नगर-एक पर्यटन स्थळ

नगर-एक पर्यटन स्थळ

आम्हाला नगर शहरच नाही तर सबंध जिल्ह्याचा अभिमान आहे. अहमदनगर जिल्हा संतांची पावनभूमी म्हणून ओळखला जातो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ई.स. 1272 मध्ये ज्ञानेश्वरी कथन करताना ज्या खांबाला ते टेकून बसत तो नेवासे येथील ‘पैस’ खांब भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे. या पवित्र स्तंभावर चंद्र, सूर्य आणि शिलालेख कोरलेला आहे. नेवासे नगरहून केवळ 56 किलोमीटरवर आहे. देव आहे पण देऊळ नाही, घरे आहेत पण दारे नाहीत असं शनी देवाचं जागृत देवस्थान शनी-शिंगणापूर नगरपासून 38 किलोमीटरवर आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तीर्थक्षेत्र असणारे शिर्डी, साईबाबांचे समाधी मंदीर नगरपासून 81 किलोमीटरवर आहे. बाबांच्या वास्तव्याच्या खुणा ते बसत असत तो दगड, त्यांनी वापरलेल्या अनेक वस्तू भक्तांना पहायला मिळतात. तेथूनच पाच किलोमीटर वर उपासनी महाराजांचे समाधीस्थान साकोरी आहे. पाथर्डीपासून जवळच असणार्‍या डोंगरावर मोहटादेवीचे मंदीर आहे. रेणुकामातेचे हे जागृत स्थान मानले जाते.

 

याच तालुक्यात वृद्धेश्वर येथे नाथ संप्रदायाचे ज्येष्ठ आदिनाथ यांची तपोभूमी आहे. येथे मच्छिंद्रनाथांचेही वास्तव्य होते. त्यांनी यज्ञासाठी प्रज्वलित केलेला अग्नी देवळाच्या परिसरात जिवंत ठेवला आहे. नगरपासून 35 किलोमीटरवर वृद्धेश्वर हे प्राचीन महादेवाचे मंदीर आहे. येथील शिवलिंग सतत वाढत असते अशी अख्यायिका आहे. कानिफनाथाचे समाधीस्थान असलेले मढी नगरपासून 51 किलोमीटरवर आहे. भटक्या समाजाची यात्रा, गाढवांचा बाजार, डुक्कर-मुंगुसांच्या केसांची विक्री आणि येथील जातपंचायत वैशिष्ठ पूर्ण असते. कर्जतपासून शंभर किलोमीटरवर सिद्धटेक येथे भीमा नदीच्या काठी अष्टविनायकापैकी एक उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाचे, अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले मंदीर आहे.

 

पारनेर तालुक्यात कोरठण खंडोबा हे जेजुरीचे ठाणे आहे. नगरपासून 90 किलोमीटरवर ह.भ.प. भगवानबाबा ह्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले ठिकाण आहे. वांबोरी येथे वाल्मिकींनी वाम तीर्थावर रामायण लिहिल्याची अख्यायिका आहे. नगरपासून 90 किलोमीटरवर रामेश्वर येथील अडीचशे फुट खोल दरीत कोसळणारा धबधबा आणि त्याच्या पायथ्याशी असणारे रामेश्वराचे हेमाडपंथी मंदीर नितांत रमणीय ठिकाण आहे. इतिहास प्रसिद्ध रतनगडाच्या पायथ्याशी अकराव्या शतकातील अमृतेश्वर मंदीर, श्रीगोंदे येथे सोळाव्या शतकातील हिंदू-मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेली शेख महमद महाराजांची समाधी आहे.

