खोलवरच्या आवाजाला शब्द द्या!

खोलवरच्या आवाजाला शब्द द्या!

Share this post on:

मराठवाड्यातील साहित्यिकांसाठी ‘चपराक’ मासिकानं वेगळा निर्णय घेतला. त्याची सुरूवात झाली मराठवाड्यातूनच!! नव्हे; महाराष्ट्रातून त्याबद्दल चांगल्या प्रतिक्रिया आल्या. लिहिणार्‍या हातांना हे पाठबळ हवंच आहे. आपल्या अभिव्यक्तीला व्यासपीठ ही कल्पनाच चांगली आहे पण मी मागच्या अंकात जी भूमिका मांडली ती अजून विस्तारानं यायला हवीय असं वाटल्यानं पुन्हा एकदा हा संवाद साधतो आहे.

लेखनाच्या संदर्भात मराठवाड्यात वेगवेगळे प्रयोग होत आहेत. ते प्रामुख्यानं कथा आणि कविता या दोन साहित्यप्रकारात आहेत. कादंबरीत हे प्रयत्न खूपच कमी आहेत. नाटक तर अगदी एक-दोन एवढ्या संख्येवरच आहे. कवींची संख्या लक्षणीय आहे. महाराष्ट्राच्या मंचीय कवितेत ठळक असणारी नावं सध्या मराठवाड्यातील आहेत. कवितेत एक वेगळा बाज मराठवाड्याच्या मंचीय कवितेनं आणला आहे. हजारोंच्या संख्यनं उपस्थिती देणार्‍या रसिकांना पूरेपूर आनंद देणार्‍या कविता मराठवाड्यातील कवींकडून दिल्या जात आहेत. कवी संमेलन ‘हीट’ करणार्‍या या कवींना सतत मागणी आहे, ही खरं तर आनंदाची गोष्ट आहे.

कथेच्या क्षेत्रात सुद्धा चांगलं लेखन आहे. मराठवाड्याच्या जनजीवनाचं एक समग्र चित्रण वेगळी गोष्ट आहे. साहित्यात परिसरातील सामाजिक पर्यावरणाचा संबंध आला पाहिजे हा वादाचा विषय आहे. तुमच्या प्रतिभेसाठी आवश्यक असेल तर ते यावं पण जाणिवपूर्वक हे वातावरण आणणं, त्या प्रदेशातील भाषा वापरणं हा प्रयोग अनाठायी आहे असं एक मत आहे. साहित्यिकाला आलेले अनुभव, मिळालेलं ज्ञान आणि सुचलेल्या कल्पना या तीन गोष्टी साहित्यकृतीचं चांगलं-वाईटपण ठरवतात. अनुभव याचा अर्थ संवेदनशील मनाला समाजातील बर्‍या-वाईट गोष्टी दिसतात, ऐकू येतात आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्यापर्यंत पोचणारे प्रसंग, घटना इत्यादी आशय, मिळालेलं ज्ञान म्हणजे वाचलेलं साहित्य, आपण लिहिणार्‍या कलाकृतीचं वेगवेगळे प्रयोग आणि रचनाबंध यांची पूर्वसूरी.

सूचलेल्या कल्पना यात नवंपण अपेक्षित आहे. तुमची मानसिक जडणघडण, वैचारिक बैठक आणि लिहिण्याचं उद्दिष्ट यातून या कल्पना येतात. साहित्यात या कल्पनेला अतीव महत्त्व आहे. लेखनाचा आनंद, व्यक्त होण्याचा आनंद या कल्पनेला वेगळी उंची देतो पण वेगळं उद्दिष्ट ठेवून लिखाण करताना ही कल्पना साहित्याला उंची देऊ शकत नाही. त्यामुळं लेखकाला या कल्पनेकडं लक्ष द्यावं लागतं. त्याप्रमाणे लेखक देतातही. लेखनासाठी अनुभव, ज्ञान आणि कल्पना आपापली भूमिका बजावतात. म्हणजे कधी एखादा अनुभव येतो आणि लिहावंसं वाटतं. मग त्या अनुभवाला साहित्यकृती होण्यासाठी ज्ञान मिळवलं जातं आणि कल्पना शोधली जाते. कधी ज्ञान ही लेखनाची प्रेरणा होते आणि त्याला अनुभव व कल्पना मदत करतात. कधी कल्पना सुचते, त्याच्या मदतीसाठी अनुभव आणि ज्ञान धावून येतात पण त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तिघांचा सुंदर मेळ प्रत्येकवेळी जमेलच असं नाही. कधी अनुभव चांगला येतो पण त्याची साहित्यकृती होण्यासाठी ज्ञान आणि कल्पना मिळत नाही. तसेच ज्ञानाचं आणि कल्पनेचं! त्यामुळं साहित्यकृती न झालेले अनुभव, कल्पना लेखकांकडे पडून असतात. त्यामुळे साहित्यकृतीकडं पाहताना याचं भान आवश्यक आहे. लेखकांकडून होणारी ही अडचण लक्षात घ्यावी लागणार आहे. पुरेशा चिंतनाअभावी झालेलं लेखन असं लक्षात येतं.

उत्तम साहित्यनिर्मितीसाठी अनुभव, ज्ञान आणि कल्पना यांची आवश्यकता मी सांगितली. हे न पाळता साहित्य लिहिलं जातं पण त्यात सगळं वाईट सांगितलं जातं. किती भ्रष्टाचार वाढला, माणुसकी संपली, नाती दुरावली, गाव ओस पडतंय, शेती उद्ध्वस्त होतेय, कुटुंब बिघडलंय, शिक्षण नाकाम झालंय, पोरं बिघडताहेत इत्यादी. ही यादी खूप लांबच लांब होईल. ते भारंभार लिहिलं जातं आणि वास्तववादी म्हणत वाचलंही जातं पण त्यामुळं समाजात एक नकारात्मकता वाढत जाते. एका अपरिहार्य अडचणींमुळं एक परिस्थिती येते. ती परिस्थिती ते वर्णन करण्यात आणि शब्दबंबाळ पानं खर्च करण्यात साहित्य रमलंय. मानवी जीवनाचं सध्याचं स्वरूप अनेक गोष्टीचा परिपाक असतं. दारिद्य्र, असहाय्यता, शोषण इत्यादी मानवनिर्मित व्यवस्था आहेत. त्या व्यवस्थेचा भीषण चेहरा दाखवायचा, त्यांचं षडयंत्र सांगायचं किंवा त्याविरूद्धची लढाई दाखवायची सोडून आपण दारिद्य्राची वर्णनं करत बसतो. असहाय्यतेचं दर्शन घडवतो. शोषणाचे कारनामे रंगवतो. त्यामुळं साहित्य महत्त्वाचं ठरत नाही. ह्याला कोणी गांभिर्यानं घेत नाही.

हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे मराठवाड्यातील साहित्य याच दुष्टचक्रात अडकतंय. मध्यंतरी एकदा मराठवाड्यातील कथाकार आणि कवी मित्रांची भेट झाली. तो वयाचा चाळीशीचा. गावाकडच्या बिघडलेल्या अवस्थेबद्दल भरभरून लिहायचा. मी त्याला विचारलं, ‘‘तुम्ही कधी शुद्ध राजकारण पाहिलं? तुम्हाला कळायला लागल्यापासून झेडपी ते एमपी भ्रष्ट कारवाया पाहत आलात. मग तुम्ही ‘हे बिघडलं’ कसं म्हणता?’’

म्हणजे एक आदर्श व्यवस्था पाहिली असेल आणि आता त्यात अनागोंदी आली असेल तर ते लिहिणं स्वाभाविक! पण अनागोंदी पाहत मोठे झालात तर ‘हे बिघडलंय’ कशावरून? हां, तुम्ही काय चांगलं ते सांगा, काय बदलायचं सांगा, कसं बदलता येईल ते लिहा! भिकार आयुष्य तर एका टप्प्यावर सगळेच जगतात. बेरोजगारीत दिवस काढतात. भ्रष्टाचाराला बळी पडतात. अन्यायाचे फटके खातात पण आयुष्य थांबत नाही. ते पुढे जात राहतं. आयुष्याच्या या वाहतेपणाची गोष्ट हीच साहित्याची गोष्ट असते. कोंडलेल्या डबक्याची नव्हे!

मराठवाड्यातील वास्तविक प्रश्‍न वेगळे आहेत. नामांतराचा जसा लढा झाला तसं मराठवाडा विकासाचं आंदोलन झालं. महाराष्ट्र निर्मितीनंतर झालेलं आणि समाजजीवनावर परिणाम केलेल्या या महत्त्वाच्या घटना आहेत. त्याचे संदर्भ साहित्यात शोधावे लागतात इतकी याची अल्प दखल घेतली गेली. आंदोलनात निर्माण झालेली टोकाची परिस्थिती तितक्याच टोकदार शब्दात आली पण नंतर काय? ही एक वेगळी बाजू आहे. ती साहित्यात येत नाही. शेतीमध्ये, राजकारणात, नोकरीत, अगदी सगळीकडे बहुजनांचा कोंडमारा होतो आहे. त्याचा शब्द तेवढ्या ताकतीनं येत नाही.

मराठवाड्यात भूकंप झाला. जनजीवनात उलथापालथ झाली. त्याचं चित्रण कोठे आहे? संतांची भूमी असलेला हा प्रदेश! अनेक दिंड्या या प्रदेशातून जातात. त्यांच्या व्यवस्था या गावोगावी, पिढ्यानपिढ्या सुरू आहे. त्या परंपरेची सुंदर बाजू लेखनात नाही. आवाजी भाषा, अंगावर येणारे प्रसंग यातून खमंग करमणूक होते. साहित्य पुढं जात नाही.

ज्या साहित्यकृती झाल्या त्यांचीही पडझड होते आहे. आदर्श आयुष्याची वीण उसवतं आहे. हे खरं आहे पण त्याहून खरं हे आहे की, हे अपरिहार्य आहे. ही अपरिहार्यता लक्षात आल्यावर दुःख कशाचं? जुनं आयुष्य मांडत राहून ते गमावल्याचं दुःख किती दिवस गायचं?

माणसामाणसाला पुढे जाण्यासाठी कुठलीच ऊर्जा हे साहित्य देत नाही. माझ्या भागात पन्नास-पन्नास मोरांच्या झुंडी फिरतात. डोंगरातून, जंगलातून धावणारे मोरांचे थवे आहेत. हरिणांचे कळप आहेत. पाच-पाचशे हरिणांचे तांडे डोंगरभर हुंदडतात. दुसर्‍या बाजूला शेतकर्‍यांना गहू, हरभरा, ज्वारी पेरता येत नाही. एका दिवसात नव्या रोपाचे रानच्या रान मोरांकडून आणि हरिणांकडून साफ होतं. साहित्यानं काय लिहावं? मोरांचं आणि हरणांचं हुंदडणं की शेतकर्‍यांची अडचण? इथं साहित्याचा कस आहे. अशा प्रसंगांची मालिका वेगवेगळ्या उदाहरणासह इथं आहे. ज्याच्या दोन्ही बाजू पाहून लिहावं लागेल. त्याच्या तळाशी जावं लागेल. खोलवर असलेल्या आवाजाला शब्द द्यावा लागेल.

ज्या साहित्यकृती झाल्या त्याबद्दल हे टिपण नाही तर नव्या लोकाना रस्ता सापडावा यासाठीचं हे निवेदन आहे. तसं हे वेगळ्या माध्यमातून हाताळताना वेगळी साहित्यनिर्मिही होऊ शकतं. आपल्या अनुभवाला बळ मिळतं. वेगळ्या शक्यतांचं आभाळ दिसू लागतं. आपण करीत असलेले प्रयत्न निश्‍चित महत्त्वाचे आहेत पण त्या प्रयत्नांना आणखी जोम यावा हा उद्देश आहे.

-दिनकर जोशी
अंबेजोगाई
चलभाष : 7588421447

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

2 Comments

  1. श्री दिनकर जोशी, नमस्कार ,तुमच्या मनातील सर्व तगमग, समाजातील वास्तवतेचे संपूर्ण वर्णन मोकळ्या मनापासून
    केलेत.

  2. आजच्या लेखक कवींना खोलवर विचार करायला लावणारा, अंतर्मुख करणारा अप्रतिम लेख

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!