झुमरी

झुमरी

माझ्या लेकीची नवी कोरी सायकल घरी आली अन् तिच्या आनंदाला उधाण आले. मला म्हणाली, ‘‘आई, तुझ्या बाईकला तू ‘हरणी’ म्हणतेस ना! मग माझ्या सायकलला नाव सुचव!’’

मी गमतीनंच म्हटलं ‘‘झुमरी..!’

घरातील सगळेच हसायला लागले अन् माझी मनी मात्र रुसून बसली. तिला काही हे नाव आवडले नाही पण मला मात्र जाम आवडले. या झुमरीने माझ्या बालपणातील हरवलेले कित्येक क्षण परत दिले.

वाटून गेलं, सायकलचा वेग आपण आपल्या इच्छेप्रमाने कमी-जास्त करू शकतो. कुठं जायचं, कुठं थांबायचं, कुठं गतिमान व्हायचं अन् कुठून परत फिरायचं… सारं सारं आपल्या हातात असतं! जीवनाचा वेगही आपल्या हातात असता तर…?

खरं सांगू, मी परत बालपणीच्या वळणावर जाऊन थांबले असते! तेच लोभस, निरागस, निर्विकार जगणं मला आवडलं असतं!

आज इतक्या वर्षांनी सायकल हातात घेतली. खूपच भारी वाटलं. झुमरीबरोबर पहाटेचं निसर्गसौंदर्य वेगळंच भासत होतं! दाट धुक्यात निजलेली भीमा नदी जणू तिच्या भोवतीची वार्‍याची चादर माझ्याभोवती लपेटत होती. पावसाने सचैल न्हालेल्या अवनीनं माझ्या झुमरीसाठीच जणू हिरवाईच्या पायघड्या अंथरल्या होत्या. वळणावरचे आम्रवृक्ष लवून मुजरा करत होते अन् माझ्या मनाच्या सायकलचा यू टर्न घेऊन मी बालपणात पोहोचले देखील…

नानाच्या सायकल मार्टमधल्या रंगीबेरंगी सायकली तरळून गेल्या क्षणभर डोळ्यांसमोरून… तेव्हा ताशी एक रुपया भाड्याने सायकल मिळायची. त्यासाठी आधी आईकडे पैशासाठी तासभर तगादा लावायचा. पैसे मिळाले की सायकलपेक्षा धुमचकाट पळत नानाचं दुकान गाठायचं… पण सायकल इतक्या सहजासहजी मिळाली तर नशीब…! नेमकीच आपल्या उंचीची अन् आवडीची सायकल कोणीतरी घेतलेली असायची. आमच्या घराशेजारी मोकळं माळरान होतं. मग काय! ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सायकलचा शोध…! सायकल चालवणारा सापडला की त्याचा वेळ संपेपर्यंत त्याच्या मागे फिरायचं कारण इतकंच की त्यानं ती सायकल दुसर्‍याला देवू नये म्हणून… इतक्या परिश्रमानंतर ती सायकल हातात यायची अन् आम्हाला आकाश ठेंगन व्हायचं… गरूडावर बसून आकाशात भरार्‍या घेणार्‍या विष्णुला वाटत नसेल असा आनंद आमच्या चेहर्‍यावर झळकायचा…!

मागून येणार्‍या गाडीच्या हॉर्नमुळे मी भानावर आले पण चढावर मात्र मला सायकल कशीच रेटत नव्हती. तितक्यात पुढच्या हँडलला दोन अन् मागच्या कॅरेजला दोन पावाने गच्च भरलेल्या मोठाल्या पिशव्या घेऊन पाववाला माझ्याकडे बघत… गाणं गुणगुणत अगदी सहज चढ चढून दिसेनासा झाला. मनातून हेवा वाटला त्याचा. थोडासा रागही आला पण क्षणभरच… कष्टाला आनंदाची जोड मिळाली की माणूस अवघड वळणंही सहज पार करतो याची प्रचिती आली अन् वेगाचं म्हणाल तर पोटाची चरबी कमी करणार्‍यांपेक्षा पोटाची खळगी भरण्यासाठी राबणार्‍याचा आवेश जास्तच असणार! त्याच्याकडची सकारात्मकता घेऊन मीही स्वार झाले झुमरीवर… गाणं गुणगुणत…!

जिंदगी के सफर मे
गुजर जाते है जो मकाम…
ओ फिर नहीं आते…
ओ फिर नहीं आते…!

-मीनाक्षी पाटोळे
राजगुरूनगर
9860557125

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा