तो सुवर्ण योग

तो सुवर्ण योग

मासिक साहित्य चपराक, सप्टेंबर 2018

एका थोर माणसाच्या आणि माझ्या नावात खूप साधर्म्य, ते म्हणजे ज्ञानप्रबोधिनीचे सर्वेसर्वा अप्पा आणि मी पण अप्पा!

त्यांचे अप्पा हे नावही त्यांना ओळखणार्‍या माणसात प्रचलित आहे आणि मला ओळखणारे सर्वजण अप्पा म्हणूनच ओळखतात.

ज्ञानप्रबोधिनी नुकतीच सुरु झाली होती. अप्पांनी काही मुलांना जाहिरातीद्वारे मुलाखतीस बोलविले आणि त्यामध्ये त्यांनी माझी निवड केली.

त्यावेळी ज्ञानप्रबोधिनी एका दगडी दुमजली इमारतीत कार्यरत होती. तेथेच मुलांना शिकविले जाई. अप्पाही तेथेच राहत. त्यावेळी एक नाविन्यपूर्ण पद्धत होती. ती म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला एक पाकीट दिले जाई. त्या पाकिटात त्याने त्याला शक्य असेल ती फी घालून पाकीट बंद करून द्यायचे. ती सर्व पाकीटे फोडून त्यातील सर्व पैसे अप्पांना द्यायचो. त्यावेळी विद्यार्थी संख्या फार नव्हती.

एकदा अप्पांना मी गंमतीने म्हणालो, ‘‘अप्पा, त्यातील काही पैसे मी खिशात घातले तर?’’

अप्पा स्मितहास्य करीत मला म्हणाले, ‘‘प्रभाकरपंत, त्यासाठीच मी तुमची नेमणूक केली आहे.’’

मी अप्पांपेक्षा सर्वार्थाने अत्यंत लहान असूनही ते मला कधीच अरेतुरे म्हणत नसत. त्यांच्या दुसर्‍याला आदराने वागविण्याच्या थोर मनोवृत्तीबाबत नवल वाटे, आदर वाटे. आपल्याला असे वागता येईल का? असा मनात विचार येई.

अप्पांना माणसांची विलक्षण पारख होती. त्यांच्या बोलण्यात मार्दव असे. त्यांची वाणी शुद्ध, स्पष्ट आणि दुसर्‍यांवर निर्मळ छाप पाडणारी होती. ते बोलताना चेहर्‍यावर तेजस्वी वलय असल्याचे जाणवे.

त्यांची राहणी अत्यंत साधी होती. सुरवार, नेहरू शर्ट, टोपी, उंच पण तरतरीत चपळ शरीरयष्टी! वेगळा पोशाख असल्याने ते उठून दिसत. त्यांचे सौम्य, प्रसन्न बोलणे दुसर्‍याला आपलेसे करी.

त्यांना पाहिल्यावर या व्यक्तीच्या मनात काहीतरी भव्यदिव्य कार्य करण्याची महत्त्वाकांक्षा, तळमळ व त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असावी असे वाटे.

ते दुसर्‍याचे बोलणे शांतपणे ऐकून घेत. त्यामुळे त्या व्यक्तीलाही समाधान वाटे.

ज्ञानप्रबोधिनीकडे जे चेक येत ते भरण्यासाठी मी बँकेत जात असे. श्री. कोटीभास्कर यांचा ज्ञानप्रबोधिनीच्या प्रगतीमध्ये मोठा वाटा आहे. त्यांनाही मी पाहिले आहे.

थोर नेते एस. एम. जोशी यांचे घर जवळच म्हणजे भावे हायस्कूलच्या पाठीमागील गल्लीत होते. त्यांची पत्नी अप्पांची भगिनी होती. काही निरोप असल्यास किंवा फोनवरून कुणाला काही सांगायचे असल्यास मी त्यांच्याकडे जात असे कारण त्यांच्याकडे फोन होता. फोनजवळ एक वही होती. त्यात फोनची नोंद करण्याचे अप्पांनी मला सांगितले होते कारण त्या फोनचे पैसे दिलेच पाहिजेत असा त्यांचा कटाक्ष होता.
माननीय श्री. एस. एम. असले तर म्हणत ‘‘काही टिपू नकोस. अप्पांना आम्ही एवढी मदत करू शकत नाही का?’’

दोघेही फार मोठे होते. त्यांच्याकडे जाणे, एस. एम. यांचे दर्शन होणे मला आवडे. अप्पांनी ब्रह्मचर्य स्वीकारले होते. त्यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्य करण्याचा वसा घेतला होता. त्यामुळे मागे कोणताही व्याप ठेवला नव्हता.

अप्पांकडे एक सायकल होती. त्याचप्रमाणे एक एम 80 होती. त्यावरुन ते चटकन कोठेतरी जात आणि काम करून येत असत.

या अप्पांकडे मला शिस्तीत काम करण्याची सवय झाली. कोणत्याही घटनेकडे आकस न ठेवता व्यवस्थित बघण्याची दृष्टी लाभली. अप्पा मला तेथे काम करण्याबाबत जो मोबदला देत तो वास्तविक मला नको वाटे पण मलाही गरज असे. त्यांच्या हाताखाली कायम काम करावे अशी माझी मनोमन तळमळीची इच्छा होती.

पण मला सरकारी नोकरी लागली. माझे वडील शिक्षक असल्याने आणि दोन भाऊ, दोन बहिणी असल्याने, त्यांची जबाबदारी पार पाडावयाची असल्याने मी सहकार आयुक्त व निबंधक सह संस्था या कार्यालयात रुजू झालो. तसेच तेथे मी मन लावून व्यवस्थित काम करे. त्याचे अधिकार्‍यांना कौतुक वाटे. त्यावेळी मी ज्ञानप्रबोधिनीला काम केल्याचे सांगे. त्यावर ते म्हणत ‘‘म्हणूनच तुला लक्षपूर्वक व मेहनतीने काम करण्याची सवय आहे.’’ तेथील पतसंस्थेचे 20 वर्षे सचिव व अध्यक्ष म्हणून काम केले. सहकारी सेवकांची पतसंस्था पुढे आणण्यास माझा हातभार लागला.

ज्ञानप्रबोधिनी मुलांना शिक्षण शिस्तीने देण्यासाठी संघाचे स्वयंसेवक होते. त्यात डॉ. वसंत ताम्हनकर होते. ते लक्ष्मी रोडवर तापडीया खाऊच्या दुकानाच्या वर राहत. काही निरोप असल्यास तेथे जात असे. आता वसंतराव (अण्णा) हयात नाहीत. त्यांनी देहदान करून यथार्थ त्यागी जीवनाची सांगता केली.

माझे वडील पाली, अर्धमागधी, संस्कृत या तीनही भाषांचे गाढे अभ्यासक होते. काही प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझ्या वडिलांना पत्र पाठवून बौद्ध वाङ्मयाबद्दल शंका विचारत. डॉ. बाबासाहेब आमच्या घरी आले होते. प्रख्यात साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांचा वडिलांनी बाबासाहेबांशी परिचय करून दिला होता. न. म. जोशी यांचा तसा लेखही यापूर्वी ‘चपराक’ मासिकातून प्रसिद्ध झालेला आहे. माझ्या लग्नानंतर अप्पा आणि ते माझ्या 408, नारायण पेठ इथल्या घरी आले होते. अप्पांबद्दल त्यांना आदर होता. दोघे स्वामी विवेकानंदांचे अभ्यासक, भक्त व परिचित होते.

आज ज्ञानप्रबोधिनीचा ज्ञानवृक्ष प्रचंड वाढला. असंख्य विद्यार्थ्यांना त्यांनी फार मोठे व सुयोग्य ज्ञान दिले. जीवनाच्या अनेक शाखांतून त्यांनी यशस्वी पदार्पण केले आहे व आजही अनेक विद्यार्थी अनेक शाखांतून अनेक विकासाचे, भारताचे सुसंस्कृत नागरिक बनण्याचे शिक्षण घेत आहेत.

मा. अप्पा आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केलेल्या त्यागाला, मेहनतीला आणि श्रमाला आदरपूर्वक प्रणाम! अनंत शुभेच्छा!! अप्पांसारखी प्रेरणा घेतली, सर्वांना शिक्षण घेण्याची संधी मिळाली तर आपला भारत देश खूप पुढे जाईल व सर्वांवर सुसंस्कार होतील.

– प्रभाकर तुंगार
पुणे

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा