तेव्हा लोकमान्य टिळकांवरचे ४० पानी पुस्तक ग्रंथालयातून वाचायला मिळाले. मला खूप आवडले ते. मी वाचनात रंगले पण वाचन झाल्यावर हे पुस्तक परत करायला लागणार म्हणून मी ते लिहून ठेवले. त्यावेळी ते काम चिमुकल्या हातांना कठीण होते पण पुस्तक प्रेमाने ते सहज झाले. 

खेडेगाव होते माझे. त्यामुळे अगदी एखाद्या घरी चांदोबा मासिक, वर्तमानपत्र, एखादे पुस्तक बघायला मिळायचे. आवडीच्या खाद्यपदार्थाकडे एवढ्या आधाशीपणाने कुणी पाहणार नाही तशी मी पुस्तकाकडे पहायची आणि ते पुस्तक मला वाचायला मिळावेच असे मनातून खूप वाटायचे पण मी लहानपणी अगदी  अबोल आणि मोठ्याशी बोलायला मुलखाची घाबरट होते. या भितीपेक्षा समोर दिसणा-या पुस्तकाचं गारुड मनावर इतके मोठे होते की मी हिम्मत करुन पुस्तक वाचनासाठी मागत असे. ही माझ्यासाठी मोठी लढाई असे पण एकदा का पुस्तक हातात आले की जग प्राप्त झाल्याचा आनंद होई. मग त्या पुस्तकाच्या वाचनात रंगल्यावर सारे जग मी विसरुन जात असे.

आठवीच्या वर्गात शिकत होते. समोरच्या ताई पाटलांच्याकडे म्रुत्युजंय कादंबरी होती. ती वाचायची परवानगी मिळाली या अटीवर की ती त्याच्या घरी बसूनच वाचायची. मी काय वाचायला मिळते म्हटल्यावर एका पायावर तयार. दिवसातले  दोन तास वाचनात गुल होत असत. एके दिवशी कामासाठी आईने खूप आवाज दिला पण वाचनाच्या समाधित ऐकायला कुठे येणार? आईची लाडकी असणारी मी, इतर भावंडांप्रमाणे कधीही मार न खाणारी मी, या वाचनाच्या मोहाने मात्र एकदा पाठीत आईच्या हातचा धम्मक लाडू खाल्ल्याचे आजही लख्ख आठवते. मोठ्या बहिणीने तिला वाचनासाठी आणलेल्या हिंदी, मराठी कादंब-या तिच्याआधी मीच वाचून घेई. पुढे मिळाली पुस्तके मनसोक्त वाचायला. घरात, शाळेत पाच मिनिटाचा अवधी मिळाला तरी वाचन सुरू. बसस्टँडवर, बसमध्ये प्रवास करतांना माझे पुस्तक वाचन सुरू असे. शाळेत काम करतांना आँफ पिरियड मिळाला किंवा अवांतर वेळ मिळाला की वाचन सुरु. सहकारी मैत्रिणी म्हणायच्या “सोन्यासारखी माणसे जवळ बसलेली असताना तुम्ही पुस्तकात गुंग!”

पण खरं सांगू? पुस्तकातून विचारधन मिळायचे ते सोन्याहून महान होते. तसे माणसांशी बोलणे चांगलेच पण पुस्तकाशी बोलणे अजून चांगले असा माझा अनुभव आहे. पुस्तके माणसांसारखी धोका देत नाही, वाद घालत नाही की कडाकडा भांडत नाही. उलट ती मायेने समजावतात तर कधी नवा मार्ग दाखवतात. म्हणून माणंसापेक्षा पुस्तके आपली वाटतात. पुस्तकाच्या मैत्रीतून सा-या जगाशी मैत्री झाली. पुस्तक आहेत म्हणून मी आहे असं आता मला वाटतंय. 

पुस्तकप्रिया सौ. सुरेखा बो-हाडे 
नासिक
मोबा. 9158774244

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “आठवण पुस्तकाची…  गोडी वाचनाची…”

  1. Nagesh S Shewalkar

    खरे आहे.
    वाचनाची गोडी सारे काही विसरायला लावते.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा