सावळबाधा

सावळबाधा

तुला शब्दांत उतरवणं खरंच सोपं नाहीये. तुझ्या अदा, मुड्स, नजाकती, यामुळेच खूप मुलखावेगळा भासतोस! …म्हणून कदाचित तू मनापासून भावतोस.

तुझं रिमझिमनं… संततधार झरणं… बेदरकारपणे बरसणं सारं आवडतं… मात्र रौद्ररूप तेवढं खटकतं. गोकुळातल्या नटखट कान्हासारख्या खोड्या करतोस. लक्ष लोचणे तुझ्या बरसण्यासाठी जेव्हा आतुर असतात तेव्हा सार्‍यांना तरसवणं तुला भारी जमतं…! आमच्या हातात मात्र तुझ्या झरण्यासाठी झुरणं इतकंच उरतं.

तू बरसतोस आणि तापलेल्या धरेला जणू सुखाच्या सरींनी शमवतोस. तुझ्या स्पर्शाने सृष्टीचा कण आणि कण शहारतो. जुनी कात टाकून, सर्जनतेच्या नव्या प्रवासासाठी सज्ज होतोस. मीही आकंठ बुडते तुझ्या बरसण्यात भान हरपून. खिडकीतून तुला कित्येक वेळ न्याहाळणं हा माझा आवडता छंद. तरीही थेंब स्पर्शन्याचा मोह अगदीच अनावर होतो. तुला ओंजळीत झेलताना होणारा आनंद वेगळाच असतो. नखशिखांन्त चिंब भिजावं वाटत असताना तू मात्र निघून जातो अचानक… मग कधी एखाद्या अवखळ वळणावर अवचित गाठतोस… भेटतोस… छत्रीविना! तुझं असं भेटणंच आवडून जातं अन् माझं छत्री विसरणंही रोजचंच होतं… पुन्हा पुन्हा.

तुझ्या सगळ्याच छटा भावतात. निरागसपणे रिमझिम बरसताना तू अंगणात दुडूदुडू धावणार्‍या बालकृष्णासारखा वाटतोस. छुमछुम पैंजणांचा पायरव अलवार रेंगाळत राहतो मनात. देव्हारातल्या देवाची सश्रद्ध मनोभावे पूजा करून मिळणारी पवित्रता जाणवते. धूप दीपाचा दरवळ प्रसन्न करतो. अगदी तसाच तुझा मृद्गंधही…! तुझी लोभस निरागसता धरतीच्या मातृत्वाला जागं करते. तिच्या कुशीतलं बीजही अंकुरू लागतं.

आषाढातला ‘तू’ प्रगल्भतेचा मुखवटा चढवून येतोस. सृष्टीचा पालनकर्ता, पोशिंदा बाप बनतोस. संततधार धारांनी भरभरून देतोस तुझ्याकडं असलेलं सारं काही ओतप्रोत. अवनी मग हिरवाईचा साज चढवू लागते तुझ्या श्रावणसरी झेलण्यासाठी.

श्रावणात तुझा नूर वेगळाच असतो. गोपिकांशी रासरंग खेळणार्‍या यौवनातल्या कृष्णासारखा. उन्हासोबतचा तुझा लपंडाव म्हणजे वेगळीच अनुभूती. अपार चैतन्यानं भरलेला सोहळा जणू. रेशीम हिरवाईवर रंगीबेरंगी चांदणफुलांची नक्षी असलेला शालू लेवून धरती तुझ्या स्वागतासाठी आतुर असते. जणू कृष्ण भेटीसाठी पैलतीरावर तिष्ठत असणारी राधा!! अन् गिरीकंदराच्या बासरीतून प्रवाही होत दुधाळ, मधाळ, फेसाळत… काहूर माजवणारी तुझी सावळधून! तुझ्या भेटीनं सारं चराचर तृप्त होतं. वेणूनादानं वृक्षवल्ली, पक्षी, प्राणी सारा आसमंत बेधुंद होतो. स्वत:ची हार मानत उन्हेही तुला मग बहाल करतात इंद्रधनूचा मुकुट! मुरारीच्या माथ्यावर शोभणार्‍या मोरपिसासारखा सप्तरंगी… पृथ्वी देखील खेळू लागते रासक्रीडा बेभान होत. प्रीतीचे, चैतन्याचे, समाधानाचे, तृप्तीचे… सारे रंग उधळते तुझ्यासोबत.

खरं सांग सावळ्या, गर्द काळ्या घनांतून तूच बरसतोस ना? तुझ्या राधेला, गोपिकांना, सख्यांना, सवंगड्यांना, गोपाळांना पुन्हा पुन्हा भेटण्यासाठी… पाऊस होवून!

-मीनाक्षी पाटोळे
राजगुरूनगर
9860557125

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

2 Thoughts to “सावळबाधा”

  1. sunil jawanjal

    पावसाबद्दल यापूर्वी इतकं सुंदर वर्णन कधीच वाचनात आले नाही अप्रतिम.. खूपच सुंदर

    1. Meenakshi Patole

      धन्यवाद सर

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा