डॉ. आंबेडकर यांनी दि. 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे धम्मदीक्षेप्रसंगी दिलेल्या 22 प्रतिज्ञा.
1) मी ब्रह्मा, विष्णु, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
2) राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
3) गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
4) देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही.
5) बुद्ध हा विष्णुचा अवतार, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो.
6) मी श्राद्धपक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही.
7) बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत कोणतेच आचार करणार नाही.
8) कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांचे हातून करवून घेणार नाही.
9) सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
10) मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
11) भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
12) भगवंताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
13) सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालनपालन करीन.
14) चोरी करणार नाही.
15) खोटे बोलणार नाही.
16) व्यभिचार करणार नाही.
17) दारु पिणार नाही.
18) ज्ञान, शील आणि करुणा या बौद्ध धर्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालविन.
19) माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणार्या आणि मनुष्यमात्राला असमान व नीच मानणार्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुद्धाच्या धर्माचा स्वीकार करतो.
20) तोच सद्धर्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
21) माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
22) इतःपर बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी मी प्रतिज्ञा करतो.
प्रस्तुत स्थळी आपण डॉ. आंबेडकरांनी धर्मांतरावेळी घेतलेल्या बावीस प्रतिज्ञांची चर्चा करणार आहोत. चर्चेकरता दीक्षाभूमी येथील स्तंभावरील 22 प्रतिज्ञांची प्रतिमा अधिकृत मानून तिच्या आधारेच उपरोक्त प्रतिज्ञांचे विवेचन करत आहे.
प्रतिज्ञा क्र. 1 ते 6 या संपूर्णतः नकारार्थी असून त्या हिंदू धर्म त्यागण्याच्या पार्श्वभूमीवर असल्याचे दिसून येते.
यानंतर प्र. क्र. 8 व 19 याही हिंदू धर्माशी संबंधित असून पैकी प्र. क्र. 8 ब्राह्मण पुरोहित विरोधी असून प्र. क्र. 19 मध्ये हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्म स्वीकृतीचा उच्चार केलेला आहे.
प्र. क्र. 5 हा बौद्ध व हिंदू धर्मातील फरक स्पष्ट करणारा भाग असून प्र. क्र. 9 ते 18 व 20 ते 22 हा बौद्धधर्मी स्वीकृती व वर्तनाशी संबंधित आहे.
या सर्व प्रतिज्ञांचे वरवर जरी चिंतन केले तरी यातून लक्षात येणार्या दोन प्रमुख बाबी म्हणजे या प्रतिज्ञा जशा बौद्ध धर्म स्वीकृतीच्या आहेत तशाच या धर्मांतर्गतनिर्मित नवीन पंथ स्वीकृतीच्याही आहेत. यामुळेच या 22 प्रतिज्ञांद्वारे बौद्ध धर्म स्वीकृतांचा समावेश ‘नवयान’ या पंथात होतो. ज्याचा व्यवहारात निर्देश ‘नवबौद्ध’ असा केला जातो.
या पार्श्वभूमीवर उपरोक्त 22 प्रतिज्ञांपैकी प्रथम 3 आपण विचारात घेऊ.
1) मी ब्रह्मा, विष्णु, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
2) राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
3) गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
डॉक्टरांनी सरसकट हिंदू देवी-देवता हा सरळ पर्याय न स्वीकारता क्रमाने ब्रह्मा-विष्णु-महेश तसेच राम, कृष्ण, गौरी-गणपती व मग हिंदू धर्मातील इतर देवदेवता अशी क्रमवारी घेतली आहे.
ज्या व्यक्तीला आपला पुरातन धर्म… येथे प्रतिज्ञा स्वरूपामुळे हिंदू हेच अपेक्षित आहे… त्यागायचा आहे त्याच्या मनाची तयारी, प्रतिज्ञा स्वीकृतीपर्यंत व्हावी हा यामागील हेतू असू शकतो परंतु यास्थळी उद्भवणारा महत्त्वाचा आक्षेप म्हणजे हिंदू व्यतिरिक्त इतर धर्मियांनी बौद्ध धर्मांतर्गत नवयान पंथात प्रवेश घेण्याचे ठरवल्यास त्यांना या प्रतिज्ञा लागू होतात का? नसल्यास नवयान पंथासह बौद्धधर्म स्वीकृतीनंतर आपल्या पुरातन धर्मातील देवी-देवतांचे भजन-पूजन करण्याचा त्यांचा हक्क हिरावून घेतला जातो का? वा अमान्य केला जातो का? तसेच याच प्रतिज्ञांच्या आधारे हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर धर्मीय उपास्य देवतेची आराधना त्याज्य मानली जाऊ शकते का? की त्यास या आज्ञांद्वारे अनुमती प्राप्त होते?
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका पंथाच्या द्वेषातून वा उपासना पद्धतीतील फरकावरून, मतभिन्नतेवरून स्वतंत्र पंथनिर्मिती समजता येते परंतु ज्या धर्माचा आपण त्याग करणार आहोत त्याचा द्वेष करून नवधर्म स्वीकृतीचा हा मार्ग कितपत योग्य आहे?
धर्मपरिवर्तन हे मत परिवर्तनातून होते. मग मतपरिवर्तनासाठी ज्ञान, जिज्ञासा सोडून द्वेषाचा आधार कशासाठी?
प्र. क्र. 4 व 5 अवतार संकल्पनेविषयी आहे.
4) देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
5) बुद्ध हा विष्णुचा अवतार होय हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो.
इथे हिंदू अवतार संकल्पना गृहीत धरली आहे परंतु खुद्द बौद्ध धर्मातील जातक कथा पूर्वजन्माधारे बुद्ध अवताराचे समर्थन करतात त्याचे काय?
प्र. क्र. 6 ते 8
6) मी श्राद्धपक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही.
7) बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत कोणतेच आचार करणार नाही.
8) कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांचे हातून करवून घेणार नाही.
हे पुन्हा धर्मांतरीत व्यक्तीने मूळ धर्मातील परंपरा आचरणात आणू नयेत याकरता घातलेले एकप्रकारे निर्बंध आहेत.
प्र. क्र. 11, 12 यातील संज्ञांची स्पष्टता प्र. क्र. 13 ते 18 मध्ये करण्यात आली आहे.
11) भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
12) भगवंताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
13) सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालनपालन करीन.
14) चोरी करणार नाही.
15) खोटे बोलणार नाही.
16) व्यभिचार करणार नाही.
17) दारु पिणार नाही.
18) ज्ञान, शील आणि करुणा या बौद्ध धर्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालविन.
प्र. क्र. 19 – 22 हा भाग जुना धर्म त्यागून नवधर्म स्वीकृतीचा आहे.
19) माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणार्या आणि मनुष्यमात्राला असमान व नीच मानणार्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुद्धाच्या धर्माचा स्वीकार करतो.
20) तोच सद्धर्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
21) माझा नवा जन्म होत आहे, असे मी मानतो.
22) इतःपर बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी मी प्रतिज्ञा करतो.
प्र. क्र. 9, 10, 22 हा भाग विचारात घेण्यासारखा आहे.
9) सर्व मनुष्यमात्र समान आहेत, असे मी मानतो.
10) मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
22) इतःपर बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी मी प्रतिज्ञा करतो.
यामध्ये सर्व मनुष्य समान मानत समता स्थापण्याचा उल्लेख आहे पण येथे कोणती समता अपेक्षित आहे? तसेच समता स्थापण्याचे कोणते मार्ग, पर्याय येथे सांगितले आहेत?
याचे उत्तर प्र. क्र. 22 मध्ये मिळते. जेथे मत, मन परिवर्तन ग्राह्य धरण्यात आले आहे. याकरता धर्मांतर ही बाब आवश्यक मानली असून याद्वारे ही अट फक्त बौद्ध धर्म व नवयान पंथ स्वीकृतांनाच लागू होत असल्याचे दिसून येत.
प्र. क्र. 22 मध्ये बुद्धाच्या शिकवणीनुसार वागण्याचा उच्चार आहे. आता इथे परत प्रश्न उद्भवतो की, बुद्धाची शिकवण म्हणजे काय? बावीस प्रतिज्ञांपैकी आरंभीच्या प्रतिज्ञा बुद्धाच्या शिकवणुकीत वा विचारांत अथवा वचनांत उल्लेखिल्या आहेत का? जर नाही, तर मग हा बौद्ध धर्मांतर्गत नवपंथ निर्मितीचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होते.
इथे आपण भूमिकांचाही विचार केला पाहिजे. घटना समितीचे सदस्यत्व लाभलेली व या प्रतिज्ञांचा उच्चार-प्रचार करणारी व्यक्ती एकच आहे परंतु दोन्ही ठिकाणी या व्यक्तीची भूमिका वेगवेगळी आहे. घटनाकाराच्या भूमिकेत आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता इ. तत्त्वांचा स्वीकार, पुरस्कार केला आहे परंतु बौद्ध धर्मस्वीकृती व त्या धर्मांतर्गत नवपंथ निर्मिती वेळी त्यांनी घटनासमितीतील भूमिका सोडत पारंपरिक पंथ निर्मात्याची भूमिका घेतल्याचे दिसून येते. हा बदल हेतुतः झाला वा असे होणे अपरिहार्य होते यावर चर्चा करणे अशक्य नाही परंतु ते प्रस्तुत विषयाच्या मर्यादेत बसत नाही.
तत्कालीन बौद्ध धर्मांतर्गत प्रचलित हीनयान व महायान या पारंपरिक पंथांहून वेगळा पंथ स्थापन करण्याचा मानस, डॉक्टरांचा धर्मांतरापूर्वीच निश्चित झाला असावा असे त्यांच्या ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथावरून प्रतीत होते. अन्यथा विपुल प्रमाणात बौद्ध संहिता, साहित्य उपलब्ध असताना त्यांना या धार्मिक ग्रंथलेखनाची आवश्यकता का भासावी? याच अनुषंगाने उपस्थित होणारा दुसरा प्रश्न म्हणजे बौद्ध धर्मांतर्गत नवपंथनिर्मितीची गरज आंबेडकरांना का वाटावी?
सामान्यतः एका धर्मांतर्गत जेव्हा अनेक पंथ-उपपंथ निर्माण होतात तेव्हा त्यांचा जन्म दुसर्या पंथाच्या विरोधात, चुरशीने झाल्याचे दिसून येते परंतु इथे थोडा फरक आहे. बाबासाहेब बौद्ध धर्मातील प्रचलित दोन पंथांचा येथे विचारच करत नाहीत व त्यांच्या टीकात्मक प्रतिज्ञांचा रोख सरळसरळ हिंदू धर्मावर आहे. ही गोष्ट त्या काळाशी कितीही सुसंगत असली तरी घटना इतिहासबद्ध झाल्याने याचे ग्रांथिक, वैचारिक परिणाम काय होतीच याचाही विचार होणे अपेक्षित होते.
यानंतरचा भाग आहे शब्दप्रामाण्यवादाचा. या बावीस प्रतिज्ञांनुसार हिंदू धर्माशी निगडित असे कोणतेही कृत्य करण्यास काही नवबौद्ध मंडळीं विरोध दर्शवतात परंतु त्याचप्रमाणे प्र. क्र. 14 ते 17 च्या पालनासंबंधी ते तितके आग्रही असतात का? इथे व्यक्तिगत अपवाद असू शकतात परंतु प्रश्न सार्वजनिक/प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे.
शब्दप्रामाण्यवादातून कट्टरता जन्म घेते हा इतिहास असून याचे भरपूर दाखले गतकालीन घटनांतून प्राप्त होतात परंतु त्यासोबत याचेही भान बाळगणे आवश्यक आहे व ते म्हणजे सहजीवनातून सर्वच बाबींची देवाण-घेवाण होत असते. त्यास विरोध करण्याने सामाजिक समरसता… जी समतेसाठी अत्यावश्यक आहे… कधीच अस्तित्वात येणार नाही.
धर्म-पंथ संस्थापक, परिवर्तकांचे विचार हे कालसापेक्ष असतात. कालातीत नाही. त्यामुळे कालसुसंगत त्याचा अर्थ घेत त्यात गरजेनुसार बदल करण्यातच व्यापक समाजहित सामावलेलं आहे.
-संजय क्षीरसागर
युवा संशोधक
चलभाष : 9987138224