घनश्याम पाटील यांची कृतज्ञतेची भावना
गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
मला आजअखेर अनेक पुरस्कार मिळाले, गौरव झाला; मात्र गडहिंग्लजकरांनी आपुलकीने केलेले कौतुक आणि झालेला सन्मान कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा आहे असे मी समजतो, असे गौरवोद्गार साप्ताहिक ‘चपराक’चे संस्थापक संपादक घनश्याम पाटील यांनी येथील कार्यक्रमात काढले.साधना प्रशालेचे माजी मुख्याध्यापक फ्रान्सिस रॉड्रिग्ज यांनी लिहिलेल्या ‘साधना’ या आत्मचरित्राचे प्रकाशन उत्साहात झाले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. पाटील बोलत होते. संत अन्थोनी चर्चच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. माजी आमदार ऍड. श्रीपतराव शिंदे अध्यक्षस्थानी होते. याच कार्यक्रमात घनश्याम पाटील यांना बेळगाव पत्रकार अकादमीतर्फे मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्राचार्य जे. बी. बारदेस्कर, प्रा. किसनराव कुराडे, प्रा. सुनील शिंत्रे, ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे उपस्थित होते.
प्रारंभी प्राचार्य बारदेस्कर यांनी स्वागत केले. श्री. रॉड्रिग्ज यांनी अत्यंत खडतर जीवनप्रवास करून त्यातील आनंद मिळविण्याचा केलेला प्रयत्न इतरांना प्रेरणादायक आहे. त्यांच्या आत्मचरित्रातून हा प्रवास तुम्हाला वाचायला मिळेल.
प्रास्ताविकात सुभाष धुमे म्हणाले, रॉड्रिग्ज यांचे साधना नावाने प्रकाशित झालेले आत्मचरित्र पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले तरूण पत्रकार व संपादक घनश्याम पाटील हे सुद्धा प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे. साप्ताहिक, मासिक आणि प्रकाशन संस्था असा व्याप मराठवाड्यातील एका तरूणाने पुण्यासारख्या शहरात करण्याचे केलेले धाडस कौतुकास्पद आहे. त्यांची प्रेरणा घेऊन इतरांनीही आपापल्या क्षेत्रात समाजासाठी उपयुक्त असे काम करावे.
प्रा. किसनराव कुराडे म्हणाले, आज एका शिक्षकाचे आत्मचरित्र प्रकाशित होत आहे. या परिसरात प्रसिद्धीपासून दूर राहून समाजासाठी सतत कार्यरत राहणारी अनेक माणसे आहेत. त्यांच्या कार्याची नोंद पुस्तकरूपाने होत आहे. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आणि समाजाला उपयुक्त ठरणारी आहे.
प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, साधना प्रशालेतील एका शिक्षकाचे आत्मचरित्र हा विषय खूप महत्त्वाचा आहे. केवळ शिक्षणक्षेत्रच नव्हे तर अन्य क्षेत्रांनाही या पुस्तकातून प्रेरणा मिळू शकते.
घनश्याम पाटील म्हणाले, आजचा कार्यक्रम आणि या परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत माझा झालेला सन्मान ही माझ्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मला यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहेत परंतु गडहिंग्लजसारख्या शहरातील जाणकार मंडळींनी अत्यंत आपुलकीने दिलेल्या सन्मानाचे मोल कोणत्याही पुरस्कारापेक्षा खूप उंचीचे व ताकदीचे आहे. या सन्मानामुळे आता माझी जबाबदारी वाढली आहे. जबाबदारीचे भान प्रत्येकानेच ठेवले पाहिजे. समाजातील वंचित मंडळींचे प्रश्न सोडविण्याचा जसा माझा प्रयत्न असतो त्याच पद्धतीने नवोदित लेखकांना लिहिते करण्याचा विशेष प्रयत्न माझ्या वृत्तपत्रातून करीत आलो आहे. नवोदित लेखकापासून ज्येष्ठांचे अनुभव माझ्या वृत्तपत्रातून वाचकांसाठी उपलब्ध करण्याचा माझा एक प्रयत्न आहे. वाचक संख्या कमी झाली, वाचन कमी झाले अशी तक्रार मला मान्य नाही. मी माझे पन्नास हजार दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवितो. याशिवाय चालू वर्षी माझ्या प्रकाशन संस्थेतर्फे 365 पुस्तकांचे प्रकाशन करण्याचे काम हाती घेतले आहे. सकस आणि चांगल्या साहित्याला वाचक खूप उपलब्ध आहेत. त्यांच्यासाठी आपण लिहित राहिले पाहिजे.
ऍड. श्रीपतराव शिंदे म्हणाले, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तिंच्या आत्मचरित्रातून नव्या पिढीसाठी काही चांगल्या प्रेरणा मिळू शकतात. रॉड्रिग्ज यांचे आत्मचरित्र सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या जीवनात अनेक खडतर प्रसंग येतात. त्या सर्वांवर मात करून जीवनाचा प्रवास करताना येणार्या अनुभवाची शिदोरी आपल्याकडे असते. याचेच पुस्तक केल्यानंतर तो दस्त भावी पिढीसाठी उपयुक्त ठरतो.
श्री. रॉड्रिग्ज यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले. या कार्यक्रमास पुण्यातील कवी रवींद्र कामठे, संतान बारदेस्कर, डॉ. सदानंद पाटणे, डॉ. उत्तमचंद्र इंगवले, प्रा. एस. आर. पाटील, सुरेश पवार, राजन पेडणेकर, दैनिक ‘कीर्तिवंत’चे संपादक दिलीप जगताप, सौ. सुमन जगताप, मोतीराम फर्नांडिस, गंगाराम शिंदे, मीलन फर्नांडिस, एम. ए. कुलकर्णी, कल्याणराव पुजारी, अशोक मोहिते, जे. वाय. बारदेस्कर, संदीप पवार, संतोष पवार यांच्यासह साधना परिवारातील शिक्षक, कर्मचारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर शिवराज महाविद्यालयात प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घनश्याम पाटील यांनी संवाद साधत विविध विषयांवर मार्गदर्शन केले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी चाललेले प्रयत्न या अनुषंगानेही त्यांनी मार्गदर्शन केले. शिवराज महाविद्यालयातील सर्व विभागांची त्यांनी पाहणी केली. यावेळी शंकरराव नंदनवाडे, बसवराज आजरी, प्रा. अनिल कुराडे, प्रा. चौगुले, प्रा. सुधीर मुंज, अनिल कलकुटगी, संदीप कुराडे, श्री. तेलवेकर आदी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
येथील ‘कीर्तिवंत’ दैनिकाच्या कार्यालयासही घनश्याम पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. संपादक दिलीप जगताप यांनी त्यांचे स्वागत केले. ‘आजची माध्यमांची भूमिका’ या संदर्भात चर्चा केली. गडहिंग्लजसारख्या ठिकाणी दैनिक सुरू करणे हे मोठ्या धाडसाचे काम असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी लक्ष्मण पोतदार, प्रदीप सुतार, सुनीता नलवडे आदी उपस्थित होते.