अब्रूदाराची आत्महत्या

अब्रूदाराची आत्महत्या

गाडीने वा अन्य कुठल्या मार्गाने तुम्ही पर्यटनाला गेलात तर देशाच्या कुठल्याही लहान-मोठ्या शहरात वा हायवेवर तुम्हाला एक आलिशान हॉट्रेल नक्कीच बघायला मिळालेले असणार. ‘कॅफे कॉफी डे’ असे त्याचे नाव आहे. देशात अशा अठराशे हॉटेलची साखळी आहे आणि तिथे एकाच पद्धतीची सजावट दिसेल व एकाच दर्जाचे खाद्यपेय पदार्थही मिळतात.

सुखवस्तु घरातील तरूण मुले किवा लहानमोठे व्यावसायिक यांच्यासाठी निवांतपणे भेटण्याची, गप्पा मारण्याची सुविधा असेच त्याचे एकूण स्वरूप आहे. अल्पावधीत म्हणजे काही मोजक्या वर्षात एका कल्पक उद्योजकाने ही साखळी उभी केली व अब्जावधी रुपयांची उलाढाल करणारा व्यवसाय निर्माण केला. त्यातून पन्नास हजाराहून अधिक लोकांना रोजगारही मिळालेला आहे. त्या उद्योजकाचे नाव व्ही. जी. सिद्धार्थ. कालपरवा त्याने अकस्मात कर्नाटकातील एका पूर आलेल्या नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आणि सर्वत्र खळबळ माजली. त्या घटनाक्रमाचा आरंभ, त्याच्याच ड्रायव्हरने सिद्धार्थ बेपत्ता असल्याची खबर कुटुंबियाना दिल्याने झाला होता कारण सिद्धार्थची इतकीच ओळख नव्हती. तो कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व माजी परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांचा जावई सुद्धा होता. साहजिकच त्याचे यश केवळ व्यावसायिकतेतून आलेले नाही ही बाब सहज लक्षात येऊ शकते. त्याचप्रमाणे त्याच्या बेपत्ता होण्याने राजकीय खळबळ उडण्याचेही कारण समजायला हरकत नसावी.

त्याचा तात्काळ शोध सुरू झाला आणि दरम्यान त्याने आपले सहकारी व कर्मचार्‍यांना लिहिलेल्या एका पत्राने खळबळ उडवून दिली. आपण व्यवसायात अपयशी ठरलो आणि आयकर खात्याचा दबाव, कर्जवसुलीचे दडपण आपल्याला असह्य झाल्याचे त्याने म्हटलेले होते. साहजिकच एकूण घटनाक्रमाला आत्महत्येचा वास येऊ लागला आणि तात्काळ त्याचे खापर कोणाच्या तरी माथी मारण्याचीही घाई सुरू झाली पण खरोखर सिद्धार्थला कोणी आत्महत्येला प्रवृत्त केले त्याचा शोधही घेण्याची कोणाला गरज वाटलेली नाही. कोण आहेत त्याचे खरे मारेकरी?

सिद्धार्थने आत्महत्या केली आणि त्याच्या पत्रामध्ये करवसुलीचा लकडा इतका उल्लेख येताच आयकर विभाग व भारत सरकारला आरोपी ठरवण्याचा राजकीय उत्साह कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी दाखवला पण इतक्या कारणाने कोणी कर्जबुडव्या आत्महत्या करीत नाही हे वास्तव त्यांना अनुभवानेही लक्षात आलेले नाही. करबुडवेगिरी वा वसुलीच्या दडपणामुळे कोणी आत्महत्या करायला प्रवृत्त होत असता तर सर्वात आधी माजी अर्थमंत्री चिदंबरम वा त्यांच्या सुपुत्राने कधीच आत्महत्या केली असती कारण त्यांना मागल्या दोन-तीन वर्षात त्याच दबावाखाली अनेकदा कोर्टात हजर व्हावे लागलेले आहे, जामिनावर जगावे लागत आहे. चिदंबरम यांचा पुत्र तर पासपोर्ट जप्त केलेल्या स्थितीत काहीकाळ गजाआड राहूनही आला आहे पण त्याने कधी आत्महत्येचा विचारही बोलून दाखवलेला नाही. विजय मल्ल्या किंवा नीरव मोदी तर देश सोडून फरारी झालेले आहेत. इडी वा आयकर यांच्या जाळ्यात अनेक उद्योजक, उद्योगपती घुसमटलेले आहेत पण त्यापैकी कोणी आत्महत्या केलेली नाही. मग सिद्धार्थनेच आत्महत्येचा मार्ग कशाला चोखाळला? कदाचित त्याला परदेशी पळून जाण्याची संधी मिळाली नाही म्हणून त्याने आत्महत्या केली काय? सहाराश्री वा तुणमूल कॉंग्रेसचे अनेक नेते अशाच कारणास्तव तुरूंगात गेलेत किंवा कोर्टाच्या फेर्‍या मारत आहेत पण त्यापैकी कोणी आत्महत्येचा टोकाचा मार्ग स्वीकारलेला नाही. मग सिद्धार्थलाही त्याच पद्धतीने जगता आले असते किंवा वकीलांना जाडजुड फी मोजून जामिनावर मुक्त वावरता आले असते. कारण करवसुली वा कर्जबुडवेगिरी यासाठी अजून तरी आपल्या देशात कोणाला फाशीची शिक्षा झालेली नाही. कॉंग्रेससाठी मते मागायला निघताना प्रियंका गांधीही आपल्या पती रॉबर्ट वाड्रा यांना इडीच्या कार्यालयात अभिमानाने नेऊन सोडत असतात. मग सिद्धार्थला टोकचे पाऊल उचलण्याची घाई कशाला झाली असेल?

सिद्धार्थ हा बहुधा या बाकीच्यांपेक्षा नको तितका सभ्य व अब्रूदार व्यक्ती असावा. त्याला अब्रू वा इज्जत म्हणजे जगासमोर उजळ माथ्याने सभ्य म्हणून जगणे असेच वाटत असावे. त्यामुळेच आपल्याला अटक होईल, आपल्यामागे तपासाचा ससेमिरा लागेल, जामिन मागण्याची वेळ येईल अशा गोष्टी त्याला बेअब्रू वाटलेल्या असाव्या. म्हणूनच ती वेळ येण्यापूर्वी त्याने जगाचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला असणे दाट शक्य आहे. बाकी तथाकथित प्रतिष्ठित वा नामवंतांपेक्षा सिद्धार्थ खूपच मागास असावा. आजकाल अनेक खटले कोर्टात प्रलंबित असणे वा जामिनावर बाहेर उजळ माथ्याने फिरण्याला अब्रूदार मानले जाते. त्याची खबरबातच त्याला लागलेली नसावी. अन्यथा त्याने ईडी वा आयकराच्या धाडींना राजकीय सूडबुद्धी ठरवून प्रतिष्ठेने एखादी निवडणूक लढवली असती. आत्महत्या नक्कीच केली नसती. मल्ल्याप्रमाणे त्याला परदेशी पळून जाणे शक्य नसले म्हणून काय झाले? त्याला राजकीय भांडवल तर करणे शक्य होते? मायावतींच्या भावावर धाडी पडल्या वा अनेक मालमत्तांवर जप्ती आली. त्याला कोडकौतुक म्हणतात की आयकर विभागाची कारवाई म्हणतात? ती कारवाई असती तर मायावती अशा गप्प बसल्या असत्या काय? भावावरच्या धाडींचे निमित्त घेऊन बहनजींनी मोदी सरकार दलितांच्या प्रगतीआड येत असल्याचा आक्षेप घेतला होता ना? यातली ‘प्रगती’ म्हणजे काय? मग सिद्धार्थलाही तेच कारण देऊन उजळ माथ्याने जगात वावरता आले असते की! आत्महत्येची काय गरज होती? नव्या राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात अशा धाडी हे प्रतिष्ठित मानचिन्ह झाल्याची बहुधा सिद्धार्थला साधी कल्पनाही नसावी. निदान त्याने असे पाऊल उचलण्यापूर्वी अभिषेक मनु सिंघवी किंवा कपील सिब्बल अशा कायदेपंडितांची तरी भेट घ्यायची होती. कुणा कॉंग्रेसवाल्याने ती भेट घडवून तरी आणायची होती. तर ही आत्महत्या नक्कीच टाळता आली असती.

पण सिद्धार्थच्या प्रतिष्ठा अब्रूच्या कल्पना खूप जुनाट होत्या आणि आपण आर्थिक गैरव्यवहार केला, घोटाळा केल्याचा गवगवा होण्यापूर्वीच त्याने इहलोकीचा अवतार संपवून घेतला. म्हणून तर त्या आत्महत्येचे दु:ख कुटुंबियांनी साजरे करण्यापूर्वीच कॉंग्रेसचे दिग्गज चव्हाट्यावर आले आणि त्यांनी या घटनाक्रमाला करवसुलीचा दहशतवाद घोषित करून टाकले. कर्जबुडव्याकडे वसुलीचा लकडा लावणे किंवा करबुडव्याकडे हिशोब मागण्याला दहशतवाद मानायचे असेल तर सरकार म्हणजेच सर्वात मोठा दहशतवाद असतो ना? तो थांबवायचा असेल तर खेड्यातल्या तलाठ्यापासून देशाच्या अर्थमंत्री, महसूलमंत्री अशा सर्व अधिकारपदांनाच रद्द करावे लागेल. मुळात अर्थमंत्रालयच निकालात काढावे लागेल. कारण कराची आकारणी वा वसुलीची मागणीच दहशतवादाचा गुन्हा होतो ना? पन्नास वर्षे देशाचा कारभार हाकलेल्या कॉंग्रेसची बौद्धिक दिवाळखोरी या एका घटनेतील राजकीय भांडवलातून समोर येऊ शकते. मल्ल्या किंवा नीरव मोदी इतके मोठे घोटाळे कशाला करू शकले? तर कॉंग्रेसला त्यांच्याकडे कर्जवसुली वा करवसुलीसाठी लकडा लावणेच दहशतवाद वाटलेला होता. अशी करांची वा कर्जाची वसुलीच करायची नसेल तर सरकारच्या तिजोरीत पैसा येणार कुठून आणि सरकारी खर्च चालवायचा कसा? याविषयीचेही ब्रह्मज्ञान चिदंबरम व मनमोहन सिंग यांनी जगाला द्यायला हवे होते ना? एकूण निर्लज्जम् सदासुखी असे का म्हटले जाते त्याचे उत्तर या वर्तनात सामावलेले आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ व श्रेष्ठ नेते सदासुखी कशाला असतात? त्याचे उत्तरही यातून मिळून जाते पण तेवढाच हा विषय नाही.

सिद्धार्थच्या आत्महत्येतला आणखी एक आरोपी आहे. आत्महत्येला प्रवृत्त करणेही गुन्हा आहे आणि या आत्महत्येला प्रवृत्त करणारा कोणी सावकार वा करवसुली अधिकारीही नाही. तो गुन्हेगारही समाजात उजळ माथ्यानेच वावरत असतो. त्याचा पर्दाफाश कोणी करायचा?

सिद्धार्थलाही आर्थिक संकटातून जिवंतपणी बाहेर पडता आले असते. दिवाळखोर वा कर्जबुडव्या म्हणून का होईना त्याला जगणे अशक्य नव्हते. नीरव मोदी वा मल्ल्या यांच्याप्रमाणे तोही वकिलांची फौज उभी करून प्रतिष्ठेने भारतातही आज जगू शकला असता. चिदंबरम यांच्याप्रमाणे जामिन घेऊन सरकारवर राजकीय सूडबुद्धीचाही आरोप सन्मानाने करीत जगू शकला असता. आत्महत्येची काय गरज होती? त्याचे उत्तर उपरोक्त नावांच्या प्रतिष्ठेत आपल्याला सापडू शकते. जेव्हा जेव्हा चिदंबरम यांच्यावर धाडीचा प्रसंग आला तेव्हा कोर्टात किंवा ईडीच्या कार्यालयात जाताना त्यांना पत्रकारांच्या कॅमेर्‍याने घेरलेले होते. त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली होती पण तोंडाला कुलूप लावून चिदंबरम निसटून जात राहिले. नंतर पत्रकार परिषद घेऊन अर्थसंकल्पावर पांडित्य झाडत राहिले पण एकदाही त्यांनी आपल्यावरच्या आरोपांवर खुलासा केलेला नाही. त्याविषयी तोंड वळवून पळ काढलेला आहे. त्याला आजकालची प्रतिष्ठा म्हणतात. त्या निमित्ताने वाहिन्यांवर माध्यमातून उलटसुलट चर्चा झाल्या व माजी अर्थमंत्र्याच्या अब्रूची माध्यमांनी लक्तरे केलेली आहेत. त्याला ओठातले हसू दाखवून चिदंबरम सामोरे गेलेच ना? त्यांनी कधी तोंड लपवले नाही किंवा प्रत्युत्तर दिले नाही. याला आपण सामान्य लोकांच्या भाषेत बेशरमपणा म्हणतो पण आजच्या राजकीय शब्दकोषात त्यालाच राजकीय प्रतिष्ठा म्हणतात. तितकी कुवत या सिद्धार्थपाशी नव्हती. तो अटकेला, जामिन वा कोर्टाच्या फेर्‍यांना घाबरला होता. सगळ्या वाहिन्यांच्या कॅमेर्‍यांनी घेरून विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची दहशत त्याला भयभीत करून गेली असावी. जिथे प्रतिष्ठेने, ताठ मानेने माध्यमांच्या कॅमेर्‍याला सामोरे गेलो, तिथे बदमाश, भामटा म्हणून तोंड दाखवायची त्याला लाज वाटली असावी. तिथेच त्याचा धीर सुटला. कायदा त्याला धाक घालत नव्हता. माध्यमात काढली जाणारी लक्तरे त्याला घाबरवून गेली.

कुणावरही, कुठलाही, कोणीही आरोप करावा आणि तात्काळ त्याची ब्रेकिंग न्यूज करून त्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या अब्रूची लक्तरे काढण्याची वाहिन्यांवर जी स्पर्धा चालू होते तो एक दहशतवाद झाला आहे. त्याला कोणाचा धरबंद उरलेला नाही. कसलेही बिनबूडाचे आरोप पुराव्याशिवाय केले जातात आणि मग प्रतिष्ठितांच्या कमावलेल्या नावाचे धिंडवडे काढण्याचा उत्सवच सुरू होतो. त्याची आज देशातल्या सर्व प्रतिष्ठित वर्गात कमालीची दहशत निर्माण झालेली आहे. म्हणून तर मल्ल्याने परदेशी फरारी झाल्यानंतर माध्यमांचे कान उपटलेले होते. तुमच्यातले कितीजण माझ्याकडे फुकटातली विमान तिकीटे वा हॉटेलची मौजमजा मागायला यायचे? त्याची इत्यंभूत माहिती गोळा करून ठेवलीय, असे मल्ल्याने ट्वीट करून म्हटलेले होते. आता माध्यमे व वाहिन्या आपली लक्तरे काढणार हे त्याने आधीच ओळखलेले होते आणि तशा दहशतीला आपण भीक घालत नसल्याचेही जाहीरपणे सांगून टाकले होते. कालपर्यंत त्याच्या कुठल्याही रासलिलांचे चित्रण कौतुकाने दाखवणारेच नंतर मल्ल्याची पापे रंगवून सांगू लागले होते. तो एक दहशतवाद होऊन बसला आहे आणि सिद्धार्थच्या आत्महत्येला तोच दहशतवाद कारणीभूत झाला आहे. जे कोणी अशा दहशत वा ब्लॅकमेलसमोर टिकू शकत नाहीत त्यांनी प्रतिष्ठित होण्याचा धोका पत्करण्यात अर्थ नसतो. सिद्धार्थला कायदा वा करवसूलीच्या कारवाईनी भयभीत केलेले नव्हते तर त्या कारवाईतून येणार्‍या देशव्यापी बदनामीच्या मोहिमांच्या भयाने त्याचा जीव व्याकूळ झालेला असणार. म्हणून तर त्यातून सुटका करून घेण्याचा एक सुटसुटीत मार्ग त्याने आत्महत्येतून शोधला. निदान आत्महत्या केली तर अशी गिधाडे आपले लचके तोडण्यापेक्षा काही काळ सहानुभूती तरी दाखवतील इतकीच त्याची अपेक्षा असू शकते. त्यामुळे सिद्धार्थला आत्महत्येला कोणी प्रवृत्त केले ते उघड आहे. त्याविषयी कोणी बोलणार आहे?

नेहमीप्रमाणेच विषयावर कल्लोळ माजवला गेला व जातो आहे पण सिद्धार्थने आपल्या सहकार्‍यांना वा कर्मचार्‍यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रातील आशय गदारोळात कुठल्या कुठे हरवला आहे. तो म्हणतो, ‘‘आपण यशस्वी उद्योगाचा आदर्श उभा करण्यात अपयशी ठरलो.’’ त्यात खरा आशय सामावलेला आहे. मुक्त अर्थव्यवस्था आली आणि कुणाही महत्त्वाकांक्षी व्यक्तीला अर्थकारणाची दारे खुली झाली पण महत्त्वाकांक्षेलाही व्यवहाराची लक्ष्मणरेषा पाळावी लागते. अन्यथा कपाळमोक्ष व्हायला पर्याय उरत नाही. तेच नीरव मोदी, मल्ल्या किंवा अनेक उद्योजकांचे झालेले आहे. झटपट मोठ्या यशाच्या मागे धावताना त्यांचा तोल जात राहिला आणि तो सांभाळण्यापेक्षा त्यांनी अतिरेकी धाडसाचा जुगार खेळण्यात धन्यता मानली. त्यांच्यावर अशी आत्मघाती स्थिती ओढवली आहे. तिचे दुष्परिणाम अपरिहार्य असतात.

त्यापासून सुटका नसते कारण व्यापार, व्यवहार आणि जुगार यात जमिन अस्मानाचा फरक असतो. जुगारात तुम्ही गमावून बसलात तर त्याचा दोष इतरांच्या माथी मारता येत नाही. त्याचीच कबुली सिद्धार्थने आपल्या पत्रातून दिली आहे पण तिकडे कितीजणांनी गंभीरपणे बघितले आहे? मल्ल्या, नीरव किंवा वाड्रा, चिदंबरम आणि सिद्धार्थ यांच्यात हाच मोठा मूलभूत फरक आहे. सिद्धार्थ तुमच्या आमच्यासारखा अब्रूदार आहे. त्याला आपल्या चारित्र्यावरचा कलंक प्रतिष्ठा म्हणून मिरवता आला नाही म्हणून त्याने आत्महत्येचा मार्ग चोखाळला. बाकीचे देशात प्रतिष्ठित म्हणून मिरवत असतात. आरोप करणारे प्रतिष्ठित आहेत आणि आरोपीही प्रतिष्ठित आहेत. आपण व सिद्धार्थ त्यांच्या प्रतिष्ठित जगात व नियमात उपरे असतो आणि म्हणून त्या जगात प्रतिष्ठित व्हायची महत्त्वाकांक्षा हाच आत्महत्येकडे घेऊन जाणारा निकटचा मार्ग असतो. मित्रांनो, म्हणूनच आपल्यातल्या एका अब्रूदार सिद्धार्थला आपण मोकळ्या मनाने श्रद्धांजली अर्पण करूया. लवकरच हीच माध्यमे त्याचे धिंडवडेही काढणार आहेत.

-भाऊ तोरसेकर
सुप्रसिद्ध पत्रकार
9702134624

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा