दारिद्य्र म्हणजे काय? दारिद्य्राची सर्वंकष व्याख्या कोणती? दारिद्य्र नैसर्गिक आहे की कृत्रिम? दारिद्य्राची निर्मिती कशी होते, दारिद्य्राचा निर्माता कोण? दारिद्य्र स्वनिर्मित असते की पर-निर्मित? असे काही प्रश्न विचारणारा व्यक्ती मानवतेचा दुश्मन या दूषणाने दूषित/संबोधित होऊन त्याला तथाकथित मानवतावादी व मानवाधिकारवादी फाडून टाकायलाही कमी करणार नाहीत. तरी मी मात्र असे प्रश्न विचारण्याचे धाडस करीत आहे व करणार आहे.
पुष्कळदा दारिद्य्राची संकल्पना स्पष्ट करताना नशीब, किस्मत, नियति, पूर्वजन्मीचे पाप अशी अवैज्ञानिक पद्धतीची छद्म/प्रच्छन्न कारणमीमांसा नकळत पुढे केली जाते व त्यानुसार दारिद्य्र-निर्मुलनाची प्रक्रिया भूतदया, माणुसकी, सहानुभूती सारख्या दयासृजित भावनेने व पद्धतीने राबविण्यात येते. वस्तुतः ही मांडणीच पूर्णतः अनैसर्गिक व भ्रामक आहे.
माझ्या मते कोणताही मानवसमूह (समाज), व्यक्ती, निसर्ग, भूभाग, सरंजामशाही, भांडवलशाही, सरकार (शासन/प्रशासन), नशीब, किस्मत, नियति, पूर्वजन्मीचे पाप इत्यादी प्रचलित संज्ञांपैकी कोणतीही संज्ञा (वा कारणमीमांसा) ही दारिद्य्राची/चा निर्माता नाही तर स्वेच्छेने दरिद्री राहू इच्छिणारा व्यक्ती स्वतःच स्वतःच्या दारिद्य्राचा निर्माता आहे! पचायला आणि पटायला अतिशय कठीण असे हे कटूसत्य स्वीकारणे तथाकथित सभ्य-समाजाला आजच्या या उजाखा (उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण)/(माझ्या शब्दात-ऊठ, जा आणि खाऊ लाग!) च्या तथा सत्योत्तर (POST-TRUTH)च्या युगातही शक्य होईल असे वाटत नाही. (या विचाराला काही अपवाद असतीलही पण अपवाद म्हणजे नियम नव्हे आणि नियमाला अपवाद असणारच!)
शासनाद्वारे यापूर्वी राबविण्यात आलेल्या, सध्या राबविण्यात येत असलेल्या वा यापुढेही राबविण्यात येणार्या कोणत्याही गरीबी हटाव योजनेचा उद्देश दारिद्य्र/गरीबी निर्मुलन हा कधीच नसतो! त्या सर्वच योजनांचा छुपा, छद्म, प्रच्छन्न उद्देश एकमात्र दारिद्य्र/गरीबी कायम टिकवून ठेवणे हाच असतो. पैसा, अन्नधान्य, सर्व सुविधा फुकटात वा अत्यल्पमूल्यात वा कोणत्याही श्रम/राबणुकीशिवाय पुरवून दरिद्री व्यक्तीला लाचार, आळशी, दीन-लीन, बेशरम, मुजोर, दारूबाज, नशाखोर, स्वाभिमान-शून्य इत्यादी बनवून त्याला सदैव दारिद्य्रातच ठेवण्याची ही शासनकर्त्यांंची क्लृप्ती असते.
दारिद्य्राचे निर्मुलन होण्यासाठी दरिद्री व्यक्तीला विनाकष्ट, फुकट, सहानुभूती किंवा तथाकथित भूतदया म्हणून काही रक्कम वा अन्नधान्यादि साहित्य पूरवून त्याचे दारिद्य्र, त्याची गरीबी दूर (?) करण्याचे आजवरचे पृथ्वीच्या पाठीवरील सारेच प्रयत्न फोल, अयशस्वी, तात्पुरते, (क्षणभंगुर), फसवे व राज्याची अर्थव्यवस्था बरबाद करणारेच ठरले आहेत. इतिहास, वर्तमानातील याचे कित्येक दाखले समोर असूनही अशा भ्रामक, फसव्या व निसर्गविरोधी योजना प्रसवून व राबवून (?) दरिद्री व्यक्तीच नव्हे तर संपूर्ण समाजासहित संपूर्ण राजव्यवस्थेची सुद्धा दिशाभूल करण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत. हे प्रयत्न म्हणजे कोणत्याही, कितीही सक्षम राज्याच्या अर्थव्यवस्थेवरील अनैसर्गिक मार व भार ठरून त्यासाठी अनर्थकारकच ठरणार आहेत.
सक्षम दरिद्र व्यक्तीच्या हाताला, डोक्याला, शरीराला, संस्कृतीला यथायोग्य काम, रोजगार, संधी, सुविधा, व्यस्तता, आरोग्य, शिक्षण पुरवून त्या सक्षम दरिद्र व्यक्तीला द्रव्य/अर्थ-निर्माता बनवण्यासाठी निसर्गसंमत व निसर्गाधारित योजना आखणे, राबवणे हा दारिद्य्र निर्मुलनाचा एक यशस्वी उपाय आहे. शिवाय यासोबतच लाचार, स्वाभिमान-शून्य, आळशी अशा असमर्थ (?) दरिद्र व्यक्तीला स्वाभिमान-संपृक्त, श्रम/कष्ट-संपृक्त होण्यासाठी प्रवृत्त करण्याकरिता सक्षम, अभ्यासपूर्ण अशा परिसर-वैशिष्ट्याशी सुसंगत व सुसंबद्ध उपाययोजना राबविणे क्रमप्राप्त ठरते. हे कार्य अत्यंत कष्टसाध्य व वेळखाऊ असले तरी हे अनिवार्य असे कार्य (!) ठरत असल्याने हे कार्य सुद्धा प्रामुख्याने करावे लागेल; परंतु असे सक्षम व सुफल उपाय हे सवंग व तात्काळ लोकप्रियतेसाठी पूरक ठरत नसल्याने अशा उपाययोजना राबविण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षच नव्हे तर अशा योजनांचा तिरस्कारच केला जातो, असे दिसून येते आणि पर्यायाने दारिद्य्र-निर्मुलन तथा गरीबी हटावसारख्या अनैसर्गिक, अनर्थकारक व फसव्या योजना (?) अनंत-काळ सुरूच (!) ठेवल्या जातील/राहतील याचीच तजवीज केली जाते.
‘‘दारिद्य्र, भूक सारख्या बाबी व्यक्तीला लाचार, दुर्बल, दीन-लीन, लाभ-शून्य, स्वाभिमानशून्य होण्याला तेवढ्या कारणीभूत नसतात; जेवढ्या बेइज्जती, अवहेलना, मानसिक यातना कारणीभूत असतात’’, या आशयाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक महत्त्वाचे प्रतिपादन मला अशावेळी आठवते. यासंदर्भात गांभीर्याने विचार केला असता प्रत्येकच विचारी, समंजस, प्रगल्भ, पूर्वग्रहमुक्त व्यक्तीला आठवेल की, त्यांनी ज्या व्यक्तीला दुसर्यांचे उतरलेले कपडे वापरताना, भूक मिटविण्यासाठी मजूरी करून अन्यांच्या अन्नावर जगावे लागताना पाहिलेय, तीच व्यक्ती स्वश्रम, मेहनत, हिंमत, नियतीशी लढाई लढण्याची दानत या स्वाभिमानी गुणांच्या आधारावर याच जीवनात आज लखोपती झाल्याचे व चारचाकी वाहनाने वावरत असल्याचे पाहिले आहे व पाहत आहे आणि आपापल्या परिसरातील अशी शेकडो उदाहरणे कोणालाही सहज आठवतील.
याचा सरळ-साधा निष्कर्ष काय? दारिद्य्र-निर्मुलन ही संज्ञा/संकल्पना परावलंबी, पर-साह्य, फुकटी, दयासृजित नसून स्वायत्त, स्वावलंबी, स्वहितसाधक, स्वाभिमानपूर्ण अशी स्वनिर्मितच आहे. जोपर्यंत व्यक्ती स्वतः ठाम निर्धार, निश्चय, संकल्प करीत नाही की, मला दारिद्य्रातून बाहेर पडायचेच आहे तोवर ती व्यक्ती कितीही मदत, सहानुभूती, फुकटी-परसाह्य इत्यादी मिळाले तरी दारिद्य्रातून बाहेर पडूच शकत नाही. पर्यायाने दारिद्य्र हे स्वनिर्मितच आहे हे स्पष्ट होते. (यालाही काही अपवाद असू शकतील पण अपवाद म्हणजे नियम नव्हे आणि नियमाला अपवाद असणारच!)
त्याचप्रमाणे सध्याच्या प्रचलित दारिद्य्र-निर्मुलन/ ‘गरीबी हटाव’च्या छद्म/प्रच्छन्न, अनैसर्गिक, अनैतिक व अनर्थकारी योजनेचे दुष्परिणाम म्हणजे यामुळे आपली लोकशाहीच धोक्यात येऊ लागली आहे. अशा सवंग लोकप्रियतेच्या योजनांमुळे आता येथील नागरिकांची त्यांच्या अधिकाराबद्दलची अत्याधिक, एकांगी जागृतता, तीव्रतम उद्दाम भावनेत रूपांतरित होऊन ती अराजकतेकडे झुकू लागल्याचे आम्हाला पहावे लागतेय आणि त्याचवेळी नागरिकांची आपल्या कर्तव्याप्रतिची भयानक उदासीनता सुद्धा पदोपदी जाणवू लागली आहे. पर्यायाने नागरिकांचे कर्तव्य आणि त्यांचे अधिकार यातील संवैधानिक समतोल भयंकर पद्धतीने डगमगू लागला आहे हे आपण बघतोच.
त्याचाच एक दुष्परिणाम म्हणजे सुबुद्ध व विचारशील नागरिकांमध्येच नव्हे तर सर्वसाधारण जनतेतही (विशेषतः भारतीय अर्थव्यवस्थेचा व समाजव्यवस्थेचा पाया असलेल्या शेतकर्यांमध्ये) यामुळे भयसूचक अशी नकारात्मकता घर करू लागली आहे. ही नकारात्मकता हळूहळू तरूणांमध्येही झिरपू लागली आहे आणि अशी नकारात्मकता कधीही विद्रोहाचे रूप धारण करू शकते हे ऐतिहासिक तथ्य नाकारता येत नाही. नागरिकांचे अधिकार व कर्तव्यांमध्ये आपल्या संविधानात जो सनदशीर व सुमधूर समतोल साधला/नमूद केला आहे, तो समतोलच जर अशाप्रकारे डगमगला तर संविधानावर आधारित लोकशाहीचे खच्चीकरण होण्यापासून रोखणे महाकठीण होऊन बसेल असे मला वाटते आणि याचे दूरगामी दुष्परिणाम काय होतील हे सांगायला कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही इतकी ही बाब स्पष्ट आहे.
एखाद्याला भरदूपारी, प्रखर सूर्यप्रकाशातही अर्ध्या रात्रीचा अंधःकारच दिसत असेल व तो आपल्या या दिसण्यावर ठाम असेल तर तुम्ही-आम्ही काय करू शकतो? त्याचप्रमाणे माझे हे मत एखाद्याला विचारणीयच वाटत नसेल, अविचारी व मानवाधिकार-विरोधी वाटत असेल तर मी काय करू शकतो? माझे हे मत, विचार तर्कशुद्ध, साधार वैज्ञानिक कारणमीमांसा, विचारव्यूहाच्या आधारे खोडून काढण्यासाठी माझ्या कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सबब यावर साधक-बाधक विचारविमर्श, चर्चा व्हावी असे मी नम्रतापूर्वक सुचवू इच्छितो. मी वैज्ञानिक विचारधारेचा पाईक असल्याने मी माझ्या विचार, मतावर ठाम आहे, असे म्हणण्यापेक्षा तटस्थ आहे असे म्हणणेच मला आवडेल.
असो.
(मधुश्री प्रकाशन, नाशिक द्वारा प्रकाशित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘माझी आत्मकथा’ या ग्रंथवजा पुस्तकातील पृष्ठ क्र. 108 वरील विवेचनावरून.)
(‘साहित्य चपराक’ – मे 2019)
– लखनसिंह कटरे
बोरकन्हार-441902, जि. गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)
7066968350