माझिया शिवारा घडो परिक्रमा

माझिया शिवारा घडो परिक्रमा

Share this post on:

आपल्या जवळ काय काय आहे याचा माणसाला पुष्कळदा विसर पडतो. कधी कधी अतिपरिचयात अवज्ञा झाल्यासारखेही होते. गावातील एक-दोन मित्र ‘वर्ष-सहा महिन्यातून आपण मित्र मिळून कोठेतरी फिरायला जाऊ’ असे अनेकदा म्हणत असतात. त्यांच्या त्या विचारांमुळे साहजिकच अंगात उत्साह संचारतो. ‘मग आपण फिरायला कोठे जाणार?’ असे विचारताच त्याचे उत्तर तयार असणार ‘गोवा’. त्याला गोवा म्हणजे त्यातील फक्त पणजी, तेथील सागर किनारा बघायला खूप आवडतं. तिथला समुद्र किनारा, निसर्ग मनाला भावतो, भूरळ घालतो. बाकीबाब बोरकरांच्या ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’ ही कविता आपोआप ओठावर नाचू लागते. मग आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा करून विषय संपवतो. मी एकदा दोनदा पणजीस गेलोही पण या मित्रांसोबत काही जाणे झाले नाही.

का कुणास ठाऊक पण मला सतत वाटत आलेय की केवळ निसर्ग बघण्यासाठी महाबळेश्वर, गोवा किंवा अन्य अशाच ठिकाणी जाण्याची काही गरज आहे असे नाही. गावालाही सुदैवाने चांगला, रम्य परिसर लाभलेला आहे. एखाद्या हौशी लेकरानं दिवसातून तीन-चारदा कपडे बदलावेत तसा हा निसर्ग प्रत्येक ऋतूत वेगळे रूप धारण करतो. गावातील काही माणसे डोंगरातील झाडे कधी सरपणासाठी तर कधी शेतीच्या कामासाठी तोडतात. क्वचित आर्थिक अडचणी भागवण्यासाठीही करवत हाती घेतात. तसे करताना त्यांची स्वार्थी नजर सृष्टीचं हिरवं रूप बघत नाही. जर असं झालं नाही तर सृष्टीचे हिरवेपण सतत बहरत राहील. गावातील पावसाच्या पाण्याचही तसचं. पावसाळ्याच्या सुरूवातीस गढूळ आणि पुढे हळूहळू नितळ होत जाणारं पाणी खळाळत गावाबाहेर निघून जात राहतं. आपण मात्र धरणं पाहण्यासाठी कोयना, भंडारदरा, जायकवाडीला जात राहतो. हे काही मनाला पटत नाही. म्हणजे जग बघायला नको असं नाही तर आधी परिसर बघायला शिकावं आणि मग जग. असं माझं मत. दहा वर्षे झाली असतील हाच विषय गावातील एका तरूण मित्राशी बोलताना काढला. गावास लाभलेला सृष्टीच्या हिरवेपणाचा मऊशार रेशमी, ओलेता स्पर्श अंगास होऊ द्यायचा असे आम्ही ठरवले आणि एका रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास गावास लाभलेल्या सात-आठ किलोमीटर लांबीच्या डोंगरावरून फेरी मारायचे ठरवले. त्याप्रमाणे आमची ही ‘गिरीपरीक्रमा’ सुरू केली.

माता आणि मातृभूमी स्वर्गापेक्षाही प्रिय असते असे एक सुभाषित आहे. त्याचा प्रत्यय गिरीपरीक्रमेच्या निमित्ताने नक्कीच येतो. दोन दिवस आधीच परिक्रमेचा दिवस निश्चित केला की मग दोन-तीन जोडीदार सहजच मिळतात. त्यासाठी कोणाला आपली रोजची कामे बुडवावी लागत नाहीत. नाहीतर कामे सोडून हे रिकामटेकडे उद्योग होतील. ही परिक्रमा केवळ मौजेखातर केलेले गिरीभ्रमण नसते तर ती आपल्या भोवतीच्या निसर्गाकडे आणि भूमीकडे, गावाकडे पाहण्याची नवी, सर्जनशील दृष्टी असते. एरवी आपापल्या गावाला लागून असलेला डोंगर गावातील बहुतेकांनी पाहिलेला असतो, नाही असे नाही तरीही तो मुद्दाम पाहणे हे विशेष असते. माणसाला तसे पर्वताचे आकर्षण फार आदीम आहे. त्याला गिरीशिखरे साद घालतात. तो दर्‍या-खोर्‍या आणि माळराने व डोंगरातूनही भटकत राहिला आहे. त्याने देवदेवतांची देवालये देखील गिरीकंदरी निर्माण केलीत. तेथे वाढणारी वृक्षराजी माणसाला आपली नातलग वाटत आलेली आहे. क्षणभराचा एकांतवास या ठिकाणी घडतो. तर ज्याला एकांतवासच हवा आहे त्याला तो एकांतवास डोंगरावरील हिरवाईमुळे सुखकर होतो.

सकाळी मी आणि दोन-तीन जोडीदार डोंगराच्या दिशेने चालत निघतो. एखादा किलोमीटर अंतर चालून गेले की डोंगर येतो. माती आणि दगडांनी बनलेला डोंगर. अर्थातच मातीमुळे कडुनिंबासारखी झाडेही भरपूर. चढणीच्या मध्यावर एक कडुनिंबाचे मोठे झाड आणि त्याच्या सावलीत दगडाच्या ठेंगण्याशा भिंतीवर टिनाचे पत्रे ठेवून तयार केलेले मावलायाचे मंदीर.

आतमध्ये भला मोठा पाषाण आणि त्याला शेंदूर लावलेला. कुणी बांगड्या, खेळ वाहिलेला, नारळ फोडलेला. बालपणी एका चुलतीसोबत आम्ही वर्षातून दोनदा तरी येथे दर्शनासाठी येत असू. या ना त्या कारणाने या मावलाया तिला छळायच्या असं तिला वाटायचं. अति श्रद्धेचाही हा परिणाम असावा यावर उपाय म्हणून मावलायांच्या सवाष्ण जेवू घालणे व नारळ फोडणे असे कार्यक्रम चालायचे. निघताना ती तिच्या मुलांना मावलायासमोर डोके टेकवायला लावायची आणि ‘आम्हाला म्हातारं करं!’ असं म्हणायला लावायची. आता ही मुलं जर काही क्षणातच म्हातारी झाली तर कसं व्हायचं! असं वाटून तेव्हा आम्हाला हसू यायचं पण विचार केल्यावर कळायचं की तिच्या तसं म्हणण्याचा अर्थ आर्यांच्या ‘जिवेत् शरद: शतम्’ सारखा होता.

डोंगराची चढण चढताना हा प्रसंग सतत आठवत राहिला. थोडे वर चढून गेल्यावर काटेरी कारीच्या झुडूपांना पिवळी पिवळी इवलाली कारीची फळं लगडलेली होती. त्यांना ‘कारं ’ म्हणतात. अधूनमधून त्यांनी मातकट लाल रंग माखला होता. ती पिकलेली होती. ती खाण्याचा मोह आम्ही आवरला नाही .काट्यातून काढून पिकली कारं एकदा तोंडात टाकली की ती लगेचच विरघळत असत. पुढे तिच गत बिगर काट्यांच्या ‘खरमटाची’ झाली. एव्हाना आम्ही डोंगर चढून पठारावर आलो होतो. आम्हाला कुणीतरी नवखे समजून गुराखी आपापली जनावरे दगडी पौळीच्या पलीकडे हाकलून लावत होती. पावसाळ्यात सगळ्याच डोंगरांवर गवत असताना लोक राखीव जंगलातच का गुरे चारतात याचं कारण मात्र काही कळालं नाही. आता बर्‍याच दूरपर्यंत चढण नव्हती. दोनेक किलोमीटर नुसते सरळच चालायचे होते. आम्ही विविध गवतांची, झुडूपांची फुलं, विविधरंगी फुलपाखरं, अधूनमधून दिसणारे पक्षी यांना पाहत चाललो होतो. रानवार्‍याची शीळ आणि पाखरांचे आवाज मनाला तरतरी आणत होते. चालता चालता एखाद्या जोडीदाराच्या मुखावाटे गाण्याचे सूरही उमटत होते. वाटचाल चालूच होती. डोंगराच्या पायथ्याशी गावतळे होते. हे भरले म्हणजे त्याचा ‘तुंब’ वरच्या बाजूस खूप दूरवरच्या आंब्याच्या झाडापर्यंत जात असे. आता ते तळे अर्धे भरलेले दिसत होते. काही गुरे तेथे पाणी पिण्यासाठी आलेली होती. त्या तळ्याच्या भिंतीवरून येणारी पाऊलवाट थेट डोंगराला भिडत होती. शिवाय पाण्याच्या बाजूने येणारी वाटही ओढा ओलांडून डोंगरालाच भिडत होती.

फक्त भिडण्यात काहीसे अंतर होते. एक काहीशी मागे भिडत होती तर दुसरी डोंगराने जेथे उंचवटा धारण केलेला होता तेथे भिडत होती. या उंचवट्याच्या भागाला ‘ससंमहांडूळ’ हे नाव होतं. या टेकडीवरून पुन्हा मोठी चढण होती. डोंगर देखील वर वर खूपच निमुळता होत गेलेला होता. पूर्वी आम्ही या डोंगरावर लीलया चढून जायचो. आता बर्‍यापैकी चढण जाणवत होती. हा ‘धारागिरी’! पावसाच्या धारा गावावर कोसळण्याआधी या गिरीवर कोसळतात, बरसतात म्हणून हा धारागिरी! येथे उंच वाढणारी झाडे नाहीत. सर्वत्र हेकळी, खैर, घेटुळी, तरवड, आराटी अशाच झुडूपांची दाटी. त्यामुळे आलेलं बारमाही हिरवेपण सांभाळणारा धारागिरी तसा शेळ्या-करडांचा लाडका. त्यामुळे शेळक्या-मेंढक्यांची कायमच वर्दळ असायची. तशी ती आजही होतीच. डोंगराच्या माथ्यावर हवा अंगाला स्पर्शून जात होती. तेथून आजूबाजूची गावे आणि तेथील झाडे, घरे इत्यादी दिसत होते. पुन्हा पुढील बाजूस उतार नि नंतर पठार! या पठाराच्या अंगाला लागून एक जुनाट दगडी तलाव. त्यात लालसर गढूळ पाणी साचलेले होते. भोवती गवतही उंच उंच वाढलेले होते. पुन्हा पुढे चढण होती. येथून वर चालत गेले की सातलिंग्या डोंगराची सुरूवात होते. डोंगरावर असणारी मुकुटासारखी सात निमुळती टोकं आणि त्यावरील प्रचंड मोठाली दगडं यामुळे गावात या डोंगराबद्दल अनेक लोककथा आहेत. या सात टोकांपैकी सर्वात मोठाल्या दगडांची जिथे वस्ती आहे त्या टोकाला ‘हत्तीखिळा’ हे नाव पूर्वापार आहे. त्या दगडांच्या सावलीत दुसर्‍या दगडावर बसणे आणि सावलीच्या गारव्याची अनुभूती घेणे खरोखरच अविस्मरणीय असते.

सावली किती गार असू शकते याचं टोकाचं उदाहरण म्हणजे हत्तीखिळ्याच्या दगडांची सावली! उजव्या बाजूला एक खोलवर दरी आणि पलीकडे डोंगराचा दुसरा भाग. त्यावर गारगोटीचे नुसतेच तुकडे सर्वत्र पडलेले. त्यामुळेच की काय या टेकडीला ‘गारमाळ’ हे नाव आहे. गारमाळावरून फिरत जाऊन खाली उतरलं की मग शेतं लागतात. नुसती लालसर-फिक्कट मातीची शेतं. इथं खरिपाची पीकं त्यातही कठण, तुरी, मुग्या चांगल्या येतात. या शेतातून साधारणतः दोन किलोमीटर चाललं की सुपात्या नावाचा छोटा डोंगर लागतो. नावाप्रमाणेच ‘सुलभ’ आहे. फारशी पत्थराई नाही. यावर कडुनिंबाच्या झाडांची संख्या अधिक. शिवाय उंची कमी त्यामुळे हा सुपात्या डोंगर आबालवृद्धांचा लाडका. त्यावर अर्धा पाऊणतास हिंडलं की मग ही गिरीपरीक्रमा पूर्ण होते. त्यासरशी आपण दमल्याची आणि थकल्याची आपली भावना प्रबळ होते. तरी घरापर्यंत चालत जायचे तर दोन-अडीच किलोमीटरचा प्रवास करावा लागतो किंवा आराम करावयाचा म्हटल्यास एखाद्या झाडाच्या सावलीचा आधार घ्यावा लागतो. अशी ही साधीशी, सहजपणे करता येणारी गिरीपरीक्रमा आपल्या गावाच्या निसर्गाविषयी आपल्याला सजग करते, जिवंत करते. निसर्गाने आपल्याला काय-काय दिले आहे हे आवर्जून दाखवते आणि गावकर्‍यांनी केलेल्या वृक्षतोडीबद्दल, डोळेझाकीबद्दल सतत उद्विग्न करते. गावात हरिनाम सप्ताहाच्या सुरूवातीला ग्रामप्रदक्षिणा होते. त्याला क्वचित एखादा बुवा नगरप्रदक्षिणा म्हणतो पण अनुभव मात्र गिरीपरीक्रमेच्या अगदी उलट असतो. या प्रदक्षिणेइतकी गिरीपरीक्रमा अजून गावकर्‍यांच्या अंगवळणी पडलेली नाही.

‘गळ्यामध्ये टाळ, मृदंगही बोले
ग्राम प्रदक्षिणा, घाणीतून चाले’

असा अनुभव येतो. प्रत्येकाला आपले घर अंगण स्वच्छ ठेवावेसे वाटते. त्यासाठी खास काळजी देखील घेतली जाते. ही स्वच्छतेची भावना शरीरापासून सुरू होते. त्यासाठी आंघोळी केल्या जातात. दिवाळीच्या दिवसात तर सुग्रास भोजनासोबतच आंघोळीला पहिली आंघोळ, दुसरी आंघोळ अशी नावे देतात. एक तर शरीराची स्वच्छता करायची आणि दुसरे म्हणजे पौष्टिक पदार्थांनी शरीराचं भरण करायचं असा हा दुहेरी कार्यक्रम असतो. तसंच मनाचं शुद्धीकरण करण्यासाठी चिंतन असतं.

मनाचं भरण करण्यासाठी त्याकाळच्या निरक्षर पण शहाण्या माणसांनी श्रवणभक्तीचा पायंडा पाडला. त्यामुळे टाळ, मृदंग, वीणा, पताका, ग्रंथ, कलश वगैरे घेऊन ग्रामप्रदक्षिणा सुरू होते. गावातील गृहिणी आपापल्या घरापुढे सडा टाकतात. जमेल तशी सफाई करतात. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. टाळकरी, वारकरी अभंग गात, वारकरीनृत्य करीत गावातून दिंडी जाते. गावातील लहान-थोर, स्री -पुरूष सारेच आनंदाने दिंडीत नाचतात. जागोजाग दिंडी थांबते तेथे अभंग म्हणण्यात येतात. वातावरणात रंग भरतो. वारकरी पावली खेळतात. थोड्या वेळाने दिंडी पुढे सरकू पाहते. नेमके त्याचवेळी गावकरी जे इतका वेळ निष्ठावंत झालेले असतात ते पाय चोरीत मुद्दाम हळूहळू चालू लागतात. विणेकर्‍याचा, मृदंगवाल्याचा नाईलाज होतो. ते तसेच पुढे सरकतात आणि वाटेवरील मानवी विष्ठेची घाण चुकवत, पावले टाकत आणि नाकातोंडाला उपरणे लावून पळू लागतात. इतक्या वेळच्या उत्साहाचा बेरंग होतो जणू. स्वच्छतेचे नारे लावून थकलेले लोक अजूनही असे का वागतात कळत नाही. ही वाट लोकांनी शौचासाठी वापरण्याची हक्काची जागा म्हणून मान्य केल्यागत! यात आपण काही गैर करतो आहोत, चुकीचे करतो आहोत असे न वाटण्याइतकीच निर्ढावलेली माणसे जेव्हा गावात दिसतात तेव्हा त्यांना कसे समजावे आणि कसे शिकवावे हेच कळत नाही.

ग्रामप्रदक्षिणा कशासाठी? हेच कळेनासे झालेले. खरे तर ही प्रदक्षिणा गावाच्या स्वच्छतेसाठी असते. रस्त्यावर शौचास बसू नये, शौचालयाचाच वापर करावा असे सांगणाराच त्यांना मूर्ख वाटू लागतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ‘ग्रामगीतेत’ अशा रस्त्यावर शौच करणार्‍यांना माकडांची उपमा दिली आहे. ते संत होते म्हणून त्यांनी माकडाची सौम्य उपमा दिली आहे. प्रत्यक्षात अशी घाण करणार्‍यांना माकडाची उपमा दिली की माकडांचाच उपमर्द केल्यासारखे होईल.

शरीर व घर याप्रमाणे गावाची सफाई करण्यास लोकांना वेळ नाही. जसे लोक तशी व्यवस्था हे आलेच. ग्रामपंचायतीचा शिपाई ‘जी मालक’ करणार! ग्रामसेवक गावात राहण्याऐवजी तालुक्याच्या गावात राहून गावाची सेवा करणार! गावचा सरपंचही मोठमोठ्या कामातच व्यस्त राहणार. मला काय त्याचे? असंच हाडीमासी बाणलेलं. नगरप्रदक्षिणेच्या सुरूवातीचे वातावरण पाहिले तर गावातल्या धार्मिकतेचा गर्व वाटतो पण त्या गलिच्छ रस्त्यावरची दिंडीची पळापळ पाहिली की आपण स्वर्गातून नव्हे तर नरकातून चालल्याचा आणि तो नरकही आपणच निर्माण केल्याचा साक्षात्कार होतो.

दररोज संध्याकाळी गावात हरिपाठ व्हायचा. संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठ! गावात एकदोन पंचरत्न हरिपाठ पाठ असणारी माणसेही होती. कातरवेळेला हा हरिपाठ सुरू झाला की तो शब्दन् शब्द कानातून हृदयात साठवावा असे वाटायचे. ‘नामामृत गोडी वैष्णवा साधली’ किंवा ‘हरिपाठ नामी स्थिरावले मन’ असे मन एका जागेवर स्थिरावले जाते. मनाला शांतता लाभते. विचाराला स्थिर बैठक लाभते. वातावरणात एक आर्तता भरून राहते. टाळ-वीणेच्या नादाने रोमारोमात संवेदना जाग्या होतात. गावातल्या या अभंग संस्कारांनी, कथा कीर्तनांनी माणसांच्या मनाचं किती भरण-पोषण केलंय! त्यामुळेच तर किती संकटे येतात, जातात तरी गावातली माणसं लव्हाळ्यासारखी टिकून राहतात. झाडांसारखी मोडून किंवा कोलमडून पडत नाहीत. ही माणसे एकाकी नाहीत. त्यांचा एक-दुसर्‍याशी बोलण्यात मोकळेपणा दिसतो. आजच्या या जागतिकीकरणाच्या आणि बाजारीकरणाच्या काळातही खेड्यातला माणूस स्वतःचे मूल्य टिकवून ठेवण्याची धडपड करतो याचं कौतुक वाटत असतं. मात्र सामाजिकतेच्या अंगाने जी समज अधिक विकसित व्हायला हवी ती तशी होत नाही. हेही जाणवत राहतेच. गावात व्यावसायिक प्रबोधनकारही कधी कधी येतात व मागणी तसा पुरवठा याच तत्त्वाने भाषणे, कथा, कीर्तने करून जातात. व्यापक समाजहिताची वाणवा मात्र सततच राहते.

गावातील माणसांना भांडणे करण्याचीही अनेकदा उर्मी येते. बहुतांश शेतकर्‍यांची बांधाच्या बाबतीत नाराजी असते. ज्याचे बांध जुने आणि आकाराने रूंद आहेत तेथे असे प्रकार कमी आढळतात. काही महाभाग तर बांधाला स्वतःच्या एकट्याच्या मालकीचे समजून त्यावरच पेरणी, लावणी करून भांडणाला निमंत्रण देतात. इतरत्र जो शेतकरी शेजार्‍यांचा बांध कोरतो तो चोरी करूनही समाधानी दिसत नाही. ज्याचा बांध कोरला जातो त्याच्या मनातही सतत असंतोष साचत जातो. त्यातून एकमेकांच्या मनात द्वेष भावना वाढत जातात. भावकीची भांडणं मनामनातून वाढत राहतात. जशी दिंडीची वाट अडवणारी मानवी घाण किळसवाणी आणि त्याज्य वाटते. तशीच मनात वाढत जाणारी ही घाण, किटाळ गावाच्या शांततेला खूपच मारक ठरल्याचे पाहून गावाची कीव येते.

असंच एकदा संध्याकाळच्या वेळेला गावातील मंदिरासमोर थांबलो होतो. लोक आपापल्या शेतातून घराकडे परतत होते. त्यामुळे अधूनमधून एखादी बैलगाडी खडखडत जवळच्या रस्त्यावरून जात होती. अशाच वेळी एक वयस्क दारुड्या उगीचच हातवारे करून कोणाला तरी शिव्या देत होता. एरवी खेड्यातली दारूडी माणसं कोणावर राग काढायचा असेल तर दारू पिऊन शिव्या देतात. नावे घेऊन शिव्या दिल्या की त्या नावाच्या लोकांकडून यथेच्छ मार खायला मिळतो. म्हणून अलीकडे गावाला म्हणून सामुहिक शिव्या हासडण्याचा अग्रक्रम या वाईट लोकांचा असतो. त्यातच गाव इतकं स्वाभिमान हरवून बसलं आहे की, कुणीही गावाला घाण शिव्या घालाव्यात आणि गावाने ते ऐकून घ्यावे. ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती बळावलेली असल्याने दारूडे अधूनमधून असा शो करीत असल्याचे दिसते. आजचाही प्रकार तसाच वाटत होता पण तो ज्याला निनावी शिव्या हासडीत होता त्याला ही ‘शब्दफुले’ आपल्यासाठीच आहेत हे माहीत असल्याने ती माणसेही मंदिराच्या दिशेने काठ्या-कुर्‍हाडी घेऊन धावत आले. आता नक्कीच काहीतरी खूप वाईट घडणार म्हणून लोकांचे श्वास रोखले पण त्या माणसांनी त्या ‘पेताड’ माणसाला हातही लावला नाही. शेताकडून त्या पिणार्‍या माणसाच्या धाकट्या भावाची बैलगाडी येत होती. त्याला या माणसांनी अडवले आणि तो खाली उतरल्यावर त्याच्या मानेवर कुर्‍हाडीने घाव घातला. तो त्या शेतकर्‍याने चुकवण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याच्या खांद्यावर तो घाव बसला. तरणाबांड शेतकरी उभा रक्ताने न्हाला. कुणाच्या करणीचे फळ कुणाला? हरीपाठादी, कीर्तनाचे वीस वीस वर्षे सप्ताह ऐकलेल्यांचे मन इतक्या लवकर कसे विचलित होते? असा प्रश्न हजारदा पडतो. की भजन-कीर्तनादी बाबी केवळ ऐकून सोडून द्यावयाच्याच गोष्टी वाटत असाव्यात. त्यामुळेच मनाची पक्वता आढळून येत नाही आणि परस्पर विरोधी वातावरण दिसू लागते जसे की कीर्तने, भजने करणारी माणसे तंबाखूदी व्यसने सर्रास करताना आढळतात.

तरीही गावातील मागच्या अशिक्षित पिढीला, अर्धशिक्षित, अल्पशिक्षित पिढीला दु:ख पचवून, कष्टात पिचून, जगण्याचं बळ देण्याचं काम भजन-कीर्तनवाल्या मंडळींनी दिलंय. गाव सोडून सहा- सहा महिने गावाच्या बाहेर जाऊन कष्ट करणारी माणसे गावातील सप्ताहादी भजन-कीर्तनादी कार्यक्रमाला गावात येऊन सात-आठ दिवस विसावतात. खरं तर अशा धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनात गावातील विशिष्ट लोक असले तरी गावातील कष्टकरी माणसे हीच खरी गावातील सांस्कृतिक, धार्मिक तसेच मनोरंजनपर कार्यक्रमाचे आधार असतात. त्यांच्या घामातूनच या अशा कार्यक्रमाला अनोखा गंध प्राप्त होतो.
प्रदक्षिणा किंवा भ्रमंती आपले ज्ञान आणि भान वाढवते. अधिक सजग करते आणि अंतर्मुखही करते. गिरीपरीक्रमा आणि ग्रामप्रदक्षिणा आपल्याला बदलाच्या दिशेने घेऊन जातात. अशीच माणसामाणसातील संवाद वाढवण्यासाठी ‘संवाद परिक्रमा’ निघाली तर माणसांची मन देखील लोभस होतील असं वाटत राहतं.

* खरमटं – जंगलात वाढणारे काटे नसणारे झुडूप. त्याला हरबर्‍याच्या आकाराची फळे येतात. ती पक्व झाली की गोड लागतात.

कैलास दौंड
पाथर्डी, जि. नगर
चलभाष : 9850608611

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!