नगरपासून जवळच असणार्‍या टाकळी ढोकेश्वर येथील पांडवकालीन लेणी अजूनही सुस्थितित आहेत. कर्जतचे ग्रामदैवत गोदड महाराज यांची समाधी, दुर्गावचे दुर्योधन मंदीर आणि अश्‍वथाम्याचेही मंदीर आहे. राशीन येथील यमाई देवीचे जागृत देवस्थान, तेथील हलत्या दीपमाळा प्रसिध्द आहेत. बेलापूरचे केशव गोविंद मंदीर, कोल्हारचे भगवतीमाता मंदीर, अकोल्या जवळील अगस्ती मुनींचा आश्रम, अगडगावचे भैरवनाथ मंदीर, येथील भुताची यात्रा प्रसिध्द आहे. ताहाराबाद येथे महिपती महाराजांची समाधी आहे. पारनेर जवळ दर्याबाई पाडळे येथील वेल्हाबाई दर्याबाई देवीचे स्थान, पारनेर गावातील पारनेरकर महाराजांचा पूर्णवाद आश्रम, धरमपुरी येथील शेगावच्या गजानन महाराजांचे मंदीर, पुणतांबे येथील चांगदेव महाराजांची समाधी अशी अनेक पवित्र स्थाने नगर जिल्ह्यात आहेत. अनेक संतांच्या वास्तव्याने पवित्र झाल्याने या ठिकाणी भाविक नतमस्तक होतात, एक धार्मिक पर्यटन म्हणूनही नगर जिल्हा महत्त्वाचा आहे. या प्रत्येक ठिकाणांचे वैशिष्ट, तेथील जत्रा, यात्रा यावर स्वतंत्र लेख होईल.

नगर जिल्ह्यातील अनेक गावांना पौराणिक वारसा लाभलेला आहे. समुद्रमंथनाच्या वेळी अमृत प्राशनासाठी राहू हा दैत्य देवांच्या पंगतीत जाऊन बसला पण भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप घेऊन त्याचा वध केला. ज्या ठिकाणी त्याचा वध झाला ते ठिकाण म्हणजेच राहुरी. समुद्र मंथनाच्या वेळी देव जेथे रहात, त्या जागेला देवाची आळी, म्हणजेच आजची देवळाली प्रवरा! पाथर्डी ही बब्रुवाहन यांची राजधानी. अर्जुन बब्रुवाहन युध्द, अर्जुनाचा शोक, भगवान श्रीकृष्णाची शिष्टाई या कथा पाथर्डी तालुक्यात घडल्याचे सांगतात. पाथर्डी जवळ लोहसर गाव आहे. अमृत मंथानाच्या वेळी चोरून अमृत पिणार्‍या राहूचा वध झाल्या नंतर त्यांचे शीर राघो हिरवे येथे, तर गळ्यातील लोखंडी सर लोहसर येथे पडल्याची दंतकथा सांगितली जाते. अकोल्या जवळच्या टाहाकारी गावाची अशीच अख्यायिका आहे. येथे असणार्‍या पट्टा गडावर रावण-जटायू युध्द झाले. जटायू पराभूत झाल्यामुळे सीतेने टाहो फोडला, त्यावरून या गावाला टाहाकारी नाव पडले. प्रभू रामचंद्रांनी वनवासातील चौदा वर्षांपैकी काही काळ व्यतित केला ते कोपरगाव नगर जिल्ह्यातच आहे. दैत्याचे गुरु शुक्राचार्य यांचे वास्तव्य कोपरगावातील बेट भागात होते.

नगर शहरातल्या अनेक ऐतिहासिक वास्तू आजही पाचशे वर्षापूर्वीचा इतिहास सांगत आहेत. निजामशाहीचा संस्थापक अहमद बादशहाने बिदरचा सेनापती जहांगीरखानचा पराभव ज्या जागेवर केला, तीच जागा राजधानीसाठी निवडली. 1490 मध्ये या जागेवर कोटबाग निजाम नावाचा महाल त्याने बांधला. हुसेन निजामशहाने 1559 ते 1562 या काळात आत्ताची तटबंदी पोर्तुगीजांच्या मदतीने बांधली. एक मैल अंशी यार्ड परीघ असलेल्या या किल्ल्याला 22 बुरुज आहेत, तटाभोवती भले मोठे खोल खंदक आहेत. खंदक ओलांडण्यासाठी 1832 मध्ये झुलता पूल बांधण्यात आला. तो वर उचलला जात असे.

त्याकाळी किल्ल्यात सोन महल, गगन महल, मुल्क आबाद, मीना महल, रूप महल, बगदाद महल, दिलकशाद, मदरसा अशा इमारती आणि गंगा, जमुना, मछलीबाई, शक्करबाई या चार मोठ्या विहिरी होत्या. पेशव्यांच्या काळात तुळाजी आंग्रे, मोरोदादादा, नाना फडणवीस, सदाशिवराव भाऊंचा तोतया यांना बंदिवान म्हणून ठेवले होते. संभाजी राजांची पत्नी येसूबाई, मुलगी भवानीबाई आणि चौथे शिवाजी महाराज हेही काही काळ या किल्ल्यात बंदिवान होते. याच किल्ल्यात पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आदी बारा राष्ट्रीय नेते ‘चले जाव आंदोलना’च्या वेळी बंदिवासात होते हा इतिहास मागे आलेला आहेच. ड्युक ऑफ वेलिंग्टनने किल्ला जिंकल्यानंतर जेथे न्याहारी घेतली तेथे तोफ ठेवलेली आहे.

निजाम शहाच्या सौंदर्य दृष्टीचे प्रतीक असणारी दुमजली अष्टकोनी वास्तू ‘हस्त बेहस्त बाग’ पाईपलाईन रोडजवळ आहे. या महालात जाण्यासाठी होडीचा वापर करावा लागत असे. शाही परिवारातील स्त्री-पुरूषांसाठी हमामखाना, म्हणजेच स्नानगृह होते. जेथे येणारे पाणी शेंडी गावावरून खापरी नळातून आणले जायचे. अकबराचा मुलगा मुराद नगरवर स्वारी करण्यासाठी आला असता येथे वास्तव्यास होता. असा इतिहास आहे. येथून जवळ असणार्‍या बद्गीरखाना म्हणजे हवामहाल मनोरा होता. याच्या झरोक्यातून येणार्‍या वार्‍याच्या झोताचा वापर शाही कुटुंब स्नानानंतर केस वाळवण्यासाठी करीत. नगरच्या संस्थापकाच्या, अहमद निजाम शहाच्या चिरविश्रांतीच्या बागरोजा या ठिकाणचे आणि तालीकोटच्या लढाईतील विजयाची आठवण असणारे गुलामअली हत्तीचे स्मारक, कॅलिग्राफीसाठी प्रसिद्ध असणारी मजुरांनी एक एक दमडी साठवून बांधलेली दमडी मशीद या वास्तूंचे वर्णन मागील एका लेखामध्ये आलेले आहेच.

नगर सोलापूर रोडवर एम. आय. आर. सी. या लष्करी अस्थापनेजवळ भव्य रणगाडा म्युझियम आहे, ज्यात दुसर्‍या महायुद्धात वापरलेले रणगाडे, प्रसिद्ध पॅटन रणगाडे ठेवलेले आहेत. सर्वात जुना 1917 चा ‘रोल्स राईस’ रणगाडा आणि जालियनवाला बाग हत्याकांडात जनरल डायरने वापरलेले ‘सिल्व्हर फॉक्स’ जातीचे चिलखती वाहन येथे आहे. हे आशिया खंडातील एकमेव संग्रहालय आहे. जवळच फराहबक्ष म्हणजे सुख देणारा महाल ही वास्तू आहे. बुर्‍हाण निजाम शहाच्या पदरी असणार्‍या चंगेझखानच्या काळात ई.स.1576 मध्ये ही गुलाबी रंगाची वास्तू बांधली. पूर्वी आसपास उद्यान असणार्‍या या अष्टकोनी वास्तूत नाच-गाणी होत. दुसर्‍या मजल्यावर चिकाच्या पडद्याआड राजघराण्यातील स्त्रिया बसत. कारंज्यात सुगंधी अत्तर मिसळून वातावरण सुगंधी केले जायचे. चांदबीबी, सदाशिवराव पेशवे, मुराद काही काळ येथे वास्तव्यास होते.

नगर शहरात प्रवेश करताना दूर डोंगरावर एक वास्तू दिसू लागते, ती जरी चांदबीबीचा महाल म्हणून ओळखली जात असली तरी ती निझामशहाचा मंत्री सरदार सलाबतखान याची कबर आहे. समुद्रसपाटी पासून 3080 फुट उंचीवर शहा डोंगराच्या पठारावर सलाबतखानाने मरण्या अगोदरच 1580 मध्ये आपल्या कबरीसाठी ही वास्तू बांधली. तळघरात त्याची आणि त्याच्या पत्नीची तर आवारात दुसर्‍या पत्नीची आणि कुत्र्याची कबर आहे. दुर्बीण महाल म्हणूनही या वास्तूचा उल्लेख आहे. आता वरपर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता केलेला आहे. रात्री ही वास्तू प्रकाश झोतात खूप देखणी दिसते.

दमडी मशिदीच्या जवळच शहा शरीफचा दायरा नगरच्या धार्मिक एकात्मतेचे प्रतीक आहे. अहमदनगरचा दुसरा बादशहा बुर्‍हाण निजाम शहा, पंधराव्या शतकात शहा शरीफ हे साधू पुरुष गुजरातमधून नगरला आले. राजे मालोजी भोसले यांना पुत्र संतती होत नव्हती, म्हणून त्यांनी शहा शरीफची प्रार्थना केली. त्यांच्या कृपाप्रसादाने मालोजीना दोन मुले झाली त्यांची नावे शहाजी (शिवाजी महाराजांचे वडील) व शरीफजी अशी ठेवण्यात आली. शहा शरीफ 1617 मध्ये वारले, त्यांची कबर येथे आहे. औरंगझेबने येथील चौघडा बंद केला तेव्हा त्याला स्वप्नात येऊन शहा शरफने शाप दिला, त्यानंतर दोनच महिन्यांनी औरंगझेबचा नगर मुक्कामी मृत्यू झाला अशी कथा सांगतात. शहा शरीफ जेथे ध्यानस्थ बसत तेथे त्यांचा पलंग ठेवण्यात आला आहे.

औरंगझेबचे मृत्यूस्थळ असणारे आलमगीर हे ठिकाण नगर पाथर्डी रोडवर नगरपासून 6 किलोमीटरवर आहे. संभाजी राजांच्या वाढत्या आक्रमकतेचा बंदोबस्त कार्यांसाठी ई.स.1681 मध्ये दक्षिणेच्या मोहिमेवर निघालेला आलमगीर औरंगझेब 20 फेब्रुवारी 1707 रोजी नगर मुक्कामी वयाच्या 91 व्या वर्षी मरण पावला. तो जेथे मरण पावला ते हे ठिकाण. तेथे आता धार्मिक शिक्षण देणारी शाळा आहे. औरंगझेबच्या पार्थिवाला जेथे स्नान घातले तेथे कबर आहे. दफन मात्र तेथे न करता औरंगाबादला खुलताबाद येथे करण्यात आले.

फुलामुलांचे कवी म्हणून प्रसिद्ध असणार्‍या कवी रेव्हरंड टिळक ह्यांची समाधी म्हणजे साहित्यिकांचे स्फुर्तीस्थानच! त्यांचे ‘वनवासी फुल’ हे खंडकाव्य आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक ह्यांचे ‘स्मृतीचित्र’ मराठी साहित्यात अजरामर झालंय. 9 मे 1919 ला टिळक मुंबईत ख्रिस्तवासी झाले, त्यांच्या पार्थिवाचे दहन मुंबईत झाले असले तरी नंतर त्यांच्या अस्थींचे दहन नगर इथल्या लालटाकी जवळील रस्त्याजवळ असणार्‍या प्रोटेस्टंट ख्रिश्चन दफनभूमीत करण्यात आले. या समाधीवर रेव्ह. टिळक आणि कवी माधव ज्युलियन यांच्या ओळी आहेत,

तुझे स्मारक दिव्य
अक्षय महाराष्ट्राचिया अंतरी
अश्रूंची पडतात
दोन सुमने याही समाधीवरी

नगरच्या समृद्ध साहित्य परंपरेची आठवण टिळकांच्या समाधी रूपाने उरली आहे. प्रसिद्ध अभिनेते शाहू मोडक यांचा अस्थिकलश टिळकांच्या समाधीच्या मागील बाजूस पुरला आहे.

आता तुम्हाला समजलं असेल आम्ही नगरकर नगरवर का प्रेम करतो ते! ही सारी स्थाने नक्कीच पर्यटनस्थळे आहेत,जी पाहण्यासाठी एक दिवस पुरणार नाही. या शिवाय जिल्ह्यात अनेक निसर्गरम्य ठिकाणे व पहावे असं बरंच काही आहे, ते पुढील लेखात! तूर्तास नगरला या. ही सर्व माहिती जे कळकळीने सांगातात, ही स्थळे दाखवतात त्या भूषण देशमुख सरांना जरूर भेटा. त्यांच्या पुस्तिकेतूनच मी काही संदर्भ घेतले आहेत. त्या पुस्तिकेसाठी जयंत येलूलकर ह्यांचेही सहाय्य लाभलेले आहे. दर दहा वर्षांनी नगरमध्ये सर्व क्षेत्रात अमुलाग्र बदल होत गेले. त्यामुळे अनेक गोष्टी राहून जातील याची मला कल्पना आहे पण पुढच्या पिढीला आपल्या समृद्ध गावाचा परिचय केवळ इतिहास रूपाने न देता आम्ही अनुभवलेले नगर दाखवण्याचा हा एक प्रयत्न!

सदानंद भणगे
नगर
चलभाष : 98906 25880

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा